उदयन देवपुजारी
उदयन नुकताच दहावी झालाय. आजूबाजूच्या गोष्टींबद्दल प्रश्न पडण्याचे, कुतूहल वाटण्याचे, भावनांचे कल्लोळ उठण्याचे हे वय; काही तरी समजतेय म्हणताना बरेच काही समजतच नाहीय, असे वाटायला लावणारे. वयाच्या अशा टप्प्यावर असताना उदयनच्या हाताला प्रकाश नारायण संतांची पुस्तके लागली. वनवास, शारदा संगीत, झुंबर, पंखा किशोरवयीन मुलांचे भावविश्व रेखाटणारी ही पुस्तके वाचताना मनात खोलवर कुठे तरी शांत तरंग उठतात असा आपल्या सगळ्यांचाच अनुभव आहे. आपल्या मनात जसा भावनांचा कल्लोळ आहे तसा तो सगळ्यांच्याच मनात असतो हा दिलासा ही पुस्तके देतात. त्या भावनांकडे स्पष्टपणे बघण्याचे, त्यांना नीट समजून घेण्याचे, स्वीकारण्याचे आणि योग्य पद्धतीने व्यक्त करण्याचे त्यातून बळ मिळते. मग कोणत्याही विषयाला खोलात जाऊन भिडताना मागे पुढे पाहिले जात नाही. ही पुस्तके वाचून उदयनलाही असेच काहीसे अनुभव आलेले दिसताहेत…
वनवास, शारदा संगीत, पंखा, झुंबर… एक छानपैकी हसूच फुलणार मनात; हळूच… नक्कीच. प्रश्नच नाही! त्या मॅड लंप्याच्या मॅड वनवासाचा मॅड वास मनात भरून येणार… एकोणीस हजार सतराशे साठ वेळा मॅडसारखं मॅड म्हणत राहावंसं वाटणार… मघाशी मनात फुटलेलं हसू आता हळूचकन गालावरसुद्धा आलंय हे नेमकंच समजणार. आता मनावरचा ताबा सुटत चाललाय… आपण सणसणीत मॅड होत चाललोय याची नीटच जाणीव होत राहणार.
आपण एका सुंदर बोटीत बसलोय… बोट कोण चालवतंय कळत नाहीये. नक्कीच पाण्याचा प्रवाह चालवत असणार ती बोट. प्रवाह जिथे नेतो तिथे जाणार. हिरव्यागार दरीतनं आपला प्रवास सुरूये… खूप झाडं… मध्येच बोगदा येणार… एकामागोमाग एक असे एकेक वास येत राहणार ओळखीचे वास, आठवणी… असंच काय काय. शेवटी आपण कुठे चाललोय याचा विचार सोडून दिलाय… डोळे मिटून घेतलेत…
असं काहीतरी वाटत राहणार… तंतोतंत!
आणि हे सगळं छानच वाटणार!
…
…
मॅडनेसची लक्षणं आहेत ही मॅडनेसची!
लंप्याचं जग, त्याचे विचार एवढ्या जवळचे झालेत ना माझ्या! जरा जास्तच! त्याची पुस्तकं वाचताना वर लिहिलंय तसलं काहीतरी काहीतरी वाटत होतं आणि पुस्तकंच वाचताना असं नाही; पण एकूणच, जेव्हा जेव्हा त्याच्याबद्दल विचार करतो तेव्हा असले काहीतरी विचार येत राहतात डोक्यात… असो.
तर दोन वर्षांपूर्वी ही पुस्तकं पहिल्यांदा वाचलेली. मी आधी ह्या पुस्तकांबद्दल काहीच ऐकलं नव्हतं. उलट आम्मीनी पुस्तकांची नावं सांगितली, तेव्हा तर उलट तोंड वाकडं केल्याचं आठवतंय. आठवीत होतो बहुतेकतरी. तेव्हा शेरलॉक होम्स, हॅरी पॉटर, फेलुदा, लॉर्ड ऑफ द रिंग्स, अगाथा ख्रिस्ती, ब्योमकेश बक्षी वगैरे असली पुस्तकं आवडीनं वाचायचो. रहस्यकथा, फॅन्टसीच जास्त. बाकीची एकदमच कमी. पु. ल. देशपांडे, द. मा. मिरासदार किंवा रस्किन बाँड वगैरे अशी थोडी; पण मुख्य रहस्यकथा, विनोदीकथा, फॅन्टसी… असलंच.
