चित्राभोवतीचे प्रश्र्न

प्रश्न – आमची मुलगी साडेचार वर्षांची आहे. मोबाईल, खेळ, गाणी, टीव्ही यापेक्षा ती चित्र काढण्यात जास्त रमते. आम्ही दोघेही चित्रकला जाणत नाही, तर तिची आवड कशी जोपासावी?

– श्वेता देशमुख

नमस्कार पालक,

मोबाईलपासून तुमची मुलगी इतकी वर्षे दूर आहे किंवा तुम्ही तिला जाणीवपूर्वक दूर ठेवले आहे, यासाठी प्रथमतः तुम्हा तिघांचे अभिनंदन.

मुलांचे व्यक्त होण्याचे मार्ग वेगवेगळे असतात. काही मुले लिहितात, काही बोलतात, काही करून दाखवतात, काही मांडतात… तसे तुमची मुलगी तिचे अनुभव कागदावर, भिंतीवर, जमिनीवर चितारते. चित्रातून व्यक्त होण्यात तिला सहजता लाभते. इथे ‘सहज’ म्हणजे ‘सोप्पे’ नाही. जन्मा’सह’ येते ते सहज. तिचे जगाकडे बघणे आणि ते रंग-रेषा-आकारातून मांडणे हे तिच्यासाठी ‘सहज’ आहे.

एक उदाहरण सांगतो म्हणजे स्पष्टता येईल. पावसाळ्यात हिरवीगार झालेली टेकडी पाहून कुणाला ‘हिरवे हिरवे गार गालिचे’ असे शब्द स्फुरतात, तर कुणी नृत्यातून पाऊस आणि हिरवी झाडे उभी करते. कुणी पूर्ण कागदावर हिरवा रंग फासते. ज्याला जे सहज असेल तसे.

ती जे काढते आहे ते ‘चित्रकला’ विषय किंवा तिची छंद-आवड नसून तो व्यक्त होण्याचा एक मार्ग आहे. उद्या कदाचित तो बदलूही शकतो. याचा शालेय चित्रकलेशी काहीही संबंध नाही. शाळेत चित्रकला म्हणून जे शिकवले जाते, ते कदाचित तिला आवडणारही नाही. तिची आजची चित्रे कदाचित त्या शिक्षकांना रुचणार नाहीत. तुमच्या दृष्टीनेही कदाचित ती योग्य चित्रकला नसेल. पण तिला काहीही फरक पडणार नाहीये. कारण तिची ही चित्रे कुणाशीही स्पर्धा करत नाहीत, कुणालाही खूश करायला ती चित्रे काढत नाही. ते फक्त तिचे व्यक्त होणे आहे.

मुलांची चित्र-अभिव्यक्ती अधिक सक्षम करण्याचे पालकांकडे दोन मार्ग आहेत.

आधी सोपा मार्ग सांगतो.

सोपा मार्ग म्हणजे पालकांनी मुलांच्या चित्रांपासून अर्धा किमी दूर राहावे. कुठलीही सुधारणा, सल्ले, सूचना देण्यापासून स्वतःला आवरावे. आपल्याला अजिबात समज नसणाऱ्या विषयात केवळ आपण वयाने मोठे असल्याचा काहीही उपयोग होत नसतो. मूल आजारी पडले, तर घरचे उपचार करण्यापेक्षा आपण थेट दवाखाना गाठतो तसेच काहीसे. आणि आपल्याला यातले कळत नाही, अशी नम्र कबुली मुलाला दिल्यास तो तुमची जाण वाढायला मदतच करेल.

दुसरा मार्ग जरा खडतर पण कुटुंबासाठी जास्त फायद्याचा आहे.

जानेवारी महिन्याच्या अंकात एका प्रश्नाचे उत्तर देताना मी सुचवले होते, की ‘मूल ८ वर्षांचे होईपर्यंत पालकांनी त्याला कुठल्याही क्लासला पाठवू नये’; तर त्यापेक्षा पालकांनी स्वतः चित्रकलेचे किमान शिक्षण घ्यावे आणि आपली त्या विषयाची समज वाढवावी. शाळेचा अभ्यास घेता यावा म्हणून नाही का पालक नव्या अभ्यासक्रमानुसार स्वतःला ‘अपग्रेड’ करतात, तसेच!

यासाठी आम्ही घेत असलेल्या एका उपक्रमाबद्दल सांगतो.

चित्रकला अजिबात न येणाऱ्या काही पालकांबाबत आम्ही हा प्रयोग केला. करोनाकाळात घरातल्या घरात मुलांसोबत वेळ कसा घालवावा, हा पालकांपुढे मोठाच प्रश्न होता. ऑनलाईन क्लासची शोधाशोध करत ते माझ्यापर्यंत आले. मग अशा पालकांसाठीच आम्ही एक ऑनलाईन कोर्स डिझाईन केला. तो अजूनही चालू आहे.

