दृश्यकला आणि पालकत्व

जाई देवळालकर

निर्झरच्या जन्मानंतर दोन-तीन महिन्यांच्या सुट्टीनंतर पुन्हा शाळेत अर्धवेळ रुजू झाले. घरी आले की रोज संध्याकाळी आजूबाजूच्या जंगलसदृश परिसरात त्याला बाबागाडीत घालून, कधी कडेवर घेऊन आणि थोडा मोठा झाल्यावर चालत फेरफटका मारणे हा आमचा लाडका नित्यक्रम होता. संध्याकाळी उतारावर चालताना वेगवेगळ्या ऋतूंमधले झाडांचे आकार आकाशाच्या पार्श्वभूमीवर खूप सुंदर दिसायचे. झाडा-पक्ष्यांप्रमाणेच विजेच्या तारा आणि पळणाऱ्या माकडांकडे बाबागाडीत पहुडलेला निर्झर टक लावून बघत राही, बोट दाखवून हां हूं करे.

घरासमोरच्या अंगणात मी आणि निर्झरनी मिळून छोटीशी बाग केली होती. झाडांना पाणी घालणे, खुरपणे, चिखल करून त्यात मनसोक्त खेळणे, खराटा घेऊन अंगण झाडणे, शेणानी सारवणे, आळी करणे, कधी दगडविटा रचून वाट तयार करणे, फुले-पाने गोळा करून रांगोळ्या काढणे, धूळ-मातीत काठीने चित्र काढणे, हे आमचे आवडते उद्योग. धूळ असलेल्या पायरीवर पाण्याचे शिंतोडे उडाले, की ते चमकत आणि थेंबात धूळ बंदिस्त होऊन थेंब जमिनीला चिकटलाच नाही असा आभास व्हायचा.  अशा गमती निर्झरला जागोजागी सापडत.

त्याच काळात मी पहिल्यांदाच दगडातले कोरीवकाम करायला घेतले होते. भल्यामोठ्या दगडावर छिन्नी-हातोडी घेऊन मी काम करत असताना निर्झरही आजूबाजूला बागडत असायचा. घराबाहेरचे मी केलेले  भित्तिचित्र पार्श्वभूमीला होतेच. बरेचदा आम्ही दोघे आपापल्या गोष्टी अंगणात स्वतंत्रपणे करत असू. कधी मी एकीकडे गाणी म्हणायचे किंवा बरेच वेळा आम्ही गप्पच असू. तो सुरक्षित आहे न एवढी फक्त मी काळजी घ्यायचे. बाकी फार आखूनरेखून मी काही करायचे नाही.

अर्थात, पेंटिंग करायला मला निर्झर झोपण्याची वाट बघावी लागे. त्या काळात, पसारा टाळण्यासाठी, मी छोट्या कागदांवर ड्राय पेस्टलमध्ये काम करायला सुरुवात केली. पुढे आम्ही शाळेतल्या दुसऱ्या क्वार्टर्समध्ये राहायला गेलो. या घरात मध्यभागी मोकळा चौक, चौकाच्या आजूबाजूला खोल्या, चौकात चाफ्याचे झाड आणि कुमुदिनी असलेले छोटेसे तळे होते. निर्झरला दिवसरात्र माती-पाण्यात खेळण्याची सोयच झाली. बाहेरच्या झाडांवर चढून तो तासन्‌तास रमायचा. असंख्य प्रकारचे किडे, मुंग्या, फुलपाखरे, सरडे, खारूताई… क्वचित प्रसंगी विंचू-सापही सोबतीला असत. या सगळ्या सोयऱ्यांमधून शाळेत वेळेवर पोचणे हे मोठे संकटच असे. पुढे निरव झाला तेव्हा चौकातल्या कोपऱ्यात नेहमीच इझल आणि त्यावर कुठले न कुठले पेंटिंग घातलेले असे. तो सहा महिन्यांचा असताना माझ्या पेंटिंगचे प्रदर्शन झाले होते, त्याची तयारी चालू असे. तसेच मुलांनी जमवलेले शंख, शिंपले, काड्या, काटक्या, असंख्या आकार-प्रकारच्या शेंगा, बिया असा खजिना असेच. रांगणाऱ्या निरवनी एकदा त्या लहानशा तळ्यात पोहायला झेप टाकली. तेव्हापासून आम्ही त्यातले पाणी उपसून त्यात वाळू भरून ठेवली. मग तर मुलांची चंगळच झाली. चौकातली एक भिंत वर्षानुवर्षे रंगत राहिली. सुरुवातीला गेरू, माती, चुना, बीट, हळदीचे पाणी चालत असे. कधी सारवलेल्या अंगणात तीन दगडांची चूल आणि दीप्तीमावशीनी खास निरवसाठी बनवलेली भातुकलीतली मातीची चूल एकत्रच पेटायची. त्यातून मिळालेले कोळसेही भिंतीवर, जमिनीवर चितारायला उपयोगी पडायचे.

