स्मृती गुप्ता
एकीकडे लाखो मुलांचे आयुष्य बालगृहांमध्ये अडकून पडलेले असताना, हजारो पालक मूल दत्तक घेण्याच्या प्रतीक्षेत का आहेत?
नुकत्याच जाहीर झालेल्या माहितीनुसार भारतात विविध बालगृहांमध्ये साडेतीन ते चार लाख मुले आहेत. दोन हजार मुले दत्तक-प्रक्रियेचा भाग आहेत (लिगल अॅडॉप्शन पूल) आणि विरोधाभास असा, की सध्याच्या घडीला 34 हजारांहून जास्त पालक बाळाला घरी घेऊन जायला, त्याला प्रेमाचे घर द्यायला उत्सुक आहेत. ही आकड्यांची गुंतागुंत काय सांगू बघतेय?
बंद दाराआड
जन्मदात्यांनी आपल्याला सोडून दिल्याची निराशा, कधीतरी आपल्याला कुटुंब मिळेल ही आशा घेऊन मुले निवारागृहांच्या भिंतींआड आला दिवस ढकलत असतात. हिंसा, कुपोषण, शारीरिक मानसिक आंदोलने. कधीकधी बालगृहांना मिळणारा निधी मर्यादित असतो. त्यामुळे त्यांच्याकडे फारशी खेळाची साधनेसुद्धा नसतात. त्यातून त्यांचा वयानुरूप विकास होत नाही, वाढ खुंटते.
दुसरीकडे मूल दत्तक घेण्यासाठी आतूर असलेली असंख्य जोडपी, त्यासाठी लागणार्या सर्व नोंदण्या करूनसुद्धा, बाळाची वाट बघत बसलेली असतात. म्हणजे कुटुंबासाठी, पालकांच्या प्रेमासाठी आसुसलेली मुले असतानादेखील दत्तक घेऊ इच्छिणार्या पालकांना करावी लागणारी प्रदीर्घ प्रतीक्षा बुचकळ्यात पाडणारी आहे.
गाडी नक्की कुठे अडली आहे?
बालगृहांमधल्या मुलांना दत्तक-प्रक्रियेमध्ये सामील करून घेण्यात नेमकी काय अडचण आहे? बाल न्याय अधिनियम (जुवेनाईल जस्टीस अॅक्ट) आणि केंद्रीय दत्तक संसाधन प्राधिकरण (कारा) यांनी प्रत्यक्ष कडक नियम घालून दिलेले असले, तरी वास्तव वेगळे आहे. संसाधनांची कमतरता, कायद्याच्या अंमलबजावणीतल्या त्रुटी, कायद्यातील संदिग्धता इत्यादी बाबींमुळे दत्तक-प्रक्रियेत येऊ शकणारी अनेक मुले ह्या प्रक्रियेच्या बाहेरच राहतात. सामान्य लोकांचे ह्या प्रक्रियेबद्दल असलेले अज्ञानही ह्याला कारणीभूत ठरते.
ह्याबाबतीत रुचीचे उदाहरण बोलके आहे. रुचीचे आईवडील गेल्यानंतर काही काळ तिच्या मावशीने तिचा सांभाळ केला. पण स्वतःच्या वैयक्तिक अडचणींमुळे तिने रुचीला एका बालगृहात ठेवले. बालगृहात तिची चांगली काळजी घेतली जाते आहे, असे मावशीला वाटे. इकडे रुची मात्र रोज आपल्या मावशीची वाट पाहत बसे. नक्की कोणता कायदेशीर मार्ग अवलंबला पाहिजे याबद्दल बालगृह-व्यवस्थापनाला स्पष्टता नव्हती. ह्या सगळ्या गोंधळात रुचीची दत्तक-प्रक्रिया कधी सुरूच होऊ शकली नाही.
