सायली तामणे

खेळाच्या माध्यमातून मुलांना चिकित्सक विचार करायला शिकवता येईल का, आणि त्या चिकित्सक विचारांची परिणती व्यक्ती अधिक संवेदनशील होण्यामध्ये होऊ शकेल का, या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी मी आणि माझी मैत्रीण निधी शहा मिळून काही मर्यादित प्रयोग केले. त्यात आम्हाला टाटा सामाजिक विज्ञान संस्थेचे (TISS) मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्याचा हा छोटासा लेखाजोखा.

टाटा सामाजिक विज्ञान संस्थेत (TISS) निधी आणि मी एका कार्यशाळेसाठी गेलो होतो. त्या दरम्यान आमच्या दोघींच्या मनात एका खेळाने मूळ धरले. किशोरवयीन मुलांचा मेंदू विकसनशील असतो. त्यांना भावनिक आव्हाने चटकन जाणवतात; मात्र दूरचा, सारासार विचार तितकासा करता येत नाही. त्यामुळे ह्या वयाची मुले पटकन आक्रमक होताना दिसतात. सभोवतालचे वातावरण, मित्रमैत्रिणी, समाजमाध्यमे, व्हिडिओ गेम्स या सर्वांचा त्यांच्यावर अधिकच पगडा असतो. त्यातून अनेकदा ह्या हिंसक वृत्तीला खतपाणीच मिळते. खेळाच्या माध्यमातून मुलांना हिंसेबाबत अधिक संवेदनशील करता येईल का, असा कुठला खेळ असू शकेल का, आपणच तो तयार का करू नये असे एकामागोमाग एक प्रश्न आम्हाला पडले. आणि त्याचे आम्हाला सापडलेले उत्तर म्हणजे प्रस्तुत खेळ.

आमचा खेळ अगदी सोपा आहे. खेळाला अकबर – बिरबलाच्या गोष्टीची पार्श्वभूमी आहे. अकबराचा दरबार भरलेला आहे. त्याच्या नवरत्नांपैकी चार जण येऊन अकबराला सांगतात, ‘‘महाराज आपल्या राज्यात खूप हिंसाचार होतो आहे, त्यावर काहीतरी केले पाहिजे.’’ त्याच वेळी दुसरे चार सांगतात, ‘‘राज्यात सगळे आलबेल आहे.’’ अकबर गोंधळात पडतो. शेवटचा उपाय म्हणून तो बिरबलाला बोलवतो. आपल्या राज्यातली परिस्थिती नक्की कशी आहे, हिंसेचे प्रमाण किती आहे हे बिरबलाने शोधावे, त्यासाठी राज्यात फेरफटका मारावा आणि परत येऊन खरी परिस्थिती कथन करावी, असे ठरते. बिरबल विचार करतो की आपण राज्यातल्या हिंसेचे प्रमाण शोधायला तर निघालो आहोत; पण त्याआधी हिंसा म्हणजे नक्की काय हे आपण लिहून ठेवले पाहिजे. या टप्प्याला, बिरबलरूपी खेळाडू त्याच्या मनातली हिंसेची व्याख्या एका कागदावर लिहितो. प्रवास करण्यासाठी बिरबलाला (खेळाडूला) तीन मोहरा दिल्या जातात. सोन्याच्या मोहरा संपेपर्यंत बिरबल म्हणजेच आपला खेळाडू खेळू शकतो. मोहरा संपल्या, की खेळाडू बाद होतो. मोहरा शिल्लक ठेवून एक फेरी पूर्ण करणारा खेळाडू जिंकतो.

ही फेरी पूर्ण करण्याचे नियम पाहू –

1.  खेळताना बिरबलाला कोणत्याही क्षणी त्याची हिंसेची व्याख्या बदलायची असेल, तर त्यासाठी एक मोहर खर्च करावी लागेल.

2. तर्काच्या चौकटी आणि नियम पाळूनच खेळ खेळला जाईल.

