आभा जेऊरकर

केवळ संघर्षाचा अभाव म्हणजे शांती नव्हे. वर्ण, धर्म, जात, पंथ, कूळ, लिंग, वर्ग यावर आधारित किंवा यासारख्या कोणत्याही कारणाने होणार्‍या भेदभावांशिवाय प्रत्येकाची भरभराट होऊ शकेल अशा वातावरणाची निर्मिती म्हणजे शांती.
– नेल्सन मंडेला
(शांती आणि अहिंसा यावर नवी दिल्ली येथे भरलेल्या जागतिक अधिवेशनासाठी पाठवलेल्या संदेशातून.) 

‘माझ्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांची भरभराट कशी होईल?’ या मध्यवर्ती प्रश्नाभोवती प्रत्येक शिक्षकाच्या मनातील विचार फिरतात असे म्हणणे काही वावगे ठरणार नाही. स्वविकासाचा आव्हानात्मक आणि रोमांचक प्रवास करण्याचा धीर मुलांच्या मनात जागावा आणि त्यांना सतत आश्वस्त, सुरक्षित वाटावे असे वातावरण असणारा म्हणजे खरा शांतीपूर्ण वर्ग असा प्रत्येक शाळेतला प्रत्येक वर्ग असावा. अशा वर्गात प्रत्येक मूल कोणतीही भीती किंवा लाज न वाटता मोकळेपणाने आणि आतून व्यक्त होऊ शकते. इथे मुलांचे हिंसा, शोषण आणि अत्याचारापासून रक्षण केले जाते.

शाळेत हे शांतीचे संस्कार करण्यासाठी मुलांचे हिंसा व अत्याचारापासून रक्षण करणे हा तर प्राथमिक कळीचा मुद्दा आहे. मुलांवर घरी किंवा शाळेत होणार्‍या अत्याचारांकडे शाळांमध्ये बघितले जात नाही. मुले आपणहून बोलत नाहीत. काही मुलांना घरी हिंसक अनुभवांना सामोरे जावे लागते आणि त्याचे ओझे ते शाळेतही वाहतात. काहीवेळा मुलांवर शिक्षकांकडूनच अत्याचार होतात. हे अत्याचार होत असूनही त्यांच्या वाट्याला उपेक्षाच येते.

बाल अत्याचाराचे चार प्रकार आहेत – शारीरिक, भावनिक, लैंगिक अत्याचार आणि उपेक्षा. मुलांना  हेतुपूर्वक इजा किंवा दुखापत करणे म्हणजे शारीरिक अत्याचार होय. शाळांमध्ये मुलांना होणार्‍या शारीरिक शिक्षा जसे मारझोड, चापट, ठोसा मारणे किंवा मुलांनी एकमेकांना केलेली दुखापत हेही शारीरिक अत्याचाराचे रूप आहे. मुलांवर सतत आरडाओरडा करणे किंवा रागावणे, शिक्षा करणे अशी भावनिक गैरवर्तणूक केली जात असेल तर तोही भावनिक अत्याचारच असतो. भावनिक छळ, भेदभाव करणे, शिवीगाळ-अपमान करणे, एकटे पाडणे किंवा मुलाकडे दुर्लक्ष करणे ही भावनिक अत्याचाराची काही उदाहरणे आहेत. खरे तर, बहुतेक सर्वच प्रकारच्या अत्याचारांच्या मुळाशी भावनिक अत्याचार हा असतोच.

ज्यात लैंगिक आनंद, उत्तेजना किंवा समाधान मिळवण्यासाठी मुलांचा वापर केला जातो अशी कोणतीही कृती लैंगिक अत्याचाराखाली मोडते. प्रौढ किंवा बरोबरीचासुद्धा लैंगिक अत्याचाराचा अपराध करू शकतो. लैंगिक अत्याचार स्पर्शाने किंवा स्पर्शरहित असू शकतो. मुलांना अश्लील व्हिडिओ दाखवणे हेसुद्धा लैंगिक अत्याचार म्हणून धरले जातात.

मुले प्रौढांच्या जगात राहतात, तेव्हा त्यांचे काहीही केले तरी चालते असे काही लोकांना वाटत असते. खरे म्हणजे मुले हे आपले भविष्य आहे आणि त्यांना हक्क आहेत. पण हे हक्क मोठ्या प्रमाणात उपेक्षिले जातात. आरोग्य, शिक्षण आणि सुरक्षितता या मुलांच्या मूलभूत गरजा भागवण्यात सतत कसूर म्हणजे उपेक्षा. रोजच्या जेवणासाठी पुरेसा पौष्टिक आहार न मिळणे हे मुलांच्या हक्काच्या उपेक्षेचेच एक ठळक उदाहरण आहे.

