नेमेचि येतो
सालाबादप्रमाणे येतो 8 मार्च अगदी आठवणीनं
त्याचं कवित्व तर कधीपासून सुरू होतं
तेही नेहमीप्रमाणं
गोडवे गायले जातात स्त्रीत्वाचे
आई, बहीण, मैत्रीण, मुलगी,
प्रेयसी, बायको…कधी सासू आणि वहिनीसुद्धा,
उगाउगी
उत्सवच तो देवीचा
8 मार्च दिवसच असतो ‘ती’चा
मांगल्य, पावित्र्य, जिव्हाळा जाज्वल्य,
ममता, नम्रता, मनमुराद वात्सल्य
भावनांचे पूर, कौतुकाचे सूर
कविता महामूर
शब्दांची उधळण, भावनांची घुसळण
त्याचत्याच शब्दांचे तेचतेच दळण
तीही हुशारते, खुशालते, फुशारते
उगाच घटकाभर वारं पिऊन उधळते
एका बाजूला सुरूच असतो बातम्यांचा ठणाणा
‘एकतर्फी प्रेमातून नीच, नराधमाचा धिंगाणा’
बाईच्या जन्माला आल्याबद्दलचीच घृणा
कोडग्या दुःखातही टिकून राहिलेला शहाणपणा
आला दिवस, सरला दिवस
उद्यापासून तेच… तसेच…
पुढच्या 8 मार्चपर्यंतचे तीनशे चौसष्ट दिवस.
– अनघा जलतारे