मधुरा राजवंशी

‘सोमवारपासून जादा तासासाठी मुलगे शाळेत येणार नाहीत. आज रंग खेळण्यासंदर्भात सूचना देऊनदेखील त्यांनी अत्यंत बेशिस्तपणा केलेला आहे. वर्गाबाहेर पडताना ‘आम्ही अजिबात रंग खेळणार नाही’ असे सांगून मुलगे बाहेर पडले होते. मी बाहेर आल्यावर सर्वजण पळून गेले. आता थेट निकालाच्या दिवशीच मुलगे शाळेत येतील.’

रंगपंचमीच्या दिवशी आमच्या मुख्याध्यापक सरांचा हा मेसेज दहावीच्या पालक-व्हॉट्सअ‍ॅप गटावर पाहिला आणि तळपायाची आग मस्तकाला गेली. अतिशय शांत आणि संयमी असलेल्या सरांना हे पाऊल उचलावेसे वाटले म्हणजे नक्कीच मुले खूप चुकीचे वागली असणार! सर मुलांसाठी किती करतात आणि त्यांच्या या एका छोट्या सूचनेचे पालनही मुलांना करता आले नाही? आपल्या मुख्याध्यापकांचा अवमान करून काय मिळवले मुलांनी? दोन क्षणांची मजा? या मुलांना आपण जरादेखील संवेदनशील बनवू शकलेलो नाही हे शाळा, पालक, समाज असे आपल्या सर्वांचे सामूहिक अपयश आहे. ‘सब चलता है’ अशी वृत्ती असलेली ही मुले पुढे प्रौढ नागरिक बनली की मग समाजाचे नियमही बिनधास्त तोडणार, असे काहीबाही खूप आले मनात. लिहिलेही मी पालक-गटावर. आता सरांनी जी सूचना केली आहे त्याचे सर्व मुलगे पालन करतील हे पालकांनी पाहावे, सरांना फोन करून त्रास देऊ नये आणि त्यांच्या आदेशाचा आदर राखून निकालाच्या दिवशीच शाळेत यावे वगैरेही सांगितले. प्रचंड राग आला होता.

काही पालकांनी गटावर माफी मागितली. मुलांच्या चुकांसाठी पालकांनी माफी मागू नये अशी विनंती सरांनी केली. झालेल्या प्रकारातून मुले काहीतरी चांगला धडा घेतील अशी अपेक्षाही व्यक्त केली.

दहावीच्या परीक्षा सुरू होत्या आणि प्रत्येक पेपरच्या आदल्या दिवशी मुले शाळेत त्या त्या विषयाच्या शिक्षकांबरोबर एक शेवटची उजळणी, महत्त्वाच्या मुद्द्यांची चर्चा आणि शंकानिरसनासाठी येत होती. आता मुलग्यांना शाळेत येता येणार नव्हते.

सरांचा सौम्य स्वभाव आणि त्यांचा क्षमा करण्याचा इतिहास लक्षात घेऊन हे प्रकरण आपणच हातात घ्यायचे असे मी ठरवले. गंभीर चुका करण्याची या वर्गातल्या मुलग्यांची ही काही पहिलीच वेळ नव्हती. सतत माफी मागितल्याचे दाखवून ही मुले पुन्हापुन्हा त्यांना हवे तसेच बेबंद वागतात असा माझा दृढ समज झाला होता.

दहावीचे मुलगे, त्यांचे पालक शाळेत येऊन भेटून जात होते. माफी मागणे, शेवटच्या महत्त्वाच्या उजळणीपासून मुलांना वंचित ठेवू नका ही मागणी, या कशालाच मी बधले नाही. ‘काहीतरी शिक्षा हवीच ना! नाहीतर चूक उमगणार कशी? पुन्हापुन्हा हे असेच होणार. आधीच काहीतरी कडक कारवाई करायला हवी होती म्हणजे इथपर्यंत पोहोचलीच नसती ही!…’ मनातल्या मनात आणि सोबती शिक्षकांकडेही माझी धुसफुस सुरूच होती.