एकदा खिडकीतून बाहेर एक पिटुकले डोके वर आले. बघते तर निरवनी बाहेरच्या बाजूनी घराची सजावट करण्याचे मनावर घेतले होते. कुणीतरी बांबूची शिडी विसरले होते. त्यावर जवळपास आठ-दहा फूट चढून त्याची कसरत चालू होती. आई ठिकठिकाणी भिंती रंगवत असेल, तर मुले चौकातल्या एका भिंतीवर कशी समाधान मानणार?

एकदा कुणी पाहुणे असल्यामुळे आम्ही गप्पा मारत बसलो होतो. आतून काही आवाज येत नसल्याचे बराच वेळानी आमच्या लक्षात आले. आम्ही चौकात जाऊन पाहिले, तर तिथल्या खुर्च्या, स्टूल, फरशी आणि भिंतींसकट चौकाचा कोपरा न् कोपरा दोघांनी मिळून चिखलानी सारवला होता. हसावे की रडावे कळे ना. पाहुणे गेल्यावर चौघांनी मिळून साफसफाई करायला घेतली, तर त्यातही पाण्यात खेळायला मिळाले म्हणून मुले खूश. पसाऱ्याकडे कानाडोळा करत असलो, तरी अशा प्रसंगी सगळे तत्त्वज्ञान बाजूला पडून चिडचिड व्हायचीच. त्यातल्या त्यात अमित वातावरण जरा हलकेफुलके करत असे, त्यामुळे मुलांची बाजू घ्यायला घरात कुणी तरी असे. हे सगळे कमी म्हणून स्वस्तातले पोस्टर कलर्स, खडू, न्यूज प्रिंट पेपरचा रोल, मोठ्या आकाराचे पाठकोरे कागद आणि मोठ्ठे ब्रश नेहमीच हाताशी असायचे. कधीकधी तर आम्ही तिघेही कागद पसरून त्यावर बसून एकत्र तर कधी स्वतंत्र पेंटिंग करत असू.

करोनाकाळात मातीकाम, पेपर मॅशे, लगद्यापासून कागद, क्रोशे, शिवणकाम, भरतकाम, सुतारकाम, कोरीवकाम, स्वयंपाक, भाज्यांचे वाफे असे बरेच या चौकानी अनुभवले. क्रोशेची गोडी लागायला अविरत विणकाम, भरतकाम करणारी आजी मुलांनी पाहिली होती. वाढदिवसापासून ते लग्नप्रसंगी वस्तू हातानी बनवून भेट देण्याचा पायंडाही यातूनच पडला. शाळेतले हातमागावरचे कापड आणून घरी कपडे शिवून वापरण्याचे प्रयोग अजूनही चालू आहेत. भिंगानी उन्हाची तिरीप कागदावर आणून कागद जाळणे, त्यातून नक्षीकाम करणे, दगडावर दगड तोलणे, सावल्या पकडून चित्र काढणे, अशा अनेक शोधांची जननी म्हणजे हा चौकातला निसर्ग आणि चौकटीत न बसवलेला ऐसपैस वेळ आहे हे नक्कीच.

