अंजली चिपलकट्टी
‘अॅलिस इन वन्डरलँड’ हा सिनेमा अनेकांनी पाहिला असेल. तो बेतलाय लुई कॅरोल या लेखकानं लिहिलेल्या एका कादंबरीवर – ‘थ्रू दि लुकिंग ग्लास अँड व्हॉट अॅलिस फाऊंड देअर’.
त्यातला अॅलिस आणि रेड क्वीन यांच्यातला एक संवाद खूप गाजला. रेड क्वीन नावाची एक राणी अॅलिसचा हात धरून तिला सगळीकडे पळवत असते आणि अॅलिसची दमछाक होत असते. त्यावर क्वीन तिला म्हणते –
‘‘हे बघ अॅलिस, इथे (वन्डरलँडमध्ये) तुला एका जागी नीट उभं राहायचं असेल तरी पळावं लागतं. आणि दुसर्या जागी जायचं असेल, तर त्याच्या दुप्पट वेगानं पळावं लागतं!’’
उत्क्रांतीत हे तत्त्व ‘रेड क्वीन इफेक्ट’ म्हणून ओळखलं जातं. म्हणजे काय? जीवजातींमध्ये इतकी स्पर्धा असते, की जो जीव प्रगत व्हायचा थांबला तो नाहीसा होणार! खरं तर हे खरं नाहीय; पण डार्विनची उत्क्रांती समजून घेताना त्याला अनेक चुकीचे पाय फुटले. त्यापैकी एक म्हणजे स्पर्धा हेच सत्य! तर जगण्याचा मंत्र काय? थांबला तो संपला. पळत राहा. मुलांनो, मोठयांनो, धावत राहा! जो इतर सर्वांना मागे टाकतो तो जिंकला! दुसर्या-तिसर्या स्थानी असणार्यांना तितकी किंमत नाही; मग बाकी सगळे अतिसामान्य!
थोर तत्त्वज्ञ बर्ट्रांड रसेलनं अमेरिकेतल्या ‘रॅट-रेस’बाबत फार मार्मिक भाष्य केलंय. तो म्हणतो, या रॅट-रेसचं मूळ अमेरिकेन लोकांच्या भीतीमध्ये आहे. कसली भीती? उद्या आपल्याला खायला मिळेल की नाही (माझा उदरनिर्वाह नीट होईल की नाही) ही भीती नाही, तर मी माझ्या शेजार्यापेक्षा जास्त चमकेन की नाही ही ती भीती आहे. या स्पर्धेमुळे आनंद हा जिंकण्याशी जोडला जातो आणि आपण सतत हरत आहोत ही भावना मनात ठाण मांडून बसते. त्याचा परिणाम फक्त कामावर होतो असं नाही, तर विरंगुळ्याचे, जगताना सहज मिळणारे वेगवेगळे आनंदही त्यांना घेता येत नाहीत.
आत्ताच्या जगात निभाव लागायचा असेल, तर सतत दुसर्याशी स्पर्धा करत पुढे राहत चला, नाही तर तुम्ही मागे पडणार! ही अशा प्रकारची वाक्यं, तत्त्वं कोणी तयार केली? आणि त्यावर आपण का विश्वास ठेवतो? बाजारात एखाद्या मालाचा दर्जा दुसर्या मालापेक्षा कमी असेल तर ते खपणार नाही, म्हणून मग त्याचा दर्जा उत्तम असायला हवा. आणि दर्जा चांगला हवा असेल, तर स्पर्धा हवीच हे आपल्याला बाजारानं शिकवलं. पण आपल्याला खरंच असा अनुभव येतो का? बाजारात खूप पर्याय उपलब्ध आहेत म्हणून त्यांचा दर्जा चांगला असतोच असं नाही. उलट, मार्केटिंग करून निकृष्ट माल खपवण्याचं कौशल्यही बाजारानं आत्मसात केलंय. शैक्षणिक संस्थासुद्धा स्पर्धेच्या या बाजारू तत्त्वावर चालल्या, तर आपली मुलं हे त्यांचं प्रॉडक्ट बनतात. मग त्यांच्यामध्ये अशी स्पर्धा लावून दिली, तर त्यांचा ‘दर्जा’ सुधारेल अशी अनेकांची समजूत आज आहे. म्हणूनच आपण ‘गुणवत्ता’ म्हणजे मार्कांच्या मागे लागलो. आपल्याला खरंच असा अनुभव येतो का, की फक्त चांगले मार्क पडणारी मुलंच यशस्वी होतात? म्हणजे उदाहरणार्थ, शाळेत पहिल्या पाचात असणारी मुलं आणि इतर मुलं शाळेतून बाहेर पडल्यावर त्यांचं काय होतं? शाळेत हुशार म्हणून नावाजलेल्या मुलांचा दबदबा असतो; पण नंतर प्रत्येकालाच करिअरच्या काही ना काही संधी मिळतातच. मग असं असेल, तर शिक्षक, पालक मार्कांसाठी एवढ्या प्रचंड प्रमाणात मुलांना इतरांशी स्पर्धा का करायला लावतात? हा असा ट्रेंड जगभरात दिसतो का?
