संजीवनी कुलकर्णी

शाळा ही जागा मुलांच्या आयुष्यात अत्यंत महत्त्वाची असते. आवडत असो वा नसो, शाळेमध्ये घडणार्‍या घटनांचा मुलांच्या मनांगणावर मोठा परिणाम होतो. अभ्यास ही त्यातली अगदी त्रोटक बाब. त्याशिवाय मित्र, शिक्षक, खेळ, सहली, स्नेहसंमेलनातले कार्यक्रम, परिपाठ अशा अनेक गोष्टी शाळेशी जोडलेल्या असतात. शाळेत आपण कुठल्या धर्माचे आहोत यावर तत्त्वत: जरी काहीही अवलंबून असत नाही, तरी एकूण व्यवस्थेत जर धर्म कुठल्या ना कुठल्या रूपानं येत असला तर त्याचा परिणाम मुलांच्या मनावर होतोच. अनेकदा स्वार्थाच्या दृष्टीनं किंवा घरच्या लोकांच्या आवडीनं मूल सरसहा अन्यायी विचारांकडेही वळतं. या अंकाच्या निमित्तानं आम्ही अनेक शाळांकडे गेलो. शाळेत धर्माचं स्थान काय असावं, काय असतं या प्रश्नांवर त्यांच्याशी चर्चा केली. त्यातून जे कळलं ते इथं मांडत आहोत...

शाळांमध्ये सामान्यपणे बहुसंख्य मुलं बहुसंख्याकांचीच असतात. कुठल्याही शाळेचा असा काही धर्म नसतो, विशेषत: भारतासारख्या निधर्मी देशात तर नसलाच पाहिजे. काही शाळा चर्चनी चालवलेल्या असतात, तिथे ख्रिश्चनेतर मुलंही जातात तसेच काही शाळा उर्दू माध्यमाच्या असतात. तिथे मात्र मुस्लीम नसलेलं कुणी जात नाही.

शाळांमध्ये सरकारी, आश्रमशाळा, संस्थानिर्मित, खाजगी असे फरकही असतात. मात्र कोणताही धर्माधिष्ठित कार्यक्रम करण्याबाबत सरकारी स्तरावरून स्पष्ट सूचना नसतात. त्यामुळे शाळा चालवणारी जी मंडळी असतात त्यांच्या वृत्ती, धारणेनुसार शाळा चालतात. खाजगी शाळा ज्या त्या मंडळींच्यानुसार तर सरकारी शाळा मुख्याध्यापकांच्या विचारांनुसार चालतात. 

गेल्या आठ-दहा वर्षांत शाळांमधला धार्मिकपणा खूप वाढलेला आहे, वाढतो आहे. शिक्षक जितके धर्मवेडे असतील त्या सामग्रीवरच मुलांचं शिक्षण पोसलं जातं. धर्म, देव इतकंच नाही तर शिक्षकांचा कुणा बाबावर किंवा एखाद्या साधू किंवा विचारधारेवर विश्वास असला, की शाळेत त्या बाबांच्या विचारांचं प्राबल्य असतं. परिपाठ ही अशा गोष्टी करण्यासाठी सर्वांची आवडती जागा असते. त्यावेळी प्रार्थना, लेखांचं वाचन विद्यार्थी किंवा शिक्षक करतात. परिपाठाचा आराखडा जिल्ह्यानुसार बदलतो. प्रत्यक्ष सरकारी आदेश नसले, तरी छोट्या रूपात तशी दिशा देण्याचा प्रयत्न आता सरकारी स्तरावरूनही होतोच.

मुख्याध्यापक आपापल्या विचारधारेनुसार शाळेत जयंत्या-पुण्यतिथ्या राबवतात. त्यावेळी मुलांच्या वक्तृत्व स्पर्धा, फोटोंच्या पूजा होतात. झेंड्याची पूजा करावी असं कुठेही म्हटलेलं नाही; पण फुलानी पाणी शिंपडून फूल, हळदकुंकू वाहून हिंदू देवांची केली जाते तशी पूजा केली जाते, स्नेहसंमेलनात वगैरे गणपतीच्या गाण्यांवर किंवा इतर हिंदू देवतांच्या गाण्यांवर नाच होतात. 

