बच्चे बने लेखक

अंजली सुचिता प्रमोद

‘लर्निंग कम्पॅनियन’ ही संस्था भरवाड समुदायासोबत काम करते. हा समुदाय पशुपालन आणि त्यातून मिळणार्‍या दुधाचा व्यवसाय करतो. त्यांच्याकडे गीर जातीच्या गायी असतात. पावसाळ्याचे तीन-चार महिने हे लोक नागपूरलगतच्या जंगलात छोट्या-मोठ्या झोपड्या बांधून राहतात. त्यानंतर त्यांना चार्‍यासाठी स्थलांतर करावं लागतं. मग मुलांच्या शिक्षणात खंड पडतो. त्यामुळे लर्निंग कम्पॅनियनचे काही ताई-दादा थेट त्यांच्या बेड्यांवर राहूनच काम करतात आणि त्यांच्यासोबत स्थलांतरही करतात. एकीकडे ताई-दादा मुलांचं शैक्षणिक पालकत्व घेतात आणि दुसरीकडे अख्खा बेडा ताई-दादांना आपल्यासोबत ठेवून त्यांचं सामुदायिक पालकत्व स्वीकारतो!

संस्थेच्या ‘बी द चेन्ज’ प्रकल्पांतर्गत, मुलांना पुस्तकांची आवड आणि वाचनाची गोडी निर्माण व्हावी म्हणून बेड्यांवर नवनवीन उपक्रम सुरू आहेत. अजिबात वाचता न येणार्‍या मुलांपासून ते अडखळत वाचणार्‍या मुलांसाठी कोणत्या प्रकारची पुस्तकं असावीत ह्याचा विचार सतत सुरू आहे. आधी पुस्तकं कमी होती; जी होती त्यातही काल्पनिक कथांचीच अधिक होती. त्यात मुलं फारशी रमत नाहीत. मुलांच्या अनुभवविश्वातली, त्यांच्या भरवाड भाषेतली पुस्तकं नव्हतीच. त्यामुळे सुरुवातीला मोठ्या मुलांच्या मदतीनं प्राण्यांची नावं आणि रोजची कामं (उदा. हेतल पाणी भरीन आयीस – हेतल पाणी भरून आली) भरवाडी भाषेत लिहून लहान मुलांसाठी वाचन-साहित्य तयार केलं. मुलं वाचू लागली आणि कालांतरानं लिहू लागली.

‘बी द चेंज’मध्ये ‘बच्चे बने लेखक’ असा एक उपक्रम आहे. मुलांनी स्वतःचे अनुभव लिहावेत हा या उपक्रमाचा उद्देश आहे. त्यांचे रोजच्या जगण्यातले अनुभवच मुळी जंगलातले, प्राण्यांसोबतचे असे खूप वेगवेगळे असतात. आपली संस्कृती, भाषा आणि अनुभवांची मुलांना सांगड    घालता यावी, त्यांच्यामध्ये रचनात्मक दृष्टिकोन यावा आणि ह्यातून मुलांच्या भावविश्वातलं भरवाड वाचन-साहित्य निर्माण व्हावं अशी एकूण कल्पना. मुलांना स्वतःचं लिखाण वाचायला मजा वाटते. ताई-दादांनाही लहान मुलांना शिकवताना ह्या साहित्याचा खूप फायदा होतो. गोष्ट वाचून दाखवताना आम्ही मुलांना लेखक, चित्रकार, अनुवादक वगैरे तपशीलही सांगतो. त्यातून मुलांचा गोष्टीतला रस वाढतो हे आम्ही पाहिलंय. आता तर असं सुंदर वातावरण निर्माण झालंय, की लिहिता न येणारं लहान मूल त्याची गोष्ट मोठ्या मुलाला सांगतं, मोठं मूल ती लिहून देतं आणि एखादं चित्रकार मूल चित्रं काढून देतं!

आँख

अनुवाद

एके दिवशीची गोष्ट आहे. माझ्या वासरूला शोधत होतो तर माझ्या डोळ्यात एक वेगळा कीडा पडला तर मी रडायला लागलो तर माझ्या अश्रूसोबत तो निघून गेला तर मी खूश झालो. 

लेखक – संजू भगवन सभाड

दहा वर्षांचा संजू ठणठण बेड्यावर राहतो. हा बेडा नागपूरहून उमरेड रोडवर वीस-पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे. पावसाळ्यात चार महिन्यांसाठी हा बेडा गावापासून दोन किलोमीटर आत जंगलात स्थलांतरित होतो. तीस झोपड्या आणि तीनसाडेतीनशे लोक. पैकी साठ शिकती मुलं. संजूला लिहावाचायला खूप आवडतं. त्यानं आतापर्यंत स्वतःच्या अनुभवांवर आधारित वीस-पंचवीस गोष्टी लिहिल्यात. स्वतःचं लिखाण परत परत वाचून त्यातल्या काही चुका आपणहून सुधारूनपण टाकतो संजू!

घुमडीया

अनुवाद

मी फिरायला गेले तेव्हा राघूचा कुत्रा माझ्या मागे लागला. मग गीतानं मला वाचवलं. मी माझ्या घरी आले. थोड्या दिवसांनी मी रामजीला सांगितलं की असं झालं. तर रामजी म्हणाला, की तू ही गोष्ट बनव की रिद्धी फिरायला गेली आणि फिर फिर फिरून आली.

लेखिका- रिद्धी जेसा सभाड

रिद्धी खेडी बेड्यावरची आहे. वय 12 वर्षं. हा बेडा बाराही महिने एकाच ठिकाणी राहतो. स्थलांतर करत नाही. भरवाड समाजात मुलींना 2-3 वर्ग शिकल्यावर शाळेत पाठवत नाहीत. रिद्धीला शाळेत यायला, शिकायला खूप आवडत असे. पण आता घरचे अनुमती देत नाहीत. घरची कामं खूपच असतात. रिद्धी आधी वेळात वेळ काढून यायची पण आता म्हणते, ‘‘मला पुस्तक वाचायला देत जा, मी शाळेत येणार नाही.’’

अनुवाद

एक गुलाबाच्या फुलावर दोन मुंग्या बसल्या होत्या. त्या दोघी नात्यानं आई-मुलगी होत्या. गप्पा करत होत्या गुलाबाच्या डेर्‍यात बसून. किती छान वाटतोय इथून चंद्र अंधारात.

लेखक – रामजी जेसा भरवाड 

रामजी म्हणजे रिद्धीचा भाऊ! नागपूरजवळ उमरेड रोडवर खेडी नावाच्या गावाजवळ यांचा बेडा आहे. 7 झोपड्या आणि एक घर, असा हा बेडा. सगळे लोक एकाच परिवारातले! रामजीला चित्र काढायला आणि लाठी फिरवायला खूप आवडतं. भरवाड संस्कृतीत लाठी चालवण्याला महत्त्व आहे. पूर्वी रामजी वर्गात येऊन सगळ्या मुलांना खूप त्रास द्यायचा. कधी शाळेत न गेल्यामुळे वर्गात बसून शिकणं ही कल्पनाच त्याला अस्वस्थ करी. पण आता वर्गातल्या जबाबदार्‍या घेणं, वाचन, लेखन आणि चित्र काढणं ह्यात त्याला मजा येताना दिसतेय. रामजी लहान मुलांना त्यांची गोष्ट लिहायला आणि त्यावर चित्र काढायला मदत करतो.

अंजली सुचिता प्रमोद

anjalitiwaskar222@gmail.com

लर्निंग कम्पॅनियनच्या माध्यमातून भरवाड मुलांच्या शिक्षणावर काम करतात.