किती मुलांना शाळेतली स्पर्धा आवडत असेल? माझा एक अनुभव सांगते – मी ‘विज्ञान विचार-पद्धत’ रुजवण्यासाठी मुलांबरोबर काम करते. कोविड काळात 30-40 मुलांबरोबर ऑनलाईन काम सुरू होतं. सुरुवातीला मुलं ऑनलाईन शाळेबाबत खूप खूश होती, नंतर मात्र ती कंटाळली. शाळेतलं ऑनलाईन शिक्षण कसं ‘बोअर’ चालतं, आम्ही कशी लबाडी करतो हे ती हसत सांगायची. नंतर मी एकदा सहज विचारलं, की आता कधी एकदा शाळेत जाऊ असं तुम्हाला वाटत असेल ना? त्यातल्या 25 मुलांनी तरी ‘आम्हाला हेच बरं वाटतं’ असं सांगितलं. काय कारण? शाळेत सगळं परीक्षा आणि मार्कांसाठी चालतं, प्रश्न विचारलेले चालत नाहीत, स्वतःच्या मनानं लिहिलेलं चालत नाही, टीचरनं सांगितलेली उत्तरं फेरफार न करता परीक्षेत लिहावी लागतात, या सगळ्याचा त्यांना ताण येत होता. कोविड काळात परीक्षा एमसीक्यू (MCQ) पद्धतीनं सोपी झाल्यानं खूप मार्क पडत होते. त्यामुळे सर्वच खूश! ही मुलं अभ्यास करायला, विचार करायला उत्सुक असणारी होती. त्यामुळे कष्ट टाळायला ती तसं म्हणत नसून, मार्क पाडण्याचं शाळेचं, पालकांचं प्रेशर त्यांना ताण देत होतं. अनेक मुलं बुलिंग करणार्या मुलांपासून सुटका मिळाली म्हणून खूश होती. काही जणांना शाळेत इतर मुलांशी तुलना होणं, पालकांचं खोदून विचारणं हे नकोसं झालेलं होतं. या बोलण्यातून मुलं कसा विचार करतात हे लक्षात आलं. हा माझा वैयक्तिक अनुभवांवर आधारित अगदीच तुटपुंजा डेटा असल्यानं मोठे निष्कर्ष काढायला उपयोगी नाही. शिवाय हा माझा पूर्वग्रह (बायस) असू शकतो! स्पर्धेविषयी माझं मत चांगलं नाही म्हणून मी तसा अर्थ काढलेला असू शकतो.
या पार्श्वभूमीवर विज्ञान काय सांगतं ते पाहायला हवं. माणसाच्या मूलभूत प्रेरणांमध्ये स्पर्धा आहे की सहकार्य? त्यापैकी शिकताना काय उपयोगी पडतं?
याबाबत 2015 मध्ये केलेला मानसशास्त्रामधला प्रयोग पाहू. 14 सहभागींना एका स्क्रीनवर रॉक-पेपर-सीझर आणि हात-कुस्ती (आर्म रेसलिंग) ह्या दोन खेळांचे चारेकशे राऊंड दाखवण्यात आले. हे खेळ अनेकांना परिचित आहेत.