अम्मीनी मला पुस्तकांची नावं सांगितली – वनवास, शारदा संगीत – प्रकाश नारायण संत. मी नाक मुरडून उडवून लावल्याचं नीटच आठवतंय. ‘वनवास’, ‘शारदा’, ‘संत’ वगैरे असल्या शब्दांनी एक वेगळंच चित्र उमटलेलं मनात… तेव्हा थोडी माहीत होतं, ही पुस्तकं मला एवढं वेड लावणारेत म्हणून!
वाचायला घेतलं वनवास… मी ही पुस्तकं पहिल्यांदा वाचली तेव्हाचा अनुभव साधाच होता… आवडलेली पुस्तकं… छान वाटलेली. वनवास संपल्यावर खूप वाईट वाटलेलं, कारण मला वाटलेलं लंप्याच्या गोष्टी या पुस्तकाबरोबरच संपल्या. पण नंतर कळलं, शारदा संगीतमध्येपण त्याच्या खूप सार्या गोष्टी आहेत. तेव्हा एकदम आनंद झालेला.
अशी ही पहिली ओळख. खरं तर तेव्हा झुंबर वाचताना थोडा तोचतोचपणा वाटलेला आणि कंटाळापण आलेला; पण तशी आवडलेली पुस्तकं… (खरं सांगायचं तर ना, मी तेव्हा – म्हणजे पहिल्यांदा जेव्हा वाचली ना ही पुस्तकं तेव्हा – मॅडसारखा लंप्या आणि सुमीच्याच गोष्टींवर अडकून बसलेलो, बाकीच्या गोष्टींवर काही एवढा विचार व्हायचा नाही. एवढ्या डोक्यात नव्हत्या शिरलेल्या. एवढ्या आठवत नव्हत्या… पण लंप्या आणि सुमीच्या गोष्टी म्हणजे! एकदम भारावून गेल्यासारखाच मी… मॅडच! एवढी वाट पाहायचो ना, त्यांच्या गोष्टी कधी येणारेत म्हणून… आणि झुंबरमध्ये नाहीयेत त्यांच्या गोष्टी एवढ्या, म्हणूनच… म्हणूनच कंटाळा आला असणार!)

मित्र-मैत्रिणींना वाचायला सांगत होतो, त्यांच्याशी गप्पा मारत होतो या पुस्तकांबद्दल… आणि त्या गप्पांतून मग एक जाणीव व्हायला लागली, की आपल्यासाठी ही पुस्तकं जरा जास्तच ‘खास’ बनत चाललीयेत… गप्पा मारताना परत परत त्या गोष्टींचा विचार व्हायचा, पुस्तकातली ‘हळुवार’ (त्या भाषेला मलातरी ‘हळुवार’ हे विशेषण द्यावंसं वाटतं) भाषा जाणवायला लागायची… हळूहळू त्यातले ‘मेटाफर’ कळायला लागायचे… पुस्तकं किती जबरदस्त आहेत हे कळत होतं…
आणि मग, आत्ताच – तीन चार महिन्यांपूर्वी – ही पुस्तकं परत वाचली. मग तर विचारूच नका!
आजच झुंबर वाचून संपवलो. गेले काही दिवस ही चार पुस्तकं वाचण्याचं काम जोरदारच चाललेलं. विचारायचं कामच नाही. इथल्या वाचनालयातून घेत होतो. सपाटाच. एकामागून एक. मागच्या वेळी पंखा आणि झुंबर वाचताना थोडं तेच तेच वाटलेलं. पण आता बरोब्बर उलटं. कंटाळा येण्याचं कारणच नाही. शेवटपर्यंत प्रत्येक ओळन्ओळ वाचत होतो. नीटच. लंप्याच्या जगाच्या हळुवार जादूचा पुन्हा एकदा स्पर्श झाल्यासारखा. छानच वाटत होतं. मीपण सणसणीत मॅडच होणार की काय असं काहीतरी… बरोबरच ते. झालोच असणार मी… पु. ल. देशपांडेंच्या त्या वाक्याचा अर्थ नीटच समजल्यासारखा… ‘तीन हजार कितीतरी वेळा लंपनच्या गोष्टी मॅडसारख्या वाचल्या तरी कंटाळा यायचा नाही…’ तंतोतंत. (की असलंच काहीतरी वाक्य, माझ्या मनात तरी असंच बसलेलं…)
हे असं लिहून ठेवलेलं मी!