धर्म हा विषय हाताळताना खरं म्हणजे खूप काळजी घ्यायला हवी. इतर धर्मांचे लोकही शाळेत असतात. एकच बहुसंख्याकांचा धर्म नसतो; पण शिक्षक शिक्षणाची नाही, तर स्वत:ची म्हणजे आपल्याबद्दल गावातील लोकांचं मत काय होतं आहे अशी काळजी घेतात. गावातील स्थानिक राजकारण जे सांगेल तसं वागतात. त्यातही ज्याचं संभाषण-कौशल्य चांगलं त्याचं म्हणणं ऐकलं जातं. सर्वात कठीण प्रसंग येतो तो इयत्ता चौथीचा इतिहास शिकवताना. अनेकांना हे जाणवलं असणार. अफजलखानाची गोष्ट सांगताना वर्गात एखादं जरी मुस्लीम लेकरू असलं, तरी पोटात गोळा येतो. त्याला कुठेही दुखवलं जाणार नाही अशी काळजी घेऊन तो पाठ शिकवावा लागतो. सर्व शिक्षक एवढी संवेदनशीलता बाळगत आणि पाळत असतील असं वाटत नाही. ह्या पाठाच्या वेळी मुस्लीम मुलांकडे वर्गातली इतर मुलं सहेतुक बघत असतात. त्या धड्याच्या पाठानंतर वर्गातल्या मुस्लीम मुलाला जगणं नको असं वाटावं इतकी विखारी वागणूक कधीकधी इतर मुलांची असते. असे इतरही काही पाठ आहेत; ते शिकवताना वर्गातल्या मुस्लीम मुलांच्या नजरेला नजर देववत नाही.

काही शिक्षिका अनेकदा उपास आणि व्रतं वगैरे करत असतात. कोणता धर्म आणि तो कसा पाळावा हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. मात्र या शिक्षिकांना धर्मनिरपेक्षपणे शिकवण्यात काही अडचणी निश्चित येणार. याबद्दल कुणाशी बोलू बघितलं तर ‘तुला फार पुळका…’ म्हणतात. काही ठिकाणी श्रावणातल्या सोमवारी शाळेला सुट्टी दिली जाते. ही अशा शिक्षिकांची सोय असणार. अशी सुट्टी कुठल्याही मुस्लीम सणाला मिळत नाही. या गोष्टीचा परिणाम मुस्लीम मुलांच्या मनावर होत असणार.

***

एका संस्थेच्या मराठी – इंग्रजी – उर्दू माध्यमाच्या शाळा आहेत. तिथला अनुभव वरील पार्श्वभूमीवर विशेष चांगला होता. संपादकगटाच्या सदस्यांनीच लिहिलेला आहे; तो आहे तसा.

तुमच्या शाळेत धर्मविषयक धोरण आहे का? तुमच्या शाळेतल्या मुलांना किमान आसपास असलेल्या धर्मांची माहिती / कल्पना असावी अशी तुमची इच्छा आहे का? त्यासाठी काय करता?

शाळेत धर्मविषयक असं खास धोरण नाही. सर्वधर्मसमभाव या तत्त्वावर शाळेचं काम चालतं. शाळेत एकाच इमारतीत मराठी आणि उर्दू असे दोन्हीही विभाग एकत्र शिकतात. अन्य धर्मांची ओळख व्हावी यासाठी वेगवेगळे विषय किंवा पाठ्यक्रम शिकवताना धर्मविषयक काही संदर्भ आल्यास मुलांमध्ये सर्वधर्मसमभाव रुजण्यास मदत होईल अशी संधी शिक्षकांकडून घेतली जाते. तसेच संस्थेच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं होणार्‍या सांस्कृतिक कार्यक्रमात संस्थेतील उर्दू आणि मराठी विभाग हे एकत्र सहभागी झालेले असतात. यातही मुलांनी अन्य धर्मांचा आदर करावा या उद्देशानं काही कार्यक्रम घेतले जातात.

