वीटही पाणी पिते
सरकारी आणि इतरही शाळांच्या कार्यपद्धतीची पाहणी करताना एक गोष्ट प्रकर्षानं लक्षात येते. ती म्हणजे वर्गाच्या बंदिस्त वातावरणातच मुलांना शिक्षण देण्याची जी पद्धत पूर्वापार चालत आलेली आहे त्यामुळे मुलांच्या मनात शिक्षणाबद्दल एक प्रकारचं औदासीन्य निर्माण होतं. आमच्या शैक्षणिक पद्धतीच्या चौकटीत फक्त सुव्यवस्थित वर्गखोली, फळा, वह्यापुस्तकं आणि इतर काही प्रचलित सामग्री एवढ्याच गोष्टींचा समावेश केला जातो. शिक्षक या साधनांच्याशिवाय शिकवण्याची कल्पनाही करू शकत नाहीत. परंतु बर्याच शिक्षणतज्ज्ञांनी चार भिंतींमधील बंदिस्त शिक्षणाला पर्याय म्हणून निसर्ग शिक्षणाला महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे.
ह्याबद्दल जर शिक्षकांशी कधी बोलणं झालं तर ‘पण मुलांना न्यायचं तरी कुठे? जवळपास अशी काही स्थळंच नाहीयेत !’ हेच ऐकायला मिळतं. त्यांची ‘स्थळं’ या शब्दाची व्याख्या सुंदर बागा, उद्यानं, एखादं निसर्गरम्य ठिकाण, नदी, धरण एवढ्यापुरती मर्यादित आहे. छोटीछोटी खेडी, शेतं, टेकड्या, आसपासचे वन्यजीव ह्या सगळ्या गोष्टी काय शिक्षणाच्या कक्षेबाहेरच्या आहेत का? आपल्या परिसराबद्दलची माहिती, अनुभव याच्या साहाय्यानं मुलांमधे पर्यावरणाबद्दलचं भान, जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न का केला जात नाही?
भ्रमंती आणि गप्पागोष्टी
माझ्या मनात अशाच काही प्रश्नांची उत्तरं शोधण्याची आणि काही नवीन अनुभवही घ्यायची लालसा होती. म्हणून मी मुलांना बाहेर फेरफटका मारायला नेऊन त्यांच्याशी सजीव-निर्जीव ह्या संकल्पनेबद्दल चर्चा करण्याचा प्रयत्न केला. ह्या प्रयत्नातून जे अनुभवायला मिळालं ते वर उल्लेखलेल्या प्रश्नांना एक दिशा देणारेही आहे.
मुलांशी गप्पागोष्टी करताना प्रथम म्हैस आणि दगड ह्यात काय फरक आहे त्याबद्दल बोललो. तेव्हा मुलांनी सांगितलं की म्हैस मोठ्ठी असते, ती चालते-फिरते, चारा खाते, दूध देते, पाडी देते, श्वासोच्छ्वास करते. दगड मात्र हलतही नाही की काही करतही नाही. नुसता जागच्या जागी पडलेला असतो. मग म्हशीच्या उदाहरणावरून जी वैशिष्ट्यं लक्षात आली त्याबद्दल चर्चा केली आणि त्याच्याशी मिळतीजुळती वैशिष्ट्यं असलेल्या प्राण्यांची नावं विचारली तेव्हा मुलांनी कुत्रा, मांजर, गाय, माणूस वगैरे सांगितलं आणि दगडाशी साधर्म्य असणारी फळा, पेन्सिल, वही, पुस्तक ही नावं सांगितली. अशा तर्हेनं म्हशीच्या कॉलममधील नावं सजीवांची आणि दगडाच्या कॉलममधली नावं निर्जीवांची आहेत हे त्यांच्या लक्षात आलं.
मग आम्ही सर्वांनी ठरवलं की संपूर्ण गावात एक चक्कर मारू आणि आजूबाजूला दिसणार्या वस्तूंपैकी कोणत्या सजीव आणि कोणत्या निर्जीव आहेत ह्याबद्दल चर्चा करू.
अशी फिरतफिरत चर्चा करताना खूप मजा आली. काही मुलींनी पानं, कागद, ठिक्कर, लाकडाचे तुकडे अशा रस्त्यात पडलेल्या वस्तू गोळा करून आणल्या आणि मग त्यावर चर्चा सुरू झाली. म्हैस आणि दगडाची जी वैशिष्ट्ये अधोरेखित केलेली होती त्याच्याशी ह्या वस्तूंची वैशिष्ट्यं जुळवून पाहिली आणि त्यावरून कोणती वस्तू सजीव आणि कोणती निर्जीव आहे हे ठरवलं. ह्या चर्चेतली दोन उदाहरणं मला विशेष वाटली.
