डॉ. तनुजा करंडे
विविध कारणांनी बाळे निवाराकेंद्रांत, बालगृहांमध्ये दाखल होत असतात. संस्थेत आल्यावर तेथील डॉक्टरांच्या देखरेखीत त्यांच्या आरोग्य-तपासण्या होतात. आवश्यक असतील तर वैद्यकीय उपचार केले जातात. ही मुले दत्तक-प्रक्रियेत आल्यावर त्यांच्या तपासण्यांचे रिपोर्ट पालकांना उपलब्ध करून दिले जातात. पालकांच्या मनात आपल्या मुलांच्या शारीरिक मानसिक स्थितीबद्दल काही प्रश्न असू शकतात. यासंदर्भात पालकनीतीच्या प्रतिनिधींनी मुंबईमधील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेल्या लहान मुलांच्या हृदयरोगतज्ज्ञ डॉ. तनुजा करंडे यांच्याशी बातचीत केली.
प्रश्न – या मुलांमध्ये सामान्यपणे जास्त आजार आढळतात असे वाटते का?
उत्तर – संस्थेतल्या मुलांमध्ये आजारांचे प्रमाण जास्त असते असे सरसकट विधान आपल्याला करता येणार नाही. ह्या प्रश्नाचे उत्तर देण्याआधी आपल्याला विविध गोष्टींचा विचार करावा लागेल. बाळाच्या जन्मदात्रीला गरोदरपणात योग्य आहार न मिळणे, तिच्या आवश्यक त्या आरोग्य-तपासण्या न होऊ शकणे, तिची प्रसूती सुरक्षित वातावरणात झालेली नसणे, अशा विविध कारणांमुळे बाळामध्ये काही आजार असू शकतात. प्रामुख्याने ह्या बाळांना आईचे दूध अनेकदा मिळत नाही. आईचे दूध नाही, मग गाईचे दूध पाणी घालून पातळ करून दिले जाते. यामुळे कुपोषणासारखी समस्या या मुलांमध्ये असू शकते. संस्थेत राहत असल्याने आहारात सगळे अन्नघटक न मिळणे अशाही समस्या असतात. त्यातून प्रतिकारशक्ती खालावलेली असू शकते. अॅनिमिया असू शकतो. त्यामुळे कुटुंबात वाढणार्या मुलांच्या मानाने त्यांची शारीरिक वाढ कमी झालेली दिसून येते. संस्थेत राहत असल्याने कितीही म्हटले, तरी घरच्यासारखी काळजी घेतली जात नाही. या सगळ्यातून त्या बाळांमध्ये काही प्रमाणात आरोग्याच्या समस्या दिसून येतात.
संस्थेत इतर मुलांसोबत राहिल्याने एकाला एखादा संसर्गजन्य आजार झाला, की तो पसरून सर्वांना होतो. डोक्यात उवा-लिखा होणे, त्वचाविकार, असे काही त्रास असू शकतात. इतर काही आजार म्हणजे एचआयव्ही किंवा ब प्रकारची कावीळ यांच्या तपासण्या संस्थेत आल्याआल्या होतातच.
अर्थात, अशा समस्या कुठेही कधीही असूच शकतात. हे सर्व आजार औषधोपचारांनी बरे होण्यासारखे असतात. ह्यासाठी अनुभवी बालरोगतज्ज्ञांची मदत घेता येईल. कुटुंबात गेल्यावर त्यांना योग्य आहार, स्वच्छतेच्या सवयी, पुरेशी काळजी आणि प्रेम मिळाले, की ती इतर मुलांसारखीच निरोगी आयुष्य जगू शकतात. कुटुंबात गेल्यावर साधारण 3-4 महिन्यांत ती हे अंतर भरून काढतात, असे माझे निरीक्षण आहे. तेवढा संयम पालकांना ठेवावा लागतो इतकेच!
प्रश्न – संस्थेतल्या मुलांमध्ये मतिमंदत्वाचे आणि गतिमंदत्वाचे प्रमाण जास्त दिसते का?
उत्तर – अशी मुले संस्थेत असतात हे खरे आहे; पण त्याचे
एक कारण असे आहे, की असे मूल झाल्यावर आपण ते सांभाळू शकणार नाही असे त्यांच्या आई-वडिलांना वाटते. त्यामागे त्यांची वेगवेगळी कारणे असतात. पालकांची आर्थिक अक्षमता हेही एक कारण असते. पण अशी विशेष गरज असलेली मुले संस्थेत आणून दिल्यामुळे हे प्रमाण वाढते. त्याशिवाय काही वेळेला मुलाला शारीरिक अक्षमता असतात. असे मूल सांभाळणे कधीकधी पालकांना कठीण वाटते. काही घटनांमध्ये असुरक्षित वातावरणात आईची प्रसूती होणे, बाळाला ऑक्सिजन कमी पडणे, अशा कारणांनीही मुलांमध्ये बौद्धिक अक्षमता निर्माण होतात. कधीकधी याबरोबर काही शारीरिक अक्षमता असतात, कमी ऐकू येणे, दृष्टिदोष, हातापायात व्यंग असणे असेही असू शकते.
प्रश्न – मग या मुलांबाबत संस्थेची काय भूमिका असते?