1. रॉक-पेपर-सीझर हा खेळ लहान मुलांना खेळताना तुम्ही पाहिला असेल. प्रत्येकानं त्यापैकी एक शब्द निवडायचा. दगडानं कात्री तोडता येते, कात्रीनं पेपर कापता येतो आणि पेपरनं दगड झाकता येतो हे नियम वापरायचे आणि बोली लावायची. समजा तुम्ही ‘रॉक’ म्हणालात आणि समोरच्यानं ‘सीझर’ (कात्री) म्हटलं, तर तुम्ही जिंकता आणि तो बाहेर पडतो कारण दगडानं कात्री तोडता येते. मात्र समोरच्यानं ‘पेपर’ म्हटलं, तर तो जिंकतो कारण पेपरानं दगड झाकता येतो! तुम्ही रॉक-पेपर-सीझरपैकी कशाची निवड केली आणि इतरांनी कशाची केली यावर जिंकणं-हरणं अवलंबून आहे.
2. हात-कुस्ती प्रकारात टेबलावर समोरासमोर हाताचा कोपरा ठेवून एकमेकांचे पंजे हातात घ्यायचे आणि दुसर्याचा हात ताकदीनं खाली पाडायचा प्रयत्न करायचा.
पहिला खेळ केवळ नशिबावर (किंवा योगायोगावर) अवलंबून आहे, तर दुसरा शरीराची ताकद आणि सतर्कता यावर आधारित आहे. यात कोणीतरी जिंकणार आणि हरणार हे आलंच. स्पर्धात्मक खेळांमध्ये जे खेळ नुसते बघत असतात त्यांच्यावर काय परिणाम होतात हे या अभ्यासात तपासायचं होतं. या प्रयोगात सहभागी झालेले हा खेळ प्रत्यक्ष खेळत नव्हते, तर व्हिडिओच्या माध्यमातून स्क्रीनवर बघत होते. प्रत्येक राऊंडनंतर जिंकणारी आणि हरणारी आकृती (जेश्चर) स्क्रीनच्या डाव्या बाजूला किंवा उजव्या बाजूला दाखवत होते. हात-कुस्ती जिंकणार्या / हरणार्या माणसाला हातात लाल किंवा हिरवं ब्रेसलेट बांधलं असं दाखवत होते. त्यांनतर त्यांना लगेच एक टेस्ट द्यायची होती. त्यात वेगवेगळ्या प्रकारे हरणार्या / जिंकणार्याविषयी काही प्रश्न विचारलेले होते. उदा – कोणाच्या हातात कोणत्या रंगाचं ब्रेसलेट होतं. बहुतांश वेळी हरणार्याच्या हातातल्या ब्रेसलेटचा रंग त्यांना जास्त लक्षात राहिला. ब्रेनस्कॅनवरून लक्षात आलं, की त्यांच्या मेंदूचं जिंकणार्यापेक्षा हरणार्या बाजूकडे जास्त लक्ष होतं. याला मेंदूचा ‘अटेंशन बायस’ (attention bias) असं म्हणतात. कारण काय असावं? ज्या गोष्टीपासून धोका, भीती असते अशा माहितीची नोंद घेण्याकडे मेंदूचा कल असतो. याचा अर्थ स्पर्धा असणारं पर्यावरण असेल, तर नेणिवेत ‘विनर’पेक्षा ‘लुझर’ची नोंद अधिक घेतली जाते. जिंकणार्या माणसाकडून प्रेरणा मिळते की नाही मग? मिळत असावी; पण हरणारा लक्ष अधिक वेधून घेतो! याचा अर्थ मानसिक पातळीवर फायदा फक्त जिंकणार्याचा होतो; बाकी हरणारा आणि बघणारे असे सर्वच भीतीच्या तणावाखाली राहतात. स्पर्धात्मक पर्यावरणाचा जिंकणार्या आणि हरणार्या सहभागींवर परिणाम होतो ते माहीत असतंच; पण त्या व्यतिरिक्त बघणार्या माणसांवरही नकारात्मक परिणाम होतो असा निष्कर्ष अभ्यासकांनी काढला. हे तसं उत्क्रांतीच्या विज्ञानाशी सुसंगत आहे. उत्क्रांतीत पर्यावरणातले धोके टिपणारे जास्त टिकून राहिले, म्हणून भीती वाटणं हा गुण टिकला (इव्होल्युशनरी स्टेबल स्ट्रॅटेजी).
