नव्या वर्षात, नव्या रूपात नव्या-जुन्या वाचकांपर्यंत पोचताना आम्हाला आनंद होतोय आणि हुरहूरही वाटते आहे. पालकनीतीसाठी ही नव्या पर्वाची सुरुवात म्हणायला हवी. छापील माध्यमात जवळपास चाळीस वर्षं उत्तम जलतरणपटूप्रमाणे सहजतेनं वावरल्यावर आता अनोळखी पाण्यात उतरण्याची ही हुरहूर आहे. काळाचा रेटा पाहता आपल्यालाही छापील माध्यमातून ऑनलाईन माध्यमात जावं लागणार हे गेली पाचावर वर्षं जाणवत होतंच; पण ही उडी घेण्याचा विचार निश्चित होत नव्हता. मुळात तो विचारच आम्हाला (आमच्यातल्या काहींना) कठीण जात होता. आता मात्र नव्या-जुन्या सर्वांनी एकमेकांचे हात धरून एकत्र उडी मारायचीच ठरवली आहे. 

१९८७ च्या जानेवारीत निघालेल्या पहिल्या अंकानंतर वेगवेगळ्या टप्प्यांवर पालकनीती परिवारात माणसं येत जात राहिली. मासिकामध्ये त्यांनी विविध प्रकारे आपलं योगदान दिलं. पालकनीतीच्या संस्थापक संपादक संजीवनी कुलकर्णी ह्यांच्या एकखांबी तंबूला आपापल्या आचारविचारांचा टेकू देऊन बळकटी दिली. त्यातून पालकनीती बहरत गेली. नीलिमा सहस्रबुद्धे, शुभदा जोशी, वंदना कुलकर्णी, प्रियंवदा बारभाई, डॉ. विनय कुलकर्णी, रमाकांत धनोकर हे केवळ विश्वस्त मंडळ नाही; त्यांचा उत्तमाचा ध्यास अंकाच्या आशयपूर्णतेतही भर घालत आलेला आहे. इथून पुढे प्रामुख्यानं नवा संपादक गट पालकनीतीचं काम पुढे नेणार असला, तरी ह्या मंडळींची साथ मोलाची असणार आहे ह्याची आम्हाला जाणीव आहे. 

प्रीती पुष्पा-प्रकाश, रुबी रमा प्रवीण, प्रणाली सिसोदिया, कृणाल देसाई, प्रीतम मनवे, ज्योती दळवी, स्मिता वळसंगकर, अमृता ढगे ह्यांची नावं तुम्ही संपादक मंडळात वाचत आलेला आहात. ही मंडळी अधिक समर्थपणे पालकनीतीचा प्रवास पुढे नेणार आहेत. अर्थात, ही काही प्रातिनिधिक नावं आहेत. आणखीही काही मंडळी अधूनमधून अंकाची धुरा सांभाळायला पुढे येत असतात. ह्या साऱ्यांची मोट बांधून अंक तुमच्यापर्यंत पोचवण्याचं काम कार्यकारी संपादकाचं. गेली काही वर्षं ती जबाबदारी अनघा जलतारे पार पाडत आहेत; ते तसेच ह्यापुढेही चालू राहील. लेखांना चित्रसाज द्यायला रमाकांत धनोकर ह्यांच्या बरोबरीनं अमृता ढगे ही सखीही असणार आहे… 

…‘मग नेमका नवेपणा काय?’ असा प्रश्न कुणालाही पडावा. 

ते पुढे कळेलच.  