संविधानातील धर्मनिरपेक्षता ही अपेक्षा तुम्ही कशाप्रकारे पूर्ण करता असं तुम्हाला वाटतं?

1963 पासून संस्थेनं शाळेत मराठीसोबतच उर्दू विभागही सुरू केलाय. त्यात जवळजवळ 300 मुलं-मुली शिकतात. या मुलांच्या शिक्षणप्रक्रियेत त्यांना मराठी तसेच उर्दू या दोन्ही माध्यमातील शिक्षक शिकवतात. सर्वांना समान वागणूक, समान संधी मिळावी या हेतूनं शाळेतील दोन्ही विभागातील शिक्षकांसाठी वेगवेगळी शिक्षक-खोली न ठेवता एकच ठेवलेली आहे. आम्ही सर्व शिक्षक एकत्र जेवतो, एकमेकांचं एकमेकांसोबत शेअर करतो. जेवणाच्या सुटीतही शालेय माध्यान्ह पोषण योजनेअंतर्गत मिळणारं जेवण सर्वं मुलं एकाच वेळी आणि एकाच ठिकाणी सोबत बसून करतात. शिक्षकांच्या सर्व सभाही एकत्र होतात. एकमेकांचे वाढदिवसही एकत्रच साजरे केले जातात. दोन्ही विभागातील सर्व शिक्षक एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होत असतात. यातून भेदाभेद, गट-तट कमी करण्यासाठी मदत होते. हे घडवून आणण्यात संस्था-चालकांची भूमिका महत्त्वाची आहे.

शाळेत शिक्षक / मूल भरती होताना / झाल्यावर त्यांचा धर्म पाहिला जातो का ?

शासनाच्या नियमाप्रमाणे शिक्षक किंवा मूल शाळेत भरती होताना धर्माचा उल्लेख केला जातो; परंतु धर्म बघून मुलास शाळेत भरती केलं जात नाही. कुठल्याही मुलाला त्याचा धर्म बघून शिक्षणापासून वंचित ठेवलं जात नाही. तसेच शिक्षकभरती करतानाही धर्माला बगल देऊन त्या शिक्षकातल्या गुणवत्तेला प्राधान्य दिल्या जातं. हे सर्व धर्मांतील मुलांना आणि शिक्षकांना लागू आहे. शहरात मुस्लीम धर्मीयांसाठी स्वतंत्र शाळा असूनही मुस्लीम धर्मातील मुलांना गुणवत्तेच्या आधारावर आमच्या शाळेत प्रवेश घ्यावासा वाटतो ही आमच्यासाठी आनंदाची बाब आहे.

शाळेत सण किंवा धार्मिक उत्सव साजरे होतात का? कोणकोणते? बालमनाला त्यातून एक आधार मिळेल असं तुम्हाला वाटतं का?

शाळेत काही सण, धार्मिक उत्सव साजरे होतात. उदा. रक्षा-बंधन, मकरसंक्रांत. हे सण साजरे करताना वर्गात हिंदू आणि मुस्लीम असं न बघता एकत्र साजरे केले जातात. ईद, मोहरम अशा सणांना एकमेकांना शुभेच्छा दिल्या जातात. आम्हाला असं वाटतं, की यामुळे एकमेकांच्या सणांचा आदर केला जातो, एकात्मता वाढते आणि सोबतच एकमेकांविषयी प्रेम वाढतं. ईद या सणाच्या वेळी शाळेकडून उर्दू विभागाच्या वर्गांना (मुले व शिक्षकही) 3 दिवस सुटी दिली जाते आणि त्यातून मागे पडलेला अभ्यास पुढे भरून काढला जातो; जेणेकरून मुस्लीम धर्मातील महत्त्वाचा सण ते कुटुंबीयांसह साजरा करू शकतात. हा नियम शासनानं आखून दिलेला नसतानाही हा संस्थेचा वैयक्तिक निर्णय आहे.