आधुनिक जगात भीती वाटण्याचे संदर्भ बदलले आहेत. आपल्या मुलांसाठी वर्गात असं भीतीयुक्त पर्यावरण आपण स्पर्धेमुळे तयार करतो का हे तपासणं गरजेचं आहे. याचं उत्तर शोधायचं असेल, तर मुळात मुलं शिकतात कशी आणि अलीकडच्या जगात ती प्रक्रिया कशी बदलली हे बघावं लागेल. मुलं भवतालाचं निरीक्षण करतात, त्यापैकी ज्या गोष्टी लक्ष वेधून घेतात, त्यांची निवड करत, काहींचं अनुकरण करत स्वयंस्फूर्तीनं शिकत असतात. मात्र नवीन शिकण्यासाठी ऊर्मी जागी होणं ही नैसर्गिक प्रक्रिया शाळेसारख्या बंदिस्त जागेत तयार करणं हे मोठं आव्हान असतं. अमुक-तमुक गोष्ट का शिकायची, या प्रश्नाचं उत्तर मुलं जेव्हा स्वतःहून शिकतात तेव्हा कोणाला द्यायची गरज नसते. उदा – एखाद्या पोहणार्या मुलीला पाहून कोणी पोहणं शिकण्याचा हट्ट करतं, तेव्हा ती त्या मुलाची स्वयंस्फूर्त ऊर्मी असते. गलोल बनवायला, पतंग उडवायला मुलं स्वतःहून पुढाकार घेतात. चित्र काढणं मुलं स्वतःहून करतात; पण लिहायला शिकणं, भौतिकशास्त्राचे नियम शिकणं यासाठी त्यांच्यात ऊर्मी जागी करणं आवश्यक असतं. यामुळे अशा काहीशा कृत्रिम पर्यावरणात शिकण्याची उत्सुकता, सहभाग आणि शिकण्याचा ताण या दोन घटकांचा समतोल साधणं शाळांना आणि शिक्षकांना कठीण जातं.
या पार्श्वभूमीवर शाळांमध्ये स्पर्धात्मक पर्यावरणामुळे मुलांची जास्त प्रगती होते की कोलॅबोरेटीव्ह – म्हणजे सहकार्यात्मक पद्धतीमुळे होते याविषयी गेल्या काही वर्षांत खूप संशोधन झालं आहे. मुलांची प्रगती मोजायची कशी? खूप माहिती आयती चमच्यानं भरवण्याऐवजी शिकण्याची ऊर्मी, जिज्ञासा चांगली असणं, नावीन्यपूर्ण विचार करता येणं अशी आयुष्याभर पुरतील अशी जीवन-कौशल्यं मिळवणं म्हणजे प्रगती असं प्रगत देशांमध्ये मानतात.
भारतात यश हे मार्कांमध्ये मोजलं जातं. पालक, शाळा आणि शिक्षक हे मुलांमध्ये मार्कांसाठी स्पर्धा असावी यावर भर देतात. त्यातून खूप गंभीर प्रश्न तयार झालेले आहेत. परीक्षेपेक्षा रिझल्टच्या दिवशी मुलांवर असणारं प्रेशर (ताण!) गोळा करता आलं, तर एखादं रॉकेट सहज उडवता येईल!
प्राथमिक आणि माध्यमिक काळातलं (15 वर्षांपर्यंत) मुलांचं शैक्षणिक यश हे मुलं किती चांगली शिकतात याचं मूल्यमापन असतं. त्या यशानुसार पुढे उच्च शिक्षण कशात घ्यायचं, काय शिकायचं हे ठरतं. शिवाय मुलांच्या यशाच्या दर्जावर त्या शैक्षणिक संस्थेचं मूल्यमापनही होत असतं. पालक आपल्या मुलांच्या प्रगतीबाबत चिंतेत असतात आणि त्यांच्या शाळा-कॉलेजकडून अपेक्षा वाढत असतात. मुलांमध्ये एकमेकांत स्पर्धा असली, तर त्यांना प्रगती करण्यासाठी चांगली प्रेरणा (मोटिवेशन) मिळते असा प्रामाणिक समज आहे.
