शब्द शब्द जपून ठेव
कमी, हळू, खरे या लेखमालेतील हा पुढचा लेख. आजच्या आपल्या जीवनशैलीचा, महत्त्वाकांक्षांचा आणि जगण्याच्या वेगाचा आपल्या भाषेवर आणि पर्यायाने भाषेचा आपल्या जगण्यावर काय परिणाम होतोय याचा लेखाजोखा घेण्याचा हा एक लहानसा प्रयत्न.
कवी ग्रेस ह्यांच्या कवितांबद्दल बोलताना, त्यांच्या शब्दांमध्ये ‘स्पर्श’निर्मिती करण्याची ताकद आहे असे म्हटले जाते. शब्दांचे मानवी आयुष्यातील स्थान हे अर्थनिर्मितीपेक्षा, माहितीच्या संप्रेषणापेक्षा कितीतरी जास्त महत्त्वाचे आणि व्यापक आहे. कधी केवळ एखादे वाक्य ऐकून अंगावर रोमांच उभे राहतात, एखाद्या रचनेने अनाहूतपणे डोळ्यात पाणी दाटते, तर एखादा शब्द अंगावरून हलकेच मोरपीस फिरवल्यासारखा हळुवारपणे कुरवाळून जातो. कधी काही शब्द मनाला दिलासा देऊन जातात, तर काही वर्णने वाचून मनात भीतीचे मोहोळ उठते. आपल्या कानांवर शब्द पडल्यामुळे, मनातल्या मनात ते उच्चारल्यामुळे दृश्यप्रतिमा निर्माण होतात, आठवणी जाग्या होतात, हे जसे आहे तसेच शब्दांमार्फत आपले विचार, भावना दुसर्यांपर्यंत पोहचवल्यावर अनेकदा आपले मन हलके होते. युद्ध सुरू होण्यापूर्वी केल्या जाणार्या युद्धघोषणा असोत किंवा मनःशांतीसाठी केलेले नामस्मरण असो, त्या शब्दांच्या उच्चाराने काही एक विशिष्ट मानसिक परिणाम साधला जातो हे आपल्याला नक्कीच मान्य करावे लागेल. एखाद्या प्रसंगी दिल्या गेलेल्या शिवीतूनदेखील, तिचा शब्दशः अर्थ अभिप्रेत नसून, तो विशिष्ट शब्द उच्चारल्याने मिळणारे समाधान शिवी देणार्या व्यक्तीला हवेहवेसे वाटते. म्हणजे आपल्याच शरीरातील पंचेंद्रियांच्या जोडीला सहाव्या इंद्रियाची भूमिकाच जणू भाषा निभावत असते. तर दुसरीकडे भाषा बोलणे/ लिहिणे हीदेखील एक ‘कृती’ असते हे विसरून चालणार नाही. म्हणजे काय तर एखाद्याला मदत करणे, मारणे, नुकसान करणे यांसाठी जशी एखादी व्यक्ती जबाबदार असते तशीच ती काय बोलते/ लिहिते यासाठीदेखील असते. आजकालच्या लाऊड, फ्लॅशी, एक्स्ट्रोव्हर्टेड जगात, भाषेच्या या दोन्ही पैलूंची नक्की काय दशा झाली आहे हे थोडे समजावून घेऊयात.
भाषेचा आणि जीवनाचा संबंध हा ‘सत्यावर’ किंवा प्रामाणिकपणावर आधारित असणे अपेक्षित आहे. म्हणजे काय, तर आपल्या भावना, आपली मते, आपले विचार आपल्याला शक्य तितक्या नेमकेपणाने आणि प्रामाणिकपणे व्यक्त करण्यासाठी भाषा मदत करत असते; किंबहुना तेच तिचे कार्य असते. मात्र भाषेला जीवनाशी जोडणारा आधारभूत प्रामाणिकपणाच या समीकरणातून निघून गेला तर? आपण जे बोलतो आहे ते आणि आपल्या मनात जी भावच्छटा आहे, आपल्याला मनातून जे वाटते आहे त्यातली तफावत वाढत गेली तर? आपल्या कानावर पडणार्या शब्दांचा आपल्या मनावर परिणामच होईनासा झाला तर? म्हणजे शब्द, वाक्य केवळ अर्थहीन, सत्यहीन, सत्त्वहीन ध्वनीची रचना होऊन गेले तर? असे घडण्याची शक्यता आजच्या काळात नाकारता येत नाही. याची काही उदाहरणे तुमच्या डोळ्यासमोर येताहेत का?
