आनंदाचा शोध घेण्याची धडपड माणूस आदिम काळापासून करत आलेला आहे. तत्त्ववेत्ते, शास्त्रज्ञ, अध्यात्माच्या वाटेवरले प्रवासी अशा साऱ्यांनाच या विषयाने भुरळ घातली आहे. आनंद नेमके कशाला म्हणावे ह्याचा मानसशास्त्र, मेंदूविज्ञान, समाजशास्त्र, अध्यात्म इत्यादी विविध अंगांनी शोध घेतलेला आहे. आनंद होण्याच्या मागची प्रेरणा, त्याचे शास्त्र, त्याचा आवाका, त्याचे व्यक्तिशः तसेच होणारे सामाजिक परिणाम आपण जाणतो; पण तरीही काही प्रश्न मागे उरतातच. अगदी साधा प्रश्न : भूतानसारख्या अनेक अंगांनी आपल्या देशावर अवलंबून असलेल्या देशातले नागरिक आनंद मोजणीच्या पट्टीवर आपल्या पुढे कसे आहेत? नेमके कुठले घटक माणसाचा आनंद ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात? त्यांच्यावर आपले नियंत्रण असते का? कसे?

आपला मेंदू आनंद घेणे जाणतो, असे मेंदूविज्ञान सांगते. खेळ, कृतज्ञता, सजगता, परस्परसंवाद ह्या गोष्टी मज्जातूंना पुनर्आकार देतात. त्यामुळे अगदी सहजपणे आनंद घेता येतो. सिरोटोनिन, डोपामाईन, ऑक्सिटोसिन, एन्डॉर्फिन ही संप्रेरके ह्या आनंदनिर्मितीत कळीची जागा घेऊन बसलेली आहेत. करुणा, निष्ठा, सुदृढ नाती, भावनिक स्थिरता ह्या गोष्टींच्या आधारे शाश्वत आनंदाची पायाभरणी होते, असे मानसशास्त्र सांगते. चिरंतन आनंद मिळवण्यासाठी अंतर्मनाची मशागत करावी लागते. भौतिक सुखाच्या मागे लागून खरा आनंद लाभत नाही. अशा वेगवेगळ्या घटकांचा आनंदनिर्मितीशी संबंध आहे.     

आनंदाबद्दलची असलेली आपली समज आपण पालक म्हणून कसे आहोत त्यावरही परिणाम करते. आपली आनंदाची कल्पना, आपले अग्रक्रम ह्या गोष्टी आपल्या पालकत्वावर, आपल्या मानसिक आरोग्यावर परिणाम करतात आणि मुख्य म्हणजे आपल्या मुलांच्या आनंदाबद्दलच्या कल्पनांना आकार देत असतात. केवळ सातत्याने मिळणाऱ्या यशाशी आपण आनंदाची बरोबरी करत असू, तर अनवधानाने का होईना, पण आपण मुलांमध्ये ताण, चिंता जन्माला घालतो. उलट आपला भर आंतरिक शांततेवर, सहिष्णुतेवर असेल, तर मुले आपोआपच स्वतःकडे वस्तुनिष्ठपणे पाहायला शिकतात. भावनिकदृष्ट्या कणखर बनतात.

शिवाय, मुले जसजशी मोठी होत जातात तसतशी त्यांच्या आनंदाच्या कल्पना व्यापक होत जातात. छोट्या बाळांचा आनंद हा सुखकारक संवेदनांशी जोडलेला असतो. मोठे होताना त्यांना इतरांनी आपला स्वीकार करावा, आपल्याला रास्त वागणूक मिळावी असे वाटू लागते. किशोरवयात स्वतःचे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य, मैत्री, स्व-ओळख, गटात स्वीकार ह्या गोष्टी महत्त्वाच्या वाटू लागतात. पालकत्वाचा उद्देश सफल होण्यासाठी मोठ्यांनीही त्यानुसार स्वतःच्या दृष्टिकोनात बदल करायला हवा. मूल लहान असताना त्याला जोजवणे अपेक्षित असले, तरी ते मोठे होईल तसे त्याच्या मतस्वातंत्र्याचा आदर करून संवादात मोकळेपणा यायला हवा. आनंद चिरस्थायी असावा असे वाटत असेल, तर समजून उमजून त्या दिशेने प्रयत्न करावे लागतील. 

केवळ क्षणिक सुख किंवा वरवरच्या यशातून खरा आनंद निर्माण होत नाही. त्यासाठी नाती अधिक अर्थपूर्ण व्हावी लागतात, नात्यांमध्ये खोली यायला लागते. मात्र आज आपण अशा जगात राहतो आहोत जिथे ‘यश म्हणजेच आनंद’ असे सातत्याने आपल्यावर बिंबवले जाते आहे. झटपट समाधान ‘विकले’ जाते आहे. अशा परिस्थितीत पूर्ण आनंदापर्यंत आपण कशी वाट काढणार आहोत? आणि मुलांना त्याचा परिचय तरी कसा करून देणार आहोत?

आपल्या मुलांनी आनंदात असावे म्हणून सगळेच पालक झटत असतात. मात्र आनंद मिळवण्यासाठी आपलाच संघर्ष चालू असेल, तर आपण त्यांना अस्सल आनंदाची ओळख कशी करून देणार? पालकांच्या मनातले असमाधान मुलांपर्यंत पोचतेच. त्यासाठी आपल्याला समाधानाच्या गाभ्याशी पोचून तिथे काही बदलाव आणता येईल का हे पाहावे लागेल. 

माझी आनंदाची कल्पना नेमकी काय आहे? समोरच्याला दुःख देऊन, हानी पोचवून मी आनंद मिळवणे चुकीचे आहे हे मला माझ्या पालकांनी सांगितले आहे आणि मीही पुढच्यांना सांगतो आहेच; मात्र ते पोचत नाही अशी माझी तक्रार आहे ती कशामुळे? माझ्या आनंदाच्या पुढे मला इतरांच्या दुःखाची काहीच मातब्बरी वाटत नाही का? तसे असेल तर काहीतरी कुठेतरी चुकते आहे. 

आनंदाबद्दलची चर्चा इथे संपत नाही. या विषयाचा आवाका ह्यापेक्षा कितीतरी मोठा आहे. या अंकात त्याकडे थोडेसे पाहता आले आहे. वैयक्तिक कथांच्या माध्यमातून त्यातील काही पैलूंचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. लोक त्यांच्या कामातून, छंदातून, पालकत्वाच्या प्रवासातून आनंद मिळवत असतात. तुम्हाला त्याशिवाय आनंदाचा वेगळा अर्थ जाणवला असेल, तुम्ही त्याचा पाठपुरावा केला असेल, तर ते आम्हाला अवश्य लिहून कळवा.

आणि शेवटी एवढेच म्हणेन, की प्रश्न फक्त ‘आपली मुले आनंदात आहेत का?’ एवढाच नाही, तर आपण नेमका कोणत्या प्रकारचा आनंद जोपासू पाहतोय हा आहे!