याबाबत न्यूझीलंडमधला एक अभ्यास (Helen Ladd E. Fiske 2003) खूप चांगलं भाष्य करतो. न्यूझीलंडमध्ये आणि अनेक प्रगत देशांमध्ये बहुतांश मुलं सरकारी शाळांमध्ये जातात. त्यांचा दर्जाही चांगला असतो. मात्र तिथे ‘नेबरहूड स्कूलिंग’ आहे. म्हणजे एका भौगोलिक भागात राहणारी सर्व मुलं, श्रीमंत असो की गरीब, त्यांना त्या भागातल्या सरकारी शाळेतच शिकावं लागतं. कोणत्या सरकारी शाळेत मुलाला घालायचं हा निर्णय पालक घेऊ शकत नाहीत. अर्थात, खाजगी शाळांचा पर्याय उपलब्ध असतो; पण खाजगी शाळा अजूनही कमी प्रमाणात आहेत. ‘मुलांना कोणत्या शाळेत घालायचं याविषयी पालकांना शाळा निवडीचे हक्क द्यावेत’ अशी सुधारणा करण्याचा प्रस्ताव तिथे 90 च्या दशकात मांडला गेला आणि काही भागांपुरता तो मान्य झाला. स्पर्धा आवडणार्या अनेकांचा होरा असा होता, की सरकारी शाळांचा दर्जा सुधारायचा असेल, तर शाळांमध्ये आपसात स्पर्धा असली पाहिजे. असं वाटण्याचं मुख्य कारण म्हणजे मुलांना स्पर्धात्मक पर्यावरणाची सवय आणि ‘एक्सपोजर’ मिळायला हवं हे लोकांचं लाडकं मत आणि पालकांचा दबाव. झालं असं, की यामुळे शाळा-शाळांमध्ये स्पर्धा तर निर्माण झाली. ती अर्थातच वर्गामध्ये मुलांच्या पातळीवर झिरपली. त्याचा मुलांवर फार नकारात्मक परिणाम झाला. मुलांचा शिकण्याचा उत्साह निर्विवादपणे कमी झाला होता. गंमत म्हणजे त्या शाळांचे मुख्याध्यापक मात्र म्हणत राहिले, की शाळांच्या, मुलांच्या ‘दर्जा’मध्ये सुधारणा झाली; मात्र मुलांच्या संपर्कात असलेल्या शिक्षकांनी मुलांवर झालेल्या नकारात्मक परिणामाबद्दल स्पष्टपणे सांगितलं. इतकंच नाही, तर स्पर्धेमुळे शाळा-शाळांमधल्या शिक्षकांचे एकमेकांशी असलेले संबंध तणावाचे झाले आणि त्यांच्यामधलं परस्पर सहकार्यही थांबलं. शिक्षकांच्या शिकवण्याच्या समाधानावरसुद्धा याचा नकारात्मक परिणाम झाला. असेच निष्कर्ष अमेरिकेत झालेल्या अनेक अभ्यासांतून काढले गेले आहेत.
याबद्दल आशियाई देशात – चीनमध्ये – झालेलं संशोधन जवळचं वाटू शकेल. झिजिआंग भागातल्या वेगवगेळ्या शाळांतल्या 1500 मुलांच्या पाहणीतून असा निष्कर्ष निघाला, की स्पर्धा ही शैक्षणिक कामगिरीवर दोन माध्यमांतून प्रभाव पाडते – मुलांचा शिकण्यातला उत्स्फूर्त सहभाग (ऊर्मी) आणि शिकण्यातला ताण. या अभ्यासातून मिळालेले निष्कर्ष, ‘लर्निंग टुगेदर अँड अलोन’ हे जॉन्सन द्वयीनं लिहिलेलं पुस्तक आणि इतर काही अभ्यास यातून महत्त्वाचे काही धागे मिळतात, ते पुढे मांडलेले आहेत –
सहकार्य आणि स्पर्धात्मक पर्यावरण यांची तुलना केली असता, स्पर्धेमुळे नवीन शिकण्याच्या अंगभूत ऊर्मीवर विपरीत परिणाम होतो. मुलांना एकत्र मिळून काम करायला वाव मिळतो, तेव्हा त्यांच्यात शिकण्याची अंगभूत ऊर्मी (intrinsic motivation) निर्विवादपणे जास्त निर्माण होते. कोणतंही ज्ञान मला जिंकण्यासाठी (परीक्षा) मदत करणार असेल तर ते चांगलं, नाहीतर निव्वळ आनंद देणार्या कृती, ज्ञान म्हणजे वेळेचा अपव्यय अशा समजुती स्पर्धेमुळे दृढ होतात. जिंकणार्या मुलांमध्येही सतत हरण्याची भीती असते. मुलांमध्ये आपसात सहकार्य करण्याची वृत्ती कमी होते. चांगले मार्क मिळवणारी मुलं कळत-नकळत दहशत तयार करतात. बुलिंग करतात. त्यांच्यात आक्रमकता वाढते. ती इतरांना तुच्छ समजतात.
