वॉल्डॉर्फ जर्नी नावाचा एक ब्लॉग आहे. त्यावर ‘सिम्प्लिसिटी पेरेंटिंग’ (Simplicity parenting) च्या लेखकाने घेतलेल्या एका वर्कशॉपमधून मिळालेले सूत्र दिलेले आहे. ते माहितीसाठी संक्षेपाने देत आहे.

मुलाच्या वयाबरोबर पालकांची भूमिका आणि शिस्तीची कल्पना कशी उत्क्रांत होत जाते, त्याबद्दल त्यांनी सांगितले आहे. मुलाच्या विकासाचे तीन टप्पे त्यांनी दिले आहेत. 

साधारण सातव्या वर्षापर्यंत : द गव्हर्नर

छोट्या मुलांना आपण काय करायचे ते सांगणारे पालक हवे असतात. एका प्रकारे ‘परोपकारी राजे’! मुलाला काय हवे असेल, त्याने काय करायचे हे आपणच ठरवतो. इथे मुलाला अनंत प्रश्न विचारू नयेत, ‘तुला खायला काय देऊ?’ ‘आज बागेत जायचे का?’ ‘कोणता शर्ट/ फ्रॉक घालायचा?’… कधीकधी तर मुलाला ठरवायला वाव नसूनही प्रश्न विचारला जातो… ‘आता निघायचे का?’ आणि मग ‘नाही’ असे उत्तर येते, जे चालणारच नसते. अनेकदा केवळ मुलासाठी सौम्य असावे, त्याच्या भावना जाणून घ्याव्यात एवढ्यासाठी हे प्रश्न असतात. पण या वयाच्या मुलांना निर्णय घेण्याचे ओझे होते. त्याचे दडपण येते. मोठेपणीसुद्धा आपल्याला भरमसाठ प्रकारांतून निवड करायची असेल तर नको वाटते… कुणी तरी सांगा यातले काय निवडू… असे होते. अशाच प्रकारे, सांगितल्याप्रमाणे आपण का वागायचे याचीसुद्धा असंख्य कारणे त्यांना देत बसू नका. ‘कारण आणि परिणाम’ अशा दृष्टीने ते अजून पाहत नसतात. ‘कारण सांगितल्यावर मूल ऐकेल’ अशी आशा तुम्हाला वाटत असेल, तर त्याच्या वयाचे भान तुम्ही ठेवलेले नाही हे नक्की. ‘कारण आणि परिणाम’ त्यांना समजावा ही अपेक्षा वयाच्या मानाने जास्त आहे. मुलासाठी अवघड आहे. ‘हात धुऊन जेवायला ये’ असे सांगितल्यावर मुलाच्या डोक्यात हात धुऊन मग जेवायचे एवढाच संबंध तयार होतो. सांगितलेले करायचे, कारण तसे सांगितले आहे. सांगायचे काम मोठ्यांचे आहे. आपण सांगायचे आहे, विनंती करायची नाहीये. सूचना कशा योग्य आहेत त्याचे आपण स्पष्टीकरण द्यायचे नाहीये. आपले ऐकावे म्हणून मनधरणी करायची नाहीये. आपण सांगायचे आणि मूल ऐकेल अशी अपेक्षा करायची. हां, मुलाने ऐकावे म्हणून आपल्याला काही करावेही लागेल. नुसते ‘जॅकेट घाल’ असे सांगून ते होत नसेल, तर हाताला धरून ते घालण्याची खात्री करावी लागेल. सूचना पाळण्याची खात्री करत राहिले, तर हळूहळू मुलाला आपणहून तसे वागायची सवय लागते.