मुलांनी शाळेत किंवा शाळेबाहेर स्वत:च्या धर्माचा किंवा दुसर्‍या धर्मांचा अनादर करू नये यासाठी तुम्ही कोणती काळजी घेता?

सुरुवातीपासूनच मुलांशी संवाद साधतो, त्यांना सर्वधर्मसमभावाचं महत्त्व समजावून सांगतो. ते मूल्य मुलांमध्ये रुजवलं जातं. एकमेकांशी प्रेमानं वागावं, एकमेकांच्या धर्माचा अनादर होणार नाही याबद्दल सुरुवातीपासूनच मुलांशी संवाद साधतो.

धर्माच्या मुद्द्यावर मुलांमध्ये आपापसात वाद झाल्यास तो कशा पद्धतीनं सोडवला जातो?

मुला-मुलांमध्ये वाद होतात पण धर्मावरून होत नाहीत. आजपर्यंत कधी असं प्रकरण विकोपाला गेलेलं माझ्या माहितीत नाही. त्यात उर्दू आणि मराठी विभागातील मुलं आपापल्या गटात राहायला प्राधान्य देतात, फारशी एकमेकांच्या सोबत नसतात.

तुमच्या शाळेच्या संदर्भात धर्म या विषयावर तुम्हाला अजून काही सांगायला आवडेल का?

उर्दू विभागाच्या वर्गांत मुला-मुलींचं प्रमाण निम्मं-निम्मं आहे ही एक महत्त्वाची बाब वाटते. कारण सामान्यपणे उर्दू शिक्षण मुलींना द्यायचं आणि मुलग्यांना इंग्रजी शाळेत घालायचं असा प्रघात असतो.

शाळेत विविध स्पर्धा होतात त्यावेळी दोन्ही माध्यमातील विद्यार्थी एकत्र येतात. खेळाच्या स्पर्धा, व्याख्यान अशा वेळी सर्व एकत्र असतात. गांधी जयंती, लोकमान्य टिळक पुण्यतिथी अशा व्याख्यानांमध्ये सर्व मुलं सहभागी होतात. विजेत्यांना बक्षिसंही दिली जातात. उर्दू माध्यमाचे शिक्षक मराठी विभागातील मुलांना आणि मराठी माध्यमाचे शिक्षक उर्दू विभागातील मुलांना बक्षिसं देतात. यात एक निरीक्षण असं आहे, की अशा कार्यक्रमांच्या वेळी मुलांनी काही घोषणा दिल्यास हात वर करून ‘जय’ म्हणताना उर्दू विभागातली मुलं हात मागे घेताना दिसतात; परंतु अशा वेळी मराठी माध्यमातील शिक्षक याचा अट्टहासही करत नाहीत. आमच्या शाळेत शिक्षकाच्या भूमिकेला जास्त महत्त्व असल्यानं मुस्लीम धर्माचे शिक्षक काम सोडून नमाजाला जायचं टाळतात. त्या ठिकाणी ते कामाला प्राधान्य देतात. यात संस्था आणि शिक्षक दोघंही एकमेकांना सहकार्य करतात.

संपादक मंडळाच्या प्रतिनिधीनी द ऑर्किड स्कूल ह्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या प्रमुख लक्ष्मी कुमार ह्यांची मुलाखत घेतली. त्या म्हणतात…