काय अवस्था झालेली माझी तेव्हा! दोन तीन दिवस सलग लंप्या येत होता स्वप्नात! म्हणजे त्याचं अमूर्त रूप येत होतं स्वप्नात. माझ्या स्वप्नांना त्याची कॉमेंट्री होत होती. मी स्वप्नात त्याच्यासारखा विचार करायला लागलेलो. ‘सगळं मॅडसारखं उलटं वाटायला लागलंय हे स्वप्न म्हणजे खरं जग आहे आणि आता मी उठल्यावर स्वप्नात जाणार आहे’, असा विचार केलेला नीट आठवतोय. (मला वाटतं तेव्हा माझ्यावर ‘इन्सेप्शन’ (खपलशिींळेप) सिनेमाचापण प्रभाव होता.) पुस्तकात जी भाषा होती त्याच भाषेत विचार करत होतो मी, स्वप्नातसुद्धा!
वेड लागलेलं!
***
माझा स्वतःवरच विश्वास बसत नाहीये एवढा प्रभाव आहे माझ्यावर या पुस्तकांचा. असं म्हणतात ना, की ‘एखाद्या व्यक्तीशिवाय/ घटनेशिवाय माझं आयुष्य कसं असतं त्याची मला कल्पनाच करता येत नाहीये’ तसं मला या पुस्तकांबद्दल म्हणावंसं वाटतंय… पुस्तकं, भाषा यांच्यात खूप ताकद असते, ती नेमकी कशी; हे कळल्यासारखं वाटतंय. पुस्तकं एखाद्यावर कित्ती प्रभाव पाडू शकतात याचा अनुभव आलाय. आणि सर्वात महत्त्वाचं – हे सगळं पूर्णतः नकळत झालंय. पुस्तकं वाचताना कुठ्ठेही मनात नव्हतं, की मला काहीतरी मिळणार आहे ही पुस्तकं वाचून, काहीतरी फायदा होणारे. निव्वळ गोष्टीची पुस्तकं – माझ्याच वयाच्या एका मुलाची – म्हणून वाचत होतो ती…
काय लिहू अन् काय नाही असं झालंय! खूप खूप खूप बोलू शकतो मी या पुस्तकांबद्दल!
लंप्याला येणारे वेगवेगळे वास – सुरुवातीला नव्हतं कळत मला… पण मग जाणवलं, की हो, आपल्यालापण येत राहतात हे वेगवेगळे वास… उदाहरणार्थ शाळा. शाळा म्हटल्यावरपण काहीतरी ‘खास’ वाटतं. शब्दाभोवती एक वेगळंच वलय, वातावरण तयार झालंय असं वाटतं… शाळेचं लाल मैदान दिसतं… असेंब्लीला लावलेलं हिरवं कापड… वरती झाडांची हिरवाई… कधीकधी आभाळ भरलेलं… अन् मग त्या पायर्यांवरच्या आठवणी… गटकाम… गप्पा… वर्ग.. शिक्षक… असलं काय काय आठवत राहतं…
हेच का ते वेगवेगळे वास?
लंप्याच्या आजूबाजूला असणारे वेगवेगळे लोक… मोठे संशोधक असलेले आजोबा… आई-बाबा… कद्रीमनी सावकार… मन्याशेट… हवळ पेंटर… टांगेवाला दुंडाप्पा हत्तरगी… शारदा संगीतमधले गुरुजी… सगळेच वैशिष्ट्यपूर्ण…
अशा ‘कळत्या वयात’ पुस्तकं वाचलेली. त्यामुळे मग माझ्या आजूबाजूला असणारे वेगवेगळे लोकपण तेव्हा कळत होते… त्यातपण हे पुस्तकातले लोक दिसायचे.
आणि पुस्तकातली भाषा! केवढी छाने ती! त्याच्यामुळे ती पुस्तकं खूप जवळची वाटतात! सुट्टीत गावाला गेलेलो… घराची आठवण येत होती… ती पुस्तकं वाचल्यावर बरं वाटायचं. एखाद्या जवळच्या व्यक्तीला भेटल्यासारखं… पुस्तकांबद्दल आपलेपणा वाटतो म्हणजे काय तेपण कळालेलं… आपलेपणाची भावना उतू गेल्यासाखंच होतं ह्या पुस्तकांबद्दल, पुस्तकातल्या भाषेबद्दल.
आणि एका गोष्टीचं खूप आश्चर्य वाटतं, या गोष्टी साधारण 40 वर्षांपूर्वी लिहिल्यात यावर विश्वासच बसत नाही! लंप्याच्या आजूबाजूची परिस्थिती, त्याचे विचार… ‘जुने’ अजिबातच वाटत नाहीत. मी कितीतरी वेळ यावर नुसता विचार केलाय.
