लॉकडाऊनदरम्यान अनुभवलेले मातृत्व

मुस्कान ही भोपाळमधील उपेक्षित समाजघटकांसाठी काम करणारी स्वयंसेवी संस्था आहे. काही वर्षांच्या अनुभवानंतर आपल्या कामाची दिशा ठरवून घेत संस्थेनेदोन कार्यक्षेत्रे निश्चित केली आहेत. संपूर्ण कुटुंबात पहिल्यांदाच शाळेत जाणाऱ्या मुलांना अर्थपूर्ण शिक्षण उपलब्ध करून देणे, आणि समाजातील उपेक्षित वर्गाला दारिद्र्य, पिळवणूक, सामाजिक विषमता ह्यांवर मात करून आत्मसन्मानाने जगता यावे, म्हणून त्यांचे सक्षमीकरण करणे.

लॉकडाऊनदरम्यान आमच्या आसपासच्या स्त्रियांमधील मातृत्वाचे आम्हाला आलेले अनुभव मांडत आहोत. ह्यांत दिवसेंदिवस तळपत्या उन्हात आपल्या कुटुंबाच्या दोन वेळच्या जेवणाची सोय करण्यासाठी रांगेत उभ्या राहणाऱ्या स्त्रिया आहेत, आपल्या मुलांना सुरक्षित घरटं मिळावं ह्यासाठी धडपडत असतानाच लॉकडाऊनमुळे काही कारणानं पालकांपासून दुरावलेल्या शेजारच्या मुलांचीही काळजी घेणाऱ्या स्त्रिया आहेत,काहीजणी वस्तीतल्या मुलांना एकत्र करून वाचन, लेखन आणि गप्पागोष्टींच्या माध्यमातून सद्यपरिस्थिती समजायला मदत करताहेत, तसेच एकत्रितपणे त्यांच्यावस्तीच्या सुरक्षिततेचा विचारकरणाऱ्या स्त्रियाही आहेत…

मुकेशबाई ह्या एकल माता आहेत. आपल्या चार अपत्यांचा सांभाळ त्या एकटीनं करतात. थोरल्या दोघांची आता लग्न झाली आहेत, आणि त्यांचं सगळ्यात धाकटं मूल फक्त दोन वर्षांचं आहे. ४५ वर्षांच्या आपल्या आयुष्यात त्यांनी बरंच काही पाहिलं आहे. त्यांचं म्हणणं आजूबाजूला सगळं बंद असलेलं बघणं मुलांना खूप जड जातंय. अशावेळी त्यांची जास्त काळजी घेणं गरजेचं झालंय.

विशेषतः त्यांची ५ वर्षांची मुलगी ह्या परिस्थितीमुळे थोडी धास्तावली आहे. “तिला शब्दांत व्यक्त करता येत नसलं, तरी मला ते जाणवतंय. आताशा ती मला अजिबात सोडत नाही. मुलांना एकटं वाटू नये म्हणून मीही हल्ली त्यांच्याशी सतत बोलत राहते.”

एका खोलीत मध्ये अडसर घालून केलेल्या दोन छोट्या खोल्यांत हे कुटुंब राहतं. वाढत्या गरमीमुळे तेवढ्याश्या जागेत सगळ्यांना दाटीवाटीनं राहणं खूप कठीण जातंय. “आम्ही गल्लीत कधीकधी ल्युडो किंवा मग चेकर्स खेळतो. कधी जास्तच गरम होत असेल, तर सगळे मिळून कार्टून बघत बसतो. माझ्या थोरल्या मुलाला वाचायला येतं. तो केंद्रातून पुस्तक घेऊन येतो आणि सगळ्यांना मोठ्यानं वाचून दाखवतो.”


दुर्गा एक वेगळंच वास्तव मांडते. दारू पिऊन पालकांमध्ये होणारी घरोघरची भांडणं सध्या थांबलेली असल्यानं मुलांना जरा दिलासा मिळाला आहे. आधी असं व्हायचं, की आईवडील भांडताभांडत कधीकधी रस्त्यापर्यंत पोचत. अशा वेळी त्यांचा अपघात वगैरे होण्याच्या कल्पनेनं मुलं घाबरी होत. दुर्गा ही ओझा गोंड ह्या आदिवासी जमातीची आहे. तिच्या जमातीला शहरी जगणं खूप कठीण जातं.

काही वर्षांपूर्वी दुर्गा त्यांच्या वस्तीत चर्चेचा विषय झाली होती. निमित्त ठरलं तिचं पोलीस ठाण्यात जाऊन नवऱ्याविरुद्ध फिर्याद करणं. फिर्याद का, तर नवरा त्यांच्या मोठ्या मुलीला शिकू देत नव्हता. तिनं आटापिटा करून मुलीला काही महिने शाळेत पाठवलं; पण दबावापुढे अखेर तिला माघार घ्यावी लागली. हलकेच हसत ती म्हणाली, “आम्ही मुलांसाठी स्वप्नं पाहिली; पण प्रत्यक्षात नाही आणू शकलो.” सध्या ती खूष आहे, कारण वस्तीतले काही युवक संध्याकाळच्या वेळी मुलांचे वर्ग घेत आहेत, मुलंही शिकताहेत. शिक्षणाचं त्यांचं स्वप्न पूर्ण करावं म्हणून ती मुलांना प्रोत्साहन देत राहते. मुलं एक मीटरचं अंतर पाळून रस्त्यावरच्या दिव्याखाली अभ्यासाला बसतात. मध्यंतरी, एका पत्रकारानं हे पाहिलं आणि त्यांचा फोटो काढून लगेच ‘बेघर मुले’ अशा शीर्षकाखाली छापूनही टाकला. दुर्गा ह्या प्रकारानं वैतागून म्हणाली, “आम्हाला विचाराल की नाही? पालक मुलांच्या शेजारी बसलेले दिसत असूनही सरळ त्यांना बेघर म्हणून मोकळा झाला.”

