वाचक लिहितात

येईल सुकून अन् शांती जगात

कारण तुझं नि माझं बी लाले रगात! 

फलटणच्या कमला निंबकर बालभवन शाळेतील इ. पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांनी या वर्षासाठी राबवलेला हा शैक्षणिक प्रकल्प. विषयनिवडीपासूनच सजग शिक्षकांचे सामाजिक भान जाणवते.

विद्यार्थ्यांकडूनच सलोख्याचा खरा अर्थ समजावून घेत घेत प्रकल्प आकार घेण्यास सुरुवात करतो. आणि परिश्रमपूर्वक, ‘माईंड-मॅप्स’द्वारे सलोख्याची अत्यंत कलात्मक ‘गोधडी’ 10-15 दिवसात तयार होते. सलोख्याचे दर्शन देणारे अनेकानेक (मनांना श्रीमंत करणारे) प्रकल्प व त्याच्या मांडणीसाठी निवडलेली वेगवेगळी माध्यमे – लघुपट, चित्र – तक्ते, इन्स्टॉलेशन्स, नाट्य – खेळ – रॅप संगीत…

कल्पक शिक्षक, संस्थाचालक, प्रेरणा देणारे श्री. प्रमोद मुजुमदार सर आणि विद्यार्थी-गण यांनी या कोलाजमधून सलोख्याचे विविधांगी सूर्यकिरण सादर केले. हा प्रकल्प प्रत्यक्ष न बघताही डोळ्यांसमोर उभा राहिला ते पालकनीतीमध्ये आलेल्या मधुरा राजवंशी यांच्या लेखामुळे; ज्या या बालभवनातच शिक्षण समन्वयक व इंग्रजीच्या शिक्षक म्हणून काम पाहतात.

शाळाशाळांमधून या लेखाचे वाचन व्हावे. धार्मिक द्वेषातून दुभंगलेला समाज एकत्र येण्यासाठी सर्वांनीच ही ‘गोधडी’ विणत राहावी. पालकनीती परिवाराचे मनापासून अभिनंदन!!

रमा सप्तर्षी, पुणे