खेळ सुरू होतो. बिरबल राज्यातील एकेका गावात फिरू लागतो. त्याला त्या त्या गावामध्ये घडणार्‍या घटनांचे कार्ड उचलावे लागते. बिरबल आपल्या हिंसेच्या व्याख्येशी त्या घटना ताडून पाहतो. त्याच्या हिंसेच्या व्याख्येत त्या घटना बसल्या, तर तो त्यांना हिंसा म्हणतो अन्यथा ती हिंसा ठरत नाही. एखादी घटना त्याला हिंसा वाटत असेल; पण त्याच्या व्याख्येत ते बसत नसेल, तर त्याला त्याची व्याख्या बदलावी लागते. अर्थात, असे करताना त्याची एक मोहर खर्ची पडते.

आपण एक उदाहरण पाहू. समजा ‘समोरच्याला हेतुपुरस्सर इजा करणे’ अशी एखाद्याची हिंसेची व्याख्या असेल, तर तार्किकपणे विचार करता अपमान करणे हीदेखील हिंसाच मानली पाहिजे. उलटपक्षी, एखादी गोष्ट हिंसा आहे असे मनातून वाटत असेल; पण व्याख्येत ते बसत नसेल, तर व्याख्येची व्याप्ती वाढवली पाहिजे.

यातून काही हेतू साध्य व्हावेत असा विचार होता. वेगवेगळ्या प्रसंगांवर मुलांचा विचार व्हावा, हिंसेची अनेक सूक्ष्म रूपे असू शकतात हे त्यांच्या लक्षात यावे, त्यातून स्वतःच्या वर्तनाचे परीक्षण केले जावे; तसेच हिंसेबाबत आपण मुलांवर आपली मते न लादता त्यांनीच स्वतःची व्याख्या बनवावी आणि ताडून पाहावी अशी आमची इच्छा होती.

सहसा हा खेळ दोन गटांमध्ये खेळला जायचा. निर्णय घेण्यासाठी बिरबल आपल्या गटाची मदत घेऊ शकतो, तर दुसरा गट बिरबलाला प्रश्न विचारू शकतो. तर्कातील त्रुटी किंवा विरोधाभास दाखवून देऊ शकतो. बिरबलाला तार्किकदृष्ट्या आपले मत समोरच्या गटाला पटवून देता आले नाही, तर त्याला त्यांचे म्हणणे मान्य करावे लागते. यात शिक्षकाचे / सुलभकाचे काम मर्यादित आहे. गरज पडल्यास मुलांना प्रश्न विचारून अधिक खोल विश्लेषण करायला लावणे किंवा अडल्यास विचार करायला मदत करणे; एवढेच. कोणत्याही कारणाने सुलभकाने त्याची / तिची मते मुलांवर लादणे अपेक्षित नाही.  

खेळात बिरबलासमोर येणारे प्रसंग हे क्रमशः अधिक गुंतागुंतीचे आणि हिंसेचे वेगवेगळे पोत दाखवणारे होते. त्यातील काही उदाहरणे खाली दिलेली आहेत –

1. लहान बहिणीने न विचारता आपले खेळणे घेतल्यामुळे भावाने तिला मारले. 

2. एका सामान्य नागरिकाने राज-उद्यानातील गवतावर पाय ठेवला म्हणून सैनिकाने त्याचा अपमान केला.

3. भूक लागली म्हणून एका गरीब म्हातार्‍या माणसाने पाव चोरला. त्यावर दुकानदाराने त्याला मारले.

4. एक लहान मूल आगीजवळ गेले असता आईने त्याला मारले.

5. कपडे आणायला वडिलांनी पैसे दिले नाहीत, म्हणून रागाने पेला जमिनीवर आपटून मुलगी निघून गेली.

6. एक माणूस जंगलातून जात असताना त्याच्या पुढ्यात वाघ आला. त्याने त्या वाघाला जिवानिशी मारले.

7. एका दुकानदाराने गरिबांचे रेशन काळ्या बाजारात विकले.