यात पालकांना रंगांची, माध्यमांची ओळख होणे, विविध चित्रशैली, स्केचिंग, अमूर्त चित्र पाहणे, डोळ्यांनी समजणे… अशा गोष्टी होत्या. प्रत्येक व्यक्तीची रेखाटण्याची तऱ्हा वेगवेगळी असते. त्यानुसार मिळतीजुळती काही प्रसिद्ध चित्रे त्यांना दाखवली. मुलांसोबत करता येणारे वीसेक चित्र-उपक्रमही ह्या कोर्समध्ये होते.

अशा पद्धतीने तुम्ही ‘गूगलून’ स्व-अभ्यासदेखील करू शकता.

यातून तीन फायदे अपेक्षित आहेत – 

१. मुलांसोबत केलेल्या चित्रांच्या या आठवणी त्यांच्या नेहमी स्मरणात राहतात. सायकल चालवणे, पोहायला शिकणे ह्याबद्दलच्या आठवणी मूल लक्षात ठेवते, तसेच हे आहे.

२. हे काय काढले आहे, ते काय काढलेय, हे असे काढ की, असा नीट रंग लाव की… अशा उंटावरून शेळ्या हाकल्या न गेल्याने पालक आणि मुले एका पातळीवर आली. एकमेकांच्या पद्धती, गुण, चुका समजता आल्या. कुठल्याही टोकाच्या टीकाटिप्पण्या आल्या नाहीत.

३. आपल्याला चित्रकला आवडतच नाही, येतच नाही, समजतच नाही हा पालकांनी इतके दिवस मनी बाळगलेला न्यूनगंड गळून पडला आणि ते या विषयाकडे नव्याने पाहू लागले.

मॉल, सिनेमा इथेच वेळ घालवणारे पालक आता मुलांना आवर्जून चित्र-प्रदर्शनाला घेऊन जातात, चित्रकाराशी बोलतात, मन लावून चित्रे पाहतात. म्युझियम पाहतात. वस्तूंवरील कलाकुसर जाणीवपूर्वक पाहतात.

सहलीला गेल्यावर मोकळ्या वेळेत छोट्या कागदावर चित्र काढतात. घरात एखादे चित्र लावतात. चित्रकारांची माहिती मिळवतात, तशी पुस्तके घरी आणतात. विविध कलामाध्यमांची ओळख झाल्याने बाजारात गेल्यावर तसे साहित्य जाणीवपूर्वक विकत घेतात. मुलांना वापरायला देतात. नव्या रंग-माध्यमातून मुलांना आणखी नवे मार्ग दिसतात. पालकही नवीन काही करून पाहतात.

पालकांना हे सारे करताना पाहून मुलांवर आपोआप चित्र पाहण्याचे ‘संस्कार’ घडतात. आणि अभिव्यक्तीसाठी त्यांना सशक्त प्लॅटफॉर्म मिळतो. हेच वाचन, व्यायामासाठीही लागू आहे. पालकांनी स्वतः या गोष्टी नियमित केल्यास मुले आपोआप त्या गोष्टी करतात.

… तर तुमच्याकडे हे दोन मार्ग आहेत. निवड तुमची!!

प्रश्न – माझा मुलगा यूट्यूबवर चित्रांचे व्हिडिओ पाहून त्यातल्या महागड्या वस्तू विकत आणायला सांगतो. यावर मार्ग काय? – ओवी सावंत

अनेकांच्या घरी ही समस्या आहे. (केवळ लहान मुलेच मागण्या करतात असे नाही; मेकअपचे साहित्य मागणाऱ्या शहरी कुमारवयीन मुलीही आहेत.)  

तुमच्याकडे कितीही पैसे असले, तरी पालकांनी मुलांशी दोन गोष्टींबद्दल बोलावे.

एक – एकूण बजेट.

घरातल्या सर्वांच्या छंदासाठी महिन्याला किती बजेट राखलेले आहे ते मुलांना स्पष्ट सांगावे. त्यामुळे पुढील महिन्यापर्यंत वाट पाहण्याची वृत्ती वाढेल. मधल्या काळात मूल विसरले, तर त्याचा अर्थ मागणी महत्त्वाची नव्हती.

दुसरे – मूल्यांकन.

आधी आणलेल्या चित्रकलेच्या साहित्याचे काय झाले, ते रंग किती वापरले, एकदाच वापरून सोडून दिले का, त्याच प्रकारात चार-पाच वस्तू केल्यात का, इत्यादी बाबींचा विचार करून साहित्याचे मूल्यांकन करावे.

आणलेले रंग, साहित्य पूर्ण क्षमतेने वापरले जात असेल, तर नवे नवे साहित्य घेऊन द्यायला हरकत नाही.

तयार झालेल्या कलावस्तू भेट देण्याचा, त्यातून घर सजवण्याचा किंवा विकून त्या पैशातून पुन्हा रंग-साहित्य आणण्याचा पायंडा पाडावा.

तुमचा चित्रकार मित्र,

श्री बा.

श्रीनिवास बाळकृष्ण

shriba29@gmail.com

(चित्रकलेसंदर्भातले प्रश्न वाचक या इमेलवर विचारू शकतात.)

चित्रकार, इलस्ट्रेटर आणि कला-मार्गदर्शक.