सुनीता तगारे

आधार मिळावा म्हणून आधारकेंद्रात राहणार्‍या बालकांच्यासोबत मी दोन दशकांहून अधिक काळ काम केले आहे. संस्थेत दाखल होणारी बालके अनेकदा आईने किंवा कोणीतरी सोडून दिलेली, निराधार अवस्थेत सापडलेली असतात. कोणाही व्यक्तीने बाळाला जन्म देणे हा काही कायद्याने गुन्हा नाही. मात्र बाळाला  निराधार अवस्थेत टाकून देणे हा मात्र गुन्हा आहे. आपल्या समाजमनावर अद्याप विवाह-बंधनाचा मोठा पगडा आहे. पण या बंधनाचा कुणाला काच जाणवतो. काही अल्पवयीन मुली शोषणाला बळी पडतात. अशा घटनांमधून पुढे जन्माला आलेल्या बालकांना त्यांच्या माता सांभाळू शकत नाहीत. त्यांना समाजाच्या रोषाला तोंड द्यावे लागते. त्यापासून लांब पळण्यासाठी म्हणून या गोष्टी गुप्त ठेवल्या जातात. समाजात आपली अप्रतिष्ठा होईल या भीतीपोटी अनेक वेळा अशा बालमातांच्या हत्यादेखील केल्या गेल्या आहेत. काही वेळा ह्या मुलीच आपले जीवन संपवून टाकतात.

आपल्या समाजात अजूनही स्त्रियांना, मुलींना उपभोगाची वस्तू मानले जाते. प्रत्येक स्त्रीवर कोणत्यातरी पुरुषाचा मालकी हक्क असतो. वडील, भाऊ, नवरा, सासरा अशा वेगवेगळ्या नात्यांच्या रूपात तो सामोरा येतो. आणि त्याच्या दबावाखाली राहावेच लागते. अशा वृत्तीतून या मुलींवर बळजोरी केली जाते. आर्थिकदृष्ट्या दुर्बल, अल्प किंवा अशिक्षित, दुर्गम ठिकाणी राहणार्‍या किशोरवयीन मुली यात अडकतात. अर्थात, शहरी, शिकलेल्या आणि सुस्थितीत असणार्‍या मुली अगदी सुरक्षित असतात असे अजिबात नाही. मात्र सोयीसुविधांची उपलब्धता असल्याने त्यांचे प्रमाण कमी असते इतकेच. ओळखीचे, नात्यातले, आणि काही वेळा कुटुंबातलेच पुरुष या मुलींचा गैरफायदा घेतात.

