दीपस्तंभ – जुलै २०२४
वाचकहो, प्रस्तुत कवितेचा सूर तुम्हाला नकारात्मक वाटण्याची शक्यता आहे. पण कविता वाचून निराश न होता आपल्या वागण्याला दिशा देणारा दिशादर्शक ह्या अर्थानं कवितेकडे पाहता येईल. म्हणून हा आहे दीपस्तंभ!
आम्ही शिकलो नाही धडा
आजीच्या आठवणीतली पोहण्याची नदी
बिनवासाची बिनरंगाची
आम्ही दोन पिढ्यांत नासवली
आम्ही शिकलो नाही धडा
नळातून येऊ दिली भरभरून आत
बेसिन, सिंक, संडास,
ड्राय बाल्कनी, बाथरूम
सगळीकडून दिली सोडून बिनधास्त
आम्ही शिकलो नाही धडा
टूथपेस्टा, शँपू, साबण, डिटर्जंट,
टॉयलेट क्लीनर,
आणखीन कसले कसले सोपस्कार,
आणि फॅक्टर्यांची घाण
आम्ही शिकलो नाही धडा
आमच्या मागे नाही ना शहर,
त्यामुळे आम्हाला येतं छान पाणी
घाण पाण्याचा धोका
कशाला ठेवायचा ध्यानी
आम्ही शिकलो नाही धडा
पुढे असलेल्या गावांचा,
त्या लोकांच्या स्वास्थ्याचा
विचारही जाऊ दिला वाहून
आम्ही शिकलो नाही धडा
त्या पुढच्या गावांमध्ये
आहेत ना शेतकरी
भाज्या-फळं पिकवणारे, मासे पाळणारे
आम्ही शिकलो नाही धडा
त्यांची बाजारपेठ म्हणजे आमचं शहर
खातो आमचीच नदी आम्ही
मेडिकल इन्शुरन्स आहेच स्वादानुसार
आम्ही शिकलो नाही धडा
आम्ही शिकत नाही धडा
आम्ही शिकणार नाही धडा
आमचेच पाय आमच्याच घशा!