पर्यावरण विषय मुलांपर्यंत नेण्याचा प्रवास

मृणालिनी वनारसे

पर्यावरण-शिक्षण हा विषय व्यापक आहे. त्यामुळे आपल्याला मुलांपर्यंत नेमकं काय पोचवायचं आहे हे त्या क्षेत्रात काम करणार्‍याला ठरवावं लागतं. मी कामाला सुरुवात केली तेव्हा ‘आपण आणि आपला भवताल याविषयी जाणीव-जागृती’ हे उद्दिष्ट ठरवणं गरजेचं आहे असं मला वाटलं. कॉलेजचं शिक्षण होईपर्यंत मला आपल्या भवतालाविषयी माहिती अशी काहीच नव्हती. आपलं पाणी कुठून येतं हे पाठयपुस्तकांत होतं. कधीमधी सिंहगडाची सहल व्हायची तेव्हा खडकवासला धरण, पुण्यापर्यंत पाणी आणणारा कालवा ह्या गोष्टी बघायला मिळाल्या होत्या. (त्यात तरंगणारी एक चप्पल माझ्या चांगली लक्षात राहिली होती. ‘हे’ पाणी आपण पितो?) शाळेनं ‘पर्वती-जलकेंद्राला भेट’ हा एक फार चांगला उपक्रम राबवला होता. ह्या सगळ्यामुळे, पाणी काही घरापर्यंत आपलं आपण येत नाही, त्यासाठी मोठी यंत्रणा काम करत असते एवढं त्यावेळी लक्षात आलं होतं.

मात्र इतर अनेक गोष्टी होत्या. वीज, कपडे, अन्न, औषधं या सगळ्या गोष्टी कुठून येतात, आपण त्या वापरल्यावर त्यांचं काय होतं वगैरे काही आमच्या खिजगणतीतही नव्हतं. याची जाणीव निर्माण होणं हे पर्यावरण-शिक्षणाचं मोठं उद्दिष्ट. ते बघू जाता कळतं, की इतक्या सुदूर ठिकाणांहून संसाधनं, वस्तू आपल्यापर्यंत पोचत असतात आणि आपण टाकलेल्या गोष्टी (प्रदूषणरूपानं) इतक्या सर्वत्र विखरत असतात, की सगळं विश्वच आपला भवताल आहे असं म्हणावं लागतं. मग विश्वाचा अभ्यास, तिथे गोष्टी कशा चालतात, प्रक्रिया, चक्रं हे सर्व माहीत करून घेणं आपल्यासाठी गरजेचं ठरतं. नजीकच्या भवतालातली आणि व्यापक विश्वातली फार कमी माहिती माझ्यापाशी होती. इकॉलॉजीच्या शिक्षणानं ही माहिती का करून घ्यायची याचं गमक आधी सापडलं आणि अभ्यास सावकाश होत राहिला.

सातपुड्याच्या अतिदुर्गम भागात मुलांसोबत काम करतानाचा अनुभव असा, की मुलांना कचरा, प्रदूषण या कल्पना समजावून सांगताना माझी दमछाक झाली. कारण उघड होतं. त्या चिमुकल्या गावात कचराच नव्हता! झिरो वेस्ट! गावात एक बारकं दुकान होतं; किराणा, गोळ्या-बिस्किटं मिळतील असं. तिथला एवढासा कचरा परिसरात सहज सामावून गेला होता. कुणाच्या चुलीत, बंबात पाणी तापवत होता.

 तिथे कशा सांगाव्या कचर्‍याच्या ढिगाच्या समस्या? प्रदूषणाचे डोंगराएवढे प्रश्न? पण मुळात त्या चिमुकल्या गावात हे सगळं त्या मुलांना का सांगायचं होतं? जे प्रश्न त्यांचे नाहीतच, त्यावर त्यांनी का वाचायचं होतं?