फिरताना अचानक मला एक मुंगळा दिसला. मी त्याला पकडलं –
‘‘हा सजीव आहे की निर्जीव सांगा बरं?’’ बरीचशी मुलं म्हणाली. ‘‘सजीव’’, मी विचारलं, ‘‘का?’’ जन्नी म्हणाली, ‘‘हा चालतो’’ रुबीना म्हणाली, ‘‘हा गूळ, साखर, खातो.’’ सहरूला म्हणाली, ‘‘हा चावतोसुद्धा’’ सजीवांचं महत्त्वाचं वैशिष्ट्य त्यांच्या लक्षात आणून देण्याच्या हेतूनं मी विचारलं, ‘‘ह्याला पिल्लू होतं का?’’ सगळ्यांनी एकदमच सांगितलं, ‘‘नाही!’’ मग मी विचारलं, ‘‘हा अंडी घालतो का?’’ पुन्हा सगळ्यांनी एकसाथ उत्तर दिलं, ‘‘नाही घालत’’
मी जरा गडबडलोच पण तरीही हळूच विचारलं, ‘‘तुम्ही ह्यांना पांढरं पांढरं छोटंसं काहीतरी घेऊन एका ओळीत जाताना कधी पाहिलं आहे? किंवा एखाद्या मोठ्या दगडाखाली असलेल्या त्यांच्या वारूळात त्या पांढर्या गोष्टी पाहिल्या आहेत?’’ मुलं काहीही ऐकून घ्यायला तयार नव्हती. रुखसाना थोडी दूर उभी राहून माझी कीव केल्यासारखी हसतहसत बोलली, ‘‘सर, हा नाही काही अंडी घालत ! अंडी तर मुंग्या घालतात!’’ मला माझंच हसू आलं. माझ्या हे लक्षातच आलं नाही की मुलं नर-मादीतल्या वैशिष्ट्यांबद्दल बोलतायत.
जरा पुढे गेल्यावर आसूबीनं एक वीट दाखवली. काही मुलं म्हणाली की ती सजीव आहे. मी पुन्हा प्रश्न विचारायला सुरुवात केली.
‘‘ही चालते का?’’ ‘‘नाही.’’ ‘‘मग काही खाते का?’’ ‘‘नाही’’ ‘‘श्वास घेते?’’ ‘‘नाही’’ ‘‘काही पिते का?’’ यावर खात्रीनं ‘‘नाही’’ असंच उत्तर येणार याबद्दल मी निश्चिंत होतो. पण बरीचशी मुलं म्हणाली, ‘‘हो, वीट पाणी पिते.’’ मी पुन्हा जरा गडबडलो. पण प्रश्न विचारणं चालूच ठेवलं. ‘‘तुम्ही पाणी केव्हा पिता?’’ ‘‘घशाला कोरड पडली, तिखट लागलं तर किंवा जेवण झाल्यावर.’’ ‘‘तहान लागल्यावर काय करता?’’ ‘‘उठून माठातलं पाणी पितो.’’ ‘‘वीट पण तसंच करते का? विटेचं पाणी पिणं आणि एखाद्या सजीवाचं पाणी पिणं ह्यात काय फरक आहे ते आपण पाहूया.’’
मुलांबरोबर चर्चा करायला संकोच वाटेल असा काही विषय तर या चर्चेच्यावेळी निघणार नाही ना ही धास्ती शिक्षकांना सतत वाटत राहते. उदाहरणार्थ मुंगळ्याबद्दलची चर्चा. नर-मादी ही संकल्पना, किंवा ते वर्गीकरण ज्याच्या आधारावर करायचं त्याबद्दल बोलताना आपल्या समाजात निषिद्ध मानले जाणारे काही उल्लेख तर होणार नाहीत ना ही भीती बर्याच शिक्षकांना वाटते. मला असं वाटतं की समाजात वावरताना मुलांना ह्या सगळ्या गोष्टी माहीत झालेल्या असतात. त्यात त्यांना काहीच वावगं वाटत नाही. मोठ्या माणसांकडून उगीचच त्याचा बाऊ केला जातो.
विटेच्या उदाहरणावरून एक गोष्ट स्पष्टपणे लक्षात येते. मुलांना त्यांची तर्कबुद्धी चालवून त्यांचे विचार मांडण्याची संधी दिली तर त्या विषयाचे वेगळे नवीन पैलू पुढे येतात. सर्वसाधारणपणे मुलांना बोलायची संधी क्वचितच दिली जाते. आणि दिलीच तरी चर्चा विशिष्ट निर्धारित दिशेनेच जाईल असा प्रयत्न केला जातो. त्यामुळे मुलांना फारसे प्रश्न विचारले जात नाहीत. किंवा शिक्षक आधी ठरवून तेवढेच प्रश्न विचारतात.
विटेच्या पाणी पिण्याबद्दल बोलायचं झालं तर वीट पाणी पिते हे मुलांचं म्हणणं बरोबरच होतं. अशावेळी आपलं म्हणणं त्यांच्यावर लादण्याऐवजी सखोल चर्चेची गरज असते.
(शैक्षिक संदर्भ, जानेवारी-एप्रिल २००७ मधून साभार)