(पुस्तक परिचय)

गीता महाशब्दे

किशोर मासिकात डॉ. शंतनू अभ्यंकर यांनी लिहिलेली लेखमाला आता लोकवाङमय गृहाने पुस्तक-स्वरूपात आणली आहे. मुलामुलींना तर हे पुस्तक आवडेलच; पण मोठ्यांनाही सुरस वाटेल.

हे पुस्तक उघडलं की अचंब्यानं विश्वाकडे पाहणारा, मोठ्या दाढीचा, शास्त्रज्ञासारखा दिसणारा एक साधा सामान्य माणूस आपलं लक्ष वेधून घेतो. याच माणसासारखं उत्सुकतेनं उचंबळणारं मन सगळ्या मुलांकडे असतं. या पुस्तकाचे लेखक डॉ. शंतनू अभ्यंकर यांनीही त्यांचं ते मन निगुतीनं जपलं आहे. त्यामुळे आपल्यातलं जिज्ञासू मन जागवण्याच्या प्रवासाला ते आपल्याला सोबत घेऊन निघतात. सतीश भावसार यांची चित्रं आणि लेखकाचे शब्द एकत्रितपणे आपल्याला एकेक गोष्ट दाखवत जातात. आजच्या मल्टिमीडियाच्या काळात शब्द, चित्र आणि विचार व कल्पना करणारं आपलं मन हा केवढा मोठा  मल्टिमीडिया आपल्याकडे आहे याची जाणीव हे पुस्तक वाचताना होते. हा अनुभव फार मजेदार आहे. म्हणून लहानमोठ्या प्रत्येकानं हे पुस्तक वाचलंच पाहिजे.

माणसाच्या उपजत कुतूहलातून त्याला अनेक प्रश्न पडत गेले. उदा. हे विश्व कसं निर्माण झालं? त्यासाठी सर्वच ठिकाणच्या माणसांनी अनेक सुरस, चमत्कारिक कल्पना लढवल्या, कथा तयार केल्या. पान-गू नावाच्या चिनी प्राण्याची गोष्ट विश्व कसं निर्माण झालं ते सांगते. अगदी हसू येतं आपल्याला आता ती गोष्ट वाचून. पण अशा कथा सगळ्या देशांमध्ये होत्या. या काल्पनिक कथांपासून विज्ञानापर्यंतच्या प्रवासाला घेऊन जाणारं हे पुस्तक आहे. माणसाला पडलेल्या सर्व प्रश्नांची ‘नीट आणि नीटस’ उत्तरं शोधायची युक्ती म्हणजे विज्ञान. विज्ञान म्हणजे केवळ एखाद्या विषयाबद्दल सांगितलेली माहिती नाही, तर ती एक विचार करण्याची, उत्तरं शोधण्याची शास्त्रीय पद्धत आहे. हे पुस्तक पूर्ण वाचल्यावर, गेल्या चारशे वर्षांत माणसाला विज्ञान नावाची एक खाशी युक्ती कशी सापडली त्याचा सिनेमा पाहिल्यासारखं वाटतं.

विज्ञान या युक्तीचा शोध अमुक माणसाला अमुक दिवशी लागला असं झालेलं नाही. अनेक लोक, अनेक वर्षं ही युक्ती वापरून काय काय विचार करत होते, उत्तरं शोधत होते, पडताळा घेत होते, आपल्या गुरूंनी सांगितलेल्या गोष्टीसुद्धा मुळापासून तपासून पाहत होते; उत्तरं चुकली तर आपल्या विचारात दुरूस्ती करत होते, तेव्हा ही पद्धत विकसित झाली आणि विश्वातल्या अनेक प्रश्नांची उत्तरं मिळत गेली. म्हणजे विश्वातल्या प्रश्नांची उत्तरं मिळण्याचा इतिहास हाच विज्ञानाची पद्धत विकसित होण्याचा इतिहासही आहे.

‘चुका सुधारत जातं ते विज्ञान, अज्ञान मान्य करतं ते विज्ञान’ हा मुद्दा सांगताना युरोपीय खलाशांनी काढलेल्या चित्रांचं उदाहरण लेखक देतात. किनारपट्टीच्या भागात अगदी बारकाव्यांची चित्रं असायची. आतल्या प्रदेशात मात्र भुतं-खेतं, चित्रविचित्र प्राणी, राक्षस अशी चित्रं काढलेली असायची. आतला प्रदेश आपल्याला अज्ञात आहे, असं त्यातून दर्शवलेलं असायचं. मूलद्रव्यांच्या तक्त्यातलं प्रत्येक घर भरलंच पाहिजे हा आग्रह जेव्हा मेंडेलीफनं सोडला, काही घरं मोकळी ठेवली, तेव्हा मूलद्रव्यांच्या गुणधर्मांचा ताळमेळ बसू लागला. काही घरं मोकळी ठेवणं म्हणजे ‘हे अजून आपल्याला माहीत नाही’ असं मान्य करणं. अशी चपखल उदाहरणं देता देता लेखक म्हणतात, ‘अज्ञानाचा शोध हा माणसाला लागलेला एक मोठा शोध आहे. प्रामाणिकपणाची ही मोठ्ठीच्या मोठ्ठी झेप म्हणायची! असा प्रामाणिकपणा आपल्याला विज्ञान नावाच्या युक्तीकडे घेऊन जातो’.