दोन्ही मुलांनी स्वतंत्रपणे घराबाहेरचे एकेक झाड शोधून त्यावर पडलेल्या फांद्या, बांबू सुतळीने बांधून भक्कम मचाण बनवले. तिथे आम्ही चौघेही संध्याकाळचे चहापान, सकाळच्या कोवळ्या उन्हात पुस्तक-वाचन करत असू. निर्झरनी त्या झाडाला एका फळकुटावर कोरीवकाम करून बनवलेला झोकाही टांगला. एकदा निरव आणि त्याच्या दोन मित्रांचा वाढदिवस त्या झाडाखाली साजरा करायचे ठरवले. आम्ही सगळ्यांनी पांढऱ्या मातीनी नक्षी काढून झाडे सजवली आणि तो परिसर झाडून, सडा घालून, चटया टाकून, ‘पार्टी व्हेन्यू’ म्हणून सज्ज केला.

गणपतीत चिकणमाती आणून गणपती बनवणे, दिवाळीत किल्ला आणि किल्ल्यावरची चित्रेही स्वतःच बनवणे हे आम्ही करत होतोच. पण बंगलोरला राहत असल्याने आजूबाजूच्या कन्नड आणि तमिळ शेजाऱ्यांचे पाहून निरव ‘गोलू’ही मांडायला लागला. त्यासाठी लागणाऱ्या बाहुल्या तो स्वतःच माती, कापड, कागदाचा लगदा अशा उपलब्ध साहित्यातून बनवायला लागला. स्वतःच पायऱ्या मांडणे, शेत, तळे, जंगल, नदी अशी आरास करणे हेही त्या अनुषंगाने आलेच. गोलूच्या निमित्तानी निरव देशातल्या कानाकोपऱ्यांतल्या बाहुल्यांविषयी माहितीही गोळा करायला लागला.

कृष्णमूर्ती शाळेत शिकवणे (खरे तर आमचेही शिकणेच) आणि शाळेच्याच आवारात राहणे यामुळे अनेक गोष्टी वातावरणातून झिरपत गेल्या. निसर्ग आणि मुक्तता हा वाढण्यातला अविभाज्य घटक झाला. ‘इट टेक्स अ व्हिलेज टु रेझ अ चाईल्ड’ हे मला अगदीच पटले आहे. आजूबाजूला आमच्या शाळेतले सहकारी चित्रकार, शिल्पकार, विणकर, कुंभार, सुतार, गायक, लेखक अशा कलाकारांचा वावर असेच. तसेच शाळेत कार्यशाळेसाठी आलेल्या लंबाणी, सिद्दी, हालक्की, भिल्ल, राठवा कारागिरांचे घरी येणे-जाणे असे. पटचित्रकार घरी येऊन कागदांच्या गुंडाळ्या सोडवत काहीशा भडक आणि उठावदार चित्रांकडे बोट दाखवून खड्या आवाजात बंगालीत गायला लागले, की मुले विस्मयचकित होऊन जात. फडचित्रकार मुकुलभैया गुळगुळीत बाटली चमक येईपर्यंत कापडाला घासून मग अत्यंत सुबक काळ्या रेघांनी चित्रे काढत असे. करवंट्यांमधल्या चमकदार, तेजस्वी नैसर्गिक रंगांत चित्रे रंगवी आणि संध्याकाळी चुलीवर झणझणीत, तुपात न्हायलेली दाल-बाटी स्वतः रांधून खाऊ घाले, तेव्हा त्याचा वेगळा अवतार मुलांना दिसे. रात्री उशिरापर्यंत भट्टी चालू ठेवणाऱ्या डोकरा कलाकारांबरोबर, लाल भडक तापलेले पितळ साच्यात मेणाची जागा घेतानाचा जादूई कार्यक्रम उकिडवे बसून गालावर हात ठेवून निर्झर देहभान विसरून बघत राही. मग त्या बंगाली राधामाशीही छोटा मेणाचा तुकडा त्याच्या समोर टाकत. आई आणि मुलगा आपापली पेंडण्ट बनवून भट्टीत लावायला देत. आठवडाभराच्या मेहनतीनंतर तयार झालेले पदक मातीच्या आवरणातून फोडून बाहेर काढताना उत्सुकता शिगेला पोहोचे. ते स्वतः घडवलेले पदक गळ्यात घालून वावरताना कुठल्याही सुवर्णपदकापेक्षाही भारी वाटे.

