घरातली चित्रकला
रणजीत कोकाटे
कल्पना करूयात, की आपल्याला चित्र काढायचंय. स्वतःचं असं काहीतरी. स्वतःला स्फुरलेलं, सुचलेलं असं काहीतरी. बघा जमतंय का. एखादं चित्र सुचलं, की नवीन विचार करायचा; पहिल्या चित्रापेक्षा थोडा अजून वेगळा. असा विचार करतच राहायचा… कोणतं चित्र काढायचं याची बरेचदा कल्पनाच करता येत नाही आणि जे सुचतं ते असतं कुठेतरी पाहिलेल्या चित्रातलं. पुढे सुचणं बंद होतं. कारण विचार थांबतो. चित्रांची कल्पना करायला दृश्यविचार करावा लागतो.
लहान मूल चित्र काढतं, तेव्हा त्यात कुतूहलाचा भाग मोठा असतो. आपल्याला दृश्यविचार करता येत नाही कारण आपल्यातलं काही नवीन शोधायचं, बघायचं कुतूहल कमी झालेलं असतं. मग आपण ‘रेडिमेड’च्या मागे लागतो. हे कुतूहल नेमकं कधी कमी होतं अथवा संपतं, हे निश्चित नाही सांगता येणार; पण खूप लहानपणीच याची सुरुवात होते हे नक्की.
पालक म्हणून आपल्या मुलाच्या दृश्यविचारांसाठी काय करता येईल ते बघूयात.
चित्र काढणं म्हणजे पेन्सिलनं एखादा आकार काढून त्यात रंग भरणं इतकी मर्यादित कृती नसते. साधारणपणे मुलांचं कागदावर, भिंतीवर रेघोट्या मारणं (स्क्रिबल) सुरू होण्याच्याच काळात आपण त्यांना चित्रात रंग भरण्याची पुस्तकं देतो. उद्देश हा की त्यांना छान छान चित्रं काढता यावीत. त्याचा परिणाम मात्र उलटाच होतो. स्वयंस्फूर्तीनं जे बघणं सुरू असतं ते सोडून त्यांचं लक्ष पुस्तकातले बंदिस्त आकार बघण्याकडे वेधलं जातं आणि ती त्याचंच अनुकरण करायला लागतात. त्या पुस्तकातला आकार मुलाला जमला, की आपल्यालाही भारी वाटतं. मुलांना पेन्सिल, खडू हातात पकडणं आणि त्यातून काहीतरी उमटवून पाहणं याचं कुतूहल असतं. त्यातून ती नवनवीन रंगांचा आणि आकारांचा शोध घेत असतात. अशा वेळी आयती पुस्तकं न देता ती काय काढतायत ते शांतपणे बघणं, कोणताही सल्ला न देता जे काढू पाहताहेत त्याबद्दल गप्पा करणं, इतकीच आपली भूमिका असली पाहिजे.
चित्रकलेतली विविध माध्यमं मुलांसाठी वापरताना खरं तर वयाची अट नाही. मूल लहान आहे म्हणून त्याला क्रेयॉन द्यायचे, मग ते जरा मोठं झालं, म्हणजे साधारण पाचवीनंतर जलरंग वापरायला द्यायचे… वगैरे आपणच ठरवलंय. असं न करता, मुलांना त्या त्या वेळेला आवडेल त्या माध्यमात काम करायला द्यायला हवं. तशी साहित्याची उपलब्धता आपण पालक म्हणून द्यायला हवी. मुलांना क्रेयॉननं काम करायला आवडतं तसंच जलरंगातही आवडतं. सहज एकमेकांत मिसळून तयार होणाऱ्या नवनवीन छटा, पाण्याच्या कमी-जास्त प्रमाणामुळे झालेले बदल मुलांना आवडतात. इतकंच काय, मुलं स्वतःचे हातपायही रंगवून बघतात. ब्रशचा स्पर्श, रंगांचा स्पर्श यातही त्यांना मजा वाटते. ‘पेपरवर चित्र काढ’ हेपण आपणच सांगितलंय; कदाचित तो त्यांचा चॉईस नसेलही. त्यामुळे त्यांना वेगवेगळे पेपर, पुठ्ठे, बॉक्स, शक्य असेल तर फरशीवर, कधी मोठाल्या पेपरवर वेगवेगळ्या माध्यमात काय काढायचंय ते काढायला द्यावं.
