वैशाली गेडाम
मला आठवते, मी मसाळा तुकूम शाळेत असतानाची ही गोष्ट. आमच्या जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने जि. प. शाळेतील मुलांसाठी नवरत्न स्पर्धा आयोजित केल्या होत्या. यात हस्ताक्षर स्पर्धेपासून ते कथाकथन, एकपात्री वगैरे अशा नऊ स्पर्धा होत्या. दरवर्षी या स्पर्धा केंद्रस्तर ते जिल्हास्तर या क्रमाने होतात. त्यासाठी शिक्षक विद्यार्थ्यांची कसून तयारी करून घेतात. आमच्या मुख्याध्यापकांनी मला या स्पर्धांची तयारी करून देण्यास सांगितली. मला असल्या निर्जीव तयार्या करून देणे पसंत नसले, तरी शाळा मुलांना स्पर्धेत उतरवणारच होती. मी ज्या गोष्टी मुलांना येतात आणि जशा येतात त्यात थोडी तयारीची भर घालून सादर करायच्या असे ठरवले होते. मुख्याध्यापकांनी या नऊही स्पर्धांची नावे लिहिलेला एक चार्ट तयार करून वर्गखोलीत लावायला सांगितला होता. तसा तो लावला गेला होता. त्यावरील ज्या स्पर्धा मुलांनी अजून ऐकलेल्या नव्हत्या व त्यांना समजलेल्या नव्हत्या त्याबद्दल त्यांनी मला विचारण्यास सुरुवात केली.
सर्वप्रथम त्यांनी मला ‘नायक बचाव स्पर्धा’ याबद्दल विचारले. मी त्यांना समजावून सांगू लागले. या स्पर्धेची संकल्पना अशी आहे – चार-पाच व्यक्ती संकटात सापडल्या आहेत. म्हणजे समजा एका नौकेत पाच व्यक्ती आहेत आणि नौका बुडत असेल, तर त्यापैकी तू कोणाला वाचवशील… आणि ज्याला वाचवले त्याला वाचवण्याचे कारण काय? म्हणजे त्या व्यक्तीचे प्राण गेल्याने समाजाची / देशाची / कुटुंबाची काय हानी होऊ शकते आणि प्राण वाचल्याने देशाचे / समाजाचे / कुटुंबाचे काय चांगले होऊ शकते हे पटवून देणे, हेच त्या स्पर्धेतील मुख्य कौशल्य.
मी नावेत सर्वप्रथम शाळेतील सर्व शिक्षक बसून असल्याचे सांगितले. मग अचानक जोराचे वादळ सुटले. नाव हलू लागली. गटांगळ्या खाऊ लागली व पाण्यात उपडी झाली. नावेतील पाचही जण पाण्यात पडले, बुडू लागले. तुम्ही किनार्यावर उभे आहात. तुम्हाला पोहता येते. पोहत जाऊन तुम्ही किमान एकाचा तरी जीव वाचवू शकता. तर तुम्ही या पाच शिक्षकांपैकी सर्वप्रथम कोणा शिक्षकास वाचवण्याचा प्रयत्न करणार?
मुले म्हणाली, ‘‘सप्पाईलेय. एवड्याईलेय.’’ (सर्वांना)
मुलांनी सर्वांनाच वाचवणार असे उत्तर दिले. मग मी त्या संकटसमयीच्या परिस्थितीतील मर्यादा सांगितल्या, ‘‘वेळ फारच कमी आहे, एकाचेच प्राण वाचण्याची शक्यता आहे, अशा वेळी तुम्ही कोणाला वाचवणार? आणि का वाचवणार? तुम्ही ज्या व्यक्तीला वाचवणार तो तुमचा नायक. त्याला वाचवण्याची गरज तुम्हाला का वाटली? त्याला वाचवल्याने काय होणार? ती व्यक्ती मेली तर कोणते नुकसान होणार? हे पटवून देणे म्हणजेच नायक बचाव स्पर्धा.’’
एवढे समजावून सांगितल्यानंतरही पुन्हा ‘सप्पायले वाचवतो’ हेच मुलांचे उत्तर. मुलांना सर्वांचेच प्राण वाचवावे वाटत होते. कोणालाही बुडू देताना, मरू देताना पाहणे मुलांना शक्य होत नव्हते. सर्वांचेच प्राण वाचवण्यासाठी ती निरनिराळ्या कल्पना लढवत होती. सर्वांचेच जीव वाचले पाहिजेत यासाठी त्यांची धडपड सुरू होती. फोन करू, ‘हेलिकॅप्टर’ बोलवू, दोर फेकू, ओंडका फेकू, जास्त लोकांना बोलवू… नाना उपाय शोधू लागली. इतरांना बुडू देऊन कुणा एकाला वाचवणे त्यांना पटेना.
