मुखपृष्ठावरील कबीराच्या भजनाचा दिसलेला अर्थ…
कसा खुळेपणा भरला आहे या दुनियेत…
सांगूनसुद्धा यांना सत्यअसत्य आकळत नाही,
आपसात लढाया करून मरायची वेळ आली, तरी मर्म समजून घ्यायची तयारी नाही.
लोकांनी घालून दिलेले नियम, कायदे, रूढी शिस्तशीर पाळणारे भरपूर भेटले आहेत…
पण तसं का करायचं याचा विचार जोपर्यंत करत नाही, तोपर्यंत ज्ञानार्थ कसा कळणार?
सराव खूप करतात, पण मनात दुसरेच काही घोळत असते;
त्यावर उपाय करू पाहताना फक्त सरावाचे मार्ग बदलतात,
प्रत्येकजण वेगळ्या माणसाच्या मागून जायचे ठरवतो.
शिक्षण, अभ्यास, व्याख्यानं, शिबिरं खूप झाली;
शिक्षण विकत देणारेही घरोघर भेटले,
पण माणुसकी, दया, करुणा कुठे गळून गेली समजलेच नाही!
आपण काय करतो आहे, कशासाठी, त्याचा अर्थ काय, त्याचा परिणाम काय…
या सगळ्याची इन्क्वायरी केली नाही तर
कबीराने सांगितलेले ‘जग बौराना’ आपल्याच अंतर्यामी आपल्याला भेटेल!
नीलिमा सहस्रबुद्धे