महिला आणि बालकल्याण विभागात कार्यरत असलेल्या मनीषा बिरारीस ह्यांना ह्याबद्दल विचारले. त्या म्हणाल्या, ‘‘दत्तक-पालकत्व स्वीकारण्याची इच्छा असलेल्या पालकांच्या मानाने उपलब्ध मुले कमी आहेत हे खरे आहे. अनेक मुले दत्तक-प्रक्रियेचा भाग होऊ शकत नाहीत. याला खूप कारणे आहेत. एकतर दत्तक-प्रक्रियेसाठी नोंदणी करताना ज्या कायदेशीर बाबींची पूर्तता करावी लागते, त्याबद्दल अज्ञान आहे. यातून बेकायदेशीरपणे मुले दत्तक घेणे, मुलांची तस्करी, अशा घटना घडतात. त्याचबरोबर दत्तक-प्रक्रिया थोडी जलद होण्याचीही गरज आहे. यासाठी संबंधित सर्व संस्थांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे. बरेचदा बालगृह (उउख) आणि दत्तक-प्रक्रियेसाठी निर्माण केलेल्या विशेष संस्थांचा (स्पेशल अॅडॉप्शन एजन्सीज, डअअ) असा समज असतो, की मोठी मुले दत्तक घ्यायला कोणी तयार नसते. तो प्रथम बदलला पाहिजे. दत्तक-प्रक्रियेतली कोणती जबाबदारी कोणाची आहे याबद्दलही ह्या संस्थांमध्ये संभ्रम आहे. आपल्या संस्थेत पुरेशी मुले दिसली नाहीत, तर आपल्याला मिळणारा निधी कमी होईल अशीही एक छुपी भीती असते. या सर्व संस्थांशी स्पष्टपणे बोलण्याची गरज आहे. त्यांना वाटणारी काळजी निराधार आहे हे त्यांच्यापर्यंत पोचवले पाहिजे.’’
अर्थात, अशा अनेक अडचणी असूनही अधिकार्यांना आणि संस्था-व्यवस्थापनाला मुलांचे भले व्हावे असे वाटते. मुलांना मदत करण्याची त्यांना मनापासून इच्छा आहे, ही आनंदाची बाब आहे.
व्यवस्थेच्या पातळीवर पद्धतशीर बदल करण्याची गरज
कार्यप्रणालीमध्ये काहीएक बदल घडून येण्याची गरज आहे. त्याचे दूरगामी फायदे निश्चितच होतील.
सुलभक म्हणून जिल्हापातळीवर विशिष्ट अधिकारी नेमणे – जिल्हा बाल सुरक्षा कक्ष (डिस्ट्रिक्ट चाईल्ड प्रोटेक्शन युनिट) ही सरकारी यंत्रणा जिल्हा पातळीवर कार्यरत असते. तिथे दत्तक प्रक्रियेच्या सुलभीकरणासाठी एक अधिकारी नेमण्याची गरज आहे. हे अधिकारी बालगृह आणि दत्तक-प्रक्रियेतील संस्थांसोबत मिळून काम करतील. मूल दत्तक-प्रक्रियेमध्ये आणण्यापासून ते त्याची दत्तक-प्रक्रिया पूर्ण करण्यापर्यंत ते मदत करतील.
उद्दिष्ट ठरवणे – प्रत्येक राज्यातून किती मुले दत्तक-प्रक्रियेचा भाग व्हायला हवीत, हे महिला आणि बाल कल्याण विभागाने निश्चित करावे. बालगृहांमध्ये असणार्या मुलांपैकी 35 % मुले घरच्यांनी सोडून दिलेली किंवा आईवडिलांचे छत्र गमावलेली असतात, असे आमचे निरीक्षण आहे. ही मुले दत्तक-प्रक्रियेचा भाग होऊ शकतात का हे सातत्याने तपासत राहिले पाहिजे. राज्यानुसार हा आकडा थोडाफार बदलू शकतो.
बालगृहातील नियम बदलणे – बालगृहात राहत असूनही मूल दत्तक-प्रक्रियेमध्ये येऊ शकलेले नसेल, तर त्याची कारणे देणे बालगृहांना अनिवार्य केले पाहिजे. बालगृहात किती मुले आहेत यापेक्षा किती मुले दत्तक-प्रक्रियेचा भाग आहेत यावरून बालगृहांचे मूल्यमापन व्हावे. ज्या मुलांचे नातेवाईक त्यांना भेटायला येतात, येऊ शकतात, फक्त अशीच मुले बालगृहात राहणे अपेक्षित आहे; इतर मुले दत्तक-प्रक्रियेचा भाग व्हायला हवीत, हे त्यातून व्यवस्थापनावर बिंबवले जाईल.
