अपर्णा देशपांडे
जेसन रीड हे अमेरिकेतील प्रसिद्ध व्यावसायिक, लेखक, लघुपट निर्माता आणि एक पिता. साधारण साडेतीन वर्षांपूर्वी त्यांच्या चौदा वर्षांच्या मुलानं आत्महत्या केली आणि एका अत्यंत सुखवस्तू घरातल्या सगळ्या सदस्यांचं आयुष्य ढवळून निघालं. मुलाच्या खोलीत एका खणात दोन चिठ्ठ्या सापडल्या.
एका चिठ्ठीत त्याच्या ‘सोशल मीडिया’वरील खात्याचे पासवर्ड होते आणि दुसर्या चिठ्ठीत लिहिलं होतं, ‘बाबा, जगाला माझी कथा सांगा.’
आपल्या कोवळ्या वयातल्या मुलाचं मानसिक अस्वास्थ्य, त्याची घुसमट वेळीच आपल्या लक्षात आली असती तर… तो आतून उद्ध्वस्त झालाय हे पिता असून आपल्याला कसं समजलं नाही, ह्या जीवघेण्या अपराधी भावनेवर अल्पशी फुंकर म्हणून त्यांनी मुलानं चिठ्ठीत व्यक्त केलेल्या इच्छेनुसार कृती करण्याचं ठरवलं.
आपलं दुःख आवरून त्यांनी इतर पालकांना आपले अनुभव सांगण्यास सुरुवात केली. अमेरिकेत गेल्या दशकात कुमारवयीन मुलांच्या आत्महत्येत सत्तर टक्क्यांनी वाढ झाली आहे – ह्या खळबळजनक आकडेवारीनं ते अस्वस्थ झाले. वरकरणी सगळं नीट असल्याचं भासवणारं मूल आतून नैराश्यानं ग्रासलं आहे हे वेळीच ओळखण्याची गरज त्यांनी आपल्या प्रत्येक मार्गदर्शनपर संवादातून विशद केली; इतकंच नाही, तर ‘टेल माय स्टोरी’ नावाच्या माहितीपटाची (डॉक्युमेंटरी) निर्मितीही केली. आपल्या मुलाच्या बाबतीत जे घडलं, ते इतर मुलांबाबत घडू नये हीच त्यामागची त्यांची प्रामाणिक इच्छा आहे.
राष्ट्रीय गुन्हे नोंदणी ब्यूरोच्या आकडेवारीनुसार भारतातही 2020 साली तरुणांच्या आत्महत्यांमध्ये त्या मागच्या वर्षीच्या तुलनेत 21 टक्क्यानं वाढ झालेली आहे. आत्महत्या करणार्यांमध्ये आय.आय.टी., आय.आय.एम.चे विद्यार्थी मोठ्या संख्येनं आहेत हे लक्षात घ्यायला हवं. ही आकडेवारी पालकवर्गासाठी खूपच मोठं आव्हान उभं करणारी आहे.
इथे मुलांचे मानसिक आजार किंवा वैफल्य समजून घेताना पालक म्हणून आपण अपयशी ठरतोय का, ही भीती मनात दाटते… ‘पालकपणाची’ भीती.
अपत्यानं आयुष्य संपवणं हे पालकांसाठी सर्वात मोठं दुःख आहे. पण मग प्रश्न पडतो, की पालकत्व निभावताना वाटणारी ही एकमेव भीती थोडीच आहे?

बदलत्या काळानुरूप बदलती आव्हानं आणि त्या अनुषंगानं येणार्या असंख्य काळज्या किंवा भीती हे सगळं आलंच. आपली जुनी मूल्यं उराशी घट्ट कवटाळून जगताना आपली झालेली कुतरओढ मुलांच्याही वाट्याला येऊ शकते. मग अशा वेळी त्या मूल्यांची कास घट्ट धरून ठेवण्याचा सल्ला मुलांना द्यावा की नाही ही खंतयुक्त, शंकायुक्त भीती… (कारण एका बाजूला शाश्वत मूल्यांची पायमल्ली कुठल्याही काळात आणि कुठल्याही परिस्थितीत होणं अयोग्यच ह्याची जाणीवही असतेच.)