‘अरेच्च्या! काय मस्त मुद्दा चमकवून दाखवला यांनी!’, माझ्यासारख्या शिक्षकाच्या मनात येतं. विज्ञानासाठी आवश्यक असलेली मूल्यं विज्ञानाच्या पद्धतीनंच, विज्ञानाच्या रस्त्यानंच रुजवली जातात हेच खरं. अज्ञान अमान्य करावं, एखादं चुकीचं- खोटं कारण चिकटवू नये हे सांगतानाही यात फारच मजेशीर उदाहरणं येतात.

‘जितका अचाट दावा, तितका बेफाट पुरावा हवा’ हा मुद्दा म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोनाचं सार आहे; डॉ. नरेंद्र दाभोळकरांच्या ‘जेवढा पुरावा, तेवढा विश्वास’ या विधानाची आठवण करून देणारं. ‘मी खोलीत वाघाएवढा डायनॉसॉर लपवला आहे’ अशी एका मित्रानं फेकलेली थाप खोडून कशी काढता येईल, इथपासून अतिंद्रिय शक्तीच्या दाव्यांपर्यंतची चर्चा यात होते.  

वैज्ञानिक पद्धत म्हणजे काय, एखाद्या प्रश्नाचा पाठपुरावा करण्यासाठी शास्त्रज्ञ ती पद्धत कशी वापरतात, हे मुलांशी गप्पा मारत शोधून काढलेलं आहे. त्यासाठी त्यांनी वापरलेलं मनीमाऊचं उदाहरण फारच भारी आणि काटेकोरपणे वैज्ञानिक आहे; मुलं सहज सर्व मुद्द्यांचा विचार करू शकतील असं. हे उदाहरण नेमकं काय आहे, ते सांगून टाकलं तर तुमची मजा जाईल. इतक्या सोप्या पद्धतीनं, सोप्या आणि गमतीदार भाषेत विज्ञानाची पद्धत सांगणारे डॉ. शंतनू हे खरेखुरे लोकवैज्ञानिक आणि मूलवैज्ञानिक आहेत.

विज्ञानाचे आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचे इतर सर्व पैलू – तर्कशास्त्र, तर्कातले दोष, छद्मविज्ञान – इथे सरळ उलगडून समोर ठेवले आहेत. ‘जिथे विज्ञान संपते, तिथे नवे संशोधन करण्याची संधी उपलब्ध आहे’ या विचारापर्यंत ते मुलांना घेऊन जातात. 

विज्ञान, विवेक, मानवता आणि उदारमतवाद ही प्रगतीची चार चाकं मुलांना समजावून सांगण्यात हे पुस्तक यशस्वी होणार हे नक्की. शास्त्रज्ञ होण्याचं स्वप्नही मुलांच्या मनात पेरलं जाणार. पुस्तक सोपं आणि मजेशीर करताना विज्ञानाची जिगर आणि रिगर मात्र कुठेही सोडलेली नाही. शास्त्रज्ञ व्हायचं तर कोणते गुण लागतात, कोणत्या उपजत गैरसमजुती आपल्या मेंदूतून प्रयत्नपूर्वक खोडून टाकाव्या लागतात, चिकित्सक विचारांची सवय कशी लावून घ्यावी लागते, हेदेखील ते सांगतात. मुलांना विज्ञानाच्या प्रवासाला लावून देऊन ‘मी आहे सोबत’ अशा एका आश्वासक नोटवर हे पुस्तक थांबतं.   

या पुस्तकाची ताकद म्हणजे, यात कुठेही उपदेशाचा, समजावण्याचा, माहिती देण्याचा स्वर नाही. केवळ गप्पा मारल्या आहेत. विषयाच्या मांडणीत, भाषेत सगळीकडे विनोदबुद्धी दिसते. हा विशेष ‘शंतनूपणा’ आहे. त्यांना तो पेरावा लागत नाही; तो येतोच आपसूक त्यांच्या लिखाणात.

हे पुस्तक वाचून खाली ठेवताच, ‘पुढचं पुस्तक कधी येणार सर?’ हा प्रश्न मुलांकडून, शिक्षकांकडून, पालकांकडून नक्की येणार याची खात्री आहे. मीसुद्धा पुढील पुस्तकासाठी उत्सुक आहे. वैज्ञानिक पद्धत नावाची युक्ती सामाजिक, आर्थिक, राजकीय क्षेत्रात कशी वापरता येते ते यात असेल अशी आशा करू या.

गीता महाशब्दे

geetamahashabde@gmail.com

नवनिर्मिती

लर्निंग फाउंडेशनच्या संचालक. शालेय शिक्षणाच्या क्षेत्रात गेली 25 वर्षे कार्यरत आहेत.