मैत्रेयी कुलकर्णी
तुर्कस्तानातला तो विमानतळ लोकांनी खचाखच भरलेला होता. अशा गर्दीत गेले सहा-सात तास मी विमानाची वाट बघत बसून होते. मला आता कळून चुकलं होतं, की ह्या फ्लाईटमध्येही मला जागा मिळणार नव्हती. आणि त्यापुढची फ्लाईट चोवीस तासांनंतर होती. सुरुवातीपासूनच ह्या फ्लाईटमध्ये काही न काही अडचणी येतच होत्या. तुर्कीला जाऊन परत यायला साधारण नऊ-दहा तास लागतात; ह्यावेळी मात्र एक अख्खा दिवस लागला. सगळं शरीर आंबून गेलं होतं. बसून बसून जखडल्यासारखं झालं होतं. सगळीच अनिश्चितता होती. त्यामुळे आणखीनच थकल्यासारखं वाटत होतं. शरीर-मनावर मळभ पसरलं होतं. इकडे विमान आणखी आणखी लेट होत होतं. बरं बाहेर जरा फिरून यावं म्हटलं, तर माझ्याकडे तुर्कीचा व्हिसाही नव्हता.
अशा परिस्थितीत मला चोवीस तास काढायचे होते. मी इथे विमानतळावर बसलेय हे घरी आई-बाबांना कळवावं, तर फोनची बॅटरी संपली होती आणि इंटरनेटही चालत नव्हतं. तिथल्या आजूबाजूच्या दुकानांमध्ये मी वाय-फायची चौकशी केली; पण जमलं नाही. आता हातावर हात ठेवून विमानाची वाट बघण्याशिवाय काही पर्याय नव्हता. पाणी प्यावं म्हणून बाटली काढली, तर पाणी संपलेलं.
त्या चार-पाच दुकानांमधलं एक कॉफी-शॉप होतं. तिथून पाण्याची बाटली घेतली. पैसे द्यायला गेले. पण माझं कार्ड तिथे चालत नव्हतं. बरं तर बरं, मी पाण्याची बाटली उघडली नव्हती. दुसरं कार्ड दिलं, तर तेही नव्हतं चालत. माझ्याजवळ त्याला देण्याएवढीही कॅश नव्हती. म्हटलं जाऊ दे, नकोच प्यायला पाणी. बाटली ठेवून दिली परत. जागेवर जाता जाता मनात विचार आला, ‘प्रवासासाठी मला हाच दिवस मिळाला होता?’ बसले नुसतीच इकडेतिकडे बघत.
तेवढ्यात कुणी माझ्या खांद्यावर हात ठेवलासा मला वाटला. मागे वळून पाहिलं. माझ्यामागे ओवरकोट घातलेली एक अत्यंत देखणी मुलगी उभी होती. फक्त तिचा चेहरा तेवढा उघडा होता. तिनं पांढरा बुरखा घातलेला होता. चेहरा शांत. डोळ्यात हसरे भाव होते. तिचं हसणं पाहून क्षणभर मी आजूबाजूचं सगळं विसरून गेले. तिनं तिची पाण्याची बाटली माझ्यासमोर धरली. ‘घे न. तुझ्यासाठीच आहे’, ती म्हणाली (टेक इट. इट्स फॉर यू). काय बोलावं, मला सुचलंच नाही. हसून मी फक्त ‘थँक्यू’ म्हणाले. पाण्याचा एक घोट घेतला. पाण्याच्या त्या घोटानं, तिच्या हसण्यानं की दोघांच्या एकत्रित परिणामानं काय माहीत; पण माझं मन प्रसन्न झालं. मी तिच्याजवळ जाऊन बसले. तिच्यासोबत एक छोटा मुलगा होता. त्याचे डोळे उमलणार्या कळ्यांसारखे होते. त्यानंही ओवरकोट घातलेला होता. भिरभिर नजरेनं तो इकडेतिकडे बघत होता.
मी तिला सहजच विचारलं, ‘‘कुठे निघालात?’’
