आमची आयुका पिढी! म्हणजे साधारणपणे आयुकासोबत जन्मलेली पिढी. आम्ही शाळा-कॉलेजात गणित-विज्ञानाशी मैत्री वाढवत होतो तेव्हा आयुकात विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे उपक्रम सुरू होत होते. म्हणजे तिथल्या सर्व नव्या कोऱ्या गोष्टी आणि उपक्रम अनुभवणाऱ्या विद्यार्थ्यांची आमची पहिली पिढी!  

आयुकाचं प्रवेशद्वार आणि लोगो, आतलं लॉन आणि त्यातले दगड, गॅलिलिओ-न्यूटन-आर्यभट्ट आणि ती झाडं, तिथे होणारे कार्यक्रम, दर थोड्या वेळानी जाऊन बघायचा तो फुकोचा पेंड्युलम… सगळंच रोमांचक! पुढे ‘मुक्तांगण विज्ञान शोधिका’ सुरू झाल्यानंतर मुलांसाठी विज्ञान उपक्रमांचा पाऊस पाडला आयुकानं! त्या आकर्षक सायन्स पार्कमध्ये दंगा केलेल्या पहिल्या काहीशे विद्यार्थ्यांमध्ये आम्ही. हेही नसे थोडके!

आमची ‘प्रेषित’, ‘वामन परत न आला’, ‘ट्रॉयचा घोडा’ पिढीसुद्धा! आम्ही वाचते झालो तेव्हा ‘प्रेषित’ही ९-१० वर्षांचं असेल. सायक्लॉप्स, आलोक कसले चित्तथरारक होते! पुढे आठवी / नववीच्या वयात मेंदूचा ठाव घेतला तो चमचमत्या, लकाकणाऱ्या फोटोंनी भरलेल्या, सोप्या भाषेतल्या, अतिशय आकर्षक, मोठ्या आकाराच्या, हार्ड-बाउंड ‘आकाशाशी जडले नाते’नं. जितकं आयुकात रोमांचक वाटे, तितकंच विज्ञान कथा-कादंबऱ्या वाचताना आणि तितकंच ‘आकाशाशी जडले नाते’ वाचतानाही! आमचे सुपरस्टार होते जयंत नारळीकर!

९०च्या दशकापासून लाखो विद्यार्थ्यांच्या जडणघडणीचा काळ जयंत नारळीकरांनी विज्ञानहर्षक केला. अशा अनेक पिढ्या ते नेहमी घडवतच राहणार आहेत. ‘आकाशाशी जडले नाते’च्या प्रस्तावनेत ते लिहितात, ‘वाचकहो, बाकीचे पुस्तक वाचले नाहीत तरी प्रकरण ५० अवश्य वाचा.’ ज्यांच्याकडे पुस्तक आहे त्यांनी प्रकरण ५० वाचून, त्याबद्दल इतरांना सांगून, त्यावर वाद-चर्चा-अभ्यास करून, नारळीकरांना सलाम करूया.

डॉ. जयंत नारळीकरांना भावपूर्ण आदरांजली.

रुबी रमा प्रवीण