टी.व्ही.वरील कोणताही रियॅलिटी शो पाहिला तर ‘अप्रतिम’, ‘अविस्मरणीय’ असे शब्द सहज वापरले जातात. स्पर्धक हे ‘महा’विजेते ठरतात, तर परीक्षक ‘महा’गुरू. केवळ ‘स्टार’ असून चालत नाही तर ‘सुपर-स्टार’ असावे लागते. सगळ्याच सेलीब्रिटी या ‘जगप्रसिद्ध’, ‘विश्वविख्यात’ असतात. सगळ्या ‘जगातले’ प्रेक्षक हे एखाद्या ‘महा’अंतिम फेरीकडे डोळे लावून बसलेले असतात. प्रेक्षकांच्या डोळ्यासमोर सतत काहीतरी भव्यदिव्य प्रतिमा उभारण्याची चढाओढ विविध वाहिन्यांमध्ये चाललेली आपल्याला दिसते. अगदी बातम्या देताना किंवा छापतानादेखील हे दिसून येते. एखादा अभिनेता/ अभिनेत्री वारली, की ‘रंगभूमी पोरकी’ होते, ‘एका पर्वाचा अंत’ होतो, ‘भरून न निघणारी पोकळी’ निर्माण होते. रस्त्यावरचे फ्लेक्स आपण नीट निरखून पाहिले, तर साधारण प्रत्येकच फ्लेक्सवरून विविध ‘महर्षी’ आणि ‘तपस्वी’ आपल्याकडे बघत असल्याचे आपल्याला जाणवेल. अगदी उत्पादनांची नावे जरी आपण पाहिलीत, तरी ‘सुपर व्हाईट’, ‘परफेक्ट रेडिअन्स’, ‘अल्टिमेट पॉवर’ अशी नावे पाहायला मिळतात. थोडक्यात, भाषेच्या माध्यमातून ग्राहकांना, वाचकांना, प्रेक्षकांना ‘मॅनिप्युलेट’ करण्याचा सतत प्रयत्न केला जात असतो आणि भाषेची ताकदच इतकी असते, की आपण नकळतपणे मॅनिप्युलेट होत जातो. पण या सगळ्याने काय होते? शब्द सारखे सारखे कानावर पडल्यामुळे हळूहळू गुळगुळीत होतात. ‘सुपर व्हाईट’देखील परिणाम करेनासे होते आणि मग परिणामकारकतेसाठी ‘एक्सट्रा सुपर व्हाईट’ निर्माण करावे लागते. एवढे करूनही ती उत्पादने, ते स्पर्धक, परीक्षक, फ्लेक्सवरील माणसे या सगळ्यांमध्ये गुणात्मक फरक पडतो का? आश्चर्याची बाब म्हणजे अगदी समाजकार्यातदेखील या फसवेपणाने शिरकाव केला आहे, तेथे तो फसवेपणा अधिकच खुपतो असे म्हणा हवे तर. आमच्या कार्यामुळे ‘ग्राउंड लेव्हलवर एक रेव्होल्यूशन घडतंय’ किंवा ‘सामाजिक कार्यकर्त्यांच्या पिढ्या घडत आहेत’ किंवा ‘अमुक एक हजार घरांमध्ये बदल घडून आला आहे’ किंवा ‘अ ब क लाख व्यक्तींचे सबलीकरण आम्ही केले आहे’, ‘नव्या भारताला आकार देण्याचे काम सुरू आहे’ असे सर्रास बोलले जाते. ते लोक काम करत नसतात असे नाही; पण समोरच्याला, निधी पुरवणार्या एजन्सीला ‘इम्प्रेस’ केले पाहिजे हा विचार याही क्षेत्राला शिवल्याचे आपल्याला जाणवते.
