यश सप्रे
‘आयुष्य’… नक्की काय असतं हे आयुष्य, मला कोणी सांगेल का?
‘आयुष्य’ म्हणजे कसं तरी जगणं आणि जीवनातून मोकळं होणं का?
‘आयुष्य’ म्हणजे मी महान आणि इतर लहान असं का?
‘आयुष्य’ म्हणजे जात-पात, धर्म, रंगभेद, लिंगभेद, मी इतका पैसेवाला नि माझ्याजवळ हे नि ते असं का??
का आपण एखाद्या जीवाला वस्तू समजतो आहोत आणि एखाद्याला पाहून ठरवून वागत आहोत???
आणि जर आयुष्य असं असेल, तर मी अनाथच बरा…
तसं माझं बालपण एका छोट्या शेतकरी कुटुंबातील एका गावात सुरू झालं. बाबाचं मला आठवत नाही, पण माझी आई होती. आई आणि मी आजीला भेटण्यासाठी तिच्या घरी जात असू. असंच एकदा रेल्वे स्थानकावर असताना मी उत्सुकतेनं एकटाच पळत रेल्वेच्या डब्यात चढलो आणि इतक्यात गाडी सुटलीसुद्धा. काही क्षणातच माझ्या नजरेसमोर माझी आई दिसेनाशी झाली. खूप वेळ ओक्साबोक्शी रडत होतो. कोण्या दोन माणसांनी मला उचलून नेऊन पोलिसांच्या हवाली केलं आणि इथून सुरू झाली माझी कहाणी अनाथाश्रमाची! मी तेव्हा जेमतेम 3-4 वर्षांचा असेन.

वयाच्या 18 वर्षांपर्यंत मी अनाथाश्रमात लहानाचा मोठा झालो. साधारण चार वेगवेगळ्या संस्थांत माझं बालपण गेलं. संस्थेच्या नियमांमुळे आम्हा मुलांची वेगवेगळ्या आश्रमात बदली केली जात असे; शिवाय कोण कसा वागतो त्यावरूनसुद्धा बदली कुठे व्हायची हे ठरत असे. अगदी 20 मुलं असलेल्या संस्थेतही मी राहिलो आणि 350 हून जास्त मुलं असलेल्या संस्थेतही वाढलो. प्रत्येक संस्थेचा आपापला वेगळेपणा होता. तुम्ही जेवणार नाही असंही जेवण संस्थेत असताना जेवलो आणि कुठे सोन्याचा घासही मिळाला. कुठे प्रेम मिळालं, तर कुठे मार. कुठे छळ केला गेला, तर कुठे साथही मिळाली. कुठे स्वातंत्र्य मिळालं, तर कुठे बांधून ठेवलं गेलं. कुठे धू धू धुऊन काढलं, र येऊस्तवर मार मिळाला, तर कुठे मानसिक मारही… अशा कित्येक गोष्टी आहेत ज्या मी इथे लिहूही शकत नाही.
असे अनुभव मिळाले असले तरी बेहत्तर; पण ह्या अनाथाश्रमाच्या बाहेरचं जग लई वाईट. अनाथाश्रमात निदान अंदाज तरी होता काय घडेल ह्याचा; ह्या बाहेरच्या जगात तर काहीएक अंदाज नाही. पण काय करणार सरकार, बाहेर तर जावं लागणारच ना! मात्र ह्यासाठी तयारी करावी लागते हे कोणी सांगितलंच नाही कधी…
दहावीची परीक्षा संपली आणि माझा वाढदिवस, म्हणजे संस्थेनेच अंदाजाने ठरवलेला एक दिवस, येताच त्या दिवशी आमच्या संस्थेचे अध्यक्ष आले समोर. मला वाटलं कधी नव्हे तर प्रेमाने दोन शब्द बोलतील. पण कसलं काय, लगेच ते म्हणे, ‘‘काय रे 18 वर्षांचा झालास ना? मग निघ इथून. चालता हो.’’ अशा पद्धतीने आश्रमातून बाहेर पडलो. सुरुवातीला एका ख्रिश्चन संस्थेत काम करणार्या एका जोडप्याने मला त्यांच्या घरी सांभाळलं… माझ्यामुळे त्यांना त्रास होऊ नये म्हणून मी एका ‘आफ्टर केअर’ संस्थेच्या संपर्कात होतो. त्यांना विनवणी करून मी त्यांच्या संस्थेत राहण्यासाठी जागा मिळवली. ‘विनिमय ट्रस्ट’ ही संस्था साधारण तीन वर्षं राहण्यास परवानगी देते; जेणेकरून समाजाबद्दल जाणीव होऊन मग आपण समाजात जाऊ शकू. त्यावेळेस मी विविध ठिकाणी कामं केली; कधी पोटासाठी तर कधी पैशांसाठी.
