मोहम्मद अरशद खान
एक लहरी राजा होता. आलेली लहर तो पुरी करूनच घ्यायचा. राजा कधी काय फर्मान सोडेल याची काही शाश्वती नसायची. दरबारातले मंत्री, सेनापती, प्रधान सगळेच यामुळे वैतागले होते. जनताही त्रस्त होती.
एक दिवस राजा दरबारात बसलेला असताना त्याची नजर बागेतल्या कावळ्यांवर पडली. थोडा वेळ विचार करून तो प्रधानाला गंभीरपणे म्हणाला, ‘‘एक गोष्ट माझ्या लक्षात आलीय. सगळे कावळे एकाच रंगाचे असतात. माश्या, सरडे, झुरळंदेखील एकसारखीच असतात. मग फक्त माणसंच का अशी रंगीबेरंगी असतात?’’
प्रधान जरा सांभाळूनच म्हणाला, ‘‘कदाचित माणसं विविध प्रकारचे कपडे घालतात म्हणून असेल तसं. म्हणून प्रत्येक माणूस वेगळा दिसत असेल.’’
झालं. राजा गरजला, ‘‘मग अख्ख्या राज्यात दवंडी पिटवा, की आजपासून राज्यातले सर्व नागरिक फक्त पिवळ्या रंगाचे कपडे घालतील. संपूर्ण राज्यात मला समानता आणायची आहे. आज्ञापालनात कोणी कसूर करत असेल तर त्याला तत्काळ सुळावर चढवा.’’
ढोल वाजवून राजाचा आदेश लगोलग राज्यातील जनतेपर्यंत पोचवण्यात आला. लोकांनी घाई-गडबडीनं पिवळे कपडे शिवून घ्यायला सुरुवात केली. कापडाचे व्यापारी आणि शिंपी यांचं चांगलंच फावलं. त्यांनी जनतेला भरपूर लुटलं.

एका आठवड्यानं राजानं सगळ्यांना एका मोठ्या मैदानात जमा होण्याचा आदेश दिला. सगळे आल्यावर राजा स्वतः निरीक्षण करू लागला.
पूर्ण मैदान पिवळ्या समुद्रासारखं दिसत होतं. प्रधान स्वतःवर भारीच खूश होता. राजा आपल्याला नक्की शाबासकी देणार अशी त्याला खात्रीच वाटत होती. पण राजाचं समाधान झालेलं नव्हतं. तो असंतुष्ट दिसत होता. ‘‘प्रधान! सगळ्यांचे कपडे एकसारखे असले, तरी लोक वेगवेगळे दिसताहेत. काही तरुण आणि सुदृढ आहेत तर काही म्हातारे, मरगळलेले! ह्या म्हातार्यांना राज्यातून हाकलून द्या. आणि त्यांनी नाही ऐकलं, तर त्यांना नदीत बुडवा.’’
राजाचा हा विचित्र आदेश ऐकून राज्यात कोलाहल माजला. म्हातारे-कोतारे राज्य सोडून पळून जाऊ लागले. काहींनी भीतीनं आत्महत्या केली. उरलेल्यांना पकडून नदीत बुडवून ठार मारण्यात आलं. संपूर्ण राज्य आक्रंदू लागलं. त्या म्हातार्या माणसांमध्ये अनेक विद्वान होते, उच्चविद्याविभूषित लोक होते. पण राजाला कोण समजावणार?
काही काळानंतर राजानं परत सगळ्यांना मैदानात जमा होण्याचा आदेश दिला. यावेळेस प्रधानानं चांगली तयारी केली होती. तरण्याबांड लोकांना सगळ्यात पुढे उभे केलं. यावेळेस राजा आपल्यावर नक्की खूश होणार, अशी प्रधानाला खात्रीच होती.
राजा मात्र खूश नव्हता. मैदानावर नजर टाकत राजानं प्रधानाकडे घुश्श्यानं पाहिलं. ‘‘तुमच्या लक्षात येतेय का? यातले काही लोक काळे आहेत आणि काही गोरे. हे काळे लोक म्हणजे राज्याच्या सौंदर्यावर डाग आहेत. त्यांना राज्यातून काढून टाका.’’
राजाचे सैनिक गावोगाव, गल्लोगल्ली जाऊन राजाच्या आज्ञेचं पालन करू लागले. काळ्या लोकांना शोधून काढून त्यांना हद्दपार करण्यात आलं. काही जण घाबरून जंगलात लपून बसले. कोणी वाळवंटात पळून गेले. जे मागे राहिले त्यांना मृत्यूला सामोरं जावं लागलं.
काही काळानं सगळ्यांना परत मैदानात जमा करण्यात आलं. राजा आला. मदोन्मत्त! नशेनं डोळे लाल झालेले. जनतेकडे बघून उन्मादात म्हणाला, ‘‘प्रधान! तुमच्यानं एकही काम धडपणे होत नाही. तुमच्यासारख्या लोकांमुळेच शेजारच्या राज्यांमध्ये आमची बदनामी होते. प्रजेकडे जरा नीट बघा. अजूनही त्यांच्यामध्ये असमानता आहे.’’
हात जोडून थरथर कापत प्रधान म्हणाला, ‘‘महाराज, मी तर आपल्या आज्ञेनुसार सार्या काळ्या लोकांना राज्याबाहेर घालवून दिलं. आता तर केवळ गोरी माणसंच उरली आहेत.’’
‘‘परंतु त्यातही काही जाड आहेत तर काही बारीक. आपल्या राज्यात यापुढे केवळ जाड लोकच राहतील. सर्व बारीक आणि अशक्त लोकांना राज्याबाहेर हाकलून द्या.’’
परत एकदा प्रधान कामाला लागला. आठवड्याभरानं राजानं पुन्हा सर्वांवर नजर टाकली आणि म्हणाला, ‘‘हे अजूनही समान नाहीत. यात कोणी उंच आहेत तर कोणी बुटके. माझ्या राज्यात बुटक्यांना थारा नाही.’’
परत एकदा प्रधान आणि त्याची माणसं कामाला जुंपली.
अशा प्रकारे राजानं कधी टक्कल असणार्यांना हाकलून दिलं, तर कधी कुरळ्या केसांच्या लोकांना. कधी चपट्या नाकाच्या लोकांना तर कधी बारीक डोळे असणार्यांना.
आणि मग एक दिवस असा आला, की राज्यात राजाशिवाय कोणीही शिल्लक राहिलं नाही. त्याचे मंत्री-संत्री, दरबारी, सैनिक, एवढंच काय अगदी त्याच्या कुटुंबातली माणसंही त्याच्या ह्या माथेफिरू वागण्याला बळी पडली. संपूर्ण राज्यात राजा एकटाच उरला. वेडापिसा होऊन तो बराच काळ भटकत राहिला. आणि मग मरून गेला.
मोहम्मद अरशद खान
कथा व चित्रे ‘साइकिल’ ह्या मुलांच्या द्वैमासिकातून साभार
(अंक जून-जुलै 2020)
अनुवाद : प्रीती पुष्पा-प्रकाश
चित्रे : प्रोइती रॉय