याच  दरम्यान  मला ‘पालकनीती’ने शिक्षा-स्पर्धा-धर्म विषयावरील परिसंवादात सहभागी होण्यासंदर्भात विचारणा केली. परिसंवादाच्या तयारीच्या पहिल्या ऑनलाईन सभेतही मी ‘काहीतरी शिक्षा हवीच’ हाच मुद्दा मांडला. शिक्षा या शब्दाचा हिंदी अर्थ लक्षात घ्यावा असे माझे म्हणणे होते. हिंदीमध्ये शिक्षा म्हणजे शिक्षण. तेव्हा ज्यातून मुलांचे शिक्षण होईल अशा शिक्षा द्याव्यात अशी (आता अतर्क्य वाटणारी) मांडणी मी केली. शिक्षा हे शिक्षकांच्या रागाचा निचरा करण्याचे साधन नसावे असे माझे म्हणणे होते, जे खरे तर नुकताच घडलेला प्रसंग पाहता माझ्याच विचारांच्या विरोधात जाणारे होते.

वेगवेगळ्या शिक्षांकडे कसे पाहावे याची आम्हा शिक्षकांची समज हळूहळू उत्क्रांत होत गेली आहे असे मला परिसंवादाच्या निमित्ताने विचार करताना जाणवत होते. उदा. मुलांना शाळेत यायला उशीर झाला, तर आम्ही त्यांची एक वेगळी ओळ करायचो आणि मग सतरंज्या उचलायच्या, स्वच्छता करायची अशा प्रकारची शिक्षा त्यांना द्यायचो. हा संपूर्णपणे अनावश्यक प्रकार आहे हे हळूहळू लक्षात आले. एक तर उशिरा येण्याची अनेक मुलांची कारणे खूप ‘जेन्युइन’ असू शकतात. त्यासाठी शिक्षा देऊन ती मुले वेळेवर येतीलच याची काही शाश्वती देता येत नाही. दुसरे म्हणजे स्वच्छता ही सर्वांची जबाबदारी आहे या भूमिकेचा पुरस्कार करणार्‍या शाळेनेच शिक्षा म्हणून स्वच्छतेचा वापर करणे हा एक करुण विरोधाभास होता. हे लक्षात आल्यावर आम्ही ही प्रथा बंद केली आणि आता उशिरा आलेल्या मुलांना आम्ही कोणत्याच प्रकारे वेगळे वागवत नाही.

गृहपाठ करून न आणणे ही शाळेत नेहमी आढळणारी ‘शिक्षेस पात्र’ असणारी आणखी एक गोष्ट. यासाठी आम्ही काय करत होतो तर त्या सर्व मुलांनी वर्गाबाहेर जायचे, गृहपाठ पूर्ण करायचा आणि मग वर्गात यायचे. हाही एक बर्‍यापैकी निरर्थक म्हणावा असा उपाय. मुलांनी गृहपाठ करून न आणण्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे त्यांना तो समजलेला नसतो. त्यामुळे बाहेर बसूनही ही मुले तो कसा पूर्ण करतात तर एकमेकांचे बघून, किंवा मग पूर्ण वेळ गप्पा मारत बसतात. आणि ताई बाहेर काढतात म्हणून गृहपाठ करून आणण्याचे प्रमाण वाढले असेही दिसत नाही; म्हणजे मूळ प्रश्नाला आपण हातच घातलेला नाही.

विचार सुरू होता. शारीरिक शिक्षा नको, मुलांचा अपमान होईल अशी शिक्षा नको हे मला मान्य होते; पण मुलांना त्यांच्या चुकीची जाणीव करून देणारे ‘काहीतरी’ हवेच यावर मी ठाम होते.

परिसंवादात सहभागी इतर – वैशाली गेडाम, सचिन नलावडे, सजिता लिमये यांचे विचार ऐकले. ते अतिशय मूलभूत मांडणी करणारे होते. काही वाचन, शिक्षक सोबत्यांशी आणि मुख्य म्हणजे मुलांशी बोलणे सुरू केले आणि हळूहळू लक्षात यायला लागले, की नाही शिकत मुले शिक्षेतून; कारण शिक्षा ही मुळातच तणाव निर्माण करणारी गोष्ट आहे आणि तणाव हा कोणत्याही प्रकारच्या शिकण्यासाठी हानिकारकच आहे. शिक्षेनंतर मुलांनी समजा एखादी गोष्ट करणे बंद केले असेलच, तर ते केवळ शिक्षकांच्या किंवा पालकांच्या भीतीमुळे. त्यांना ते पटले आहे म्हणून नाही. आपण मात्र शिक्षेमुळे मुले सुधारली अशा खोट्या भ्रमात वावरत राहतो.

