लोक हेच खरे वैज्ञानिक आहेत, प्रत्यक्ष गावखेड्यांत जगणाऱ्या लोकांकडे पिढ्यान्‌पिढ्यांचे साठलेले शहाणपण असते – त्यामुळे निसर्गाबद्दल, स्थानिक परिसंस्थांबद्दल, पर्यावरणाबद्दल त्यांना खोल समज असते ही भूमिका घेऊन समकालीन चर्चाविश्वातील अनेक मतप्रवाह, रूढ पद्धती आणि प्रस्थापित समजुतींना आव्हान देत त्यांची पुनर्रचना करण्याचे काम गेल्या तीन–चार दशकांपासून गाडगीळ सर करत होते.

कर्नाटकातील बांबूवर काम करणारे बुरुड समुदाय असोत, मैसूरजवळील बिळी-गिरीरंगन-बेट्टा पर्वतरांगांमध्ये कुमरी शेती करणारे शोलिगा आदिवासी असोत किंवा महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील गोंड आदिवासी समुदाय – या सगळ्यांची निरीक्षणे किती वैज्ञानिक आहेत हे गाडगीळ सरांनी अनेकदा ठोस उदाहरणांसह समाजासमोर मांडले. प्रसंगी त्यांनी शास्त्रज्ञ म्हणवणारे, अधिकारी आणि मोठ्या उद्योगपतींच्या भूमिकांना थेट आव्हान दिले. अपुऱ्या आकलनातून किंवा जाणीवपूर्वक, प्रस्थापितांच्या भूमिकेमुळे त्यांच्या विधानांचे अनेकदा विपर्यास करण्यात आले. मात्र ते हाडाचे वैज्ञानिक होते. कोणत्याही अपप्रचाराला, घूमजावला किंवा दबावाला ते कधीच घाबरले नाहीत.

कर्नाटकात कागद उत्पादक कंपन्या आणि वनविभाग यांची भूमिका कशी चुकीची किंवा अपुऱ्या ज्ञानावर आधारलेली आहे हे त्यांनी बुरुड समुदायांसोबत केलेल्या कामातून स्पष्ट केले. बिळी-गिरीरंगन-बेट्टा पर्वतरांगांमध्ये नैसर्गिकरित्या लागणाऱ्या वणव्यामुळे आवळ्याची झाडे कशी वाढत होती, हे त्यांनी पुढे आणले.

पर्यावरणीय प्रश्नांची उत्तरे शोधायची असतील तर प्रयोगशाळांची मदत घ्यावीच, पण त्याआधी लोकांकडे जायला हवे, लोकांकडेच त्या प्रश्नांची उत्तरे असतात – हा त्यांच्या कामाचा आणि मांडणीचा केंद्रबिंदू होता. त्यामुळेच मुंबई विद्यापीठाचा ‘परिसर विज्ञान’ अभ्यासक्रम त्यांनी गडचिरोलीतील मेंढा-लेखा गावात अभ्यासवर्ग स्वरूपात घेतला होता.

याच अभ्यासवर्गातून विजय देठे हा कार्यकर्ता-अभ्यासक घडला. त्याने पाचगावसारखी प्रयोगभूमी उभी केली. पाचगावातील लोकांनी विजय देठे यांच्या मदतीने ‘लोकज्ञान आधारित निसर्ग नियोजनाची’ प्रयोगशील वाट चोखाळली. सामुदायिक वनहक्कातून पाचगावला सुमारे एक हजार हेक्टर जमीन मिळाली. या जमिनीचे व्यवस्थापन कसे करायचे, लोकांचे ज्ञान वापरणे म्हणजे नेमके काय करायचे हे विजय देठे गाडगीळ सरांच्या अभ्यासवर्गातून शिकले आणि त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी पाचगावात केली.

तेंदू पानांची मोठ्या प्रमाणावर होणारी तोड थांबवण्याचा गावाने सर्वानुमते निर्णय घेतला. पानांच्या अतितोडीमुळे तेंदू फळे कमी होत होती. त्यामुळे लोकांना फळे मिळत नव्हती आणि पुढे नवीन रोपेही उगवत नव्हती. तेंदू फळे आणि त्यापासून बनवलेले पदार्थ मुलांच्या पोषणासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. पूर्वी ही फळे दुधातून मुलांना दिली जात. पुन्हा ही प्रथा सुरू झाली. उरलेली फळे विकून उपजीविकाही सुरू झाली.

मध्य प्रदेशातील शिवनी जिल्ह्यातील गोंड आदिवासी अक्षय तृतीयेनंतर परंपरागत ‘पंडूम’ सण साजरा करून चारोळी तोडत. त्यामुळे तोपर्यंत फळे पिकून काही प्रमाणात खाली पडत आणि त्यातून नवीन रोपे उगवत. मात्र व्यावसायिक फायद्यासाठी ही चारोळी लवकर तोडली जाऊ लागली. गाडगीळ सरांच्या निसर्ग-नियोजन आधारित व्यवस्थापन पद्धतीचा वापर करून लोकांनी पुन्हा जुनी प्रथा सुरू केली. परिणामी चारोळीचे उत्पादन सुमारे ३० टक्क्यांनी वाढले आणि जंगलात नवीन चारोळीची झाडेही दिसू लागली.

महाराष्ट्रात गाडगीळ सरांच्या पुढाकारातून ‘महाराष्ट्र जनुक कोश’सारखा अनोखा कार्यक्रम राबवण्यात आला. या कार्यक्रमात त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हालाही काम करण्याची संधी मिळाली. या उपक्रमात जमिनीशी जोडून काम करणाऱ्या लोकांच्या ज्ञानाला, मतांना आणि विचारांना प्राधान्य देण्यात आले. कवळी, दगडी, मालदांडी, पिवळी अशा ज्वारीच्या जाती, शेवाळी मिरची, खपली गहू, पावण्या आणि मारवेल गवत यांचे मोठ्या प्रमाणावर संवर्धन झाले.

याच विचारांतून विदर्भात पारधी समुदायांच्या ज्ञानाचा वापर करून कौस्तुभ पांढरीपांडे यांनी गवत, गवताळ कुरणे, माळरान आणि नामशेष घोषित करण्यात आलेल्या तणमोर पक्ष्यांचे संवर्धन केले. शिकारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, निसर्गाचे शत्रू ठरवलेल्या समुदायातील लोक तणमोर पक्ष्यांच्या संवर्धनासाठी पुढे आले. पारधी समाजातील हिंमतराव पवार आणि बुगावाई आजी यांच्याशी संवाद साधताना गाडगीळ सर जणू रेचल कार्सन यांनी मांडलेलीच भूमिका मांडत होते. आपण जर शहरी ज्ञानाच्या कोशातून बाहेर पडलो नाही, लोकांशी संवाद साधला नाही, तर हे ज्ञान आपल्याला कधीच कळणार नाही.

गाडगीळ सर गेले. पण जाण्याआधी ते अमूल्य लिखाण करून गेले. त्यांची भूमिका ही पुस्तके पुढेही मांडत राहतील. सह्यचला आणि मी, बहुरूपी हक्काची वनराजी, निसर्गाने दिला आनंदकंद, उत्क्रांती : एक महानाट्य, सह्याद्रीची आर्त हाक ही मराठी पुस्तके, तसेच लोकजैवविविधता नोंदवही मार्गदर्शिका आणि समुदाय आधारित वनव्यवस्थापन मार्गदर्शिका आपल्याला दीर्घकाळ दिशा देत राहतील. गाडगीळ सरांना विनम्र आदरांजली.

बसवंत विठाबाई बाबाराव

वनराई, पुणे