वाचक लिहितात…

२०२३ च्या मे महिन्यात पालकनीतीमध्ये मानसी महाजन ह्यांनी ‘वाचकांचे हक्क’ हा लेख लिहिला होता. तो वाचून स्वतःमध्ये केलेले बदल एका पालकांनी मांडले आहेत –

“काही दिवसांपूर्वी पालकनीतीमधील मानसी महाजन यांचे ‘वाचकाचे हक्क’ वाचण्यात आले. वाचल्यानंतर वाटले, असे काही नसते. पूर्ण ओळ वाचून, प्रत्येक शब्द वाचला तरच पुस्तक वाचले अशा मताची मी होते. मग मानसीसोबत कुबेरच्या पुस्तक वाचण्याबाबत चर्चा केली. ‘कुबेर फक्त १-२ शब्द वाचून किंवा फक्त चित्र पाहून तुला सांगेल मी पूर्ण पुस्तक वाचले. तो तुला उल्लू बनवत आहे.’ कारण मी माझ्या वाचनाच्या व्याख्येवर ठाम होते. मानसीशी चर्चा केल्यावर वाचकाचे हक्क स्पष्ट झाले. आणि मी माझे स्वतःचे वाचन हेच हक्क वापरून करत आले आहे हे खूपच जाणवले. माझे वाचन (कधी वर वर वाचणे, कधी फक्त चित्र बघून बातम्या वाचणे, कधी पुस्तक फक्त चाळणे), दोघा मुलांचे पुस्तकवाचन (गोष्टी ऐकणे, पुन्हापुन्हा ऐकणे, मला हे पुस्तक वाचून दाखव असे म्हणणे) आणि नवऱ्याचे कधीही पुस्तक हातात न घेता, मी काही वाचून दाखवले तर हक्काने ऐकणे… या सर्व गोष्टींची मनात यादी तयार व्हायला लागली. या यादीमुळे वाचकाचे हक्क स्पष्ट समजले आणि मुलांच्या वाचनाबद्दल असलेले मळभ दूर झाले. आता कुबेर फक्त पुस्तक घेऊन बसला असला, तरी मला आनंद होतो. कारण तो पुस्तकाच्या जवळ येत आहे, पुस्तक समजून घेत आहे.

सर्व आनंदाला कारणीभूत आहे, मानसीचा पालकनीतीमधील ‘वाचकाचे हक्क’ हा लेख.

कांचन बढे, पुणे