बोधनात्मक विकासासाठी सहकार्य आणि कोलॅबोरेटीव्ह पद्धती स्पर्धेपेक्षा खूप जास्त उपयोगाची ठरते असं पियाजे आणि वायगॉट्स्की ह्या दोन्ही शिक्षण-संशोधकांचं म्हणणं समजून घ्यायला हवं. एकमेकांशी चर्चा, मतभेद, आपला मुद्दा पटवून देण्यासाठी होणारी घासाघीस यातून एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण होतेच; पण त्यामुळे स्वतःच्या चुका, कच्चे दुवे आणि तार्किक गफलती ‘न हरता’ कळतात, तसं स्पर्धात्मक पर्यावरणात घडत नाही. समजून घेण्याऐवजी स्पर्धेत दुसर्याला हरवणं हेच केंद्रस्थानी असतं. आपलंच म्हणणं न रेटता दुसर्यांचा ‘पर्स्पेक्टिव्ह’ समजून घेण्यासाठी लागणारी भावनिक ताकद कोलॅबोरेटीव्ह पद्धतीत विकसित होते.
स्पर्धात्मक पर्यावरणात मुलांच्या मनात शिकण्याविषयी तिटकारा आणि जिंकणार्याविषयी राग तयार होतो. एकमेकांना मदत करण्याची नैसर्गिक ऊर्मी दबून राहते, मग माहिती ‘शेअर’ करायला नकार तयार होतो. एका बाजूला सहकार्य चांगलं म्हणायचं आणि दुसर्या बाजूला मुलांमध्ये आपसात कुरघोडी करणारी स्पर्धा लादायची यामुळे मुलांच्या मनात विरोधाभास तयार होतो.
हरलॉक या वैज्ञानिकानं मुलांच्या गटांमध्ये स्पर्धा ठेवून त्यांचा अभ्यास (Hurlock 1927) केला. त्याच्या असं लक्षात आलं, की पहिल्या दिवशी जो गट स्पर्धेत हरला होता, त्यातले सदस्य चौथ्या दिवशीपर्यंत त्या पराभवाचा परिणाम विसरू शकले नव्हते आणि त्यांच्यात त्याचा न्यूनगंड तयार झाला होता. सेन्ज (Tseng 1969) या संशोधकाच्या पाहणीनुसार, जिंकण्याशी संबंधित फायदा जितका अधिक, तितका ताण आणि हरण्याची भीती असते. अॅटकिन्सन (1965) याच्या म्हणण्यानुसार पराभवाची भीती इतकी ठाण मांडून बसते, की मुलांचा कल स्वतःची प्रगती, शिकणं यापेक्षा कोणत्याही मार्गानं पराभव टाळण्याकडे असतो. मग मुलं फसवाफसवी करतात किंवा आव्हानात्मक काम टाळायला बघतात. ती असं काम निवडतात, जे खूप अवघड किंवा खूप सोपं असेल. खूप अवघड काम जमलं नाही तरी पराभवासाठी कोणी बोल लावत नाही आणि खूप सोप्या कामात यश मिळवता येतं.
वर्गातल्या मुलांच्या बौद्धिक क्षमता वेगवेगळ्या असतात. एकंदर असं दिसतं, की ज्यांना वर्गात चांगलं बोलायला जमतं किंवा ज्यांचे मार्क चांगले असतात त्यांना स्पर्धा करायला आवडते, कारण त्यामुळे त्यांची वर्गातली प्रतिष्ठा उंचावते; मात्र ज्यांचे मार्क कमी आहेत अशी मुलं दबावाखाली असतात. चांगले मार्क मिळवणारी मोजकी मुलं शिक्षकांचीही लाडकी असतात, त्यामुळे स्पर्धांमध्ये त्यांचा उत्साह आणि सहभाग चांगला असतो. पण बहुतांश मुलं मात्र आपण मागे आहोत अशी भावना मनात ठेवून आणखीनच मागे पडतात. हे आपण वर वर्णन केलेल्या ‘अटेंशन बायस’ प्रयोगाशी सुसंगत आहे. पण मुख्य मुद्दा असा, की मार्क मिळणं हे इतक्या केंद्रस्थानी येतं, की जिज्ञासा, वेगळा विचार करता येणं या मूळ शिकण्याच्या गाभ्यापासून ही मुलंही दूर जातात.