हा खेळ आम्ही विविध वस्त्या, शाळांमधील आठवी ते दहावीच्या मुलांसोबत खेळलो. त्यांची मते, निवड, अभिप्राय ह्यांच्या नोंदी केल्या. त्यातून मुलांच्या मनातील हिंसेच्या विविध संकल्पना पुढे आल्या. काही मुलांच्या मते एखादी कृती हिंसा आहे की नाही हे त्यातून उद्भवणार्‍या परिणामांवर ठरते.

समजा एकाने दुसर्‍याला मारले; पण त्याला खूप इजा झाली नाही तर ती हिंसा नाही. मग नक्की किती इजा झाल्यावर आपण त्याला हिंसा म्हणणार असा प्रश्न आम्ही मुलांना विचारायचो.

काही मुले म्हणायची : मारण्याचे, अपमान करण्याचे प्रमाण किती आहे त्यावर हिंसा आहे की नाही हे ठरते; थोडासा अपमान केला, मारले तर ती हिंसा नाही.

परत तोच प्रश्न… थोडे आणि जास्त कसे ठरवायचे?

एक-दोन मुले म्हणाली : आपल्या कृतीमुळे समोरच्या व्यक्तीला त्रास होतो आहे, हे माहिती असूनही तो तसे करत असेल तर ती हिंसा आहे; नकळत काही घडले तर ती हिंसा नाही.

काही म्हणाले : एखादी कृती करण्यामागे व्यक्तीचा हेतू (इंटेन्शन) काय होता, त्यावर हिंसा ठरते; चांगल्या हेतूने केलेली कोणतीच कृती, कितीही त्रास झाला तरी हिंसा नाही.

त्यावर आम्ही धार्मिक दहशतवादाचे उदाहरण देत असू. धर्मांध लोकांनाही वाटत असते, की ते चांगल्या कार्यासाठी / धर्मरक्षणासाठी समोरच्याला इजा करत आहेत. त्याला आपण हिंसा म्हणणार की नाही? मग मुले विचारात पडायची.

एक-दोघे म्हणाले : कृती करणारी व्यक्ती समोरच्या व्यक्तीच्या नात्यात आहे का ते पाहिले पाहिजे. नात्यात केलेली कोणतीही कृती हिंसा नाही. आईवडील मुलांबाबत कधीच हिंसा करू शकत नाहीत.

काहींचे म्हणणे पडले : नुकसान पोचवणारी कृती न करण्याचा पर्याय त्या व्यक्तीकडे होता का? पर्याय असूनही केली तर ती हिंसा ठरते. मग ‘पर्याय नसणे’ म्हणजे काय याबद्दल आम्ही चर्चा करायचो आणि बहुतांश वेळा ‘काहीतरी पर्याय असू शकतो’ असे शेवटी मुलांना वाटले.

काही मुलांवर ‘संस्कारांचा’ पगडा असायचा. म्हणजे काय? मोठ्यांचे ऐकावे, मोठे नेहमी बरोबरच असतात असे काहीसे त्यांना वाटायचे. मग कृती करणारी व्यक्ती वयाने मोठी असली, तर ती हिंसा नाही असे त्यांचे म्हणणे पडायचे. अशा वेळी मोठ्यांच्या चुकीची अनेक उदाहरणे आम्ही त्यांच्यासमोर ठेवायचो.

एका मुलाच्या उत्तराने मी हादरलेच. तो म्हणाला, ‘‘कृती चारचौघात होते की चार भिंतींच्या आड होते त्यावर हे ठरते. कोणी बघणारे नसेल तर ती हिंसा होत नाही. घरात घडणार्‍या कृतीकडे हिंसा म्हणून बघू नये.’’ असे विचार कसे निर्माण होत असतील? कदाचित आपल्या घरात घडणार्‍या घटनांचे समर्थन करून स्वतःला दिलासा देण्याचा त्याचा हा प्रयत्न असावा. एखादी कृती इतरांसमोर करणे आणि तीच कृती घरात पडद्याआड करणे यानेच फरक होतो अशी त्याची ठाम समजूत होती. कृतीला कोणी साक्षीदार आहेत की नाही याने काय फरक पडतो असे आम्ही त्याला वेगवेगळ्या प्रकारे विचारून पाहिले. त्यावर त्याच्याकडे उत्तर नव्हते; तो अस्वस्थ झाला.

