आदरांजली – निर्मलाताई पुरंदरे
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या निर्मलाताई पुरंदरे ह्यांचे नुकतेच निधन झाले. सामाजिक कार्याबरोबरच विविध विषयांवरील लेखन, ‘माणूस’ साप्ताहिकाच्या संपादन विभागात सहभाग, फ्रान्स मित्रमंडळातील भरीव योगदान, हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू होते. त्यांच्या कार्याचा असा थक्क करणारा आवाका होता.
ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्यांनी 1981 मध्ये ‘वनस्थळी ग्रामीण विकास केंद्र’ ह्या संस्थेची स्थापना केली. त्या माध्यमातून राज्यात सुमारे 250 बालवाड्यांची निर्मिती, 11 हजारांहून अधिक बालवाडी शिक्षकांची घडणूक, महिलांचे – आरोग्य, शिक्षण आणि रोजगारप्रशिक्षण अशा विविध उपक्रमांतून ग्रामीण नागरिकांच्या विकासासाठी त्या झटत होत्या. त्यांनी वयाच्या पन्नासाव्या वर्षी सुरू केलेला हा उपक्रम आजही सुरूच आहे. या कामात त्यांच्यासोबत काम करणारांशी बोलले, की निर्मलाताईंची महती समजते. मुलीचे आईवर असावे तसे या प्रत्येकीचे निर्मलाताईंवर प्रेम आहे.
सांस्कृतिक देवाणघेवाण व्हावी ह्या हेतूने स्थापन झालेल्या असोसिएशन ऑफ फ्रेंड्स ऑफ फ्रान्स ह्या संस्थेमध्ये त्या 1967 सालापासून कार्यरत होत्या. अनेकदा फ्रान्सला जाऊन आल्या होत्या. त्यांच्या अनेक मित्रमैत्रिणी फ्रेंच होत्या. संस्थेच्या माध्यमातून फ्रान्सला जाऊन आलेले, तिथे सुरू असलेल्या वेगवेगळ्या कार्यक्रमांची ओळख झालेले आणि ते इथे येऊन चालवणारे अनेको लोक आहेत.
त्यांच्या कार्याची शासकीय तसेच विविध संस्थापातळींवर दखल घेतली जाऊन वेळोवेळी त्यांना पुरस्कारांनी गौरवण्यात आले. ह्यात महाराष्ट्र सरकारचा यशवंतराव चव्हाण पुरस्कार, उंच माझा झोका पुरस्कार, महर्षी कर्वे संस्थेचा बाया कर्वे पुरस्कार, पुण्यभूषण पुरस्कार इ. चा समावेश आहे.
निर्मलाताईंना पालकनीती परिवारातर्फे भावपूर्ण आदरांजली.