अपूर्वा देशपांडे जोशी

लहानपणीच्या आठवणींचा माझ्याकडे मोठाच खजिना आहे. खूप खूप आनंद देणार्‍या आठवणी; अगदी थोड्या कटूही आहेत. आमच्या घराच्या, सोसायटीतल्या, आजी-आजोबांच्या घरच्या, पाळणाघरातल्या, शाळेतल्या. मी सांगतेय तो काळ साधारण 30 वर्षांपूर्वीचा आहे. मी तीन-चार वर्षांची असताना माझ्या आईची नगरला बदली झाली. त्यामुळे सोमवार ते शुक्रवार रास्ता पेठेत आजी-आजोबांच्या घरी राहिल्यावर आई कधी येते याची मी खूप आतुरतेने वाट पाहायचे. ती आली की इतका आनंद व्हायचा. मग आम्ही दोघी औंधच्या घरी जायचो. बाबांचीपण त्या काळात दुसरीकडे बदली झालेली होती.

शनिवार-रविवार पूर्णपणे माझ्यासाठी असे. त्यावेळी त्यांना इतरही किती कामे असतील. मी सहा वर्षांची असताना आईने तिची सेंट्रल गव्हर्नमेंटची उत्तम नोकरी सोडली. नंतर दोन-तीन वर्षांनी बाबांनीपण नोकरी सोडली. आपल्या दत्तक-मुलीला जास्तीतजास्त चांगले कसे वाढवता येईल याचाच आई-बाबा विचार करत होते. अर्थात, हे सारे आता कळते.

हे सोपे नव्हते. आर्थिक फटकाही मोठा होता. पण सर्व बाजूंनी विचार करून आई-बाबांनी माझ्यासाठी हा निर्णय घेतला. त्यांच्या गरजा खूप कमी होत्या. अधिकारी पदावर असूनही राहणीमान साधे होते. आयुष्यात त्यांना काही कटू अनुभवही आले. पण त्याकडे कसे दुर्लक्ष करायचे ते त्यांनी मला शिकवले.

मी साधारण दहा-अकरा वर्षांची असताना आई-बाबांनी मला मी दत्तक असल्याचे सांगितले. झाले असे, की एक दिवस बाबांनी मला ‘टाइम्स ऑफ इंडिया’त आलेला एक लेख वाचायला सांगितला. तो लेख होता ‘अ‍ॅडॉप्शन’बद्दल. मी आपला सहजच वाचला. बाबा शेजारीच होते.

मी एकदम बाबाला विचारले, ‘‘मी अ‍ॅडॉप्टेड आहे का?’’

बाबा म्हणाले, ‘‘हो.’’

मी बाबाला म्हणाले, ‘‘कूल.’’

 झाले. पाच मिनिटांत विषय संपला. मीही बाकी काही विचारले नाही. हे काहीतरी गंभीर आहे असा विचारही माझ्या मनाला शिवला नाही. सर्व काही नेहमीप्रमाणे सुरू होते. पुढे मी मोठी झाल्यावर आईने मला सांगितले, की ती त्या दिवशी खूप अस्वस्थ झाली होती. अपूला काय वाटेल, तिच्या मनात काय विचार येत असतील, ह्याची तिला खूप भीती वाटत होती. पण माझे आई-बाबा माझ्या निकोप, सर्वांगसुंदर वाढीसाठी, माझ्या आनंदासाठी, जीव तोडून इतके काही करत होते, की ‘अ‍ॅडॉप्टेड’ हा एक शब्द सोडला, तर ते माझे जन्मदाते नाहीत, असे मला कधीच वाटले नाही.

मला कोणी जन्म दिलाय, त्यांनी मला अनाथालयात का सोडले, काय झाले असेल, असे मला तेव्हा किंवा अगदी जाणती झाल्यावरसुद्धा कधीच विचारावेसे वाटले नाही. अर्थात, दत्तक-प्रक्रियेत खूप गोपनीयता पाळलेली असते.

शाळेत असताना मी एक सर्वसाधारण विद्यार्थिनी होते. पुढे आई-बाबांच्या प्रोत्साहनामुळे मी एमबीए झाले. मी काही करू शकेन ह्याबद्दल लोकांना शंकाच वाटायची; पण मी जिद्दीने करून दाखवले.

माझ्या फक्त दोन-तीन मैत्रिणींना मी दत्तक असल्याबद्दल माहीत होते. काहींना माझी स्टोरी ऐकायची असायची; पण मला त्यात रस नव्हता. आणि माहितीही नव्हती. खरे तर समाज किंवा काही नातेवाईकांनाच तो फरक वाटत असेल तर वाटो. मला फक्त आणि फक्त सुधीर आणि राजश्री देशपांडे हेच प्रेमळ आई-वडील माहीत आहेत. मला स्वतःला जन्मदाते आणि दत्तक-पालक अशी तुलना कधीच करावीशी वाटली नाही, वा वाटणार नाही. आजही मी एवढेच म्हणेन, की जन्मोजन्मी मला हेच आई-वडील लाभावेत.

पुढे लग्नासाठी म्हणून आई-बाबांनी विवाहमंडळात माझे नाव नोंदवले. मुलाला पहिल्यांदा भेटले, तेव्हा मी सुरुवातच अशी केली, ‘‘मी ‘अ‍ॅडॉप्टेड’ आहे. आणि जाडही आहे. ह्या दोन्ही गोष्टी तुला मान्य आहेत का? तरच आपण इतर गोष्टी बोलू.’’ माझा फोटो तर त्या मुलाने, ओंकारने, पाहिलेलाच होता. ‘मला या गोष्टीचा काहीच बाऊ वाटत नाही’, असे त्याचे म्हणणे होते. त्याचे बाबा आणि बहिणीलाही ह्याचे काही वाटले नाही. समाज काय म्हणेल असे त्याच्या आईला जरा वाटले होते; पण ते तेवढेच. आमच्या दोघांची पसंती असल्याने आई-बाबांनीही आनंदाने ‘हो’ म्हटले.

पहिले मूल झाल्यावर दुसरे दत्तक घ्यावे असे माझ्या मनात होते. पण माझा नवरा या गोष्टीला फारसा तयार नव्हता. मला त्याची मानसिकता समजू शकत होती. आणि घरातल्या इतर व्यक्तींनी तसा विचार करणेही समजू शकत होते. अशा परिस्थितीत त्या मुलावर, नकळत का होईना, पण अन्याय झाला तर… अशा विचाराने माझ्या मनाची द्विधा अवस्था झाली आणि तो विचार मी दूर सारला.

आई-बाबांबद्दल काय वाटते, हे मला शब्दांत व्यक्तच करता येणार नाही. पण तरीही वाटते, माझे आई-वडील ही मला मिळालेली सर्वात मोठी भेट आहे. ते जगातले सर्वात चांगले आई-बाबा आहेत. त्यांनी मला निवडले यासाठी मी त्यांची किती ऋणी आहे हे सांगता येत नाही. फीलिंग अमेझिंग!

अपूर्वा देशपांडे जोशी

apurvadeshpande03@gmail.com

एमबीए (एच आर मध्ये काम), सध्या पूर्ण वेळ आई. मुलांसंदर्भात काम करण्याची इच्छा.

शब्दांकन : प्रियंवदा गंभीर