पूजा सतरा वर्षांची मुलगी. ग्रामीण भागात राहणारी पण शिक्षणाची आवड असणारी. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत होती. तिला एका पायाला पोलिओ झालेला होता. तिच्या जन्मदात्या वडिलांनीच तिच्यावर शारीरिक अत्याचार केला. दबावामुळे ती काहीच प्रतिकार करू शकली नाही. आईने खोदूनखोदून विचारल्यावर पूजाने घाबरत घाबरत आईला सर्व सांगितले. धक्का बसण्याच्या पलीकडे आईची परिस्थिती झाली. तिला काहीच सुचेना. पण आता पुढे काय करायचे, याविषयी चिंता वाढू लागली. गावात, नातेवाईकांत समजले, तर केवढा मोठा अनर्थ होईल या काळजीने सगळ्यांची झोप उडाली. यातून काहीतरी मार्ग काढणे आवश्यक होते. म्हणून शहरातल्या एका अत्यंत जवळच्या नातेवाईकांना विश्वासात घेऊन पूजाला त्यांच्याकडे आणले. डॉक्टरने पूजाची तपासणी केली असता तिचे गरोदरपण काढून टाकण्यापलीकडे जास्त दिवसांचे होते असे कळले. पूजा आणि तिच्या आईच्या पायाखालची वाळूच सरकली. काहीही करून यातून आमच्या मुलीची सुटका करा म्हणून ते डॉक्टरांना विनवू लागले. जास्त दिवस झालेले असल्याने गर्भपात करणे शक्य नव्हते. ते बेकायदेशीर आणि पूजाच्या आरोग्याच्या दृष्टीने असुरक्षितदेखील होते. त्यानंतर आधी सांगितल्याप्रमाणे आईने पूजाला निराधार बालकांच्या संस्थेत पाठवले. मी त्याच संस्थेत सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करत होते. मी पूजाच्या बाळाची संस्थेत कायदेशीर प्रवेश-प्रक्रिया करायला घेतली. मला काम करायला लागून केवळ दोन-तीनच वर्षे झाली होती. अशा कामाचा फारसा अनुभवही नव्हता. त्यामुळे पूजासोबत काम करताना माझ्या मनावर फार परिणाम झाला. आतापर्यंत मी जिव्हाळ्याचे, प्रेमाचे संबंध, सुरक्षित आयुष्य अनुभवले होते. ह्या सर्व गोष्टी मला भयानक आणि अविश्वसनीय वाटल्या. जगात असे काही घडू शकते अशी मी कधी कल्पनाही केली नव्हती. आपण निवडलेली सामाजिक कार्याची वाट अशी निराशाजनक असणार असेल, तर ती सोडून देऊन दुसरे काही सर्वसामान्य असे निवडावे, असा विचार मनात येऊ लागला. त्यावेळी आमच्या संस्थेच्या संचालिका अतिशय कुटुंबवत्सल, आपुलकी जपणार्‍या आणि प्रेमळ होत्या. प्रत्येक कार्यकर्त्यामधले गुणदोष हेरून त्याला जबाबदारी द्यायच्या. माझ्या मनातली चलबिचल त्यांच्या लक्षात आली. त्या माझ्याशी स्वतंत्रपणे सविस्तर बोलल्या. ‘पूजाच्या बाबतीत घडणारी घटना ही अगदी दुर्मीळातली दुर्मीळ आहे, अशा घटना वारंवार आणि प्रत्येकच नात्यात घडतात असे अजिबात नाही, जगात अनेक चांगल्या गोष्टी आहेत, त्याकडे आपण पाहूया’, अशा प्रकारे त्यांनी मला समजावले आणि समजूनपण घेतले. त्यामुळे हळूहळू का होईना मी कामात स्थिरावले. मनही स्थिर होऊ लागले. आणि त्या ठिकाणी सामाजिक काम करताना अशा अनेक प्रकारच्या घटनांना मी पुढच्या काळात सामोरी गेले.

13 वर्षांची रजनी संस्थेत आली आणि तिच्या पाठोपाठ रजनीला झालेले नवजात बाळ घेऊन तिची आई. तशीच रस्त्यावरून बेवारस फिरत असताना अनेकांच्या अत्याचाराला बळी पडून रस्त्यावरच बाळाला जन्म देणारी मतिमंद असलेली प्रौढ काशी. अशा अनेक, मनाला चटका लावणार्‍या वेदनादायक कहाण्या पुढे माझ्या अनुभवात आल्या. या मुलींना-महिलांना संस्थेच्या आधाराची, मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. त्यासाठी आपण आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवून काम केले पाहिजे, हे माझ्या मनात हळूहळू रुजत गेले. कितीही अडचणी आल्या तरी त्यावर मात करायचीच, हा निश्चय पक्का होत गेला. कुटुंबातल्या, ओळखीच्या आणि अनोळखी, अशा सर्वच स्त्रियांबद्दल आपुलकी, जिव्हाळा वाटू लागला.