स्पर्धेत आपण इतरांच्या पुढे आहोत की मागे पडतो आहोत यावरून मुलांमध्ये दोन तट पडतात असं दिसतं. स्पर्धा मानवणारे मोजके विद्यार्थी अधिकाधिक सहभागी होत राहतात; मात्र मार्क कमी पडणारे शिकण्यापासून दूर जातात. म्हणजे स्पर्धेमुळे मुलांच्या शिकण्यातल्या सहभागाबाबत (लर्निंग एंगेजमेंट) विषमता वाढत जाते. शिकण्यातली विषमता वाढवणारा हा मुद्दा नीट आणि काळजीपूर्वक विचारात घ्यायला हवा.
याचा अर्थ शिकण्याच्या प्रक्रियेतून स्पर्धात्मकता पूर्ण हद्दपार व्हावी असं नाही. चुरस करता येणं, यश मिळाल्याची भावना अनुभवणं हे शिकण्याच्या प्रक्रियेत मजा आणू शकतं; पण त्याला काही अटी आहेत. गेल्या 25-30 वर्षांमध्ये झालेल्या अनेक संशोधनांत सहकार्य आणि स्पर्धा यापैकी कोणत्या पर्यावरणात मुलांच्या मानसिकतेवर चांगला परिणाम होतो याबाबत सातत्यानं काही निष्कर्ष निघाले आहेत. स्पर्धा काही विशिष्ट परिस्थितीत चांगला रचनात्मक परिणाम साधू शकते.
केवळ इतरांबरोबर सहकार्य आणि केवळ इतरांशी वैयक्तिक स्पर्धा यापेक्षा या दोन्हीचं मिश्रण अधिक चांगलं परिणामकारक ठरतं. म्हणजे कसं? उदाहरणातून स्पष्ट करूया. जॉन टोर आणि ज्युडिथ हराकोविच यांनी मुलांबरोबर काही प्रयोग केले. बास्केटबॉल खेळताना मुलांची कामगिरी सगळ्यात चांगली केव्हा होती यांची निरीक्षणं केली. हा खेळ एकट्यानं, दोघांची स्पर्धा लावून किंवा मुलांचे गट बनवून त्यांच्यात सहकार्य किंवा स्पर्धा अशा अनेक पद्धतींनी खेळवला. खेळण्याचा उत्साह, आव्हान घेण्याची मजा, चांगला स्कोअर (कामगिरी), एकमेकांबरोबर चांगला समन्वय आणि बॉण्डिंग या निकषांवर तुलना केली, तर जेव्हा मुलं वैयक्तिक नव्हे तर गटांमध्ये स्पर्धा करत होती, तेव्हा त्यांची कामगिरी सर्वात चांगली होती. शिवाय त्यांना त्याचा आनंदही जास्त मिळाला. गटातल्या मुलांबरोबर त्यांचं नातं अधिक मित्रत्वाचं बनलं, शिवाय दुसर्या गटाबाबत नकारात्मक भावनाही कमी होती.
दिलेल्या कामात शारीरिक हालचाल, श्रम यांचा अंतर्भाव असतो, तेव्हा स्पर्धेचं धोरण चांगला परिणाम साधू शकतं. पण स्पर्धा करताना दोन्ही बाजूचे गडी तुल्यबळ असले तरच असा परिणाम साधतो ही मोठी अट असते. तसे संतुलित मिश्र-गट चांगला परिणाम साधू शकतात. वास्तव जगात अशी अट एका वर्गातल्या मुलांमध्ये पूर्ण होणं अवघड असतं. तरीही शारीरिक खेळ खेळताना मुलांना स्पर्धा अधिक मानवते.
शिकण्याची ऊर्मी जागवण्यासाठी स्पर्धेचा फायदा व्हायचा असेल, तर अतिशय संयतपणे पर्यावरण नियंत्रित ठेवावं लागतं. त्यासाठीचे निकष कोणते?