तुम्ही एक कर्तव्यदक्ष शिक्षक किंवा कर्तव्यदक्ष पालक असणार, तेव्हा तुम्ही नक्कीच मुलांवर अशा कोणत्याही प्रकारे अत्याचार करणार्‍यातील नाही आहात. हा लेख इथपर्यंत वाचल्यावर, तुमच्या देखरेखीखाली असणार्‍या मुलांवर नकारात्मक परिणाम करणार्‍या तुमच्या विचारांवर, पूर्वग्रहांवर किंवा वर्तणुकीवर चिंतन कराल. तुम्ही स्वतःच्या वर्तणुकीत आवश्यक तो सकारात्मक बदल घडवून आणाल. ही मुलांच्या सुरक्षिततेसाठी पहिली आणि महत्त्वाची पायरी आहे. मात्र, शैक्षणिक जागा मुलांसाठी खरोखर सुरक्षित करण्यासाठी एक पालक म्हणून, शिक्षक म्हणून किंवा मुलांचे प्राथमिक काळजीवाहक म्हणून आपण यापेक्षा बरेच काही करू शकतो.

सर्व प्रकारच्या हिंसा आणि अत्याचारांपासून मुलांना सुरक्षित ठेवणारे वातावरण तयार करण्यासाठी खालील गोष्टी करता येतील.

1. मुलांची सुरक्षा आणि संरक्षण यासाठी शाळेचा मसुदा तयार करणे :

 मुलांच्या रक्षणाची जबाबदारी कुणा एकाच शिक्षकाकडून किंवा पालकांच्या गटाकडून शाळेशी जोडलेल्या सर्व समुदायाची होण्यासाठी हे एक पाऊल खूप मोठी मदत करू शकते. अत्याचाराला अटकाव करण्यासाठी आणि तो झालाच तर योग्य पद्धतीने हाताळण्यासाठी शाळेत सर्व प्रक्रिया, प्रणाली आणि नियम मांडून ठेवलेले असावेत. त्यातून सगळ्यांसाठी मार्गदर्शिका तयार करून ती सर्वांना सहज उपलब्ध व्हावी यासाठी मुलांना दिसेल, वाचता येईल अशा ठिकाणी भिंतीवर लावलेली असावी.

2. मुलांच्या सुरक्षिततेसाठी नियमितपणे प्रशिक्षण घेत राहणे :

अत्याचार अनुभवत असलेल्या मुलाबद्दल समजल्यावर त्याला प्रतिसाद देण्यासाठी सर्वप्रथम शिक्षकच उपलब्ध असण्याची शक्यता अधिक असते. अत्याचाराला अटकाव करणे, मुलांमधील अत्याचाराच्या सूचक खुणा ओळखणे, अत्याचार उघडकीस आल्यावर त्याला योग्य प्रतिसाद देणे आणि योग्य व्यक्ती किंवा संस्थेकडे अत्याचाराची कायदेशीर नोंद करणे या सगळ्यासाठी लागणारी योग्य माहिती, दृष्टिकोन आणि कौशल्ये ही या ‘सुरक्षा-प्रशिक्षण कार्यक्रमा’तून मिळत राहतात.

3. ऑनलाईन अत्याचाराबद्दल जागरूकता निर्माण करणे:

इंटरनेट वापरामधून मुलांना मिळणार्‍या वाढत्या संधीमुळे ऑनलाईन लैंगिक अत्याचार आणि शोषणाला उधाण आले आहे. इंटरनेटवरून निनावी संपर्काचा दुरुपयोग होऊ शकतो. गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक मुलांशी गोड बोलून प्रथम विश्वास संपादन करतात आणि मग त्यांना लैंगिक कृतीमध्ये गुंतण्यास भाग पाडतात. हा धोका किशोरवयीन मुलांसाठी सर्वाधिक असल्याचे दिसून आले आहे. सर्वात वाईट म्हणजे ऑनलाईन संपर्काचा उपयोग मुलांच्या तस्करीसारख्या भयंकर गुन्ह्याला मदत करण्यासाठी होऊ शकतो. म्हणूनच स्वतःच्या ऑनलाईन सुरक्षिततेबद्दल मुलांशी मोकळा संवाद होणे महत्त्वाचे आहे.  