आणखी वाईट म्हणजे शिक्षेचा अतिशय मूलभूत आणि दूरगामी दुष्परिणाम आपल्या लक्षातच येत नाही – मन दुखावणे आणि नात्यात दुरावा निर्माण होणे. शाळेत यायला बंदी केलेले दहावीचे मुलगेही दुखावले गेले. शाळेतले त्यांचे शेवटचे काही दिवस हे त्यांच्या मनात एक कटू आठवण म्हणून राहतील. त्यांना समजून घेऊन त्यांच्याशी बोलून काही तोडगा काढणे हे कितीतरी जास्त परिणामकारक झाले असते, असे आता विचार करताना जाणवते.

***

मध्यंतरी सहावीच्या वर्गाशी गप्पा सुरू होत्या. वर्गातल्या 35-36 मुलांमधील तीसेकजणांनी तरी आम्ही आई-बाबांच्या हातचा मार खाल्लेला आहे असे सांगितले. आणि विशेष म्हणजे ‘या मारामुळे माझ्यात कशी सुधारणा झाली’ हे उदाहरणासहित यातील प्रत्येकाने सांगितले.

‘‘घरी गेल्यावर मी बॅग कशीही ठेवायचे. सामान अस्ताव्यस्त ठेवायचे. एक दिवस आईने खूप मारले. त्यानंतर मी सगळे आवरून ठेवायला लागले.’’

‘‘जेवण करू वाटायचे नाही. ताटातले सगळे संपवायचो नाही. मग मार बसला. आता मी सगळे आवडीने(?)  खातो.’’

‘‘डाव्या हाताने जेवत होतो म्हणून आजोबांनी खूप मारले. मग मी उजव्या हाताने खायला लागलो.’’

‘‘भांडी घासावी लागू नयेत म्हणून मी उशिरा उठायचे. मम्मीने झाडू फेकून मारला. मग मी लवकर उठून भांडी घासायला लागले.’’

‘‘एकदा लहानपणी मी मोबाईल धुतला. पप्पांनी

खूप मारले. त्यानंतर मी मोबाईलला कधी हात लावला

नाही.’’

असे अनेक अनुभव मुलांकडून आले. थेट शिक्षा किंवा मग शिक्षेची धमकी असे दोन्ही प्रकार पालकांनी वापरले होते. शिक्षेशिवाय चूक उमगणार नाही आणि वर्तन सुधारणार नाही अशी एक ठाम समजूत प्रौढांची आणि त्यामुळे मुलांचीही आहे. मात्र शिस्त लावण्यासाठी केलेली शिक्षा हे प्रौढांचे तात्पुरते समाधान आहे आणि दीर्घकालीन संवाद यापलीकडे याला खचितच उत्तर नाही. पुन्हा शिक्षा होण्याच्या भीतीपोटी मुले एखादी गोष्ट करायची टाळतीलही कदाचित; पण जोपर्यंत ती समज आतून येत नाही तोपर्यंत शिक्षा सर्वार्थाने फोल आहे. प्रौढ व्यक्तींनी केलेल्या चुकीसाठी शिक्षा, दंड, तुरुंगवास, फाशी हे माणसाने शोधून काढलेले ‘शॉर्टकट’ उपाय आहेत. त्याचा पायाही केवळ भीती हाच आहे. गुन्हा करणार्‍या प्रत्येकाशी संवाद साधून त्याच्यात आमूलाग्र बदल करण्यासाठी समाजाला, शासनाला, यंत्रणेला वेळही नाही आणि इच्छाही नाही. पण शिक्षेने समाज सुधारत नाही हे सूर्यप्रकाशाइतके लख्ख आहे. आपल्या मुलांना द्यायला तर आपल्याला वेळ आहे ना? तो वापरू, त्यांच्याशी बोलत राहू.

‘शिक्षा किंवा धमकी नसती, तर तुमच्या वागण्यात सुधारणा झाली नसती का?’ या प्रश्नाला सहावीच्या मुलांनी एकसुरात ‘झाली असती’ असे सांगितले. नीट समजावून सांगितले असते तर जास्त आवडले असते, आई-बाबांबरोबरचे नातेही प्रेमाचे जास्त, आणि भीतीचे कमी झाले असते असे त्यांच्याकडून आले.