म्हणजे एवढ्या वर्षांपूर्वी माझ्या वयाच्या मुलांच्या मनात येणारे विचार वेगळे अजिबातच नव्हते!
म्हणजे लंप्या 40 वर्षांपूर्वीच्या मुलांच्या मनामध्येपण होता, आत्तापण आहे…
मग काळ कोणताही असो, मुलं कशीपण असोत, खोलवर त्यांच्या मनात कुठेतरी लंप्या असणारच?
नक्कीच! असणारच! प्रश्नच नाही!
अद्भुतच वाटतं मला हे!
माझ्या मनातपण आता अशीच काय काय चक्र सुरू असतात. वेगवेगळी चक्रं फिरवत असतो. आणि लंप्याच्या चक्राचा एवढा प्रभाव त्याच्यावर! लंप्या असा कायम आपल्याजवळच आहे असं वाटत राहतं.
शेवटी काहीही म्हणा, लंप्यासारखे विचार आपल्याकडून काही व्हायला नाहीत सोडा. आपल्याला शक्यच नाही ते तसलं. लंप्याएवढा ग्रेट लंप्याच!
असं वाटतं, तो सगळ्या गोष्टींवर जेवढा मनापासून विचार करतो ना, तसं जमणारच नाही कोणाला… फारच ग्रेट आहे ते! लंप्या आपल्या मनातल्या चक्रांना मुक्तपणे फिरू देतो, सहजपणे फिरतात त्याची चक्रं… आपली मात्र बांधली गेली आहेत असं वाटतं…
लंप्याचे कोणत्याही गोष्टीवरचे, कसलेही विचार असोत. ते मनापासून, आतून आल्यासारखे वाटतात. वाचताना कितीतरी वेळा जाणवतं हे… मग त्याच्या त्या ‘आगगाडीच्या रुळांशी’ बांधल्या गेलेल्या आठवणी… स्वरांबद्दल केलेले विचार… आणि याच्याशिवाय शेवटीसुद्धा – त्याचे बाबा गेल्यानंतरच्या भावना… या सगळ्यातूनच.
एकूणच, चारही पुस्तकं त्याच्या त्या विचारांनी भरलेली आहेत. पुस्तकं एवढी आवडली त्याचं कारण तेच – त्याची ती मॅड विचारसरणी, त्याची ती मॅड चक्रं!
एकदा मी या चार पुस्तकांना माझे धर्मग्रंथ असंही म्हटलेलं. या पुस्तकात नुसतं ‘मॅड’पणच भरलंय असं नाही. या पुस्तकातून लेखक आपल्याला एका विचारसरणीची ओळख करून देतात असं वाटतं… लेखकांनी ओळख करून दिलेला लंप्या सगळ्याच मुलांच्या मनात कुठेतरी असणार. आणि त्याचं ते असणं फारच महत्त्वाचं आहे… अभ्यासापेक्षाही महत्त्वाचं…
… सध्या मला बर्याच जणांनी वर्तमानपत्र वाचत राहण्याचा, वेगवेगळ्या मोठमोठ्या लोकांची चरित्रं वगैरे वाचत राहण्याचा सल्ला दिलाय. म्हणजे त्यांच्या विचारांचा माझ्यावर प्रभाव राहील, चांगला पगडा राहील, मला प्रेरणा मिळेल, ते काय काय काम करत आहेत ते कळेल… वगैरे वगैरे.
पण माझं उलटंच आहे.
लंप्याचा प्रभाव! त्यात कसली आलीये प्रेरणा, चांगला प्रभाव…
मला वाटतं वर्तमानपत्रं, चरित्रं वगैरे वाचणं हा आहेच एक भाग; पण या सगळ्याच्या मुळाशी लंप्या आहे. त्याच्यासारखा मॅडसारखा विचार केला तरच कळेल की खरी, आतून आलेली प्रेरणा म्हणजे काय ते… असं आपोआपच कळत जाईल सगळं, मनात चक्रं मुक्तपणे फिरायला लागली की – लंप्यासारखी!
असो… काही का असेना, एक मात्र नक्की आहे, ही पुस्तकं एक खूप मोठी सुरुवात आहे, माझ्यासाठी तरी.
उदयन देवपुजारी
उदयन पुण्याच्या अक्षरनंदन शाळेतून यंदा दहावी झाला असून आता वर्ध्याला अकरावीत शिकतो. खेळणे, वाद्य वाजवणे, वाचन, ओरिगामी हे त्याचे छंद आहेत.