आपल्या पाल्याचा विनय ही त्याची कमजोरी समजून त्याचा गैरफायदा घेतला जाईल का ही भीती. परिपूर्णतेचा ध्यास घेणार्या आपल्या अपत्याची हे जग हेटाळणी करेल का ही भीती. खाच-खळग्यांनी भरलेली प्रामाणिक सन्मार्गाची वाट जोपासताना उथळ सवंगतेची सोपी निसरडी वाट त्यांना खुणावेल ही भीती… तारुण्यसुलभ भावनेतून जुळलेले प्रेम-अनुबंध तुटल्यास पोर आतून खचेल का ही भीती… खेळ, कला, अभ्यास वगैरे सर्व गोष्टींमध्ये आपल्या मुलांनी प्रावीण्य मिळवलं, तरच त्याचा निभाव लागेल या भीतीतून तर पुढे भीतीचे अनेक ब्रह्मराक्षस उभे राहतात… आपणच मुलांना एका विशिष्ट जीवनशैलीची सवय लावली आहे, दुर्दैवानं कधी त्यापासून एक पायरी खाली उतरायची वेळ आली तर त्यांचा निभाव लागेल का, ही भीती
कवयित्री पद्मा गोळे यांची ‘आईपणाची भीती’ ही कविता आपल्या मनातल्या भावना तंतोतंत व्यक्त करते.
आजच्याइतकी आईपणाची
भीती कधीच वाटली नव्हती
अगतिकतेची असली खंत
मनात कधीच दाटली नव्हती…
असं म्हणत त्यांनी आईची, काळानुरूप वाटणारी, भीती व्यक्त केली आहे.
पालकांना उद्देशून केलेल्या भाषणात जेसन रीड नेहमी सांगतात, की पालकांनी आपलं वैयक्तिक अपयश, उणिवा, निराशा मुलांपासून लपवून ठेवू नयेत. होतं असं की अनेकदा वडील हे मुलांचे ‘सुपर हिरो’ असतात. मग ही सुपर हिरोची प्रतिमा जपण्याच्या नादात वडिलांना स्वतःचं अपयश मुलांपासून लपवावं लागतं जे योग्य नाही. मुलांशी मोकळा संवाद करताना आईवडिलांनी आपल्या मर्यादा आणि हातून घडलेल्या चुका ह्याविषयी जरूर बोलावं. यश-अपयश, चुकणं-सावरणं हे जगण्याच्या वाटेवरचे सहज आणि अविभाज्य घटक आहेत हे मुलांना समजणं गरजेचं आहे. त्यातील सहजता लक्षात आल्यास मुलांना त्यांचं अपयश पचवणं कठीण जाणार नाही.
मुलांना वाढवताना आपलं मूल वाममार्गाला लागण्याची सततची टांगती तलवार पालकांच्या डोक्यावर लटकत असते. पूर्वीपेक्षा आज ह्या तलवारीची धार जास्त आहे आणि मुलांच्या मोबाईलच्या व्यसनानं तर ती आणखीनच तेज होत जातेय. पालक म्हणून वाटणार्या भीतीत भर घालणारा हा एक अत्यंत त्रासदायक मुद्दा! मुलांचा वाढलेला ‘स्क्रीन टाईम’ कमी करण्यासाठी त्यांना वाचन, मैदानी खेळ, बैठे खेळ, घरातली कामं, व्यायाम ह्या आणि इतर सर्जनशील गोष्टींकडे वळवणं आवश्यक आहे, हे खरं; पण त्यासाठी लागणारा प्रचंड वेळ, ऊर्जा आणि संयम यांचा पालकांकडे अभाव असणं ही मोठी समस्या आहे. नुसती बंधनं घालून आरडाओरडा करून ती सुटणार नाही.
माणसाला स्वतः घालून घेतलेल्या बंधनात राहायला जमतं; पण ती बंधनं इतरांनी आणि विशेष करून पालकांनी घालून दिल्यास त्यांचं पालन करणं मुलांना जाचक वाटतं. ही समस्या सोडवण्यासाठी लागणारा आवश्यक तितका वेळ आपण देऊ शकत नाही, मग ह्या गोष्टी कशा नियंत्रित करायच्या हीदेखील एक भीतीच.
आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आजचं काम ‘उद्या’ पूर्ण करू म्हणत असताना आपण आपलं जगणं फारच गृहीत धरतो. तो ‘उद्या’ आपल्यासाठी उगवलाच नाही तर हा विचार आला, की अंगावर सरसरून भीतीची लहर फिरून जाते. मृत्यूसारख्या अटळ वास्तवाबद्दल मुलांशी बोलण्याची आपल्याला जाम भीती वाटते. मुलं लहान असताना हे विषय बोलण्यात नसणं योग्यच; पण साधारण चौदा ते वीस वयाच्या आपल्या मुलांशी मृत्यू ह्या विषयावर बोलण्यास काहीच हरकत नाही. आपण त्यांच्या भविष्याची काय तरतूद करून ठेवत आहोत, आपले आर्थिक व्यवहार कसे आहेत, ह्याची ढोबळ कल्पना तरी मुलांना दिली जायला हवी.
मुलांच्या आयुष्यातल्या समस्या, मग त्या कितीही मोठ्या किंवा छोट्या असूदेत, त्याबद्दल त्यांनी पालकांशी मनमोकळं बोलावं, पालक त्यांच्या पाठीशी राहतील, असं वातावरण पालकांनाच निर्माण करावं लागतं.
आपलं मूल कुठल्याही परिस्थितीत जिवाचं बरंवाईट करून घेणारच नाही, अशी समजूत करून घेऊन गाफील राहणं ही चूक महाग पडू शकते.
जेसन रीड म्हणतात, की आत्महत्या ह्या विषयावर मुलांशी बोलण्यास पालक घाबरतात. हा विषय काढून आपण नको ते विचार त्यांच्या मनात पेरू की काय अशी भीती त्यामागे असते. पण आज ह्या विषयाबाबत मुले अनभिज्ञ आहेत असं मुळीच नाही! अनेक माध्यमांतून, समाजातून, मित्रपरिवाराकडून तो त्यांच्यापर्यंत पोचलेला आहे. मग तो घरात चर्चेसाठी निषिद्ध का असावा? उलट अशा चर्चांतून मुलांची वैचारिक बैठक पक्की होईल. यश-अपयश ह्यापेक्षा तिथपर्यंत पोचतानाचा प्रवास अनुभवणं जास्त संपन्न करणारं आहे, हा विचार किती मोलाचा आहे. अपयशानं खचून जाऊन किंवा मानसिक दौर्बल्यामुळे आत्महत्या करून मुलं आपल्यामागे राहणार्या आपल्या कुटुंबीयांना आयुष्यभरासाठी अनंत यातना देतात, हे आजूबाजूच्या उदाहरणांतून मुलांना समजणं गरजेचं आहे. हे विषय बोलण्याची भीती आधी पालकांना आपल्या मनातून काढून टाकावी लागेल, तरच ते मुलांना ह्यावर बोलतं करू शकतील.
शेवटी हे मान्य करावंच लागेल, की पालकत्व काही ‘ऑटोमॅटिक’ यंत्रणा घेऊन येत नसतं. त्याचा एक ठाशीव असा ‘प्रोग्राम’ नसतो. त्यात सततच्या बदलाला सामोरं जाण्याची तरतूद असावी लागते. भविष्यात होऊ शकणार्या अमंगळाची भीती वाटणं स्वाभाविक आहे; पण पालकत्वात त्यावर मात करण्याची ताकदही असतेच असते. लक्षात ठेवू या डर के आगे जीत होती है!
अपर्णा देशपांडे

aparnadeshpande@gmail.com
अभियांत्रिकीच्या प्राध्यापक. विविध माध्यमांवर तसेच नियतकालिके आणि दिवाळी-अंकांसाठी नियमित लेखन. पेंटिंग आणि ‘की’बोर्ड वादनाचा छंद.
चित्र : रमाकांत धनोकर