‘पालकनीती’ बंद करणं शक्यच होतं. सोपंही होतं. पण वेगवेगळ्या माध्यमांतून मुलांबरोबर असणार्‍या आमच्या नव्या पिढीलाच ‘ती’ची गरज भासत होती. निकड जाणवत होती. मुलांना केंद्रस्थानी ठेवून शांतताप्रिय जगाचा विचार कसा करता येऊ शकतो याची गेली ३९ वर्षं झालेली घुसळण लोण्यासकट वाया जाऊ देण्याची आमची तयारी नव्हती. हे लोणी आम्हाला तर हवं आहेच; पण आमच्या आजूबाजूला असलेल्या समवयस्क शिक्षक-पालक प्रौढांनीही ते चाखावं अशी आमची इच्छा आहे. त्यासाठी घुसळण चालू ठेवायची. लोण्याचा गोळा मोठा करत जायचा आणि अधिकाधिक लोकांना त्याची चव द्यायची असा प्रयत्न आम्हाला मनापासून करावा वाटतो. स्वतःसाठी, आपल्या पुढच्या पिढीसाठी!

तर नवीन आहे भेटण्याची पद्धत आणि त्यासाठीचं माध्यम.  

आजूबाजूला झपाट्यानं बदलणाऱ्या परिस्थितीत पालकनीतीचं स्वरूपही बदलावं असं आम्हाला वाटतं. अंकाप्रमाणे सर्व लेख एकत्र तुमच्यासमोर येण्याऐवजी, आता दर आठवड्याला एक लेख तुमच्यापर्यंत पोचेल. शुक्रवार संध्याकाळी जग ‘वीकएंड’च्या पार्टीत शिरत असताना आपण वाचनाच्या जादुई दुनियेत शिरू. चालू वर्तमान काळ तर बघूच, शिवाय भूतकाळाकडूनही शिकू. म्हणजे दर आठवड्याला एका नव्या लेखासोबत जुन्या वर्षांमधल्या परंतु आजही कालसुसंगत असणाऱ्या लेखांनाही आपण अधूनमधून उजाळा देणार आहोत. याशिवाय दरवर्षी दिवाळी एकत्र साजरी करायलाच हवी, नाही का! आणि दिवाळी अंकांशिवाय ती पुरी होऊच शकत नाही. जसा पोटाला फराळ लागतो, तसा मेंदूला दिवाळी अंक हवाच ना! तोही हातात घेऊन! छापील माध्यमातून! आणि म्हणूनच आपल्या एवढ्या वर्षांच्या परंपरेनुसार आम्ही दिवाळी अंक मात्र छापील रूपात घेऊन येऊ.

पालकनीतीची नवीन तंत्रज्ञानाशी सांगड घालण्यासाठी वर उल्लेख आलाय त्यातली काही मंडळी आहेतच; पण त्यांना मोलाची साथ करण्यासाठी अमोघ चौगुले, विक्रांत पाटील आणि ऋषिकेश भरड ही नव्या दमाची मंडळीही पालकनीती परिवारात दाखल झालेली आहेत. त्यांचंही इथे स्वागत करूया. ही मंडळी तंत्रज्ञानात तय्यार आहेतच, पण म्हणून वैचारिक प्रवासात नाहीत असं नाही; किंबहुना आहेतच.   

  पालकनीती मासिक आजवर मराठी वाचकांपुरतं सीमित होतं. नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीनं आता हे सीमोल्लंघन करण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळे मानवी भाषा बोलू शकणार्‍या सर्वांपर्यंत पोचणं आता शक्य होणार आहे. आणि नुसतं त्यांच्यापर्यंत पोचणंच नव्हे, तर त्यांचं ऐकणंही शक्य आहे. हा जगभराचा वैचारिक प्रवास आपल्याला करता यावा यासाठी शक्य तिथे नवे बंध निर्माण करण्याची गरज आहे. यासाठी मधमाशीचं काम सगळ्यांनी करावं. प्रत्येकानं करावं. १९२ देशातील १९२ ‘पालकनीती प्रतिनिधी’ मुलांसाठी आणि मुलांच्या माध्यमातून विश्वशांतीसाठी आणि स्वच्छ हवापाण्यासाठीही काम करतील असं स्वप्न बघायला काय हरकत आहे! आपण सगळे मिळून हे स्वप्न बघूया आणि करूया वाटचाल त्या दिशेनं!     

संपादक मंडळ, पालकनीती