याचं  कारण त्यांचं पाठयपुस्तक ही माहिती त्यांना देत होतं हे एक आणि दुसरं महत्त्वाचं कारण असं, की ते कचरा तयार करत नसले, तरी प्रदूषणाचे दुष्परिणाम प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे त्यांच्यापर्यंत पोचतात. तेव्हा त्याची माहिती त्यांना असायला हवी. हे ठीक होतं. पण मुलांचा  नजीकचा परिसर, त्यांचा निसर्ग, याविषयी पुस्तकात काय उल्लेख होता? काहीही नाही. सर्वसाधारण माहिती देणार्‍या पुस्तकांबरोबरच, त्यांच्या नजीकच्या परिसराविषयी बोलणारी पुस्तकं, शैक्षणिक साहित्य, मुलांकडे नको का, या विचारातून ‘बायफ’च्या (BAIF) शिक्षणमित्र प्रकल्पांतर्गत परिसराविषयी (इकॉलॉजी) सांगणार्‍या पोस्टर्सची निर्मिती केली. तिथली नदी, डोंगर, ओढे याविषयी बोलणार्‍या या पोस्टर्समध्ये मुलं-माणसं दरवर्षी जत्रेला जातात त्या अस्तम्बा डोंगराचाही उल्लेख होता. माणसं त्या परिसंस्थेचा भाग! म्हणून त्यांना पोस्टर संकल्पनेत सहज सामावलं गेलं.

या मुलांकडून मीही खूप शिकले. जेवणाच्या थाळ्या आणि कागदी बॉल करून ही मुलं सुट्टीत टेनिस खेळायची. खेळाच्या साहित्याचा अभाव त्यांच्या कधी आड आला नाही. पावसात सागवानाच्या पानांची छत्री करून डोक्यावर धरायची. त्या सुंदर छत्रीसमोर माझी विकतची छत्री मला गरीब बिचारी वाटायची. हा अनुभव पाठयपुस्तकांच्या पलीकडला होता.

शहरी ते दुर्गम भागातल्या मुलांसोबत काम करताना काय कामी आलं? माझा स्वतःचा लहानपणचा अनुभव. मी पुण्यासारख्या शहरात लहानाची मोठी झाले. पण माझ्या वडिलांचं गाव कोकणातलं धामणी नावाचं खेडं. तिथे उन्हाळी हिवाळी सुट्ट्या घालवल्यानं कंदील वापरणं, चूल पेटवणं, विहिरीतून पाणी काढणं, या गोष्टींशी माझी ओळख होती. एवढंच नव्हे तर रानातून फळं मिळवून खाणं, आंबा फणसाचे टिकाऊ पदार्थ करून ठेवणं, पत्रावळी करणं ही कौशल्यं मी बघत आले होते. लहान असताना असं का वगैरे प्रश्न फारसे पडायचे नाहीत. पुण्यात असं आणि गावी तसं! हां, रात्री आठ वाजता निजानीज याची गावी गेल्यावर सुरुवातीला सवय नव्हती. थोडा वेळ लागायचा रुळायला. पण मग तिथल्या भावंडांसोबत आम्हीही लवकर झोपून सकाळी पाच वाजता आरामात जागं होऊ लागलो. गरजेच्या सगळया गोष्टी सूर्याच्या प्रकाशात करायच्या! सूर्य गेला की आपणही झोपी जायचं! हवेत कशाला रात्रीचे दिवे! बरं, दिवस चांगला मोठा असतो, पुरेसा वेळ असतो. हे सर्व मी जीवनशैली म्हणून अनुभवलेलं असल्यानं मला ग्रामीण भागातल्या मुलांसोबत काम करताना अडचणी तर आल्या नाहीतच; पण त्यांच्याकडे कोणते गुण, जीवनकौशल्यं आहेत हे चांगलं बघता आलं, त्यांचं कौतुक करता आलं. किती काय काय येतं गावातल्या मुलांना! घरचं शेत, परसबाग राखता येते, पुढच्या वर्षीसाठी बिया कशा राखायच्या त्याची तंत्रं माहीत असतात. लिहू तेवढं थोडं. ही जीवनकौशल्यं किती मोलाची आहेत हे या मुलांना सांगायला नेहमीच वेळ कमी पडतो. अर्थात, गावात स्थिती बदलते. मुलांना वेगळं, शहरी जगून बघायला आवडतं. ते ठीक. पण तो चॉईस असावा. कसं जगायचं आहे तो आपला चॉईस असावा, आपल्याकडे पर्यायांची समृद्धी असावी, एवढं त्यांना नक्की सांगावं असं वाटलं.