मला वाटले, नावेत बसलेले सर्व त्यांचे शिक्षक आहेत म्हणून त्यांना एकाला वाचवून बाकीच्यांना सोडून देणे शक्य होत नसेल. म्हणून मी नावेत आता गावातील ही ही पाच माणसे बसली आहेत असे सांगितले. याही वेळी त्यांचे उत्तर ‘सर्वांनाच वाचवू’ असे होते. मग मी राजकारणी लोकांची नावे त्यात घातली. त्यानंतर अॅक्टर्सची नावे टाकून पाहिली. नंतर खेळाडूंची, नंतर थोर महामानवांची नावे घातली. पण पोरांचे उत्तर एकच, ‘सप्पायले वाचवतो’, ‘एवड्यालेय वाचवतो’. थोर महामानवांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचेही नाव होते. गावातील प्रत्येक घरी बाबासाहेबांचा फोटो होता. ते गावच शंभर टक्के बुद्धिस्ट होते. तर मला वाटले, आता तरी मुले म्हणतील ‘बाबासाहेबाले वाचवतो’. पण मुले असे नाही म्हणाली. त्यांना बाबासाहेबांनाही वाचवायचे होते, महात्मा गांधीजींनाही वाचवायचे होते, टिळकांनाही वाचवायचे होते, सावित्रीमाईलाही वाचवायचे होते, सुभाषबाबूंनाही वाचवायचे होते. मी त्यांना म्हणे, ‘अरे ही स्पर्धा आहे, यात कुणा एकालाच वाचवता येईल आणि त्याचेच प्राण का वाचवले हे सांगावे लागेल.’ मुले मात्र या सर्व व्यक्तींपैकी कुणा एकाचा, एखाद्याच्या कार्याचा, एखाद्याच्या जाण्याने होणार्या नुकसानीचा विचार करतच नव्हती. मी त्यांना वारंवार या मुद्द्यांची आठवण करून देत होते. मुलांना मात्र या मुद्द्यांवर विचार करावासा वाटतच नव्हता. क्षणभर विचार करून पाहात आणि पुन्हा ‘सर्वांनाच वाचवले पाहिजे’ हाच विचार त्यांच्या बुद्धीला पटे व ती मला ‘सर्वांनाच वाचवू’ असेच सांगत.
मुले म्हणाली, ‘‘अशी स्पर्धा राहाते का? अशी स्पर्धा ठेवाची राहाते का? आमी नाई भाग घेत अशा स्पर्धेमधी.’’ मुलांनी ठाम नकार दिला या स्पर्धेत उतरण्यासाठी. मी मुलांचे म्हणणे मान्य केले.
नंतर मुलांनी मला वादविवाद स्पर्धा कशी राहाते असा प्रश्न केला. मी त्यांना समजावून सांगू लागले. मुलांना ही स्पर्धादेखील वेडगळ वाटली. त्यांच्या मते, दुसर्याचा मुद्दा पटला नाही तर आपला मुद्दा पटवून सांगा लागते; पण त्याची स्पर्धा थोडी ठेवाची राहाते तू जिकते का मी जिकतो मनून? मुलांनी मला निरुत्तर केले. या अशा स्पर्धांमध्ये भाग घेण्यास त्यांनी ठाम नकार दिला माझ्यापुढे. मी ‘माझ्यापुढे’ हा शब्द वापरला. कारण ती फक्त माझ्यापुढेच नकार देऊ शकतात. बाकी शिक्षकांपुढे नाही. बाकी शिक्षकांनी जे सांगितले त्याला हो म्हणतात. त्यांनी लिहून दिले तर पाठ करून जातीलही; पण माझ्यापुढे मात्र ठाम नकार. मुले माझ्याशी वाद घालत होती, अशा स्पर्धा चांगल्या नसल्याबद्दल. आणि या वादविवादात मी हरत होते. मी हरत असल्याचा मला अत्यंत आनंद होत होता. माझ्याशी वाद घालणे ही मुलांसाठी स्पर्धा नव्हती. तो त्यांचा अधिकार होता आणि गरजदेखील. या लेखाच्या निमित्ताने हा प्रसंग शोधण्यासाठी मी माझी जुनी डायरी काढली. त्यात मुलांच्या या माणुसकीने भरलेल्या युक्तिवादाने माझे डोळे भरून आल्याची नोंद मला तिथे दिसली.