ती म्हणाली, ‘‘आम्ही सीरियाला चाललोय; माझ्या आईवडिलांकडे.’’
सीरिया ऐकल्यावर माझ्या कपाळावर आठ्या उमटल्या. ऐन युद्धाच्या दरम्यान ही तिथे कशाला चालली आहे? असं कुणी करतं का? माझ्या मनातले विचार बहुधा माझ्या चेहर्यावर उमटले असावेत.
माझ्या आईची तब्येत बरी नाहीय, ती म्हणाली. मी गेल्यानं तिला थोडी मदत होईल.
जणू माझ्या मनातलं सगळंच तिला कळत होतं. आता ती स्वतःहूनच एवढं सांगत होती, तर म्हटलं आणखी संवाद वाढवावा. मग तिच्याशी बोलण्यातून कळलं, आजूबाजूच्या शहरांमध्ये युद्धाची बरीच धामधूम चाललेली होती; पण त्या मानानं तिच्या आईचं शहर सुरक्षित होतं. तिथे शांतता होती. अर्थात, तिथेही डॉक्टरांकडे जाण्यासाठी घराबाहेर पडणं मुश्कीलच होतं. तिथली माणसंही भीतीच्या सावटाखाली जगत होती. न जाणो, कधी काय होईल… आपलं घरदार सोडून बाहेर जाणं तर आणखीच मुश्कील. मात्र तरीही आईवडिलांकडे जायचं असं तिनं ठरवलंच होतं. विमान तर सोडाच; पण टॅक्सी किंवा बसचा प्रवासही सुरक्षित राहिलेला नव्हता.
माझ्यासारख्या एका अनोळखी व्यक्तीजवळ ती हे सगळं बोलत होती. मी तिला समजून घेण्याचा प्रयत्न करत होते. आणि तिला मन मोकळं करताना बघून मलाही बरं वाटत होतं. तिच्या अडचणींसमोर माझं विमान लेट होणं ते काय! विमान चोवीस तास उशिरा येणार, तर त्याचा मी किती बाऊ करत होते. मुंबईला पोचल्यावर बाहेर टॅक्सी तयारच असणार होती. घरी आईनं गरमागरम पोहे करून ठेवलेले असणारच होते. प्रश्न फक्त चोवीस तासांचा होता; पण तिचं काय?
वर आणखी तिच्यासोबत तिचं लहान मूलही होतं. युद्धाच्या तोंडी जायला निघाली होती ती. आपल्या आईवडिलांची काळजी घ्यायला. आणि असं असूनही ती किती शांत होती. माझं कार्ड चालत नाहीय, हे पाहून वर मला पाणी देऊ केलं.
ह्या घटनेला काही दिवस होऊन गेले. आणि ती गेली होती, त्या शहरात युद्ध सुरू झाल्याच्या बातम्या येऊ लागल्या. ढासळणारी घरं, जळणार्या इमारतींचे फोटो समाजमाध्यमांवर यायला लागले. म्हणजे आता तिचं शहरही सुरक्षित राहिलेलं नव्हतं तर! माझ्या डोळ्यासमोर तिच्या लहानग्याचे डोळे आले. वाटलं, अशी कितीतरी लहान मुलं तिथे असतील, आपल्या आईवडिलांची काळजी घ्यायला गेलेल्या मुली असतील. आणि आणखी कितीतरी इच्छा असूनही जाऊ शकली नसतील.
युद्धाचा अर्थ पहिल्यांदाच मला इतका जवळून समजला होता. तसं तर युद्धाच्या कहाणीनं नेहमीच मन अस्वस्थ होतं म्हणा; पण ह्या गोष्टीनं माझ्या मनात कायमचं घर केलं.
मैत्रेयी कुलकर्णी
चित्रे व लेख ‘साइकिल’ ह्या मुलांच्या द्वैमासिकातून साभार
(अंक जून-जुलै 2020)
अनुवाद : अनघा जलतारे
चित्रे : मैत्रेयी कुलकर्णी, तापोशी घोषाल