व्यवस्थित समजावून सांगितले तर बदल होऊ शकतो असेही काहींचे म्हणणे होते.

‘‘वर्गात मी खूप बडबड करायचे. ताईंनी मला बाजूला घेऊन समजावून सांगितले, की माझ्या बोलण्यामुळे त्यांची शिकवण्यातली लिंक तुटते. ते मला समजले आणि आता मी कमी बोलते.’’

‘‘झाडू मारायचा कंटाळा करणार्‍या मुलांना आज तुम्ही नीट झाडले नाही तर तुम्हाला खेळाच्या तासाला वर्गात बसावे लागेल, अशी धमकी दिली तर मग ती मुले मनात नसताना भीतीपोटी कसेतरी काम उरकतील. पण समजा स्वतः शिक्षकही स्वच्छता करण्यात सामील झाले आणि स्वच्छता का महत्त्वाची आहे हे जर मुलांना पटवून देऊ शकले तर मग मुले ते काम मनापासून करतील. शिक्षक उपस्थित नसतानासुद्धा व्यवस्थित झाडू मारतील.’’ हे शहाणपण सहावीमधल्या एका मुलीकडून आले आहे.

एकाने तर सकारात्मक दृढीकरण (पॉझिटिव्ह रिइन्फोर्समेंट) सुचवले! ‘‘योगासनाच्या तासानंतर खेळाचा तास असतो. योगासनाच्या ताई म्हणतात, नीट योगासने केली नाहीत तर खेळायला सोडणार नाही. त्याऐवजी असे म्हणावे, की तुम्ही 15-20 मिनिटे छान योगासने करा, मग मी तुम्हाला लवकर खेळायला सोडेन. याचा जास्त उपयोग होईल.’’

शिक्षकांना मुलांची मदत घेऊन संघर्षाची परिस्थिती निर्माण झाल्यास काय करायचे हे ठरवता येईल नक्की.

***

आमच्या शाळेत बालवाडीच्या वर्गांमध्ये ‘विचारांचा कोपरा’ अशी एक जागा आहे. मुलांकडून काही चुकीचे घडले तर त्या कोपर्‍यात जाऊन त्यांनी काही काळ विचार करणे अपेक्षित असते. यामुळे मुलांना आणि शिक्षकांनाही झालेल्या घटनेचा सांगोपांग विचार करायला आणि भावनांना आवर घालायला अवकाश मिळतो.

मोठ्या मुलांसाठी एक वही केलेली आहे. आपल्या वर्तनाचा, कृतीचा विचार करून त्यावर आपण स्वतः काय उपाययोजना करणार असे शिक्षकांच्या मदतीने मुले त्यात लिहितात. काहीतरी चुकीचे घडले, तर त्याबद्दल विचार करावा लागणे, ते लेखी सुसंबद्ध मांडता येणे आणि पुन्हा ते घडणार नाही याची जबाबदारी स्वतःच घेणे हे मुलांनी त्यातून शिकणे अपेक्षित आहे.

शिक्षा न देणे ही प्रचंड अवघड गोष्ट आहे. कडक शिक्षेशिवाय शिस्त नाही हे समाजमनात इतके घट्ट रुजलेले आहे, की वेगळ्या मार्गाने जायचा नुसता विचार करायचा म्हटले, तरी काहीतरी आपल्याला मागे ओढते. ‘बोलून वगैरे काही होत नसतं. दोन रट्टे दिल्याशिवाय पोरगं सुधारणार नाही’ हे आसपासचे सगळेजण आणि आपल्या मनाचाही एक भाग आपल्याला सतत सांगत राहतो.

शाळेतल्या 200-300 छोट्या छोट्या माणसांचे छोटे-मोठे अनेक प्रश्न रोज समोर उभे ठाकतात तेव्हा प्रत्येक परिस्थितीचा स्वतंत्र विचार करून निर्णय घेणे दमवणारे असते. काही वेळा काय करावे ते अजिबात सुचत नाही. नववीतल्या एका मुलाने त्याच्याच वर्गातल्या एका मुलाला खूप मारले. दोघांचे समुपदेशन सुरू आहेच; पण आपल्या रागावर नियंत्रण न ठेवता आल्याने आपण हिंसेचा अत्यंत चुकीचा मार्ग अवलंबला याची मारणार्‍या मुलाला जाणीव व्हावी म्हणून त्याचे समुपदेशन करणार्‍या ताईंच्या सल्ल्याने त्याला आम्ही एक आठवडा घरी थांबायला सांगितले. ही शिक्षा खरेच आवश्यक होती का? मनात अजूनही प्रश्न आहेतच.