4. वर्गात सुरक्षित वातावरण निर्माण करणे :

वर्गखोल्या मुलांसाठी सुरक्षित वाटणार्‍या जागा असतात. सामाजिक आणि भावनिक शिक्षण घडवणारी वेगवेगळी साधने वापरून मुले मोकळेपणाने स्वतःला व्यक्त करू शकतील. आपली आनंदी कणखर वृत्ती जोपासतील, निरोगी स्वप्रतिमा निर्माण करतील, तसेच स्वतःच्या सुरक्षेसाठी सीमा आखणे आणि कोणी त्या सीमेचे उल्लंघन केल्यास स्वतःचे रक्षण करणे हेही शिकतील. कठीण अनुभवांतून जात असलेल्या मुलांना वर्गाच्या या सुरक्षित जागेत बोलणे आणि मदत मागणेही शक्य होईल.

5. समाजापर्यंत पोचण्यासाठी आणि जागरूकता निर्माण करण्यासाठी नियमित सत्रांचे नियोजन करणे :

केवळ शाळांमध्ये मुलांसाठी सुरक्षित जागा निर्माण करणे पुरेसे नाही. मुलांना घरी किंवा समाजात हिंसक अनुभवांना सामोरे जावे लागत असल्याने त्यांचे तिथेही रक्षण होणे गरजेचे आहे. बहुतेक वेळा शाळेतील शिक्षक आणि कर्मचार्‍यांनी समाजात विश्वास आणि आदर संपादन केलेला असतो. त्या जोरावर पालकांशी आणि मुले जिथे राहतात त्या समाजाशी मुलांच्या सुरक्षिततेबाबत शिक्षकांनी आणि शाळेच्या कर्मचार्‍यांनी संवाद सुरू करावा. मुलांवरील अत्याचार, हिंसा आणि सुरक्षिततेची गरज याबद्दल समाजात जागरूकता निर्माण करावी.

6. सर्वांसाठी न्याय्य आणि सर्वसमावेशक शिक्षणाची तजवीज करणे :

आणि सरतेशेवटी, शाळेची धोरणे सर्वांसाठी (विशेषतः ज्यांच्यावर अत्याचार आणि हिंसा होणे सोपे आहे अशा मुलांसाठी) न्याय्य आणि सर्वसमावेशक शिक्षण देण्यास बांधील आहेत ना याची प्रामाणिक चिकित्सा करणे महत्त्वाचे आहे. मुले जितकी जास्त काळ शाळेत जातात तितका बालविवाह आणि बालमजुरीचा धोका कमी होतो असे निदर्शनास आले आहे. म्हणूनच या लेखाच्या सुरुवातीला दिलेल्या नेल्सन मंडेला यांच्या वाक्यानुसार कोणत्याही वर्ण, धर्म, जात, पंथ, कूळ, लिंग, वर्ग यावर आधारित किंवा इतर कोणत्याही भेदभावाशिवाय मुलांना चांगले शिक्षण मिळण्यासाठी आणि त्यांची उन्नती होण्यासाठी प्रत्येक शाळेने अपरंपार प्रयत्न करणे फार महत्त्वाचे आहे.

योग्य संसाधने, कौशल्य, माहिती आणि पुरेसे धैर्य असेल, तर मुलांच्या शोषणाविरुद्ध सक्रिय आणि परिणामकारक प्रतिसाद देणे शक्य आहे आणि मुळात अत्याचार होऊच नयेत यासाठी प्रयत्न करणेही शक्य आहे.

भारतात बाललैंगिक अत्याचाराच्या विरोधात कायदा नव्हता, तो 2011 साली लागू झाला. त्याचे नाव ‘पॉक्सो’ – प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस (मुलांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण). या कायद्यानुसार मुले व मुली दोघांनाही संरक्षण मिळते. लैंगिक अत्याचार केलेला नाही असे आरोपीचे म्हणणे असेल, तर ते सिद्ध करण्याची जबाबदारी त्या आरोपीवर असते. बालकाने सांगितलेले खरे मानले जाते. स्पर्शाविना आणि स्पर्शाने केलेल्या लैंगिक प्रयत्नांचाही या अत्याचारात समावेश असतो. अत्याचाराच्या तीव्रतेनुसार आरोपीला शिक्षा दिली जाते. 

आभा जेऊरकर

abhajeurkar@gmail.com

मुदिता फाउंडेशनमध्ये फॅसिलिटेटर आणि संशोधक म्हणून काम. मुदिता फाउंडेशन हे असुरक्षित मुले, स्त्रिया आणि समाजाची सुरक्षा या विषयात काम करते. त्यांचा बाल लैंगिक शोषण, ऑनलाईन अत्याचार व शोषण आणि मानवी तस्करी या तीन समस्यांवर मुख्य भर आहे.

अधिक खोलात माहिती घ्यायची असल्यास खालील पत्त्यावर संपर्क साधा :

http://www.muditafoundation.in/

अनुवाद : आनंदी हेर्लेकर