मुलं
मुलं –
आपल्या आईसोबत आहेत
शेतावर राबत
मुलं –
आपल्या वडलांसोबत आहेत
चामडं रंगवत
मुलं –
रेल्वेच्या डब्यात आहेत
उघडीवाघडी झाडपूस करत
मुलं –
वीटभट्टीवर आहेत
या जन्मापासून
त्या जन्मापर्यंत
विटा थापत
मुलं –
लाल सिग्नलवर आहेत
ऐन धोक्याच्या मधोमध
गाड्या चमकवत
मुलं –
ढाब्यांवर आहेत
सगळ्यांपुढे ताटं ठेवत, भांडी घासत
त्यांना भूक छळत नाही
रात्री उशीरपर्यंत
मुलं –
झोपू शकत नाहीत
मुलं स्वप्नं पाहू शकत नाहीत
स्वप्नं पाहायला बंदी आहे
त्यांच्यासाठी
मुलांना कोण सांगेल
शिक्षणाचा नवा कायदा आला आहे
त्यांच्यासाठी.
रेवतीरमण शर्मा
अनुवाद : गणेश विसपुते