केवळ व्यावसायिक क्षेत्रातच हे होते असे नाही, तर आपल्या वैयक्तिक आयुष्यातदेखील या रोगाने शिरकाव केल्याचे आपल्या लक्षात येईल. फॅमिली ग्रुपवरील व्हाट्सअप मेसेज वाचले तर ‘सलाम त्या अ ब क ला’ असे सर्रास आपल्या वाचनात येते. खरेच सलाम करावीत अशी किती माणसे असतात? आपल्या मुलाचे/ विद्यार्थ्याचे कौतुक करताना अगदी ‘तो जिनियस आहे’ किंवा त्याचे दोष दाखवताना ‘तो मठ्ठ आहे’ असे बरेचदा म्हटले जाते. मुलेही ही न कळणारी लेबल्स स्वत:च्या उराशी कवटाळून बसतात. Love किंवा प्रेम हा शब्द खरे तर किती जबाबदारीने, अलवार, हळुवारपणे वापरला जायला हवा; पण आता सर्रास कुठल्याही मैत्रीच्या, अगदी ओळखीच्या नात्यातही ‘Thank you so much, I love you!’ म्हटलेले ऐकू येते. ‘I love you’ पासून ‘I love hairbands’पर्यंत पुरा पडता पडता ‘Love’ हा शब्द झिजून इतका गुळगुळीत झालाय, की त्याच्या उच्चाराने, ऐकण्याने उठणारा रोमांच कुठल्या कुठे हरवून गेला आहे. मग इच्छित परिणाम साधायला त्यापुढे ’’really’ हा शब्द जोडावा लागतो. ‘I really loved the play’, ‘मला खरंच अ ब क खूप आवडलं’. आपण खरे बोलतो आहोत हे सारखे ठसवून सांगायची पाळी आपल्यावर का आली आहे? ‘मस्त’, ‘छान’, ‘भारी’, ‘कमाल’ या सगळ्या शब्दांचा अर्थ एकच – ‘ठीक’ किंवा ‘ओके’. एकीकडे सर्वसाधारण गोष्टीसाठी गरजेपेक्षा मोठे शब्द वापरायचे, तर दुसरीकडे ‘विरोध नसणे’, ‘उपयुक्त वाटणे’, ‘पुरेसे वाटणे’, ‘योग्य वाटणे’ या सगळ्या अर्थच्छटांना आपण ‘आवडणे’ या एकाच शब्दात गुंडाळून टाकतो. अगदी ‘care’, ‘concern’, ‘affection’, ‘friendship’ या सगळ्यांना ‘love’ नावाचे वेष्टन वापरून गुंडाळतो तसेच. ही सगळी खरे तर भाषेशी केलेल्या अप्रामाणिकपणाचीच उदाहरणे आहेत. समाजमाध्यमांमुळे इमोजी (स्मायली) नावाची एक नवीनच भाषा उदयाला आली आहे. या भाषेत तर समोरच्याच्या मनातले जाऊद्या, समोरच्याला उघड काय म्हणायचे आहे हेदेखील कळत नाही. थम्स अपचा अर्थ ‘वा किती छान’ पासून तर ‘मी वाचलं’ इथपर्यंत काहीही असू शकतो. मग आपल्या भावनांचे गांभीर्य पटवायला लोकांना थम्स अपसोबत एखाद-दोन बदाम, एखादा ‘सुंदर’ असे दर्शविणारा इमोजीदेखील पाठवावा लागतो. परत तेच, ‘मला खरंच आवडलं’.