‘‘शाळा हा समाजाचाच एक भाग असतो. इथे सर्व धर्मांचे लोक एकत्र येणार असतात, वैविध्याला वाव असतो. दुर्दैवानं आज शाळांचं आर्थिक, व्यावसायिक, धार्मिक अशा वेगवेगळ्या संदर्भात ध्रुवीकरण झालेलं आहे. समाजात वैविध्याचा उत्सव करण्याची, परस्परांचा आदर करण्याची आणि सहनशीलतेची नव्हे तर सहिष्णुतेची परंपरा निर्माण करण्यामध्ये शाळेची भूमिका महत्त्वाची असते. विविधता जिवंत राहावी असा अवकाश शाळेत असावा यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो. त्यासाठी आम्ही मुलाची पार्श्वभूमी लक्षात घेतो. मुलं कुठून येतात, घरी कायकाय करतात, धर्म-परंपरा कोणत्या पाळल्या जातात, त्यांना काय वाटतं याबद्दल बोलायला वर्गात होणार्‍या चर्चा, सादरीकरण, शाळेतले सभा-समारंभ यामध्ये वाव दिला जातो. अर्थातच, बहुसंख्यांचा धर्म जास्त स्पष्टपणे माहीत असतो; पण दुर्लक्ष होणार्‍या जागांकडेही आमचं लक्ष असते.

मुलांना परिसरातल्या गोष्टींशी जोडून घ्यायचा आमचा प्रयत्न असतो. 2 ऑक्टोबरच्या सर्वधर्म-प्रार्थनेमधून सर्व धर्म शांती आणि प्रेमाचाच संदेश देतात हे पोचतं. प्रत्येकच व्यक्तीला परिपूर्ण ओळख, परस्पर प्रेम-आदर असणारं मित्रमंडळ, सन्मान आणि उपजीविकेचं साधन यांची गरज असते. त्यासाठी तू माझ्यासारखं किंवा मी तुझ्यासारखं वागायची गरज नसते. आपले विश्वास दृढ करण्यासाठी ते मोठ्यामोठ्यानं सांगत राहण्याची गरज नसते. आपल्या मनातले पूर्वग्रह मात्र तपासून बघावेत. आजची पिढी प्रत्येक गोष्टीला प्रश्न विचारणार आहे. त्याला अपमान समजू नका. 

नुकतंच आमच्या शाळेत मुलांनी महाभारत युद्धासंदर्भात एक नाटक सादर केलं. युद्धाच्या संकल्पनेचा संबंध दैनंदिन आयुष्यातल्या संघर्षाशी जोडला. नीतीतत्त्वं वैश्विक असतात; धर्म कोणताही असो. धर्म नीती शिकवण्यासाठी असतो; पाप देण्यासाठी नव्हे. संत, सुफी, कृष्ण, ख्रिस्त यांच्या गोष्टींचा अर्थ लावताना त्या नीतीतत्त्वांचा संदर्भ घ्यायचा असतो. आपल्यात तू आणि मी अशी फूट पाडून भिंती बांधायच्या नसतात. दुर्दैवानं, ह्या संवादासाठी शिक्षणव्यवस्थेत अवकाश ठेवलेला नाही.

आपल्याकडे धर्म रोजच्या व्यवहारात खाजगी असतो; पण धार्मिक उत्सव सामाजिक असतात. गणपती उत्सवात सगळेजण एकत्र येऊन आरत्या करतात. आपलं व्यक्तित्व, धर्म ही काही मुद्दाम जाहीर करायची गोष्ट नाही. धार्मिक अनुभवातला सामाजिक पैलू मुलांपुढे आणण्याची जबाबदारी शिक्षक म्हणून तुमच्यावर आहे. उदा. सर्वांना प्रसाद देण्यामागे काय विचार असतो त्याबद्दल आम्ही मुलांना सांगत असतो.

आमच्याकडे प्रार्थना ह्या देवाच्या / पौराणिक व्यक्तिमत्त्वांच्या न करता निसर्गतत्त्वाच्या असतात. वेगवेगळ्या भाषांमधल्या प्रार्थना असतात. तो आपला आपल्याशीच संवाद असतो. त्यापैकी एक टागोरांची कविता आहे – व्हेअर द माइंड इज विदाउट फिअर.