याशिवाय, कृती पहिल्यांदाच केली की हे वारंवार होणारे वर्तन आहे, केलेली कृती ही न्याय / बदला घेण्याच्या उद्देशाने केली गेली आहे का, स्वतःच्या रक्षणासाठी केली आहे का, असे अनेक निकष मुलांनी लावले. ‘एखाद्याने आपले नुकसान केले तर उलटून त्याचे नुकसान करणे हिंसा नाही’ असे अनेक मुलांचे मत दिसले.  

सुरुवातीला व्याख्या करताना, सर्व मुलांच्या मनात ‘हाणामारी’ एवढीच फक्त हिंसेची व्याप्ती असायची. हळूहळू एकेका प्रसंगाकडे अधिक सखोलपणे बघितल्यावर त्यात अपमान करणे, घालूनपाडून बोलणे, मुद्दाम नुकसान करणे, हक्क नाकारणे / डावलणे, स्वतःच्या इच्छा लादणे, अशा अनेक कृतींचा समावेश होत गेला.

फक्त आम्हीच मुलांना प्रतिप्रश्न करायचो असे नाही. मुलेदेखील एकमेकांना प्रश्न विचारायची. उदा. गुन्हेगारांनी पोलिसांना मारणे ही हिंसा पण पोलिसांनी गुन्हेगारांना मारणे ही हिंसा नाही, असे का; हिंसा उद्देशावर ठरत असेल, तर भगतसिंगांच्या मार्गाला हिंसक का म्हटले गेले… त्यांचा हेतू तर अगदी चांगला होता; शरीराला जखम होणे आणि मनाला जखम होणे हे वेगळे आहे का… कोणत्या निकषावरून, असे बरेच प्रश्न मुलांनी एकमेकांना विचारले.

या सगळ्यामध्ये मुलांना स्वतःच्या घरातील कौटुंबिक हिंसेबद्दल बोलणे, त्याकडे त्रयस्थपणे बघणे जड जात होते असे आम्हाला दिसले. ‘मारणे आणि अपमान करणे’ ही हिंसा असेल, तर बाबा आईला मारतात तीपण हिंसा नाही का, या प्रश्नाचे उत्तर देणे मुलांना अनेकदा कठीण गेले. ‘बाबांनी आईला मारणे चूक आहे; पण हिंसा नाही’, किंवा ‘बाबांनी आईला मारायला नको; पण ती हिंसा म्हणता येणार नाही’, अशा प्रकारचा बचाव मुले करायची. मोठ्यांना अधिक समजते, त्यामुळे मोठे लहानांना मारू शकतात; पण छोटे मोठ्यांना मारू शकत नाहीत – असा काहींनी युक्तिवाद केला.

हा खेळ खेळणार्‍या प्रत्येक मुलाचा सहभाग अत्यंत उत्साहवर्धक असल्याचे आम्हाला दिसून आले. चिकित्सेला खेळाचे रूप दिल्यामुळे मुले गुंग होऊन हा खेळ खेळायची. ‘आम्हाला खूप विचार करावा लागला’ असे आवर्जून सांगायची. बर्‍याच मुलांना शेवटी ‘हिंसा म्हणजे काय?’ याचे एक ठोस, ‘अधिकृत’ उत्तर आमच्याकडून हवे असायचे. कोणत्या तरी पुस्तकात लिहिलेल्या, शिक्षकांनी सांगितलेल्या गोष्टी मुलांना स्वतः विचार करून शोधलेल्या उत्तरांपेक्षा जास्त महत्त्वाच्या वाटायच्या यातच आपल्या शिक्षणव्यवस्थेतील मोठा दोष दिसून येतो.