तुम्ही म्हणाल बोलणार्या आणि ऐकणार्या दोघांनाही याबद्दल हरकत नसेल, दोघांनाही मनातून हे माहिती असेल, तर अडचण काय आहे? प्रश्न तेव्हा निर्माण होतात जेव्हा एक म्हणजे आपल्याला खरेच काहीतरी प्रामाणिकपणे बोलायचे असते. त्यावेळी आपल्या भावनांची तीव्रता पोहोचविण्यासाठी आपल्याकडे शब्दच उरत नाहीत आणि दुसरे म्हणजे बोलणारा शब्दांच्या निवडीबद्दल फार गंभीर नसतो आणि ऐकणार्यावर मात्र शब्दांच्या मूळ छटेचा परिणाम होत असतो. याला एका अर्थी भाषिक फसवणूकच म्हणता येईल. हळूहळू मग एकूणच लोकांच्या बोलण्यावरून आपला विश्वास उठायला लागतो. आपल्या एखाद्या कृतीवर/ कामावर इतरांनी दिलेला प्रामाणिक प्रतिसाद हा वास्तवाचे भान राहण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे; पण सत्त्वहीन शब्दवापराच्या सवयीमुळे भाषेचे कार्यच खुंटते. कुणाचे कौतुक करण्यात गैर काहीच नाही; पण त्या कौतुकाचा सत्याशी किती संबंध आहे हे आपण तपासून पाहिले नाही, तर टी.व्ही चॅनल्स आणि जाहिरातदारांच्या जोडीला आपणदेखील स्वतःची आणि समोरच्याची फसवणूकच करत असतो. तसेच याने होणारा अजून एक दुष्परिणाम म्हणजे भाषा ही कृतीपेक्षा कमी महत्त्वाची वाटायला लागते. त्यामुळे आपण जे बोलतो/ लिहितो आहोत त्याची जबाबदारी आपण घेतलीच पाहिजे असे नाही असे वाटते. ‘मी तेव्हा बोलून गेलो’, ‘तेव्हा वाटलं म्हणून बोललो, आता नाही तसं वाटत’, ‘असं सगळेच बोलतात’ अशा पद्धतीने ‘बोलणे’ ही एक वरवरची कृती असून एखादी गोष्ट करतो म्हटले म्हणजे केलेच पाहिजे असे नाही असा समज होतो. ‘मी शब्द दिलाय’ हे जुन्या काळातले वाक्य आता फक्त हसण्यावारी नेण्यासाठीच उरले आहे. अर्थात आपल्या आजूबाजूच्या समाजातली, जीवनातली वाढलेली गुंतागुंत आणि जगण्याचा वाढलेला वेग यांचा यामध्ये मोठा हात आहे. आठ वाजता येतो म्हटल्यावर आठ वाजता पोहोचणे हे अनेकदा व्यक्तीच्या हातात उरत नाही.
सकारात्मक शब्दांचे जसे मोठे-मोठे फुगे फुगवले जातात, तसेच नकारात्मक शब्दांचेदेखील. ‘माझी वाट लागली आहे’, ‘हॉरिबल आहे हे’, ‘शिट, होपलेस’ असे शब्द वापरून बरेचदा आपण परिस्थिती आहे त्यापेक्षा गंभीर असल्याचे आपल्या मेंदूला सांगत असतो. भीषण, असह्य, अशक्य असे शब्द सर्रास वापरून आपण परिस्थितीचे भयंकरीकरण करतो. आपल्यावर सकारात्मक शब्दांचा परिणाम होत असेल; पण नकारात्मक शब्दांचा होणार नाही असे मानणे हास्यास्पद ठरेल. या भयंकरीकरणामुळे साध्या-साध्या प्रसंगांना संकट मानून मग आपणदेखील हातपाय गाळून बसण्याची शक्यता वाढते. यापेक्षा परिस्थितीचे आकलन करायला नेमके शब्द (फसवे सकारात्मक नव्हे) वापरले, तर आलेले दडपण कमी होण्याची शक्यता आहे.