आमच्या शाळेत 90% मुलं हिंदू आहेत; बाकी शीख, मुस्लीम, पारशी, ख्रिश्चन मिळून 10%. त्यामुळे सर्वांना आपलंसं वाटावं यासाठी मुद्दाम लक्ष ठेवून प्रयत्न करावे लागतात. एकमेकांबद्दल सहानुभाव, अनुकंपा, आदर आहे ना हे सूत्र धरलं जातं. धार्मिक आणि सामाजिक मुद्दे सकारात्मक – रचनात्मक रीतीनं चर्चेत आणले जातात. मीडियामधून पोचणार्‍या गोष्टी कशा असतात, त्यांचे वेगळे पैलू आणि दुसर्‍या बाजू कशा समजून घ्यायच्या याबद्दल मुलांना जाण यावी म्हणून प्रयत्न केले जातात. हा मुद्दा शिक्षक-प्रशिक्षणात आवर्जून घेतला जातो. संगीतसभांमध्ये बॉलीवूड न घेता अभंग, सुफी संगीत यांचा अंतर्भाव असतो.

धर्म हा तर फार जबाबदारीचा विषय आहे. त्यात जाताजाता काही शेरे मारले आणि पुढे गेलो असं चालणार नाही. त्यातून काही वेगळेच अर्थ काढायला लोक टपलेले असतात. अतिशय जबाबदार सामाजिक वर्तन शिकण्यासाठी मुलांपुढे सर्वात मोठं उदाहरण आपलंच असणार आहे. ‘बोले तैसा चाले’ ही शिकवण सगळ्यात मोठी.

अर्थात, यातून काही सगळे सामाजिक प्रश्न सुटणार नाहीत. शाळांच्या हातात काही थोड्याच गोष्टी असतात. मुलं सर्व समाजाकडून शिकत असतात. आपण सर्व काही करू शकतो असं समजणं हा अहंकारच ठरेल; मात्र आपण काय करू शकतो ते ओळखून वैविध्य राखण्यासाठी शाळा हातभार लावू शकते.’’

पुण्यातील मराठी माध्यमाची एक नामवंत शाळा म्हणते, ‘‘आमच्या शाळेचं धर्माविषयी आणि एकूण विविधतेविषयी निश्चितच धोरण आहे. ते देशाच्या धोरणाशी संलग्न आहे. विविधता ही साजरी करण्याची गोष्ट आहे हे आम्ही मुलांमध्ये आवर्जून रुजवण्याचा प्रयत्न करतो. विद्यार्थ्यांना आजूबाजूच्या धर्मांची ओळख करून देतो. आत्तापर्यंत पारशी, मुस्लीम आणि ख्रिश्चन व्यक्तींना शाळेनं बोलावलं आहे. पण त्यासाठी वेगळा तास असण्यापेक्षा अभ्यासक्रमाशी जोडून घेतलं, की मुलांनाही ते समजून घेणं सोपं जातं. असं असलं तरीही समाजात असलेलं वैविध्य शाळेत दिसत नाही, याची आम्हाला जाण आहे.’’

प्रत्येक धर्मातल्या लोकांचे रोजच्या जगण्यातले रीतिरिवाज काय असतात, सण-उत्सव कोणते असतात, ते कशाप्रकारे साजरे करतात अशी त्या त्या धर्माची थोडक्यात ओळख व्हावी असा हेतू या प्रकल्पामागे असतो. व्यक्तींशी धर्माविषयी बोलण्यासाठी त्या व्यक्तींना शिक्षणाची, मुलांची आवड असावी लागते. एकूण धर्माकडे तटस्थपणे बघणार्‍या आणि विविधतेत ठाम विश्वास असणार्‍या व्यक्तींबरोबरचा संवाद निरोगी होतो आणि त्यातून जे मूल्य रुजू घालायचं ते साधतं. अशा व्यक्ती शोधणं आणि सापडणं अवघड असतं.

एक सामाजिक संस्था म्हणून शाळा धर्मनिरपेक्ष आहे. धर्मावर आधारित कुठलाच भेदभाव करणं, कुठल्याही धर्माला झुकतं माप देणं, विशिष्ट धर्माचा अभ्यासक्रमात समावेश करणं, कार्यपद्धती धर्माला अनुसरून असणं असं होणार नाही याची शाळा पूर्णपणे काळजी घेते.

