मुलाखत : विपुल शहा
मुलाखतकार : सायली तामणे
‘‘जगात खरी शांती नांदायला हवी असेल, तर आपल्याला मुलांपासून सुरुवात करायला हवी. मुले त्यांच्यातील निसर्गदत्त निरागसपणाने वाढली, तर आपल्याला शांती प्रस्थापित करण्यासाठी धडपडच करावी लागणार नाही किंवा कुठलेही निष्फळ, निष्क्रिय ठरावही करावे लागणार नाहीत.’’ – महात्मा गांधी
विपुल शहा हे शिक्षक-सुलभक (टीचर फॅसिलिटेटर), मानसिक आरोग्य विशेषज्ञ, समुपदेशक आणि मान्यताप्राप्त योग-प्रशिक्षक आहेत. ते मुख्यत्वे किशोरवयीन मुले आणि त्यांच्या पालकांसोबत काम करतात. सध्या विद्यार्थ्यांमध्ये दिसून येणार्या विविध हिंसक प्रवृत्ती, त्यांचा उगम, त्यावर करायचे उपाय आणि या सगळ्यात शिक्षणाची आणि पालकांची भूमिका याबद्दल सायली तामणे यांनी त्यांच्याशी बातचीत केली. त्या संवादातील काही मुख्य मुद्दे…
तुम्ही हार्वर्ड विद्यापीठातून शिक्षणक्षेत्रात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मग मानसिक आरोग्य समुपदेशनाकडे कसे आणि का वळलात?
‘टीच फॉर इंडिया’ फेलोशिप करत असताना मला असे प्रकर्षाने जाणवले, की मला याच क्षेत्रात काम करायचे आहे. पण अनेक प्रश्न पडायचे. उदा. आपण इंग्रजी माध्यमातून मुलांना का शिकवतोय? त्यांना आम्ही विषय तर शिकवत होतो, पण पुढे काय? मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी काय केले
पाहिजे? शिक्षणाला अनेक आयाम आहेत हे ध्यानात येत होते. माझे शिक्षण व्यवस्थापनात झालेले असल्यामुळे मुलांना समजून घेणे कठीण जात होते. असेही जाणवले, की याचा सखोल अभ्यास करायची गरज आहे. यात काय नवनवीन संशोधन होते आहे ते समजले पाहिजे. म्हणून मी हार्वर्ड विद्यापीठात अर्ज केला. तेव्हा असे वाटायचे, की पाश्चिमात्य संशोधनातून काही उत्तरे मिळतील. पण मला अपेक्षित असलेली खोली त्यातून मिळाली नाही. शिक्षण म्हणजे फक्त विषय शिकणे आणि आधुनिक, भौतिक जगामध्ये यशस्वी होणे नव्हे. ते मला अपुरे वाटले. मी सर्वांगीण विकास साधणार्या शिक्षणाच्या शोधात होतो.
माझ्या प्रश्नांची उत्तरे भारतातच सापडतील असे परत
परत संकेत मिळत होते. मग परत येऊन मी अनेक प्रयोगशील शैक्षणिक उपक्रमांना भेट दिली, त्यांत सहभागी झालो. फोन-लॅपटॉप सगळे बंद करून एका आदिवासी गावात राहिलो.
तिथे माझे खरे शिक्षण झाले. तेव्हा लक्षात आले, की
जोपर्यंत शिक्षक आणि पालक स्वतःवर काम करत नाहीत, तोपर्यंत खरे शिक्षण होऊ शकतच नाही. मग मी जे. कृष्णमूर्तींच्या शाळांमध्ये काही काळ शिकवले. तेव्हा मी शिक्षकही होतो, आणि विद्यार्थीही! ‘मला माहीत आहे, मी सांगतो’ यापेक्षा ‘आपण मिळून शोध घेऊ’ ह्या दृष्टीने मी शिक्षणाकडे बघू लागलो. माणूस म्हणून अधिक चांगले बनण्याकडे नेणारे, बुद्धी- मन आणि हाताने काम करण्याची कौशल्ये विकसित करणारे शिक्षण कसे असेल याचा मी
विचार करू लागलो. हा शोधच मला इथपर्यंत घेऊन आला आहे.
सध्या ज्या पद्धतीने शिक्षण होते आहे, त्याचे काय परिणाम तुम्हाला दिसतात?