आपल्या आजूबाजूला इतके रंग आहेत. ते मुलांसोबत बघता येतील. पण रंग बघायचे म्हणजे तरी काय? तुमच्या बागेत किंवा घरातल्या कुंडीत एखादं रोपटं छान बहरलंय. त्याचा जो रंग दिसतोय तो आपण बघतो. पण हेच बघणं सूक्ष्म करून पाहिलं तर? त्या झाडाचं एखादं पान किंवा फुलाच्या देठाकडल्या भागाचा रंग, मधल्या भागाचा रंग, वरचा टोकाकडच्या भागाचा रंग याचं निरीक्षण केलं, तर रंगांच्या अनेक छटा दिसतील. कोवळ्या पानाचा रंग, पूर्ण पिकलेल्या पानाचा रंग… वरवर दिसणाऱ्या रंगाव्यतिरिक्त त्याच रंगाच्या अनेक छटा दिसतील. घरात आणलेल्या भाज्या, आकाश, दगड… अनेक गोष्टींतून मुलांना रंग बघायला शिकवू शकतो. हेच रंग मुलं पुन्हा त्या वस्तूकडे बघून आपल्या आवडत्या माध्यमात कागदावर रंगवतील. रंगवताना वस्तूचा आकार जसाच्या तसा काढण्याची गरज नाही. रंग हे फक्त रंग म्हणून बघायचे आणि पेपरवर लावायचे. आपण बघतोय ती रंगाची छटा मिळेपर्यंत शोधत राहायचं. कधीकधी नेमकी छटा शोधण्याच्या नादात अनेक छटा आपल्याला सहज मिळतात. अशा कृतींमुळे मुलांना चित्र काढण्याची मजा अनुभवता येते.
अजून एक गंमत बघूया. मांडणी-शिल्प किंवा रचना-शिल्प हा कलाप्रकार. वस्तूंची एका विशिष्ट पद्धतीनं मांडणी करून कल्पनेत रंगवलेली गोष्ट साकारायची. घरातली भांडी, खोके, बरण्या, चमचे, प्लेट… जे मिळेल ते घेऊन आपलं गाव किंवा शहर उभं करता येईल. आपल्या कल्पनेतल्या जागेचा कच्चा आराखडा तयार करायचा आणि उपलब्ध साहित्यातून गाव / शहर रचायचं; अगदी घरभर. छोटे-मोठे डबे, खोके यांच्या शाळा, हॉस्पिटल, इमारती… काहीही होईल. सर्व मांडणी प्रतीकात्मक करायची. इथे जास्त महत्त्व असेल ते मुलांच्या कल्पनेला. त्यांचा त्या रचनेमागचा विचार काय आहे त्याबद्दल बोलावं. काही पटलं नाही, तरी ‘हे करू नकोस’ म्हणण्यापेक्षा आपलं मत सांगावं. स्वतःच्या कल्पना मुलांवर लादू नयेत. नेहमीच्या माध्यमांपेक्षा हे माध्यम वेगळं आहे. मुख्य म्हणजे यात द्विमितीय गोष्टींसोबत त्रिमितीय वस्तूंचा वापरदेखील करता येतो. हे रचनाशिल्प कितीही मोठं, कितीही लांब असू शकेल; फक्त त्यातल्या बारकाव्यांचा नीट विचार केलेला असावा. ते कल्पकतेनं रचलेलं हवं. मुलांची मांडणी पूर्ण झाली, की त्यांनी काय विचार केलाय तो घरातल्या सगळ्यांनी समजून घ्यावा.
चांगलं बघणं हे कोणत्याही कलेचा मूलभूत पाया आहे. बघणं समृद्ध असलं, तरच त्यात नवीन काही सुचायला वाव असेल. मुलांना पुस्तकातली चित्रं दाखवायला हवीत. कलादालनात जाणं सगळ्यांनाच जमेल असं नाही; पण आपल्या अवतीभोवतीची एखादी इमारत किंवा घर, सुरू असलेलं बांधकाम, रस्त्याच्या कडेला उगवलेलं एखादं रोपटं, बाजार, दुकान, सुतारकाम सुरू असताना आकाराला येणारी एखादी खुर्ची अथवा टेबल, भिंतीवर पावसाळ्यात आलेलं शेवाळ, बांधकामाच्या शेजारी रचून ठेवलेला विटांचा ढिगारा… सगळं सगळं बघायला हवं मुलांनी आणि पालकांनीही.
कल्पना काही अशाच आपसूक डोक्यात येत नाहीत, त्याला खतपाणी घालावं लागतं. वेगवेगळ्या माध्यमांतून, विषयांतून, बघण्याच्या सरावातून, व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य जपण्यातून, शोधण्यातून, कधी आकारातून, कधी बोलण्यातून कल्पना जन्माला येतात.
रंग, रेषा, आकारांशी वेगवेगळ्या माध्यमांत खेळताना मुलांना आणि त्यांच्यासोबतच्या मोठ्यांना मजा येईलच; शिवाय दोघांचीही दृश्यात्मक समज तयार होत जाईल.
रणजीत कोकाटे
ranjit.kokate@rediffmail.com
मुलांसोबत चित्रकलेच्या कार्यशाळा घेतात तसेच शिक्षक, पालकांसाठी कलाशिक्षणासंबंधी कार्यशाळा घेतात.