धर्मनिरपेक्षता ही व्यवहारात असली पाहिजे, असं आम्ही मानतो. विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या शाळाप्रवेशातही हे पाळलं जातं. किंबहुना, इतर सर्व निकष समान असतील तर शाळेत वैविध्य यावं म्हणून हिंदू धर्माव्यतिरिक्त इतर धर्मांच्या व्यक्तींना प्राधान्य दिलं जातं. अर्थात, फक्त वैविध्य यावं यासाठी इतर निकष न बघता इतरांना प्राधान्य दिलं असं मात्र निश्चितच करत नाही. देवाची प्रार्थना वगैरे नाही म्हणत. रोजचा ठरवलेला वेळ आहे ज्यात मन शांत करणार्‍या वैविध्यपूर्ण गोष्टी उदा. परिपाठाच्या वेळी संगीत ऐकणं, माणुसकी, विविधता या विषयीची गाणी, प्रार्थना म्हणणं – केल्या जातात. कधीकधी वेगवेगळ्या धर्मांच्या प्रार्थना म्हणतो.

मराठी माध्यमाची शाळा असल्यानं मुळात प्रवेशासाठी येत असलेल्यांमध्येही हिंदूधर्मीय, मराठी भाषक अधिक असतात. मुलांच्या या परिचित परिघापासून सुरुवात करून त्यांना समाजातील विविधतेची ओळख करून देणं आणि तिचा आदर करायला शिकवणं हे शाळेचं धोरण राहिलेलं आहे. ही विविधता फक्त धर्मापुरती मर्यादित नाही. जात, भाषा, रंग, वर्ग, रीतिरिवाज, अन्नपदार्थ, सण-उत्सव, अनेक बाबतीत ही विविधता आहे. सुरुवातीला भारताबद्दल बोललं जातं, मग जगाबद्दलचीही जाण वाढवण्यासाठी हा संवाद सुरू राहतो. त्यातून आदर, स्वीकार आणि सन्मान मुलांच्या मनात विकसित व्हावा अशी अपेक्षा असते. विविधता जशी पोचवायची तसंच साम्यही दाखवत राहायचं याचा उपयोग होतो. नाहीतर, आमचं वेगळं, तुमचं वेगळं अशी भावना निर्माण होऊ शकते.

मोठ्या वर्गातली मुलं धर्मावर संदर्भशोधन करतात. स्थळभेटी, गृहभेटी, कुटुंबांना भेटतात. जसे पाहुणे शाळेत येतात तसं मुलं त्या वातावरणात जातात. सहावीत असलेल्या संस्कृती / धर्मांच्या ओळखीच्या निमित्तानं धर्मप्रकल्प केला जातो. त्याचं सादरीकरण होतं. वर्गात काही प्रसंगानुरूप संधी आल्या तर बोलणं केलं जातं. यासाठी शिक्षकांचं प्रशिक्षण करावं लागतं. मराठी परिसर भाषा म्हणून शिकण्याचे माध्यम तेच, या तर्कानं मुलांच्या घरी हिंदू धर्म तर तोच शाळेतही साजरा करावा असं सुरुवातीला काही शिक्षकांना वाटतं; पण शाळेची भूमिका समजावून दिल्यावर ही गोष्ट त्यांच्या लक्षात येते. परिचित आहे तिथून सुरुवात करायची आहे. पण मुलांना परिचित गोष्टीच शिकवत राहणं हा शाळेचा उद्देश नाही. अपरिचित गोष्टींची ओळख करून देणं हेही शाळेचं काम आहे. वेगवेगळ्या संस्कृतींची ओळख करून देणं, गाणी, गोष्टी, गप्पा यातूनच हे सहज घडतं. शिक्षक अनेकदा ठरावीक परंपरेतून आलेले असतात. त्यांच्या धारणा पूर्ण बदलतील असं नाही. पण शाळेचा विचार काय आहे एवढं तरी त्यांच्यापर्यंत स्पष्टपणे पोहोचवलं जातं. ‘आपल्याकडे असं असतं ना’ असं शिक्षक शिकवताना म्हणतात. सहजच. पण ते त्यांच्या (शिक्षकांच्या) जगापुरतं मर्यादित असतं. मुलांमध्ये असलेली विविधता मनात ठेवून बोलायला हवं. इतिहासाच्या शिक्षकाला तर खास काळजी घ्यायला लागते. बोलण्यात आपलं-तुपलं यायला नको, याबद्दल शिक्षकांशी आवर्जून बोलणं केलं जातं.