समाजात अजूनही जागृती होण्याची गरज दिसून येते. संस्थेत येऊन बाळ दाखल करण्याविषयी अजूनही मनात भीती, साशंकता असते. मग अशा नको असलेल्या बालकांना निराधार अवस्थेतच टाकून दिले जाते. अशी बालके मग पोलिसांच्या माध्यमातून कायदेशीर प्रक्रियेद्वारे बालकांच्या संस्थेत दाखल होतात. निराधार अवस्थेत टाकून दिल्यामुळे बालकांचे खूप हाल होतात. अंगावर जखमा, वजन कमी, कुपोषण, अशा वाईट अवस्थेत ही बालके सापडतात. संस्थेत दाखल झाल्यावर सर्वसाधारण अवस्थेत यायला त्यांना बराच काळ लागतो. काही बाळांना तर अनेक दिवस दवाखान्यात उपचारासाठी राहावे लागते. अशी विविध वयांची, विविध परिस्थितीतून आलेली, विविध गरजा असलेली, अनेक मुले संस्थेमध्ये एकाच वेळी राहत असतात. जन्मदात्या आईवडिलांना नकोशी असणारी ही बालके पाहिली, की माझ्याच मनात अपराधीपणाची भावना निर्माण होत असे. या बालकांची काहीही चूक नसताना एवढी मोठी शिक्षा त्यांना मिळते याबद्दल खूपच वाईट वाटत असे. प्रत्येक बालकाला आईचे दूध प्यायला मिळाले पाहिजे, अशी इतकी छोटी पण महत्त्वाची आणि नैसर्गिक गोष्ट. पण ह्या बाळांना ते मिळू शकत नाही. ती विशेषत: स्पर्शाची भुकेली असतात. संस्थेमध्ये त्यांना जेवण, दूध, कपडे, औषधे, सारे उत्तम दर्जाचे मिळत असे; पण प्रेमाचा स्पर्श त्यांना खूप हवाहवासा वाटे. मुले संस्थेतच राहत असली, तरी मी मात्र सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा (आवश्यकतेनुसार कधीही) या वेळेत संस्थेत यायचे. मुले माझ्या गाडीचा आवाज बरोबर ओळखत आणि धावत येऊन मला बिलगत. तो माझ्या आणि मुलांच्या अगदी आनंदाचा क्षण असे. रोजच्या सहवासाने मला सर्वच मुलांबद्दल आपुलकी, जिव्हाळा वाटू लागला. आजूबाजूंच्या सर्वच मुलांना आपण प्रेम दिले पाहिजे, त्यांना आनंदात ठेवले पाहिजे, ही जाणीव प्रकर्षाने निर्माण झाली. या मुलांना आपल्या घरी नेणे शक्य नाही हे माहीत होते. म्हणून आम्ही संस्थेतच सर्व सण-समारंभ, मुलांचे वाढदिवस साजरे करायला सुरुवात केली. गणेशोत्सव, दहीहंडी, राखीपौर्णिमा, दिवाळी अशा सणांना मुलांच्या उत्साहाला आणि आनंदाला उधाण येत असे. अनेक वेळा बाहेरची मंडळीपण यात सहभागी होत असत. शिवाय संस्थेत मुलांसाठी प्रत्यक्ष काम करणार्‍या भगिनीसुद्धा भाग घेऊ लागल्या. आमच्या सर्वांच्याच नातेसंबंधांमध्ये एक प्रेमाचा धागा निर्माण झाला. समाजामध्ये या मुलांविषयी एक प्रतिकूल असे कुतूहल असते. या सहभागाने या कुतूहलाची जागा मुलांविषयीच्या प्रेमाने घेतली. अशा अनेक कार्यक्रमांनी मुलांना आनंद मिळायला लागला.

अर्थात, हा आनंद तात्पुरता असतो. या सर्वच बालकांना स्वतःचे, त्यांच्या हक्काचे आईवडील, घर मिळायलाच हवे. त्याशिवाय त्यांचे जीवन परिपूर्ण होऊ शकत नाही. म्हणूनच आमच्या संस्थेच्या कामाचा पुढचा आणि महत्त्वाचा टप्पा म्हणजे या मुलांना योग्य असे कुटुंब शोधून न्यायालयीन प्रक्रियेद्वारे दत्तक देणे. त्या आधी एक महत्त्वाचा टप्पा असतो तो ह्या निराधार अवस्थेत सापडलेल्या मुलांचे जन्मदाते शोधण्याचा. स्थानिक वृत्तपत्रे, पोलीस-यंत्रणा यांची ह्याकामी मोठी मदत मिळते. काही मुलांचे जन्मदाते शोधून मुलांना त्यांच्याकडे सोपवण्याचा प्रयत्न यशस्वी झाला. ते क्षण परमोच्च आनंदाचे होते.