शहरांच्या दुरवस्थेविषयी किती बोलावं! इथली मुलं त्याचा त्रास सर्वाधिक सहन करतात. शिवाय त्यांना पर्यावरणाचे धडेही मिळत राहतात. खेळायला जागा नाहीत, टीव्ही, मोबाईल असून बघायचा नाही! अशा स्थितीत या मुलांनी करायचं काय! त्यांना मी अनेकदा आमच्या छोट्या वर्कशॉप्सचा भाग म्हणून पुण्याच्या वेताळ टेकडीवर नेऊन आणते. मुलं तिथे आधी गेलेलीही असतात अनेकदा; पण आम्ही सोबतीनं एकेक गोष्ट पाहत पुढे जातो तेव्हा त्यांच्या पोतडीत त्यांनी इतकं काही जमा केलेलं असतं! ती सगळं टिपत असतात. पुनःपुन्हा येतात आणि मी एखादी गोष्ट सांगायला विसरले तर म्हणतात, ‘अगं ते सांग ना, बांबू किती उंच गवत आहे त्याबद्दल!’ काय, कसं बघायचं कळलं, की ती बघत राहतात, शोधत राहतात. त्यांना ते सगळं मिळायला हवं.

ते मिळालं नाही आणि नुसतंच हे करू नये, ते करू नये झालं की मुलं वैतागतात. माझा एक भाचा बहुतेक याच वैतागातून मला एकदा म्हणाला, ‘आय हेट इव्हीएस!’ (म्हणजे पर्यावरण-अभ्यास). त्यावेळी हा विषय अनिवार्य (कंपलसरी) केला गेला होता. मला काय बोलावं सुचेच ना. मग हळूहळू त्याला आणि त्याच्यासारख्या अनेक मुलांना काय सांगायचं आहे याचा मी विचार केला. मी त्याला नंतर म्हटलं, ‘‘तुला मजेत राहायला आवडतं ना! मग नेहमी मजेत कसं राहता येईल याचाच आपल्याला अभ्यास करायचा आहे. आज मजेत आणि उद्यासुद्धा मजेत. आज बेबंद गाडी चालवली आणि हातपाय मोडून घेतले, तर थोड्या वेळाची मजा आणि नंतर सजा होईल, तसाच विचार सर्व गोष्टींबाबत करायचा आहे. त्यासाठी आपण, म्हणजे माणसं, कसे घडलो आहोत, आपल्यासकट आजूबाजूचं विश्व कोणत्या नियमांच्या आधारानं चालतं याचा अभ्यास करायचा. आपलं राहणं, वागणं या नियमांना धरून असलं, तर आपण मजेत राहणारच.’’ मुलांना हे नवीन विचार आवडताहेत. त्यांच्यापर्यंत हे विचार नेण्याचे वेगवेगळे मार्ग चोखाळायला मला मजा येते आहे. मुलांसाठी लिहिलेली माझी गोष्टींची पुस्तकं याच प्रयत्नांचा भाग आहेत.

‘आम्ही बिघडलो तुम्ही बी घडाना’ असा हा आनंददायी प्रवास चालू आहे.

मृणालिनी वनारसे

www.mvanarase.com

इकॉलॉजीच्या अभ्यासक. ‘परिसर आणि आपण ‘ याविषयी मुले आणि मोठ्यांसाठी लेखन करतात.