कधीकधी मतभेदाचे प्रसंगही येतात. उदा. वाढदिवस साजरा करणं. त्याचं आजकाल खूप बाजारीकरण होतं. विशेष प्रकारचे केक आणणं आणि कापणं. त्यापेक्षा शाळेचा भर साधेपणानं साजरा करण्यावर असतो.  

अजूनही खूप कमतरता जाणवतात. जितक्या सहजपणे दहीहंडी साजरी होते तितक्या सहजपणे ईद साजरी होत नाहीए. पण त्या धर्माची मुलं शाळेत संख्येनं खूपच कमी असल्यानं ते कृत्रिमही होतं. मोठ्या मुलांसोबत काही कृतिप्रकल्प / व्यक्तींशी भेटीगाठी सोपं असतं. लहानांसाठी पद्धतींचा खूप विचार करावा लागतो. 

संविधानावरचा एक अभ्यासक्रम शाळेत घेतला गेला. सातवीत नागरिकशास्त्रात संविधान असतं. क्रमिक पुस्तकापुरतं मर्यादित न ठेवता संविधानाचा पूर्ण अभ्यासक्रम घेतला जातो. अभ्यासक्रमात असे बदल शाळा करते. मोठ्या मुलांनी दलित साहित्यावरचं संदर्भ-शोधन केलं. कधीकधी काही घटना घडतात, मुलांकडून अचानक प्रश्न येतात. नव्या शिक्षकांना त्या प्रसंगात सांगता आलं नाही तरी काहीतरी घडलंय हे नक्कीच जाणवतं. मग मोठ्या ताई जाऊन मुलांशी बोलतात. नव्या शिक्षकांच्या तासाला असं काही घडलं, तर नंतर अनुभवी शिक्षक मुद्दाम विषय काढून वर्गाशी बोलणं करतात.

धर्मनिरपेक्षता आणि सर्वधर्मसमभाव असं दोन्ही बाजूंनी बघत राहावं लागतं. धर्माचा काही उल्लेखच करायचा नाही, त्याचं अस्तित्व मान्यच करायचं नाही, मुलांशी त्याबद्दल काही बोलायचंच नाही अशी एक भूमिका असते. शाळेनं कशाला या सगळ्यात पडायचं, असं काही जणांचं म्हणणं असतं. आमच्या शाळेचा असा दृष्टिकोन नाही. आमच्या मर्यादेत आम्ही मुलांशी बोलतो. धर्म, त्वचेचा रंग, लिंगभाव, संस्कृती यामधील विविधता याबद्दल आदर, स्वीकार आणि सन्मानाची भूमिका असावी अशी आमची भूमिका आहे. 

(ह्या लेखातील विविध शाळांतील शिक्षणकर्मींच्या मुलाखती पालकनीती संपादक-गटाच्या प्रणाली सिसोदिया, मानसी महाजन, प्रियंवदा बारभाई, प्रीती पुष्पा प्रकाश ह्यांनी घेतलेल्या आहेत. शिक्षकांच्या मताचा आदर करून आम्ही त्यांची नावे इथे जाहीर केलेली नाहीत.)

संजीवनी कुलकर्णी

sanjeevani@prayaspune.org

लेखक पालकनीती मासिकाच्या संस्थापक संपादक तसेच प्रयास संस्थेच्या विश्वस्त आणि आरोग्यगटाच्या समन्वयक, प्रगत शिक्षणसंस्था, फलटण या संस्थेच्या संचालक मंडळाच्या सदस्य आहेत.