ह्यातून अजून एक महत्त्वाची गोष्ट दिसून आली, ती म्हणजे भाषा आणि विचार यांचे एकमेकांशी असलेले नाते – विशेषतः औपचारिक तर्काचे नियम समजण्यासाठी आणि वापरण्यासाठी भाषेचा, विशेषतः ज्ञानभाषा, विकास होणे खूप महत्त्वाचे आहे. भाषेवर काम करणार्‍या अनेक संस्थांचा आणि लोकांचा भर हा ‘अभिव्यक्तीसाठी भाषा’ एवढ्यावरच असतो. आणि अभिव्यक्ती अत्यंत महत्त्वाची असल्यामुळे सुरुवातीला ते योग्यदेखील आहे; पण पाचव्या वर्गाच्या पुढे हळूहळू चिकित्सकपणे विचारांची मांडणी करण्यासाठी (क्रिटिकल थिंकिंग) भाषा वापरता येण्यावर भर देण्याची गरज आहे हे नाकारता येत नाही. बर्‍याच मुलांना हिंसा म्हणजे काय, किंवा हिंसेची व्याख्या कशी करणार असे विचारल्यावर फक्त उदाहरणे देता आली. त्या उदाहरणांमधून एक सामान्य सूत्र शोधून ते शब्दांत मांडता आले नाही.

काही मुलांनी ‘आम्हाला फक्त गन वापरून शूट करण्याचे खेळ आवडतात’ असे अत्यंत प्रामाणिकपणे सांगितले. याचा एक अर्थ आमचा खेळ आवडला नाही असा होतोच; पण दुसरा अर्थ आमच्या खेळाची खूप गरज आहे असाही होतो.

खेळांमधील सामर्थ्याचा आपण पुरेसा वापर करून घेत असल्याचे दिसत नाही. ‘करमणुकीचे साधन’ ह्या सीमित अर्थाच्या खूप पुढे जाऊन विचार आणि भावनांना हात घालण्याची ताकद खेळात आहे. भावना जशा विचारांवर परिणाम करतात तसेच विचारदेखील भावनांवर परिणाम करतात. ह्याचा एकत्रित परिणाम व्यक्तीच्या वर्तनावर झालेला पाहायला मिळतो. मग विचारांच्या मार्गाने भावनांना हात घालून बघता येईल का… शोधून पाहिले पाहिजे.

काही कारणाने आमच्या खेळाचे आम्ही मर्यादित प्रयोगच करू शकलो; पण अशा प्रकारच्या खेळांची आपल्याला कल्पना करता आली, त्याला बोर्ड गेम किंवा तत्सम औपचारिक रूप देता आले, तर भाषा, विचार आणि भावना या तिन्हींना स्पर्श करता येईल. आणि असे खेळ वारंवार खेळल्याने कालांतराने कदाचित वर्तनातही बदल घडू शकतील. नैतिकतेचे कोरडे धडे न देता, मुलांना आपली समज स्वतः निर्माण करता येईल. एकदा असा खेळ खेळून मुलांमध्ये फरक पडला असा आमचा मुळीच दावा नाही;  पण मुले विचार करत असलेली, अंतर्मुख होत असलेली नक्की दिसली. विचारांचे एक बीज आपण अशा खेळांतून पेरू शकलो, तरी पुढे त्याला अंकुर फुटू शकतील. किंवा ते तसेच दडून राहील त्यांच्या डोक्यात… योग्य वेळ येईपर्यंत… कोण जाणे. असे खूप प्रयोग करून बघायची गरज आहे.  

सायली तामणे

sayali.tamane@gmail.com

शिक्षणाने अभियंता. शिक्षणक्षेत्रात अनेक वर्षे आर्थिकदृष्ट्या कमकुवत मुलांसोबत काम करत आहेत. मुलांमध्ये चिकित्सकवृत्ती (क्रिटिकल थिंकिंग) निर्माण व्हावी, निरीक्षणातून स्वतः ज्ञाननिर्मिती करण्याची क्षमता निर्माण व्हावी यासाठी त्यांनी ‘मीमांसा’ नावाचा प्रोग्राम तयार केला आहे. त्या अंतर्गत त्या शिक्षक आणि विद्यार्थी-प्रशिक्षणाचे काम करत आहेत.