बेचव, पाण्यासारख्या अन्नामध्ये लोणचं घालून खाता यावं म्हणून लोणचं विकत घेण्यासाठी आश्रमात असल्यापासूनच दूध डिलिव्हरीचं काम सुरू केलं होतं. कधीकधी कपड्याचा साबण विकून वडापाव खाल्ला. त्यानंतर केटरिंग सर्व्हिसचं कामही केलं. एक दिवसाच्या कामाचे 70 रुपये मिळत; शिवाय जेवणही. 18 वर्षांचा झाल्यावर ऑफिस बॉय म्हणून काम करू लागलो, कारण मी दहावीमध्ये नापास झालो होतो. शिक्षण कमी असल्यास समाज कसा हिणवतो, ते नापास झाल्यावर कळलं. अशा पद्धतीने समाजाचे चटके आणि धक्के लागण्यास सुरुवात झाली. प्रत्येकजण प्रश्नांची आणि शंकांची एके-47 बंदूकच जणू घेऊन बसल्याचं दिसत होतं. माझं नाव काय आहे ह्यापासून ते जातीपातीपर्यंतचा संघर्ष. मग हळूहळू मी माझ्या आजच्या नावापर्यंत पोहोचलो. ती कहाणी मोठी दिलचस्प आहे; पण ती परत कधीतरी. नशिबाने काही मंडळी माझ्या आयुष्यात होती, समाज समजवण्यासाठी. त्यांनी मला काही प्रमाणात सावरलंही. काहींनी कधी साथ सोडली नाही, तर काहीजण प्रेम देऊन नंतर अचानक काही न सांगता आयुष्यातून निघून गेले. माझ्या काळजाचे तुकडे तुकडे केले. अरे… निदान काय चुकलं हे तरी सांगावं ना! असं वगळून कसं काय जाता येतं? कित्येकदा माणसं आयुष्यात आली, त्यांना वाटलं तेव्हा माझ्या मनाशी खेळली; पण मी मात्र कधीही भेद केला नाही. कारण प्रेम करणं हे माझ्या रक्तात आहे. एखाद्याला प्रेम मिळत नाही, तर काय त्रास होतो हे मला खूप चांगलंच ठाऊक आहे…
कितीही काहीही झालं, तरी माझा शोध संपला नव्हता. कुठे तरी स्वतःसारख्या विचाराचे लोक असतील, कुठे तरी मला प्रेम मिळेल ह्या भावनेने दरवेळी हरूनही उठत गेलो. खूप त्रास करून घेतला. मानसिक त्रासासोबत कायमस्वरूपी शारीरिक त्रासही करून घेतला. काश! त्या वेळेस मार्गदर्शन करणारी कोणी व्यक्ती माझ्या आयुष्यात असती, तर आज माझं शरीर आणि मी नीट असतो.
स्वतःला बलवान करून मी धावतो आहे शोधात…
… असा शोध घेत घेत मी येऊन टेकलो उदयपूरला. माझ्या जवळच्या मित्र-मैत्रिणींसोबत मी स्वराज युनिव्हर्सिटी*ला पहिल्यांदा आलो. आणि सुरू झाला आणखीन एक वेगळा प्रवास अल्टरनेटिव्ह एज्युकेशनचा. त्या आधी ‘पुकार’ संस्थेमुळे मला बरेच सामाजिक विषय समजले होते, शिवाय मी ‘अनवाणी शोधक’ (बेअरफूट रिसर्चर) म्हणून तीन विषयांवर काम केलं होतं. तिथे काही जिवाभावाची माणसं जुळली. ‘स्वराज’मध्ये पहिल्यांदा मी दोन वर्षं हवं तसं, पैसे मिळवत राहण्यासाठी काही काम न करता, शिकू शकलो. भारतभर वेगवेगळ्या लोकांना, जागांना भेट देत गेलो. नवीन जग समजलं. मी स्वतःला शोधू शकलो ह्या प्रवासात. माझे मित्र-मैत्रिणी आणि त्या दोन वर्षांच्या प्रवासात ज्यांनी मला वेळ दिला त्यांचा मी खरंच ऋणी आहे. आनंद खूप होता. गंमत म्हणजे मी तिथे गेलो ‘फिल्म मेकिंग’ शिकायला आणि दोन वर्षांनी बाहेर आलो ‘शेफ’ बनून… आता शिक्षणपद्धतीवर आणि स्वतःवर काम करत आहे.