“लोक देतील ते आज आम्ही खात आहोत. लोकांनी धान्य-डाळी दिल्या, तर अधिक बरं, कारण किती शिजवावं त्याचा आम्हाला अंदाज असतो. शिजलेली अन्नाची पाकिटं मिळाली, तर ‘हे उद्याही येतील ना घेऊन?’ अशी काळजी वाटत राहते. कुणी काही वाटत असेल, तर त्यांच्यामागे धावू नका म्हणून मी मुलांना सांगते. मुलंच ती; पण वस्तीत कोविडचा शिरकाव होऊ नये, म्हणून आम्हाला काळजी घेतली पाहिजे.”


मंडवा वस्तीतली आम्रपाली असो, की कृष्णानगरमधली सोनी,मोठी माणसं नसलेल्या घरांत लहानग्यांपर्यंत अन्न पोचतंय नं, ह्याची त्या दक्षता घेत राहतात. सोनीनं सांगितलं, की सासूपासून लपवून ती काही जास्तीच्या पोळ्या करते आणि शेजारी राहणाऱ्या तीन मुलांपर्यंत पोचत्या करते. लॉकडाऊनची कुणकुण लागली, तेव्हा त्यांचे आईवडील आपल्या मुलीला आणायला गावी गेले, आणि आजतागायत परतू शकलेले नाहीत.

सोनीप्रमाणेच आम्रपालीदेखील शेजारी राहणाऱ्या चार मुलांच्या खाण्यापिण्याची काळजी घेतेय. त्यांची आई अन्नाच्याशोधात दिवसभर वणवण करत असताना एवढा वेळ मुलं उपाशी राहू नयेत म्हणून तिची धडपड चाललेली असते. खरं तर आम्रपाली स्वतः वस्तीवर वाटप होणाऱ्या अन्नधान्यावर अवलंबून आहे; पण तरीही आपल्या कष्टकरी शेजा-यांमधील अधिक अभावग्रस्त कोण आहे ह्यावर ती लक्ष ठेवून असते आणि त्यांच्या गरजा पुरवण्यासाठी तिची धडपड चाललेली असते.

आपल्याला हा आजार होईल ह्या विचारानं तिचा सहा वर्षांचा मुलगा खूप घाबरलेला आहे. त्यामुळे तो सारखा त्याचा टॉवेल चेहऱ्यावर पांघरून बसलेला असतो. ती सतत त्याला समजावून सांगत राहते, की घरात असं काही करायची गरज नाही. फक्त अनोळखी व्यक्तीपासून किंवा आजूबाजूला कुणी खोकत असल्यास जागरूक राहा.

तिचं म्हणणं, “प्रत्येकाला शुद्ध हवेची गरज असते. त्यामुळे मी मुलांना बाहेर खेळू देते. फक्त रस्त्याच्या कडेला ती खेळत असताना त्यांच्याकडे लक्ष ठेवते, एवढंच.”

“बाजारातून काहीही, अगदी कलिंगड आणलं, तरी काही वेळ आम्ही ते उन्हात ठेवतो, नंतर घरात आणून स्वच्छ धूतो आणि मगच खातो. कधीकधी मुलं कुठली गोष्ट दुकानातून आणावी म्हणून अगदी धोषाच लावतात. अशा वेळी मी अगदी कातावून जाते; पण मग मी स्वतःलाच विचारते, की ह्यात त्यांचा काय दोष? त्यांच्या वडिलांना मी त्यांच्यावर अजिबात हात उचलू देत नाही.”


अंजूला दोन मुलं आहेत;मुलगा चार वर्षांचा आणि मुलगी दोन वर्षांची. घरातली माणसं, विशेषतः लहान मुलं, कोविड-१९ च्या प्रतिबंधात्मक उपायांचं पालन करताहेत ना, ह्याबद्दल ती जागरूक असते. म्हणजे मुलं घराबाहेर गेली, तर साबणानं त्यांचे हात धुणं, घराबाहेर नेहमी पाण्याची भरलेली बादली आणि साबण ठेवणं वगैरे. ती म्हणाली, “मोठ्यांनी हे केलं नाही, तर लहानांकडून सुरक्षेची काळजी घेण्याची आपण अपेक्षा कशी करणार?” तिच्या बंजारा वस्तीतली माणसं पिण्याच्या आणि वापरासाठीच्या पाण्यासाठी एक दिवसाआड येणाऱ्या टँकरवर अवलंबून असतात. आधी आयांबरोबर मुलंही येत पाणी भरायला; पण आता वस्तीतल्या बायका त्यांना येऊ देत नाहीत.

 (भोपाळमधील निरनिराळ्या वस्त्यांमध्ये अन्नधान्याचे वाटप करत असताना सीमा आणि शिवानीचे तेथील स्त्रियांशी जे बोलणेझाले, त्यातील हे काही अंश.)

सीमा आणि शिवानी  | shivanitan@gmail.com

source: http://www.muskaan.org/blog/mothers-experiences-in-the-lockdown/