वरवरचे परिणाम आपल्या सगळ्यांनाच दिसताहेत. मुले जास्त आत्मकेंद्री होत आहेत, स्पर्धात्मक वृत्ती वाढते आहे, स्वतःचे कर्तृत्व सिद्ध करणे सगळ्यात महत्त्वाचे झाले आहे. आणि हे कर्तृत्व मोजण्याचे ठोकताळेही तेच तेच ठरलेले आहेत. परीक्षेत अधिकाधिक गुण मिळवणे आणि पुढे त्या गुणांचे रूपांतर अधिक पैसे मिळण्यात कसे होईल यावरच सगळा भर दिला जातोय. एका अर्थी अत्यंत ‘यूटिलिटेरिअन’ (उपयुक्ततावादी) विचार केला जातो आहे. आणि म्हणून समाज म्हणूनही आपली दृष्टी अत्यंत संकुचित होते आहे.
सध्या मानसिक आरोग्यासंदर्भात समुपदेशन करत असताना मला असे जाणवते, की माझ्याकडे येणार्या कित्येक लोकांच्या प्रश्नांचे मूळ त्यांच्या लहानपणात दडलेले आहे. तेव्हा मनावर झालेले संस्कार, आघात, यांचा स्रोत मुख्यतः शाळा किंवा पालक आहेत असे दिसून येते. लहानपणी घरात झालेली तुलना, वर्गात झालेले दमन, इतरांनी केलेली टीका, अपमान याचे व्रण अनेकदा आयुष्यभर टिकतात. मग मोठे झाल्यावर अशा मुलांना सतत असुरक्षित वाटत राहते. आपल्याला इतरांनी स्वीकारावे, चांगले म्हणावे अशी गरज वाटत राहते. अनेकांना मी वयाच्या तिशी-चाळिशीतही लहानपणी घडलेल्या एखाद्या घटनेमुळे आलेल्या तीव्र चिंतेने ग्रासलेले पाहिले आहे. मोठेपणीदेखील आपले निर्णय, वर्तन आणि परस्परसंबंधांमध्ये याचे प्रतिबिंब दिसते. आपल्या व्यथा, दु:ख आपण पुढे पसरवत जातो.
शाळेत अनेकदा मुलांना व्यक्त होता येत नाही. तिथे कुतूहल, उत्स्फूर्तपणा ह्यांना जागा नसते. वर्षानुवर्षे अशा वातावरणात राहिल्याने त्यांना एक प्रकारचे बधिरपण येते. समाजापासून तुटलेपण येते. अशी मुले मोठी झाल्यावर मग माध्यमांच्या, जाहिरातींच्या, चंगळवादाच्या, राजकीय प्रोपोगंडाच्या, इतर मुख्य प्रवाहांच्या प्रभावाखाली खूप
लवकर येतात. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शांतिवादी आणि पर्यावरणवादी सतीशकुमार म्हणतात तसे ‘सोल, सॉईल अँड सोसायटी’ (मन, माती आणि समाज) यांच्याशी आपला
संपर्क तुटतो. आतून जाणवणारी पोकळी भरून काढायला
मग समाजमाध्यमांच्या आणखी आणखी आहारी जाणे,
व्यसन करणे सुरू होते. प्रेम, आपुलकी, स्वीकारले जाण्याची गरज पूर्ण न होण्यातून हे सगळे निर्माण होते. आयुष्य
यांत्रिकपणे पुढे जात राहते; त्यात चेतनाही नसते आणि उत्स्फूर्तताही!
तुमच्या मते हिंसा म्हणजे काय?
या संदर्भात एक वाक्य मला आठवते – ‘हर्ट पीपल हर्ट अँड हील्ड पीपल हील’ (जे दुखावले गेले आहेत ते इतरांना दुखवतात, जे निरोगी आहेत ते इतरांना निरोगी करण्याचा प्रयत्न करतात). आपल्या मना-शरीरावर झालेले आघात द्वेषाचे रूप घेऊन आपल्या मनात वाढत राहतात. ‘टीच फॉर इंडिया’मध्ये काम करताना मी हे जवळून अनुभवले आहे. शहरांतील वस्त्यांमधून येणारी ही मुले खूप कठीण परिस्थितीतून यायची. त्याचे प्रतिबिंब त्यांच्या वर्तणुकीत पडलेले दिसायचे. मुले सतत अस्वस्थ, आक्रमक असायची. अगदी लहान लहान कारणांवरून त्यांची मारामारी, भांडणे व्हायची. तग धरून राहण्यासाठी एका अर्थी त्यांना ते अपरिहार्य वाटायचे. त्याशिवाय आपला निभाव लागणारच नाही, अशी काहीशी त्यांची भावना असे. अर्थात, फक्त अशा ढोबळ स्वरूपातच हिंसा असते असे नाही, तर लहान-लहान अदृश्य स्वरूपात, सूक्ष्म स्वरूपातदेखील हिंसा प्रकटते. सतत फक्त स्वतःकडे लक्ष वेधून घेणे, इतरांचे समजून, ऐकून न घेणे, आपल्या आवाजाने इतरांचे म्हणणे दाबून टाकणे हीदेखील हिंसेचीच रूपे आहेत. असा वर्ग सांभाळता-सांभाळता कधीकधी माझ्या मनातील हिंसा प्रकट होईल की काय अशी भीती वाटायची. माझा राग अनावर व्हायचा. मग मला प्रथम स्वतःवर काम करावे लागले. लहानपणापासून मी योगासने, विपश्यना करायचो. आमच्या शाळेतल्या मुलांनाही मी पुण्यातल्या सेंटरला घेऊन जायला लागलो. हळूहळू मी वर्गात मुलांसोबत त्यासंबंधी काही कृती करायला लागलो. दररोज काही मिनिटे शांत राहून डायरी लिहिणे व आत्मपरीक्षण करणे याचीदेखील माझ्या विद्यार्थांना सवय लागली. त्याचा आम्हाला चांगला फायदा होताना दिसला.
