“अंघोळीनंतरचा दमट टॉवेल खोलीत जमिनीवर पडलेला असतो तसाच रोज. कितीही वेळा सांगितलं तरी फरक पडत नाही. सांगून, ओरडून, रागावून, काही करून ह्याच्या डोक्यात शिरत नाही. टॉवेल उचलून वाळत घालणं अगदी सहज शक्य आणि गरजेचं आहे. सातवीतल्या मुलाला एवढंही जमू नये!”
ह्याऐवजी, माझं गोड पोरगं टॉवेल उचलून वाळत घालण्याची छोटीशी पण महत्त्वाची जबाबदारी अनेकदा सांगूनही पार पाडत नाहीये म्हणजे त्यामागे काहीतरी असेल, ते हुडकून काढलं पाहिजे, असा विचार करता येईल का मला? मग मी विरुद्ध मुलगा+टॉवेल हा सामना व्हायच्याऐवजी, मी+मुलगा विरुद्व टॉवेल हा सामना रंगेल.
“काय रे, रोज काय होतं तुझ्या डोक्यात त्या जमिनीवरच्या टॉवेलविषयी?”
“मला दिसतच नाही तो टॉवेल! खरंच सांगतोय!”
“अरेच्या! मग काय दिसतं तुला खोलीत गेल्यावर?”
“कपाटाचं दार दिसतं, समोरची भिंत दिसते…”
“मग पाटी लावूया का समोरच्या भिंतीवर? ‘टॉवेल उचल’ अशी? म्हणजे लक्षात येईल.”
हा प्रसंग आहे अमेरिकी मानसशास्त्रज्ञ
डॉ. बेकी केनेडींच्या घरातला. बेकी ‘गुड इनसाइड’ नावाची पालकत्वाबद्दल प्रशिक्षण देणारी कंपनी चालवतात. यूट्युबवरही त्यांचे अनेक व्हिडिओ उपलब्ध आहेत. आपलं मूल ‘गुड इनसाईड’ आहे आणि तरीही विचित्र वागतंय, तेव्हा त्यामागचं कारण शोधण्याचं कुतूहल माझ्यात निर्माण व्हावं, अशी त्यांच्या मांडणीची सुरुवात होते. पाटी लावल्यावर मुलगा टॉवेल उचलू लागला का, तर अगदी दर वेळी जरी नाही, तरी ८०% वेळेस हो!
ह्या साध्या प्रसंगापासून सुरुवात करून एकूणातच मुलं शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सशक्त कशी वाढतील ह्याबद्दल त्या अनेक सिद्धांत मांडतात. माझ्या आयुष्यात माझ्याशी असं कोणी कधीच वागलं नसेल, तर मी माझ्या मुलांशी असं वागणं कसं शक्य होईल, ह्याची उकलही त्या करतात. मूल झालं की आपोआप उमगतं काय करायचंय ते, निसर्गतःच आपल्याला माहीत असतं ते… वगैरे ऐवजी, व्यवस्थित प्रशिक्षणाशिवाय जसं डॉक्टर होता येत नाही तसंच हे आहे, ह्या अत्यंत महत्त्वाच्या कामासाठी अनेक कौशल्यं शिकून आत्मसात करायला हवीत, अशा मताच्या त्या आहेत.
ह्या वर्षभरात दर महिन्याला ह्या पानावर आपण डॉ. बेकी केनेडी ह्यांचे वेगवेगळे सिद्धांत वाचूया!
रुबी रमा प्रवीण

पालकनीती संपादकगटाच्या सदस्य.