निशा नावाची चार वर्षांची मुलगी निराधार अवस्थेत सापडली. आमच्या संस्थेत दाखल झाली. ह्या मुलांशी गप्पा करताना काहीतरी सापडते. तिच्याशी बोलताना लक्षात आले, की तिची भाषा तेराशे किलोमीटर अंतरावर असलेल्या एका राज्यातली आहे. ही गोष्ट मी पोलीस आयुक्तांच्या कानावर घातली. त्यांनी त्यांची यंत्रणा कामास लावली. त्याला यश आले. निशाच्या आईवडिलांनी त्यांच्या स्थानिक पोलिसांकडे ती हरवली आहे अशी तक्रार दाखल केलेली होती. सर्व कागदपत्रांची छाननी करून कायदेशीर प्रक्रियेद्वारे निशाला त्यांच्या ताब्यात दिले. आईवडील दिसताच निशाने त्यांच्याकडे धाव घेतली. त्यावेळी उपस्थित माजी न्यायाधीश, पोलीस अधिकारी आणि आम्ही सर्व कार्यकर्ते खूपच भावविवश झालो होतो. आपण करत असलेले काम सार्थकी लागले असे वाटले.

अशा अनेक मुलांना त्यांचे जन्मदाते आईवडील परत मिळवून देण्यात यश आले. आपल्या जन्मदात्यांकडे जाऊ न शकलेल्या बाळांना दत्तक-पालक मिळवून दिले. दत्तकेच्छु पालकांच्या कागदपत्रांची छाननी करणे, त्यांचे व्यक्तिमत्त्व पारखून घेणे, गृहभेट करणे, त्यांच्या मुलाखती घेणे, या सर्व गोष्टी संवेदनशीलतेने कराव्या लागतात. आपण एका निरागस चिमुकल्या जीवाचे आयुष्य घडवत आहोत, त्यात अगदी छोटीशीही चूक होता कामा नये, यासाठी अक्षरशः डोळ्यात तेल घालून जपावे लागत असे. काही वेळा त्यांना समुपदेशन करावे लागे. सर्व सोपस्कार पूर्ण होऊन बाळ दत्तक-पालकांच्या सुपूर्त करताना एक आगळे समाधान मिळत असे. बालकांच्या आयुष्यातल्या वेदनादायी प्रवासाची वाटचाल आनंददायी, सुखकर दिशेने होत होती. पालकांनाही त्यांच्या आयुष्याची परिपूर्ती झाल्यासारखे वाटत असे. अगदी क्वचित वेळा, काही अपरिहार्य कारणामुळे बाळ परत घेण्याच्याही घटना घडल्या आहेत. तेव्हा खूप वाईट वाटते. अपराधीपणा वाटतो.

दत्तक-पालकांचा आणि मुलांचा खूप चांगला अनुभव आला. दत्तक-प्रक्रिया पूर्ण होऊन मूल त्याच्या घरी गेले, की संस्थेचा संबंध औपचारिकपणे संपतो. पण अनेक जण त्यांच्या घरातल्या कौटुंबिक सण-समारंभांना आवर्जून बोलावतात. त्यांच्या कुटुंबाचा एक सदस्यच मानतात. असा माझ्या कुटुंबाचा परीघ विस्तारत गेला. माझे आयुष्य अधिकाधिक समृद्ध झाले. आता संस्थेचे काम सोडून एक दशक उलटून गेले आहे; पण काही मुले अजूनही माझ्या संपर्कात आहेत, मला भेटायला येतात. माझे जीवन अशा अनेक अनुभवांनी समृद्ध केले आहे. अजून काय पाहिजे?

सुनीता तगारे

sunita.tagare@gmail.com

महिला व बालविकास क्षेत्रात काम करण्याचा 35 वर्षांचा अनुभव. भारतीय समाज सेवा केंद्र (BSSK) या संस्थेच्या औरंगाबाद शाखेच्या संचालक म्हणून काम केले आहे. ‘आस्था फाऊंडेशन औरंगाबाद’ या ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करणार्‍या संस्थेत कार्यरत आहेत.