हा झाला भाषेच्या खरेपणाचा मुद्दा. यापुढे जाऊन भाषा कमी आणि हळू वापरणे हे पैलूदेखील आहेतच. भाषेच्या संदर्भात कमी आणि हळू या शब्दांचा अर्थ काय? एक म्हणजे सतत आपण काही तरी बोलले पाहिजे, आपले मत व्यक्त केले पाहिजे, आपली चुणूक, आपले वेगळे अस्तित्व दाखवून दिले पाहिजे, असा काहीसा एक अलिखित नियम या स्पर्धेच्या युगात अस्तित्वात आला आहे. त्यामुळे प्रत्येकाला जणू बोलण्याची, आपले मत समाजमाध्यमांवर मांडण्याची घाई झाली आहे. अर्थात अशा प्रकारच्या घाईतून निर्माण झालेले विचार अपरिपक्व, टोकाचे किंवा प्रतिक्रियात्मक आणि ते मांडण्यासाठी वापरलेली भाषा ढोबळ असण्याची शक्यता निर्माण होते. तसेच खर्या आयुष्यातल्या व्यवहारांबाबतपण आहे. ‘पटकन बोल’, ‘पटकन सांग’ असा आग्रह करून आपण एकमेकांना विचाराला, अभिव्यक्तीला (आर्टिक्युलेशन) वेळच देत नाही. तर अनेकदा बोलण्याची, मत मांडण्याची घाई झालेली असल्यामुळे पुढचा काय म्हणतो आहे ते आपण नीटसे ऐकून घेत नाही, त्याला काय म्हणायचे आहे हे समजून घेत नाही. असे म्हणतात Aरीींंशपींळेप ळी ींहश ीरीशीीं रपव र्िीीशीीं षेीा ेष ज्ञळपवपशीी… मात्र इतरांचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकायला आजकाल आपल्याकडे सवडच उरली नाहीये. आपल्या जगण्याच्या वेगामुळे आपला पेशन्सदेखील आज कमी झाला असल्याचे दिसते. एखाद्याने आपल्या मेसेजला, इमेलला लवकर उत्तर दिले नाही, तर ते आपल्याला अपमानास्पद वाटते. ती व्यक्ती आपल्याला महत्त्व देत नाही असे आपल्याला लगेच वाटून जाते. जाहिरातींमध्ये सर्रास केलेले चुकीचे भाषांतर हेदेखील अशाच फास्ट जगाचे फलित आहे.
माझा एक डॉक्टर-मित्र गडचिरोलीमध्ये काम करत असताना एका वर्तमानपत्राने त्याच्या कामाचा परिचय करून देणारा लेख छापला. त्यात त्यांनी ‘त्या भागात हाडे गोठविणारी थंडी आणि रक्त उकळविणारे ऊन असते’ असा उल्लेख केला होता. त्यावेळी त्या मित्राने आम्हा सर्व स्वकीयांना मेल करून हे खोटे आहे हे प्रांजळपणे सांगितले होते. गडचिरोलीमध्ये गरमी आणि थंडी दोन्ही तीव्र असते हे मान्य केले, तरी त्यासाठी वापरलेल्या प्रतिमा खूप टोकाच्या होत्या. वर्तमानपत्राचा हेतू अर्थातच वाचकांवर प्रभाव टाकण्याचा होता. त्या वाक्याने ऐकणार्यावर/ वाचणार्यावर कितीही प्रभाव पडत असला, तरी ते वास्तवापासून कित्येक मैल लांब होते. आता सगळीकडेच हा खेळ सुरू झाल्याचे आपल्याला दिसते. अशी वाक्ये वारंवार वाचनात आली, तर हळूहळू त्या शब्दांबद्दल काही वाटेनासे होते आणि काही शब्द, प्रतिमा आपण कायमच्या हरवून बसतो. एखादा ठेवणीतला पोशाख रोज रोज घालून आपण जशी त्याची शोभा घालवतो, अगदी तसेच. खरे तर एखादी ‘कृती’ करताना जसे आपण तिच्या प्रामाणिकपणाबद्दल, तिच्या परिणामांबद्दल विचार करतो, अगदी तसाच विचार भाषेबद्दलदेखील करायची गरज आहे, नाहीतर हातातून वाळू निसटून जावी तशी हळूहळू आपल्या आयुष्यातून भाषा, तिच्यामुळे निर्माण होणार्या प्रतिमा, मिळणारा दिलासा, भाषेतून घडणारा स्पर्शाचा अनुभव, त्यातून येणारी भावनिक झिंग निसटून जाईल आणि उरतील फक्त चकचकीत वेष्टनात गुंडाळलेले सत्त्वहीन ध्वनी!
सायली तामणे | sayali.tamane@gmail.com
लेखिका पालकनीतीच्या संपादकगटाच्या सदस्य असून त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात पदव्युत्तर शिक्षण घेतलेले आहे. त्या सध्या विविध सामाजिक संस्थांसाठी शैक्षणिक साहित्यनिर्मितीचे काम करतात.