‘मुलांचे मासिक’
लहान वयात मुलांना गोष्टी, कविता, बडबडगीते इत्यादी साहित्यप्रकार खूप आवडतात. त्यातून नकळत चांगली मूल्ये रुजत जातात. मुलांच्या मनाची घडणूक होत राहते. ‘मुलांचे मासिक’ हे कार्य गेली 94 वर्षे सातत्याने करीत आहे. बालवाचकांना त्यांच्या वाढवयात दर्जेदार साहित्य देण्याचा मासिकाने नेहमीच प्रयत्न केला आहे. ‘मुलांचे मासिक’ लहान मुलांच्या हुशारीवर आणि निरागसतेवर विश्वास ठेवते.
इंग्लंडमध्ये फार पूर्वी ‘चिल्ड्रेन्स मॅगझीन’ प्रसिद्ध होत असे. त्यावरून प्रेरणा घेऊन मासिकाचे नामकरण ‘मुलांचे मासिक’ असे करण्यात आले. असंख्य बालसाहित्यिकांना या मासिकाने हक्काचे व्यासपीठ मिळवून दिले.
नोव्हेंबर 1927 मध्ये ‘मुलांचे मासिक’ चा पहिला अंक संस्थापक संपादक श्री. बा. रा. मोडक यांनी मुलांसाठी प्रसिद्ध केला. तेव्हापासून आजतागायत मासिकाची दमदार वाटचाल सुरू आहे.
वि. स. खांडेकर, ना. सी. फडके, पु. भा. भावे, चिं.वि. जोशी, रियासतकार सरदेसाई, राजा बढे, राम शेवाळकर, भा. रा. भागवत ह्यांपासून ते अलीकडील राजीव तांबे, सलील कुलकर्णी, सुबोध भावे अशा अनेकांनी मासिकात बालवाचकांसाठी लेखन केले आहे. मुलांची अभिरुची लक्षात घेऊन त्यांना आनंद मिळेल असे साधे, विज्ञाननिष्ठ साहित्य देण्याकडे मासिकाचा कल असतो. कालौघात मासिकाने अधिक देखणे, सचित्र, व्यापक रूप धारण केले. ‘मुलांचे मासिक’चे विविध विषयांवरील विशेषांक हे एक वैशिष्ट्य म्हणावे लागेल. विज्ञान, गणित, वसुंधरा, कॉम्युटर, आरोग्य, स्वातंत्र्य असे निरनिराळे विषय ह्या निमित्ताने मांडले गेले आणि अत्यंत लोकप्रिय झाले. दिवाळी अंक आणि इतर विशेषांक हे संपूर्णपणे बहुरंगी असतात.
नवे-जुने लेखक, बालवाचक, त्यांचे पालक, अशा सगळ्यांचा मासिकावर फार लोभ आहे. मुलामुलींसाठी तर ही न संपणारी शिदोरी आहे. ‘मुलांचे मासिक’ने आपली वेगळी ओळख नेहमीच जपली आहे. येत्या काळात ‘मुलांचे मासिक’ नव्या रूपात बालवाचकांसमोर येण्याच्या दृष्टीने सज्ज होत आहे. विज्ञान, संगणक, पर्यावरण, समानता, राष्ट्रीय प्रश्न, आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा, कला अशा विविध विषयांवरील प्रवाही, सकस, भावनाप्रधान आणि ज्ञानमूलक साहित्य ह्यामुळे मुलांना उपलब्ध होणार आहे. ह्या चळवळीत बाल साहित्यिकांनाही सामावून घेण्याचा मासिक-कर्त्यांचा प्रयत्न आहे.