पण शाळाही हळूहळू शिकते आहे, अधिक सहृदय होते आहे, हे महत्त्वाचे.

शाळा आणि धर्म

ज्ञानप्रसाराचे एक प्रमुख स्थान असणारी ‘शाळा’ ही व्यवस्था, ती जिथे उभी आहे त्या ठिकाणच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय संदर्भांना सोडून पाहता येणे शक्य नाही. सामाजिक संकेत, मूल्ये आणि श्रद्धा यांचा प्रचार-प्रसार शाळा करत असतात. तो मर्यादित स्वरूपात असला, तरी मुलांवर त्याचा मोठा आणि दीर्घकालीन प्रभाव पडू शकतो. मूल्ये जपणारी आणि नैतिकतेचे भान असणारी भावी पिढी शाळेने उभारावी अशी समाजाची अपेक्षा असते; मात्र शाळांचा भर मुख्यतः संविधानिक मूल्ये बाजूला सारून धर्माशी निगडित मूल्ये रुजवण्यावर असलेला दिसून येतो. याचे कारण म्हणजे धर्म हा पारंपरिक समाजात नैतिकतेचा मूलभूत आधार आहे आणि भारतासारख्या देशात, जिथे धर्म आणि नैतिकता एकमेकांत इतके घट्ट गुंफलेले आहेत, शाळा विद्यार्थ्यांचे चारित्र्य विकसित करण्याचा प्रयत्न करत असताना धर्माचा अगदी सहज आधार घेतात. त्यात कुणाला काही खटकतही नाही.

भारताचा कोणताही एक असा अधिकृत धर्म नाही आणि हे आपल्या संविधानात स्पष्ट सांगितलेले आहे. धर्मनिरपेक्षता हे आपले मूलभूत तत्त्वही आहे. पूर्णपणे शासनाच्या अनुदानावर चालणार्‍या शाळांमध्ये धार्मिक शिक्षण देता येणार नाही असे कलम 28 मध्ये नमूद आहे. आपल्या शाळा धार्मिक शिक्षण देत नसल्या, तरी बहुसंख्यांच्या धार्मिक प्रतीकांनी आणि रीती-रिवाजांनी त्या अगदी न्हाऊन निघालेल्या दिसून येतात.

2010 साली एमएच्या अभ्यासक्रमाअंतर्गत मी फलटणमधल्या दोन शाळांचा अभ्यास केला होता. दोन्ही शाळा खाजगी अनुदानित होत्या. एका शाळेत 11% तर दुसर्‍या शाळेत 4% विद्यार्थी अल्पसंख्य समाजातील होते. दोन्ही शाळांमधील सर्व वर्ग व कार्यालयांमध्ये सरस्वती, गणपती, राधा-कृष्ण, शंकर, दत्त, राम-लक्ष्मण-सीता यांपैकी एकतरी चित्र होतेच होते. मुलांचे जे कलेचे काम भिंतींवर लावलेले होते त्यात स्वस्तिक, कमळ, हनुमान, नारळ आणि कलश अशी चित्रे होती. दिवाळी, गणपती आणि विजयादशमी या सणांबद्दल मुलांनी आणि शिक्षकांनी केलेल्या कविताही लावलेल्या होत्या. एका शाळेच्या नावामध्ये ‘मंदिर’ हा शब्द होता आणि शाळेच्या इमारतीच्या भिंतींवर कमळाची नक्षी होती. दुसर्‍या शाळेचे ब्रीदवाक्य म्हणजे गीतेतील एक श्लोक होता, दारातच देवघर होते आणि त्यात सरस्वतीची मूर्ती होती.

सूचना फलकावर सगळ्यात वरती दोन स्वस्तिकांच्या मध्ये ‘श्रीराम’ लिहिलेले होते. ‘कला म्हणजे सत्य आणि शिव यांचा सुरेख संगम’ हा सुविचार होता. चांगल्या सवयी दाखवणार्‍या तक्त्यात हात जोडून उभे असणारे मुलगा-मुलगी होते आणि सकाळी व संध्याकाळी देवाची प्रार्थना करावी असे लिहिलेले होते. शिक्षकखोलीत लावलेल्या प्रतिज्ञेत ‘शाळा हे माझे मंदिर आहे आणि अध्यापन ही माझी पूजा आहे’ असे लिहिलेले होते. प्रयोगशाळेमध्ये पंचांग लावलेले होते.