एका आदिवासी पाड्यावर निसर्गाच्या संगतीत काम करायचं आहे म्हणून तयारी चालू आहे. उदयपूरला शिकत असताना मला एक जोडपे भेटले. त्यांच्याशी चांगली गट्टी झाली माझी. एके दिवशी त्यांनी मला दत्तक घेण्यासाठी विचारणा केली; माहीत नाही मस्तीत बोलत होते की खरंच ते. पण मी मात्र त्यांना त्या वेळेस म्हणालो, ‘‘जमलं तर तुम्ही एखाद्या लहान मुलीला दत्तक घ्या. मी तर आता घोडा झालोय. माझ्याऐवजी एका लहान मुलीला तुमच्यासारखी माणसं मिळतील तर फार बरं होईल.’’ साधारण तीन वर्षांनी मला त्यांचा संदेश आला. ‘लडके घर आजा, तेरी छोटी बहन आ गयी है’. हे ऐकून खूप आनंद झाला. मी तिला भेटूनही आलो मागच्या वर्षी दिवाळीत. खूप गोड आहे माझी बहीण.
मला आठवत नाही आमच्या वेळेस दत्तक घेणं ही प्रक्रिया प्रचलित होती का ते; पण काही वर्षांनंतर जोरात सुरू झाली. लोक मुलं दत्तक घेऊ इच्छित आहेत हे ऐकून फार भारी वाटलं. मूल दत्तक घेण्याने त्या आई-बाबाना जितका आनंद होत असेल, त्याहून कित्येक पटींनी त्या अनाथ मुलाला होतो, ही गोष्ट नाही कळणार कोणाला. इट इज हिडन हॅप्पीनेस!
मला आठवतं, मी आश्रमात असताना शनिवारी-रविवारी इतर काही मुलांचे नातेवाईक यायचे. त्यांना पाहून मला रडू यायचं. एखाद्याची आई त्याचे डोळे पुसत तर एखाद्याला कुशीत झोपवत असायची. हे दृश्य लपूनछपून पाहून डोळ्यात अश्रूंच्या धारा वाहत. काश! माझे आई-बाबा असते असं वाटायचं; पण अश्रू गिळून टाकावे लागायचे. असं करत करत माझ्या डोळ्यांना अश्रू मागे घेण्याची सवय लागली. आपल्याला असं प्रेम मिळणार नाही हे समजलं. म्हणून मी स्वतःला फिल्मी दुनियेत हरवून घेत, ह्या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत, मोठा होत गेलो आणि ‘कुटुंब नाही हेच बरं’ असं स्वतःला सांगत आयुष्य ढकलत गेलो. मात्र आपलं कोणी प्रेम करणारं हवं, हे नाकारू शकलो नाही. आताही कोणी दत्तक घ्यावं असं वाटत राहतं. एखाद्या मित्राला बिनधास्त हवं ते शिकायला, हवं तिथे फिरायला, हवं तसं खायला मिळतं, तो हवी ती वस्तू घेऊ शकतो; त्याला हवं तसं जगताना पाहून वाटतं, जर का मला माझं कुटुंब असतं, तर किती कायकाय केलं असतं… पूर्ण चित्र बदललं असतं. कधीकधी काही मुलांना प्रॉपर्टीकरता स्वतःच्या घरच्यांना मारताना, त्यांच्या प्रेमाचा गैरफायदा घेताना पाहून वाईट वाटतं. आपल्या आई-बाबांना हे कसा त्रास देऊ शकतात, कुटुंब असल्याचं महत्त्व कसं समजत नाही ह्या मुलांना, हे मला कळतच नाही. कधीकधी मग प्रश्न पडतो, की मूल स्वतःचं जन्माला आणावं की दत्तक घ्यावं?
‘दत्तक घेण्यापेक्षा स्वतःचं रक्ताचं मूल असलेलं नेहमी चांगलं’ असं मला माझी एक जवळची ताई म्हणाली होती. पण त्यांना मी कसं सांगू, की ताई ह्या काळात आपली रक्ताची नातीही आपली साथ देत नाहीत, मग रक्ताच्या नात्याचं काय घेऊन बसलोय आपण? त्या उलट एका आईने मला खूप सुंदर सांगितलं. ती म्हणे, ‘‘यश, मूल आपलं रक्ताचं असो की दत्तक घेतलेलं, आपल्या मनातून आलं ना की हे मूल माझं आहे, तर ते आपलं असतं. तेव्हा दत्तक असलेलं बाळही दत्तक राहत नाही.’’
असाच विचार जर का केला, तर कित्येक अनाथ मुलांचं आयुष्य बहरेल आणि सर्वांचं आयुष्य सुंदर होईल!
यश सप्रे

camperchef.ing@gmail.com
नेरळला आदिवासी लोकांबरोबर काम करतात. समाजमाध्यमावर ‘कॅम्पर शेफ’ ह्या नावाने फूड-कल्चर, रिस्पॉन्सिबल टुरिझम अशा विषयांना तसेच स्थानिक कारागिरांच्या वस्तूंना स्थान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतात.
*स्वराज युनिव्हर्सिटी: https://www.swarajuniversity.org
 
 
             
             
            