मुलांसाठीच्या स्पर्धा निश्चितपणे आपण मोठ्यांनी ठरवलेल्या आहेत. हे ठरवताना आपण विचार केला नाहीये, की मुलांना काय हवे आहे. त्यांना स्पर्धांची गरज आहे का, नाही का, कुठल्या वयात गरज आहे, कोणत्या प्रसंगी गरज आहे, कोणत्या क्षेत्रात गरज आहे, मुले स्पर्धेकडे कोणत्या नजरेतून बघतात, यापैकी कोणताही विचार आपण केलेला नाही.
मुळात स्पर्धा ही नैसर्गिक प्रेरणा आहे. उत्क्रांतीच्या प्रक्रियेत निसर्गाशी संतुलन साधत जगण्याच्या स्पर्धेत जे टिकून राहिलेत त्यांचे अस्तित्व कायम राहिले. या स्पर्धेत ज्यांचा टिकाव लागला नाही, ते नामशेष झाले. ती स्पर्धेची वृत्ती आहेच माणसात. मात्र सामाजिक जीवन जगताना या प्रेरणेचा सारासार विचार आपल्याला करावाच लागेल.
खेळात स्पर्धा होते आणि ती नैसर्गिक आहे असे मला वाटते. कारण अगदी लहान लहान मुलेदेखील खेळताना एकमेकांशी स्पर्धा करताना दिसतात. जसे, कोण लवकर पोचते, कोण जास्त उंच / लांब उडी मारते, कोण वेगाने धावते हे असे त्यांच्यातही आपसात सुरू असते. हे सारे निखळ आणि शुद्ध असते. हरण्याची खंत वा जिंकल्याचा अभिनिवेश यात नसतो. मात्र हीच स्पर्धा जेव्हा शिक्षणक्षेत्रात प्रवेश करते आणि उग्र रूप धारण करते तेव्हा मात्र तो चिंतेचा, काळजीचा विषय बनतो. आपण सध्या याच क्षेत्रातील स्पर्धेबाबत चिंतित झालेलो आहोत. कारण शिक्षणक्षेत्रातील स्पर्धेने मुलांचे जीवन घेरून टाकलेय. आनंदाने जगणे मुले विसरून गेली आहेत, की त्यांना आनंदाने जगणे विसरायला आपण मोठ्यांनी भाग पाडले आहे? आपल्याला विचार करावा लागेल!
शिक्षणक्षेत्रात स्पर्धेची खरेच आवश्यकता आहे का?
वर वर विचार करता स्पर्धेशिवाय शिक्षण शक्य नाही असे आपल्याला वाटू शकते. एवढी सारी मुले. या सगळ्यांमधून निवडायचे कोणाला? एखाद्या शाखेसाठी, एखाद्या नोकरीसाठी मुलांची पात्रता जोखायची कशी? तर मग स्पर्धा घ्या. आणि अशा स्पर्धेत उतरावे लागते / लागेल म्हणून त्याची तयारी मूल तीन-चार वर्षांचे असल्यापासूनच करा. ही अतिशयोक्ती नाही. आपल्या आजूबाजूला डोकावून बघितले तर सहज दिसेल हे आपल्याला. इतक्या लहान वयापासून मुले स्पर्धेच्या जगात उतरून कोमेजलेली किंवा हताश किंवा उग्र झालेली दिसून येतात. यातील बरीच मुले पुढे निराश होतात. यावर्षीच्या आठ महिन्यांत राजस्थानमधील स्पर्धा परीक्षेच्या ‘कोटा’नामक कारखान्यात (शहरात) 22 मुलांनी आत्महत्या केल्याचे अलीकडेच वाचनात आले. संवेदनशील मनाला किती उद्विग्न करणारी गोष्ट आहे ही! दहावी बारावीचे निकाल जाहीर झाले, की सोबतच दोन-चार विद्यार्थ्यांच्या आत्महत्याही वृत्तपत्रांमध्ये दिसतात. मुलांनी आपले जीवन पणाला लावून पुढे ते अकस्मात संपवावे म्हणून आपण मुलांना शिक्षण देतोय काय?
