खेळघराच्या मूल्यमापनाच्या प्रक्रियेचं हे चित्र!


आमच्या कामाच्या इम्पॅक्टचं, त्यातल्या वेगवेगळ्या प्रकल्पांचं, कामांच्या जबाबदाऱ्या घेणाऱ्या अनेक व्यक्तींचं मूल्यमापन!
या प्रक्रियेतून समोर येणारी कामाची, व्यक्तींची ताकद, समोर उभी असलेली आव्हानं आणि उपायांच्या दिशा या संदर्भातल्या मंथनाचे काम म्हणजेच हे मूल्यमापन!
खूप गुंतागुंतीचे आणि व्यामिश्र स्वरूपाचे!
खेळघरात प्रत्येकजण आपापल्या ताकदीनुसार, पद्धतीने या कामाला आकार देत, सुंदर बनवत नेण्याचा प्रयत्न करत असतो.
आम्हा सगळ्यांच्या मनातली आनंदाच्या दिशेने जाण्याची उत्कट उर्मी या कामाचा सर्जनशील बनवते.

गेल्या चार दिवसातल्या खेळघराच्या मूल्यमापनाच्या प्रक्रियेत आकार घेत गेलेले हे चित्र! आम्हा सगळ्या टीमने मिळून तयार केलेले!

दरवर्षीच मे महिन्यामध्ये खेळघरचे evaluation असते. या वर्षी ही प्रक्रिया अधिक अर्थपूर्ण आणि रसपूर्ण व्हावी म्हणून आम्ही काही वेगळ्या प्रकारे प्लॅनिंग केले.

आधीच्या आठवड्यात expressive आणि articulated writing या विषयावर सर्व गटाबरोबर मी एक सत्र घेतले. ‘ माझे मागील वर्ष ‘ या विषयावर सर्वांनी लेखन केले. मदतीला काही मुद्दे दिले होते. या लेखनाच्या आधारे evaluation मध्ये प्रत्येकीने आपले सादरीकरण मांडले.

तसेच टीममध्ये छान हार्मनी तयार व्हावी म्हणून ही काही सत्रे झाली होती. एकमेकांना appreciate करण्याबरोबरच, प्रश्न दिसणे आणि दुखावले न जाईल असा फीडबॅक देणे यावर ही बोलणे झाले होते.

प्रत्यक्ष मूल्यमापनाच्या चार दिवसांची आखणी देखील, चर्चा आणि संवादा च्या सत्रांच्या मध्ये मध्ये मोकळा वेळ मिळेल, त्यात सर्वांनी मिळून काही छान गोष्टी करता येतील अशी केली होती.
ग्रुप ने करता येईल अशा एका डान्स चा व्हिडिओ मिळाला होता. मध्ये वेळ मिळेल तेव्हा आम्ही त्याची practice करत होतो. खूप हसत होतो.

Evaluation च्या दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मी सहज एका पाठकोऱ्या कागदावर scribbling करत होते. करता करता एकमेकांत गुंतलेल्या आकारांचे एक मेझ तयार झाले. मग मी त्यातल्या काही छोट्या छोट्या आकारात काही patterns काढून ते अधिक सुंदर बनवू लागले.
दुसऱ्या दिवशी सगळ्या टीमला ते चित्र दाखवले, तेव्हा मला वाटले, अरे हे तर आपल्या evaluation च्या प्रक्रियेचेच चित्र!
अतिशय गुंतागुंतीची ही प्रक्रिया आपण काही काही भागांतून सुंदर बनवायचा प्रयत्न करतो आहोत.

यावर अपर्णा म्हणाली, आम्ही पण यात रंग भरतो. आपण सगळे मिळून हे चित्र पूर्ण करूया. प्रत्येकाने त्यातल्या काही आकारांमध्ये आपल्याला आवडेल असे डिझाईन काढले तर मजा येईल.

कल्पना सर्वानाच खूप आवडली. पुढील दोन दिवसात चर्चांच्या दरम्यान प्रत्येकाने त्यातील काही काही आकार आपल्या पद्धतीने भरले…
आणि त्यातून हे सुंदर चित्र तयार झाले.