उत्तर – ह्या बाळांची आरोग्य-तपासणी होऊन अपंगत्वाचे प्रमाण किती आहे ते ठरवले जाते. पुढे ही बाळे ‘विशेष गरजा असणारे मूल’ या प्रकारामध्ये दत्तक-प्रक्रियेत उपलब्ध होतात. ‘कारा’च्या प्रक्रियेत बाळ मिळण्याचा कालावधी साधारण तीन-चार वर्षांचा असतो; पण विशेष गरजा असणारे बाळ एका आठवड्यात घरी येऊ शकते. आपण या बाळाची नीट काळजी घेऊ शकू अशी खात्री असलेले पालकही असतात. आणि त्यामुळे ही बाळेही आपल्या प्रेमाच्या कुटुंबात जातात असा अनुभव आहे.
प्रश्न – अगदी लहानपणी लक्षात येणार नाहीत असे मानसिक आजार या मुलांमध्ये मोठे झाल्यावर अधिक दिसतात का? तुमच्या अनुभवावरून तुम्ही काय सांगाल?
उत्तर – मूल कितीही लहान असले, तरी आपल्या जन्मदात्यांपासून विलग होण्याचा आघात त्याच्या मनात खोलवर कुठेतरी असतोच आणि त्याचा त्याच्या मनोवस्थेवर परिणाम होतोच होतो. जन्मदात्री सोडून जाते. नंतर संस्थेत अनेकजण असतात. त्यातले काही स्पर्श प्रेमळ असतात, तर काही तुलनेने कोरडे असतात. कोण आपल्याशी कसे वागते आहे ते बाळ बघत असते. त्याला प्रेमाने भरवले जाते आहे, की खाऊ घालण्यात कोरडा व्यवहार आहे याची त्याचे मन नोंद घेत असते. त्यानंतर कुणीतरी बाळाला दत्तक घेते. आता यापैकी आपले असे कोण आहे ह्याचा अंदाज त्याला लौकर येत नाही. त्यातून बाळामध्ये एक दुखावलेपण, पोरकेपण येते. मूल जितके लवकर कुटुंबात जाईल आणि कुटुंबात त्याला ममतेने वागवले जाईल, आपलेपणा मिळेल, तितका हा आघात पचवणे त्याला सोपे जाते.
मुलांना त्यांच्या जन्माबद्दल, ती कुटुंबात कशी आली याबद्दल, लवकरात लवकर सांगितले जाणे त्यांच्या हिताचे आणि गरजेचे असते. मूल पाच-सहा वर्षांचे होईपर्यंत गोष्टी सांगून, गप्पांमधून त्याच्यापर्यंत हे पोचवले गेले पाहिजे. ‘इतक्या लवकर सांगून त्याला काय कळणार…’ असा विचार करून पालक बरेचदा सत्य दडवून ठेवतात; पण होते असे, की मूल नऊ-दहा वर्षांचे होता होता त्याच्यामध्ये शारीरिक बदल व्हायला सुरुवात होते. त्यातून ह्या वयातली बंडखोरी डोके वर काढते. अशा वेळी त्याला त्याच्या जन्माबद्दल कळले, तर त्याची मानसिक स्थिती आणखीच बिघडते. माझ्या जन्मदात्यांनी मला का टाकले असेल, मी कोण आहे, माझी ओळख काय आहे, माझी मुळे कुठली आहेत, असे प्रश्न त्याला त्रास देऊ लागतात. त्यातून ते आणखीनच सैरभैर होते. म्हणून आधीपासूनच, मूल साधारण तीन वर्षांचे असल्यापासून त्याला समजेल अशा प्रकारे गोष्टींचा वापर करून पालकांनी त्याच्या जन्माचे वास्तव सांगत जावे.
प्रश्न – या सगळ्यात पालकांचा प्रतिसाद कसा असावा?
उत्तर – दत्तक-प्रक्रियेतून आलेल्या सगळ्याच मुलांना मानसिक आजार असतात असे म्हणता येत नाही. पण आपण वर पाहिल्याप्रमाणे त्यांनी त्यांच्या पूर्वायुष्यात कठीण परिस्थितीला तोंड दिलेले असू शकते, याची जाणीव पालकांना असणे गरजेचे आहे. अशा वेळी समुपदेशकांची मदत घेता येईल. मुलाशी आस्थेने, प्रेमाने वागून त्याला वाटणारी अस्वस्थता कमी करता येईल. मुलांसाठीही समुपदेशकाची मदत जरूर घ्यावी. त्यांच्याशी बोलून मुलांनाही आपल्या भावनांचा निचरा कसा करायचा ते समजेल.
नेल्सन मंडेला, स्टीव्ह जॉब्स, राजेश खन्ना अशा कितीतरी कर्तृत्ववान व्यक्तींना दत्तक-प्रक्रियेतून आपले कुटुंब मिळालेले आहे. अशी उदाहरणे मुलांना कळायला हवीत. त्यातून त्यांचे मनोबल उंचावायला मदत मिळेल. म्हणजे मग आजूबाजूच्या मुलांनी किंवा कोणी त्यांना त्यांच्या पूर्वायुष्याबद्दल विचारल्यास ती स्वतःबद्दल आत्मविश्वासाने बोलू शकतील.
डॉ. तनुजा करंडे

tanujakarande@gmail.com