स्पर्धेशिवायही शिक्षण होऊ शकते आणि उत्तम होऊ शकते ही गोष्ट आपल्याला समजून घ्यावी लागेल. त्यासाठी अभ्यास-समित्या गठित कराव्या लागतील. स्पर्धेच्या परिणामांचा चांगला-वाईट तो शोध घ्यावा लागेल.
मुलांमध्ये सहकार्याची भावना रुजावी म्हणून मी अलीकडे मुलांची परीक्षा गटात घ्यायला सुरुवात केलीय. दुसर्याला मागे टाकून एकट्यानेच पुढे जाण्याची स्वार्थी वृत्ती आज माणसांमध्ये रुजून आलेली आहे. त्यापलीकडे जाऊन मुलांनी एकमेकांचा विचार करावा हा त्यामागील उद्देश. जीवन जगताना सर्वच क्षेत्रांत मिळूनच काम करायचे असते. उदा. घर बांधणे, एखादे यंत्र तयार करणे, उत्पादन करणे, शेती करणे, दवाखान्यातील शस्त्रक्रिया वा घर चालवणे; सर्व गोष्टी मिळूनच कराव्या लागतात. त्यामुळे शालेय शिक्षणात छुटपुट स्पर्धांचे स्तोम माजवण्यापेक्षा मुलांना एकमेकांच्या सहकार्याने करण्याची कामे / प्रकल्प देण्यावर अधिक भर असावा. मिळून काम करण्याची, मिळून गटामध्ये परीक्षा देण्याची आव्हाने मुलांसमोर ठेवायला हवीत. तयार केलेले सगळे गट यशस्वी व्हायला हवेत. एक जरी गट अपयशी झाला, तर बाकी सर्व गट नापास… अशा प्रकारचे नियम ठेवल्यास सर्वांनी यशस्वी होण्यासाठी मुले एकमेकांना मदत करताना दिसतात. ह्या फार कल्पक आणि आनंददायी कृती आहेत. सांघिक परीक्षा द्यायला मुलांना शिकवायला हवे.
मुलांना स्वभावतः आव्हाने आवडतात. आव्हानांचा सामना करायला आवडते. म्हणून अशी आव्हाने पेलण्याची सवय शाळेतच रुजवावी. उदा. लवकर कोण लिहितो, हे काम लवकर कोण करेल, कोणता गट हे करून दाखवेल अशी आव्हाने मुले हिरिरीने पेलताना दिसतात. मात्र आपण शिक्षकांनी त्यास स्पर्धेचे रूप देऊ नये.
दुसरी एक गमतीची आणि विसंगत गोष्ट आपल्याला शाळेत दिसून येते ती परीक्षेच्या वेळी. कुणी कुणाचे पाहून लिहू नये. कुणी कुणाला दाखवू नये. कुणी कॉपी करू नये. मला हे फारच हास्यास्पद आणि विसंगत वाटते. ऐन परीक्षेच्या वेळी आपण मुलांना सांगतो, की कुणी कुणाला सहकार्य करू नका म्हणून. खरे तर सहकार्याची गरज परीक्षेच्याच वेळी असते. मग ती शालेय असो, वैयक्तिक वा सामूहिक जीवनातली. आणि नेमके परीक्षेच्याच वेळी असहकार पुकारायचा!! आहे की नाही गंमत? आणि मग वर्षभर सहकार्य, सहकार, बंधुता या शब्दांचा घोष करत कितीही प्रार्थना म्हटल्या काय आणि उपक्रम राबवले काय, त्याचे फलित ते काय?
मुळात कॉपी करायची वेळ येते याचा अर्थच परीक्षा सदोष आहेत असा होतो. मग या परीक्षांवर, शाळेत शिकवण्याच्या पद्धतींवर, विषयांवर विचार करून धोरण आखणे सोडून आपण ‘कॉपीबंद अभियान’, ‘कॉपीमुक्त अभियान’ असले काय काय राबवत असतो. त्यासाठी पैसा, यंत्रणा खर्ची पाडत असतो.