एक समुपदेशक म्हणून तुम्ही हे प्रश्न कसे हाताळता?
सध्या मी समुपदेशक म्हणून किशोरवयीन मुलांसोबत आणि पालकांसोबत सत्रे घेतो. सध्या समोर येणारा सर्वात मोठा प्रश्न किशोरवयीन मुलांच्या व्यसनाचा आहे – मोबाईल, समाजमाध्यमे, व्हिडिओ गेम आणि पॉर्न या सगळ्यांचे व्यसन वाढते आहे. याचा त्यांच्या मनःस्थितीवर वाईट परिमाण होतो आहे. ते अत्यंत अधीर, आक्रमक होत आहेत. आपल्याला हवी ती गोष्ट लगेच मिळाली पाहिजे / झाली पाहिजे असा अट्टहास वाढतो आहे. पाहत असलेल्या गोष्टींची खर्या आयुष्यात नक्कल करणे, लक्ष केंद्रित करता न येणे, सतत विचलित राहणे, एकटेपण निर्माण होणे, स्वतःच्या दिसण्याबद्दल- कपड्यांबद्दल असुरक्षितता वाढणे, स्वतःबद्दलची वास्तवापेक्षा वेगळीच ऑनलाईन प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न करणे अशा अनेक समस्या आहेत. या संदर्भात मी मुलांशी आणि पालकांशी संवाद साधतो. सुरक्षित वातावरणात मुले आपले भावविश्व अधिक जवळून समजू लागतात. त्यांना सतावणार्या प्रश्नांची उत्तरे, नवीन दृष्टिकोन त्यांना स्वतःलाच उलगडू लागतात. त्यांना समजून-उमजून घेण्याचे, मित्रत्वाचे असे आमचे नाते असते. आणि यामध्ये ‘माइंडफुलनेस’ या तंत्राचा मला खूप उपयोग होतो.
माइंडफुलनेस म्हणजे नक्की काय?
‘माइंडफुलनेस’ ही संज्ञा आपण पश्चिमेकडून घेतलेली असली, तरी त्यामागील विचार हा भारतामध्ये अनेक शतके योग किंवा विविध ध्यानपद्धतींमध्ये अस्तित्वात होता. त्याची थोडक्यात व्याख्या करायची झाली, तर वर्तमान क्षणामधील अनुभवाला कोणत्याही प्रकारचे विश्लेषण, टीका-टिप्पणी न करता, प्रतिक्रिया न देता, नियंत्रित करायचा प्रयत्न न करता पूर्णपणे सामोरे जाणे, सर्वांगाने उपस्थित असणे, वर्तमानावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करणे. यासाठी अनेक मार्ग सांगितले जातात. स्वतःच्या श्वासावर लक्ष केंद्रित करणे, चालणे आणि त्या प्रक्रियेकडे त्रयस्थपणे बघणे, आपण जे खातो आहोत त्यावर संपूर्ण लक्ष केंद्रित करणे, आपल्या आजूबाजूच्या आवाजांवर, हालचालींवर लक्ष केंद्रित करणे, स्वतःला निसर्गाशी जोडून घेणे, लिहिणे, कलेचा वापर करणे इत्यादी. मी योगाच्या माध्यमातून माइंडफुलनेस साधण्यावर भर देतो. यामुळे स्वतःशी आणि आपल्या आजूबाजूच्या जगाशी, निसर्गाशी, माणसांशी आपला तुटलेला संबंध पुनर्प्रस्थापित होतो. अगदी वरवर पाहायचे झाले, तर यामुळे मुलांची एकाग्रता आणि कार्यक्षमता वाढते. बोअरडम, एकाकीपणा किंवा हताशा यांवर मात करण्यासाठी प्रलोभनांवर विसंबून न राहता, मुलांना स्वत:सोबत राहून, स्वत:ला जाणून घेऊन शांतपणे वेळ घालवता येणे, हे महत्त्वाचे कौशल्यदेशील माईंडफुलनेस शिकवते. पण त्याही पुढे जाऊन, यामुळे ‘स्व’भान येते, भावनिक स्थैर्य