कधी देशविदेशांतूनही कलाकार येत. कुठल्या वाटेवर तर कुठे स्टुडिओमध्ये पेंटिंग करण्यात मग्न झालेले दिसत. कधी घरीच कलेविषयी अनौपचारिक गप्पा रंगत. मुले नेहमीच आजूबाजूला असत. प्रभाकर कोलते आले, की मुलांना आपली चित्रे दाखवायला सांगत आणि कमालीच्या संयमानी आणि उत्सुकतेनी, कुठलेही सल्ले न देता, पाहत. त्यांच्या घरी गेलो, की त्यांच्या नव्या पेंटिंगसमोर मुलांना उभे करून त्यांना काय वाटते हे आवर्जून विचारत. मुलांचा लाडका अबू (अनिल अवचट) त्यांना काहीबाही ओरिगामी दाखवायचा. निर्झर उत्सुकतेनी काही ओरिगामी शिकला. मग नंतर दोऱ्याचे, नाण्यांचे खेळ. कधी लवकरच त्याचा उत्साह मावळायचा. तरीही अबू त्याला शिकायचा आग्रह करत नसे. हे दोघेही आजोबा मुलांना पूर्ण स्वातंत्र्य देण्याविषयी आग्रही होते.

मुले लहान असताना एकदा कच्छमध्ये लहान लहान पाड्यांवरच्या अनेकविध कारागिरांना त्यांच्या परिसरात काम करताना पाहण्याचा योग आला. विणकाम, भरतकाम, लिप्पण, कुंभारकाम, सुतारकाम, लाखेचे काम, गोधड्या, धातूच्या घंटा, रोगण अन् काय अन् काय. इतके वैविध्य, इतकी कलाकारी… रंग अनुभवताना स्वप्ननगरीचाच भास झाला. या साऱ्याचा मुलांवर खूप काळ प्रभाव राहिला. त्यानंतर शक्य होईल तेव्हा कधी वाढदिवस चन्नपट्टणच्या लाकडी खेळणी बनवणाऱ्या कारागिरांबरोबर, तर कधी दिवाळी तोलपावकुटा करणाऱ्या केरळातील कलाकारांबरोबर साजरी करायला सुरुवात केली. बरेचदा वेगवेगळ्या हस्तकलांची माहिती मिळवून मुलेच प्रवासाचे नियोजन करू लागली. विविध ठिकाणच्या संग्रहालयांमध्ये बारकाईने निरीक्षण करत तासन्‌तास रमू लागली आणि आमची गाईड झाली.

मुलांची चित्रे सुधारून देण्याचे, त्यांची इतरांबरोबर तुलना करण्याचे मोह आम्ही आवरले. मुलांना कंटाळा आल्यावर काय करायचे याचे उत्तर द्यायचे शक्यतो टाळले. अमित तर विचारलेल्या प्रश्नांवर प्रश्न विचारून मुलांना स्वतःची उत्तरे स्वतःच शोधायला उद्युक्त करत असे. मुलांच्या फावल्या वेळावर हक्क बजावायचे कटाक्षाने टाळले. कुठल्याही क्लास, वर्कशॉपला पाठवले नाही. लहानपणी मुले म्हणायची, ‘घराला  एकटं वाटतं आहे, मी आज शाळेत नाही जात, घराबरोबर राहतो’, तेव्हा शिक्षक असूनही मुलांचे शाळेला बुट्टी मारणे पचवण्याचा प्रयत्न केला.

या अनुभवांमधून काय मिळाले, काय नाही असे हिशोब अजूनही मांडले नाहीत आणि मांडू इच्छितही नाही. शिकण्याचा, अनुभवण्याचा आमचा प्रवास बऱ्यापैकी एकत्र होत असल्यामुळे ‘गाड्याबरोबर नळ्याचीही यात्रा’घडत गेली. बरेचदा गाडा कुठला आणि नळा कुठला हा प्रश्न पडतोच.

जाई देवळालकर

jaai.deolalkar@gmail.com

अमूर्त चित्रकार.  जे. कृष्णमूर्ती फाऊंडेशनच्या द व्हॅली स्कूल, बंगलोर या शाळेत चित्रकला विषयाचे अध्यापन. विविध राज्यांत भित्तीचित्रे, चित्रकलाविषयक कार्यशाळा घेतात. कला व शिक्षण या विषयांवर लेखन. शास्त्रीय संगीताचा अभ्यास आणि आवड.