1. वैयक्तिक स्पर्धेपेक्षा विद्यार्थ्यांचे गट करून त्यांच्यात चुरस असावी. गटाच्या आत मुलांना एकमेकांच्या सहकार्यानं करता येतील असे ‘टास्क’ द्यावेत. मग त्या गटांमध्ये ‘हलक्या’ स्वरूपातली स्पर्धा ठेवली, तर मुलांना कमी ताण येऊन नवीन शिकण्यासाठी उत्साह येतो. उदा. वेगवेगळे विषय देऊन त्यावर सादरीकरण करणं, गटात कोडी सोडवणं, ‘क्विझ’ खेळणं वगैरे. गटांमधल्या स्पर्धेमुळे जिंकण्याचा आनंद विभागला जातोच; पण हरण्याचा ताण वैयक्तिकरित्या त्रास देत नाही.
2. चुरस करताना त्यात जिंकणं-हरणं महत्त्वाचं नसून, दुसर्याकडून काय शिकतो हे अधिक महत्त्वाचं आहे हे मुलांवर ठसवलं गेलं पाहिजे. काही वेळा योगायोगामुळे आपण कसं जिंकू-हरू शकतो याचाही अनुभव मुलांना यावा अशी स्पर्धेची रचना हवी.
3. शिकताना असे खेळ निवडावे ज्यात ठरावीकच मुलं जिंकतील असं न होता सर्व मुलांना जिंकण्याची संधी मिळेल. स्पर्धा अशी असावी, की ज्यामुळे काही मुलांना आपण बाहेर फेकले जातोय असं वाटू नये.
4. प्रश्न निवडतानाही अशी काळजी घेता येते ज्यात सर्व मुलांना ‘मला येतंय…’ असा आनंद घेता येऊ शकतो.
5. स्पर्धेचे नियम आणि निकष अगदी स्पष्ट आणि न्याय्य असावेत. संदिग्ध नियमांमुळे कोणाला अन्याय झाला असं वाटू नये.
भारतीय शिक्षण-व्यवस्थेच्या स्पर्धेशी असलेल्या घट्ट संबंधाबद्दल बोलायचं, तर वेगळा लेख लिहायला लागेल. त्यात विरोधाभास असा, की स्पर्धा करूनही गुणवत्ता नाही अशी ‘तेलही गेले तूपही गेले’ अशी परिस्थिती आहे. उच्च माध्यमिक पातळीवर (12वी नंतर) ज्या स्पर्धापरीक्षा घेतल्या जातात त्यातही परीक्षेचं स्वरूप एमसीक्यू प्रकारचं असलं, तरी एका मिनिटात गुंतागुंतीच्या अवघड प्रश्नाचं उत्तर देणं या पद्धतीमुळे विचार करून उत्तर देण्यापेक्षा आधी सराव किती केलेला आहे आणि किती आठवतं आहे यावर जास्त भिस्त असते. म्हणूनच ‘कोटा फॅक्टरी’सारख्या शिकवण्या फोफावतात आणि ‘शिक्षणा’पेक्षा पालकांच्या प्रतिष्ठेला जास्त महत्त्व प्राप्त होतं. तिथली मुलं किती ताणाखाली असतात हे तिथे ज्या आत्महत्या होताहेत त्यावरून बाहेर येतंच आहे. अगदी दहावीतल्या मुलांनाही मार्कांच्या ताणामुळे येणारं नैराश्य वाढलेलं आहे.
वरील अभ्यासावरून इतकं लक्षात येतं, की शिकण्याचा ताण न येता स्पर्धेचे फायदे मिळवता येण्यासाठी लागणारं पर्यावरण वास्तवात असणं अवघड आहे. त्यामुळे बहुतांश मुलांसाठी सहकार्याधारित स्थिर, भयमुक्त शिक्षणाची व्यवस्था असेल, तर शिकण्याची प्रक्रिया चांगली घडून येऊ शकते, असं प्रगत देशांतील व्यवस्था सांगतात. यासाठी मुलांबरोबर गप्पा मारत ज्ञानरचनावादी, पडणारे प्रश्न सोडवत जाण्याच्या (inquiry) पद्धतीनं शिकण्याची व्यवस्था अधिक चांगलं काम निभावू शकेल.
अंजली चिपलकट्टी

anjalichip2020@gmail.com
लेखक मुलांमध्ये जिज्ञासा आणि विज्ञान-विचार पद्धत रुजवण्यासाठी काम करतात. त्यांना निसर्ग आणि शेतीमध्ये रस आहे. त्यांचे ‘माणूस असा का वागतो?’ हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे.