निर्माण होते, अतिचिंता, भीती, राग कमी होतो, स्वनियंत्रण वाढते. माइंडफुलनेसचे तंत्र जर आपण लहान वयात शिकलो तर आयुष्यभरासाठी कामी येते. याला एका अर्थी सामाजिक – भावनिक शिक्षणपण म्हणता येते. लहान मुलांना ही तंत्रे जास्त लवकर अवगत होतात असा माझा अनुभव आहे. हे एकदा साध्य झाले, की पुढे मग लहान-लहान उद्दिष्टे ठरवणे, ती पूर्ण झाल्यास स्वतःला शाबासकी देणे, 45 मिनिटांचा कालावधी ठरवून लक्ष विचलित होऊ न देता ठरलेले काम करणे अशा अनेक गोष्टी विद्यार्थ्यांना स्वतःसाठी करता येतात.
या सगळ्यामध्ये पालकांचे काय योगदान असू शकते?
मला एक गोष्ट प्रकर्षाने सांगावीशी वाटते. मुलांना पालकांचा क्वालिटी-टाइम हवा आहे. म्हणजे काय, तर तुम्ही संपूर्णपणे, म्हणजे शरीर-मनाने उपस्थित राहून, त्यांचे म्हणणे लक्षपूर्वक, जाणीवपूर्वक, आपुलकीने, कोणतेही निष्कर्ष न काढता (नॉन-जजमेंटल पद्धतीने), संवेदनशीलतेने ऐकण्याची गरज आहे. हा वेळ मुलांना मिळत नाहीये. हे वय मुलांच्या दृष्टीनेदेखील खूप वादळी असते. एकीकडे त्यांना स्वतःचे स्वातंत्र्य आणि अवकाश (स्पेस) हवा असतो; पण दुसरीकडे त्यांना पालकांशी बरोबरीचे, मित्रत्वाचे नातेही हवे असते. आपल्या मुलांशी अर्थपूर्ण संवादाच्या संधी निर्माण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आपल्याला वाटणारी काळजी आणि माया ही अधिकार, नियंत्रणाशिवाय व्यक्त करता आली, तर त्याचा मुलांना खूप फायदा होईल. मुलांच्या आवडीनिवडी समजून घेऊन त्यांना वाव देणे, त्यांच्यावर छोट्या छोट्या जबाबदार्या टाकून, उद्दिष्टे देऊन त्यांच्यातील आत्मविश्वास वाढवणे, तसेच त्यांच्यासोबत विविध सर्जनशील, आनंददायी, आरोग्यदायी, प्रेरणादायी आणि व्यावहारिक जगातील कृतींमध्ये सहभागी होणे खूप महत्त्वाचे आहे.
मला अजून एक गोष्ट म्हणावीशी वाटते. आपण शिक्षणाचा विचार करताना तो साकल्याने करण्याची गरज आहे. मुलांचा सर्वांगीण विकास, त्यांचे आरोग्य केंद्रस्थानी ठेवून शिक्षणाची रचना करण्याची गरज आहे. माइंडफुलनेस हे एक तंत्र झाले; पण मानसिक आरोग्याचे मोठे ध्येय समोर ठेवून शैक्षणिक व्यवस्थेची रचना व्हायला हवी. म्हणतात ना – ‘सा विद्या या विमुक्तये’; अर्थात, मुक्त करते ती विद्या!
विपुल यांनी माइंडफुलनेससंबंधात सुचवलेले काही दुवे खाली दिले आहेत –
1.https://positivepsychology.com/mindfulness-for-kids/
2. https://www.changetochill.org/how-can-i/mindful-movement/
3. https://www.dhamma.org/en/about/ mini_anapana
4. https://plumvillage.org/mindfulness-practice/
5. https://fit.sanfordhealth.org/blog/breathing-techniques-to-inspire-mindfulness-article
विपुल शहा
vipul.shaha@post.harvard.edu
मुलाखतकार : सायली तामणे