आठ ते बाराव्या वर्षापर्यंत : द गार्डनर

आता हे वय सूचना देण्याचं आणि त्याप्रमाणे वागण्याचं नाही. मुलाला हळूहळू योग्य ते वागायची समज यावी, यासाठी प्रयत्न करण्याचे आहे. मुलाचे म्हणणे ऐकले जाते, हे त्याच्यापर्यंत पोचायला हवे. मुले अनेकदा त्यांच्या मागण्या नीट, काळजीपूर्वक मांडतात आणि पालक त्यावर काय म्हणतील याचाही विचार करून ठेवतात. आपण त्या मागणीचा विचार केला, त्यावर विचार करतो आहे हे मुलाला दर्शवले आणि योग्य वेळी योग्य पद्धतीने प्रतिसाद दिला, की ते सर्वात उपयुक्त ठरते. या वयातल्या मुलाला भावना फार महत्त्वाच्या असतात. आपली टीम आहे, आणि आपण त्यात महत्त्वाचे आहोत, हे त्यांना जाणवले पाहिजे. आपल्या वागण्याचा परिणाम कोणाकोणावर होतो, काय होतो हे लक्षात आले, की मुले इतरांचा विचार करू लागतात. या वयात इतरांशी जोडून घेण्याची, आपलेपणाची, मैत्रीची तीव्र इच्छा असल्याने, काय करावे आणि काय करू नये हे मुलांना कळू लागते. 

तेरा नंतर – टीन एज : द गाईड

आता मुलाला स्वतःच निवड करण्याची, निर्णय घेण्याची क्षमता आलेली असते. आपण सोबत राहून मदत करायची असते, मार्ग दाखवायचा असतो. त्यासाठी चर्चा आवश्यक असते. आपली मते व्यक्त करताना काळजी घ्या. आता मुलांना काही सांगितलेले आवडत नाही. मात्र विचार आणि मत व्यक्त केले तर हवे असते. शिस्तीसंदर्भात मिळून काही ठरवता येते. बाहेर, मित्रांकडे गेल्यावर काय मर्यादा पाळायच्या आणि का त्याबद्दल चर्चा केलेली असावी. मर्यादा ओलांडली तर काय, याबद्दल मूल स्वतःच जास्त कडक नियम ठरवू शकते. मुलाकडून चुकीची निवड केली गेली, तर त्याबद्दल एकत्र येऊन बोलायला हवे, पुढच्या वेळी कशी काळजी घ्यायची… वगैरे. प्रौढ वयात एकट्याने जे निर्णय घ्यावे लागतात त्याची तयारी अशी होत असते. 

त्या त्या टप्प्यानुसार अपेक्षित विकास दिसत नाही, असे पुन्हापुन्हा लक्षात येत असेल तर एक पायरी मागे जाऊन बघा. आपलेआपले निर्णय घेण्याआधी टीम-मेंबर होण्याची समज आलेली असायला लागते. मुळात मूलभूत नियमांचे पालन हा सगळ्याचा पाया आहे. 

शेवटी, लक्षात ठेवण्यासाठी काही मुद्दे –

  • ‘फक्त वागणूक सुधारणे’ हे ध्येय नव्हे. त्याने कोडगेपणा येतो, भावना नाकारायला सुरुवात होते. समोरच्याबद्द्ल काहीही विचार न करता मूल फक्त पळवाट शोधू लागते. तेवढेच ध्येय असेल, तर पालकांना त्यांचा अधिकारसुद्धा शिल्लक राहत नाही. फक्त शिक्षा आणि बक्षीस एवढीच भाषा शिल्लक राहते. मुलाला आपणहून योग्य मार्ग सापडायला हवा, त्यासाठी बाह्य पुरस्कार कामाचे नाहीत.
  • मुले मुद्दाम अवज्ञा करत नाहीत, त्यांची दिशा चुकते.
  • ‘Time-out’ मुळे मुलांना रुळावर यायला थोडा वाव मिळतो.
  • सारखे ‘वा, किती छान’ असे कौतुक करत बसू नका. एक तर तशी सवय लागते, किंवा त्यांच्या लक्षात येते की प्रत्येक गोष्ट काही ‘छान’ केलेली नसते. आणि मग त्याचा कंटाळा येतो.
  • आत्ताच्या आत्ता सांग … असा मुलाने आग्रह धरला तर उत्तर ‘नाही’ असेल हे त्याला कळू द्या. 
  • मूल काही करत असेल तेव्हा सारखे मध्येमध्ये बोलू नका. त्याला शांतपणे काम करू द्या. त्याने तुम्हालाही काम करू द्यावे अशी काळजी घ्या. सतत लक्ष वेधून घेण्याची ऊर्मी थांबवायला शिकवा.
  • एकच सूचना परत परत देऊ नका. एकदा सांगितल्याबरोबर मुलाने ऐकावे असे वाटत असेल, तर दुसऱ्यांदा सांगणे चुकीचेच आहे ना?

संक्षिप्त अनुवाद : नीलिमा सहस्रबुद्धे