परिपाठ सरस्वती-पूजनाने सुरू झाला. परिपाठात गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णू आणि दिगंबरा, दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असे स्तोत्र-श्लोक म्हणण्यात आले. एखादा वार ज्या देवाचा असतो त्या देवाच्या प्रार्थना त्या दिवशी परिपाठात म्हटल्या जातात अशी माहिती मला मुख्याध्यापकांनी दिली.

मी ज्या दोन वर्गांचे निरीक्षण केले त्यात सत्यम् शिवम् सुंदरा, मोरया रे बाप्पा मोरया रे, श्रीराम जयराम जय जय राम, गणपती बाप्पा मोरया, शाळेमध्ये लवकर या, श्रीरामचंद्र की जय, राधा कृष्ण की जय, विठ्ठल-रुक्मिणी की जय, हर हर महादेव, जय भवानी जय शिवाजी अशी गाणी, मंत्र, घोषवाक्ये म्हटली गेली.

***

कोणत्याही सामान्य शाळेत विविध धर्मांची मुले एकत्र शिक्षण घेत असतात. त्या सर्वांना समानतेने आणि सन्मानाने वागवणे हे शाळेचे कर्तव्य असते. विशिष्ट धर्माच्या प्रतीकांच्या किंवा रिवाजांच्या भडिमाराने इतर धर्मीय मुलांना किंवा शिक्षकांना असुरक्षित वाटू शकते. यातून असहिष्णुता आणि संघर्षाचा जन्म होऊ शकतो.

कमला निंबकर बालभवनची स्थापना होतानाच जी तात्त्विक बैठक ठरवली होती, त्यामध्ये सर्व जातीधर्मांच्या मुलांनी एकत्र शिकणे आणि कोणत्याही धर्माच्या प्रतीकांना शाळेत स्थान नसणे हा मूलभूत विचार होता. नारळ फोडण्यासारख्या वरवर निरुपद्रवी वाटणार्‍या प्रथाही कोणत्याच कार्यक्रमात कधीच पाळल्या गेल्या नाहीत.

शाळेत बौद्ध, जैन, मुस्लीम आणि हिंदू अशी चार धर्मांची मुले आणि शिक्षक आहेत. धर्म न मानणारेही आहेत. या सर्वांच्याच सन्मानासाठी कोणत्याही प्रकारची उपासना शाळेत केली जात नाही. शाळेत म्हटल्या जाणार्‍या प्रार्थनाही कोणत्या विशिष्ट धर्माच्या नाहीत. निसर्ग आणि अंतर्मनाला साद घालणारी, बंधुता आणि सद्भावनेची गीते आम्ही परिपाठात म्हणतो.

अर्थात, धर्म, सण-उत्सव हे मुलांच्या जगण्याचा एक महत्त्वाचा भाग असल्यामुळे शाळेत येतातच. यायलाही हवेत. गप्पा, लेखन, चित्रे यातून सणांबद्दल अभिव्यक्त व्हायची संधी मुलांना मिळते. तिथेही मग मुद्दाम ईद, महावीर जयंती, आंबेडकर जयंती याबद्दल वर्गात किंवा परिपाठात चर्चा व्हावी यासाठी प्रयत्न केले जातात. ‘मुद्दाम’ असे मी यासाठी म्हणते, की हिंदू बहुसंख्य असलेल्या आपल्या समाजमनात हे सहज येत नाही. शाळेच्या गॅदरिंगमध्ये देवीचा गोंधळ, गणेशवंदना, खंडोबाची गाणी सहज निवडली जातात. तिथे एखादी कव्वाली, अझीम-ओ-शान शेहेनशाहसारखे अकबराची गुणवैशिष्ट्ये सांगणारे गाणे, आमीर खुसरोच्या, कबीराच्या रचना, शाहीर संभाजी भगत यांची गीते हे मुद्दाम विचारपूर्वक घ्यावे लागते. मुस्लीमद्वेषाची पेरणी करणार्‍या पाठ्यपुस्तकातून शिवाजी महाराजांचा इतिहास शिकणार्‍या चौथीच्या मुलांना आवर्जून ‘शिवरायांच्या छायेखाली मुळीच नव्हती वाण, आनंदाने नांदत होते हिंदू-मुसलमान’ हे गाणे शिकवले जाते.