मुले एकमेकांशी स्पर्धा करण्यापेक्षा नेहमी सहकार्य करू पाहताना दिसतात. मी शिक्षक म्हणून रुजू झाल्यानंतर परीक्षेच्या वेळी मुलांना परंपरेनुसार दूर दूर एकामागे एक बसवायचे. मुले एकमेकांना सांगू, विचारू, मदत करू पाहायची आणि मी त्यांना दटावून सरळ रेषेत, मागे पुढे न पाहता आपला पेपर आपण सोडवायचा असे सांगायचे. पण जसजसा मुलांचा अभ्यास करू लागले, तसतशी मला मुले बरोबर आणि आपण चूक आहोत असे जाणवू लागले. आणि खरेच होते ना ते. म्हणून तर नावेतल्या कुणा एकाला वाचवू पाहण्यापेक्षा सर्वांनाच वाचवण्याचा प्रयत्न मुले करत होती. तशी आता ही ‘नायक बचाव’ स्पर्धा आमच्या जिल्हा परिषदेने रद्द केली आहे. पण वादविवाद स्पर्धा आहेच. मुले वादविवाद करू इच्छितात, मात्र ती स्पर्धा म्हणून नाही तर खरीखुरी. अगदी व्यवस्थेसोबत वाद घालू इच्छितात. कारण कोणतीही स्पर्धा ही शेवटी लुटुपुटुचीच असते. कृत्रिम असते. मुले मात्र अस्सल जगू इच्छितात. त्यामुळे आपण मोठ्यांनीही स्पर्धा हवी / नको असा वादविवाद करत बसण्यापेक्षा मुलांच्या समृद्ध आणि आनंदी जीवनाचा विचार करायला हवा.
फिनलंड हा शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर देश आहे. तिथेदेखील शालेय शिक्षणात स्पर्धा नाही. पुढे नोकरीच्या संदर्भात स्पर्धा आहे; पण त्यातही बरीच मुले व्यावसायिक अभ्यासक्रमात गेलेली दिसतात. व्यावसायिक शिक्षण घेऊन आपला व्यवसाय उभारताना दिसतात. ज्या मुलांना उच्च शिक्षण घ्यायचे असते ती तिकडे वळतात. फिनलंडमध्ये शिक्षणाचे भरपूर पर्याय उपलब्ध असल्याने स्पर्धा ही गोष्ट तिकडे दुय्यम आहे. आपल्यालादेखील असे करता येऊ शकते. आपल्याकडे विज्ञान, वाणिज्य आणि कला याच शाखांना मुख्य ज्ञानप्रवाह म्हणून मान्यता मिळालीय. अशा तीन मर्यादांमुळे स्पर्धा फोफावण्यास आणखी वाव मिळाला. मुळात अभ्यास-विषय विज्ञान, वाणिज्य, सामाजिक शास्त्रे, कला, व्होकेशनल आणि खेळ अशा सहा शाखांमध्ये विभागता येऊ शकतात, जेणेकरून स्पर्धा कमी करता येईल. आपल्या शिक्षणव्यवस्थेत तीन मुख्य शाखांऐवजी ह्या सहा मुख्य शाखांचा समावेश झाला, तर स्पर्धा आपोआपच घटेल, कारण मुलांसाठी पर्यायांची उपलब्धता वाढलेली असेल.
व्होकेशनलला व्यावसायिक शिक्षणाची विविधता वाढवायला हवी. अलीकडे मुलांचा कल केशकर्तन, खाद्यव्यवसाय, ब्युटीपार्लर चालवणे वगैरे नानाविध कौशल्ये शिकून व्यवसाय करण्याकडे दिसतो. आपल्याकडे ब्युटीपार्लर हा विषय अजून व्होकेशनलला आलेला नाही. व्होकेशनलला जाणार्या मुलांची संख्याही आपल्या इथे फारच कमी आहे, कारण या अभ्यासक्रमाकडे सन्मानाने बघितले जात नाही. पालकही डॉक्टर किंवा इंजिनियर यापलीकडे विचार करताना दिसत नाहीत. पालकांची तथाकथित प्रतिष्ठा जपण्यासाठी मुलांना तथाकथित प्रतिष्ठा असलेले विषय निवडावे लागतात. बर्याच मुलांना एखादा व्यावसायिक अभ्यासक्रम शिकून स्वत:च्या पायावर लवकर उभे व्हावे असे वाटत असते, पण पालकांना आपल्या मुलाने किमान ग्रॅज्युएशन करावे आणि त्यानंतर मग काहीही करावे अशी इच्छा असते. माझ्या ओळखीची अशी कितीतरी मुले आहेत, ज्यांना एखादे कौशल्य शिकून व्यवसाय करण्याची इच्छा होती; परंतु त्यांना त्यांच्या पालकांच्या प्रतिष्ठेसाठी इंजिनियरिंग करावे लागले. शिक्षण संपल्यानंतर त्यातील कुणी खाद्यपदार्थांच्या हातगाड्या टाकल्या, तर कुणी आपली उमेद गमावून बेरोजगार होऊन बसलेत. अगदी काल मला माझे एक जुने स्नेही भेटले. ख्यालीखुशाली विचारली. मुलाबाळांची आस्थेने विचारपूस केली आणि अर्थातच एक उत्सुक प्रश्न विचारला, ‘‘मुलगी काय करतेय?’’
