पुस्तक खिडकी
एकीकडे मुलांना दर्जेदार बालसाहित्य सहजपणे, मोफत उपलब्ध व्हावे यासाठी अनेक लोक प्रयत्नशील आहेत. युट्यूब चॅनेल, मोफत ई-पुस्तके असलेली संकेतस्थळे, गोष्टींचे अॅप्स अशा माध्यमांतून मुबलक बालसाहित्य उपलब्ध आहे. असंख्य पुस्तके उपलब्ध असली तरी त्यातून उत्तम, एखाद्या विषयाला वाहिलेली पुस्तके शोधून काढायची कशी?
दुसरीकडे लॉकडाऊनमध्ये शाळा, वाचनालये बंद असल्यामुळे मुलांना नियमितपणे वाचायला पुस्तके मिळत नव्हती. शहरी मुलांना डिजिटल पर्याय उपलब्ध होते. पण ‘चांगली पुस्तके शोधून कशी काढायची?’ हा प्रश्न होताच. छोट्या खेड्या-पाड्यांमधल्या मुलांना डिजिटल पर्यायांची विशेष माहिती नव्हती. असली, तरी त्यासाठी लागणारे इंटरनेट उपलब्ध असण्याची शक्यता कमी. अशा परिस्थितीत मुलांपर्यंत पुस्तके आणि गोष्टी पोचणार कश्या?
ह्या दोन गोष्टींची सांगड घालण्यासाठी, दर्जेदार साहित्य निवडून, थोडक्या इंटरनेटच्या मदतीने, सहजगत्या मुलांच्या हातात नेऊन पोचवण्यासाठी ‘पुस्तक खिडकी’ नावाचे मुलांचे मराठी ई-साप्ताहिक सुरू झाले.
‘पुस्तक खिडकी’चा ‘अंक’ म्हणजे एक-पानी पीडीएफ फाईल असते! अंकात एक ‘ऐकण्याची’ गोष्ट, एक ‘वाचण्याचे’ पुस्तक, एक कृती आणि शिक्षक-पालकांसाठी काही खुराक अशी चार सदरे, म्हणजेच ‘खिडक्या’ असतात. आजूबाजूला घडत असलेल्या गोष्टींमधून प्रत्येक आठवड्याचा विषय निवडला जातो. त्या विषयाचा विविध अंगांनी विचार करून चार सदरांमधील मजकूर निवडला जातो. ‘पुस्तक खिडकी’च्या प्रत्येक सदरात एक लिंक असते. त्या त्या लिंकवर क्लिक करून ऐकण्याची गोष्ट, वाचण्याचे पुस्तक, कृती आणि मोठ्यांसाठीचे सदर उघडता येते. अंक पीडीएफ स्वरूपात असल्यामुळे व्हॉट्सअॅपवर अगदी सहजपणे पाठवता येतो. पाहिजे तेव्हा अंक मोबाइलवर उघडून वाचता येतो.
‘पुस्तक खिडकी’मधून मुले आणि पालकांना मुलांसाठी असलेली चांगली पुस्तके माहीत होतात, वाचायला मिळतात. arvindguptatoys.com स्टोरीवीवर अशा संकेतस्थळांवरची ई-पुस्तके निवडून, कमी इंटरनेट असले तरी ती उघडून वाचता येतील अशा प्रकारे त्यांची तांत्रिक मशागत करून अंकातून दिलेली असतात.
परीक्षा, फुलपाखरू, वारा, आंबा, अशा मुलांच्या भावविश्वातल्या विषयांबरोबरच शांती, स्वातंत्र्य, संविधान, लिंगभाव, युद्ध असे गंभीर विषयही आजवर ‘पुस्तक खिडकी’तून डोकावून गेले. अंकात दिलेल्या गोष्टी, लेख आणि कृती ह्यांच्या अनुषंगाने पालक-शिक्षकांनी मुलांबरोबर बोलावे, त्यांची मते जाणून घ्यावीत आणि स्वतःही विचार करावा अशी अंकामागची भूमिका आहे. काही शिक्षकही तासाला ‘पुस्तक खिडकी’तील सदरांचा वापर करतात.
‘पुस्तक खिडकी’चे सभासदत्व विनामूल्य असून, नावनोंदणी केली, की अंक व्हॉट्सअॅप आणि ई-मेलवरून पाठवला जातो.
नमुना अंक – https://bit.ly/pustak-khidaki-11-2021
नावनोंदणीसाठी – https://bit.ly/pk-register
जुने अंक बघण्यासाठी – http://www.jidnyasaa.com/p/blog-page.html