मुले समाजाचा भाग आहेत. त्यामुळे समाजातील धार्मिक तेढ तीही अनुभवतातच. घरी बोलणे होते, सोशल मीडियामधून अनेक उलट-सुलट गोष्टी त्यांच्या ऐकण्यात, पाहण्यात येतात. त्यामुळे याबद्दल शाळेत मुलांशी बोलणे, कृती करणे आवश्यक असते. भारत-पाकिस्तान शांतता व सद्भावनेसाठी प्रयत्नशील असलेली भारतातील एक महत्त्वाची चळवळ म्हणजे आगाज़-ए-दोस्ती. गेली 11 वर्षे यांच्यातर्फे ‘इंडो-पाक पीस कॅलेंडर’ छापले जात आहे. ‘भारत-पाकिस्तान शांतता’ या विषयावर दोन्ही देशांतील मुलांनी काढलेली चित्रे मागवली जातात आणि त्यातील 12 चित्रांची निवड करून ती त्या वर्षीच्या दिनदर्शिकेमध्ये छापली जातात. गेली दोन वर्षे आम्ही शाळेकडून मुलांची चित्रे पाठवत आहोत. चित्रांचा विषयच असा आहे, की त्यावर भरपूर चर्चा होते. मुले विचार-करती होतात.

गणेश चतुर्थीपूर्वी मुले शाडू मातीचे गणपती बनवतात. मुलांनी स्वतः बनवलेले पर्यावरणपूरक गणपती बनवणे आणि कलात्मक सर्जनशीलता असा दुहेरी उद्देश या कामामागे आहे. मात्र गणपतीच बनवायला पाहिजे असे बंधन नसते. ज्या मुलांच्या घरी गणपती बसत नाही ते इतर काही कलाकृती बनवतात किंवा मग आपल्या मित्र-मैत्रिणींना मदत करतात. हा पर्याय त्यांना उपलब्ध असणे आम्हाला खूप महत्त्वाचे वाटते.

मुले काही काम करत असली, तर अनेकदा संगीत लावले जाते. यात कधीकधी मुलांची फर्माईशही असते. गेल्या वर्षी ‘पसूरी’ या गाण्याची वारंवार मागणी होत असे. त्यावेळी हे पाकिस्तानी गायकांनी गायलेले गीत आहे याचा आवर्जून उल्लेख केला. शाळेतल्या स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात क्रांतिकारी उर्दू शायर आणि लेखक फैज अहमद फैज यांची सुप्रसिद्ध ‘बोल’ ही कविता शिक्षक व मुलांनी मिळून गायली. या गीताच्या मध्ये-मध्ये सर्वेश्वरदयाल सक्सेना आणि उदय प्रकाश यांच्या कवितांच्या ओळींचे वाचन केले. तीनही कवींचा विचार एकच आहे याबद्दल मुलांशी बोललो. 

शाळेतल्या धर्माबद्दच्या चर्चेसाठी पुस्तके आणि चित्रपट ही खूप उपयुक्त साधने आहेत. युद्ध आणि द्वेष यांतून काहीच निष्पन्न होत नाही याची समज येण्यासाठी द ब्रेडविनर, तोत्तोचान, हॅनाची सूटकेस अशा पुस्तकांची आणि इंडिया अनटच्ड, अ बॉय इन द स्ट्राईप्ड पजामा, पिनोकिओ यांसारख्या चित्रपटांची खूप मदत होते, आणि धर्माबद्दलच्या या संपूर्ण चर्चा-संवादात ही समज मुलांना येणे हे मला सर्वाधिक महत्त्वाचे वाटते.

 दिवसेंदिवस असुरक्षित होत चाललेल्या जगात पाऊल ठेवणारी आपली ही मुले मनातून सुरक्षित असावीत यासाठी प्रत्येक शाळेत पुरेपूर प्रयत्न व्हायला हवेत.

मधुरा राजवंशी

rmadhuraa@gmail.com

लेखक कमला निंबकर बालभवनमध्ये शिक्षण समन्वयक आणि इंग्रजीच्या शिक्षक आहेत.