‘‘बी. ए. करतेय.’’ माझे हे उत्तर ऐकून त्यांना केवढातरी शॉक बसला.
‘‘काऊन? बी. ए. काऊन?’’ त्यांनी अतिशय आश्चर्याने विचारले.
यावरून आपल्या लक्षात यावे, की पालक टेक्निकल विषयांच्या किंवा जॉब मिळवून देणार्या, भलेही मग तो पंधरावीस हजाराचा का असेना, अभ्यासक्रमाच्याच शोधात असतात. सामाजिक शास्त्रांचा अभ्यास करण्यात कुणालाही आता रस उरलेला नाही. ही तंत्रज्ञानात गुंतलेली मुले आठ ते बारा तास नोकरी करून कुटुंब ते नोकरी एवढीच जगतील. सामाजिक विषयांचा विचार करण्यास कुणाजवळ वेळ नसेल. आज अशाच रस्त्याने आपण पुढे जाऊ लागलो आहोत असे दिसतेय. त्यामुळे सध्या शिक्षणक्षेत्रात प्रचंड वाढलेली स्पर्धा आणि त्याचे भयावह परिणाम आपल्याला दिसत नाहीत असे झालेय.
देशातील प्रत्येक मूल आणि त्याचे फुलणे बहरणे महत्त्वाचे आहे. ही शासनाची, शिक्षणक्षेत्राची आणि पालकांची जबाबदारी आहे. मुले जीवनातून उठतील अशा स्पर्धा असू नयेत. एक मूल जरी शिक्षणातील स्पर्धेमुळे आपले आयुष्य संपवत असेल, तर ते शिक्षणव्यवस्थेचे अपयश आहे. शिक्षण हे स्पर्धेचे क्षेत्र नाही. शाळेत असताना, मुलांना निवडण्याची प्रक्रिया घडण्यापेक्षा, मुलांना घडवण्याची प्रक्रिया घडली पाहिजे.
शिक्षणातली स्पर्धा अर्थातच मोठ्यांनी ठरवलीय. अख्खी शिक्षणव्यवस्था मोठ्यांनी म्हणजे व्यवस्थेत असणार्यांनी ठरवलीय. यात सारे काही मोठ्यांना अनुकूल होईल असे ठरवले गेलेय. मुले काय म्हणतात, शिक्षणात मुलांना स्पर्धा करावी वाटते, की त्यांना केवळ शिकावे आणि शिकावेच वाटते, नवनवीन कल्पना लढवाव्यात, नवे सृजन रचावे असे वाटते? जी मुले शिक्षणातील स्पर्धेत उतरलेली दिसतात, ती स्वेच्छेने उतरली आहेत की त्यांना उतरण्यास व्यवस्थेने बाध्य केले आहे अशा सगळ्या प्रश्नांचा धांडोळा आपणास घ्यावा लागेल; अन्यथा ही शिक्षणातील स्पर्धा आणखी कित्येक मुलांचे जीवन संपवून टाकेल. आपण वेळीच शहाणे झाले पाहिजे.
वैशाली गेडाम

gedam.vai@gmail.com
लेखक चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडगुडा (धोंडाअर्जुनी) येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षक आहेत. शिकवताना त्या सातत्याने नवनवीन प्रयोग करत असतात.
मुलांबद्दल बोलताना ‘या स्पर्धेच्या युगात मुले टिकली पाहिजेत’ हे पालक आणि शिक्षकांच्या तोंडी अनेकदा येते. मुलांना समाजात फिट करणे हे शाळेचे काम आहे की त्यांना त्यांचा स्वतःचा असा विचार मांडता यावा / करता यावा यासाठी प्रयत्न करणे? मुले अधिक विचारी, स्वतंत्र, स्वावलंबी, सहिष्णू, संवेदनशील, सहकार्याची वृत्ती असलेली झाली, तर ती जगाच्या स्पर्धेत कोलमडून पडतील का? आपण त्यांना मजबूत बनवायचे की स्पर्धेच्या जगात त्यांनीही धावावे म्हणून त्यांना आतापासूनच ट्रेनिंग द्यायचे, या विचार करण्यासारख्या गोष्टी आहेत.
मधुरा राजवंशी