कायद्यांमध्ये बदल – बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियमामध्ये बदल करण्याची गरज आहे. ज्या मुलांना त्यांच्या घरचे, पालक, नातेवाईक भेटायला येत नाहीत किंवा त्यांनी संबंध तोडले आहेत, अशी मुले दत्तक-प्रक्रियेमध्ये यावीत, जेणेकरून त्यांना त्यांचे कुटुंब मिळू शकेल. ह्या दृष्टीने कायद्याचे सक्षमीकरण होण्याची गरज आहे.
आम्ही तीन दत्तक-पालकांनी 2019 मध्ये ‘व्हेअर आर इंडियाज् चिल्ड्रन’ (डब्ल्यूएआयसी) ह्या संस्थेची स्थापना केली. प्रत्येक निराधार मूल हे दत्तक-प्रक्रियेचा भाग व्हावे हे संस्थेचे ध्येय आहे. ह्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही खालील मुद्द्यांवर काम करतो.
1. तंत्रज्ञानाच्या मदतीने दत्तक-प्रक्रियेतील विविध घटकांसोबत काम करणे
2. नियम आणि कायदे-बदलासाठी व्यवस्थेवर दबाव आणणे
3. दत्तक-प्रक्रियेसंदर्भात समाजात जागरूकता निर्माण करणे
1. विविध बालगृहांमध्ये असलेल्या मुलांची माहिती गोळा करून त्यातली दत्तक-प्रक्रियेमध्ये येऊ शकणारी मुले तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ओळखली जातात. अशा मुलांची यादी तयार झाली, की त्यांची सर्व कागदपत्रे गोळा करणे, नियमांची पूर्तता करणे, यासाठी प्रयत्न केले जातात. आजवर संस्थेने अशा 4000 हून अधिक मुलांचा प्रश्न सोडवला आहे.
2. अधिकाधिक मुले दत्तक-प्रक्रियेत यावीत ह्यासाठी कायद्यांमध्ये बदल होण्याची गरज आहे, हे ओळखून डब्ल्यूएआयसी विविध सरकारी संस्थांसोबत काम करते. येणार्या समस्या तेथील तज्ज्ञ व्यक्तीपर्यंत पोचवल्या जातात.
3. समाजात या सर्व प्रक्रियेसंदर्भात जागरूकता निर्माण करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. एखादे मूल घरच्यांनी सोडून दिले किंवा ते अनाथ झाले, तर नक्की कुठे आणि कसा संपर्क साधावा हे प्रत्येक नागरिकाला माहिती असणे गरजेचे आहे. अशा मुलांना लोक जवळपासच्या निवाराकेंद्रात नेऊन सोडतात. ही संस्था दत्तक-प्रक्रियेशी संबंधित संस्थांपैकी नसली, तर ते मूल दत्तक-प्रक्रियेत येण्याची शक्यता खूपच कमी असते. या सगळ्याबद्दल आम्ही जनजागृती करतो. प्रत्येक मुलाला कुटुंब मिळणे हा त्याचा अधिकार आहे, हा विचार समाजापर्यंत पोचवण्याचा आमचा प्रयत्न असतो.
मोठी मुले दत्तक घेताना
मोठी, म्हणजे 18 वर्षांपर्यंतची, मुले दत्तक घेणे आपल्या देशात कायदेशीर आहे. बाळ दत्तक घेण्याबद्दल आपण बरेचदा ऐकलेले असते. मात्र भारतात दत्तक-प्रक्रियेसाठी उपलब्ध असणार्या सर्व मुलांमध्ये मोठ्या वयाच्या मुलांचा विचार सहसा होत नाही. खरे तर ह्याही मुलांना त्यांचे स्वतःचे घर मिळायला हवे.
आता आता 10 वर्षांपर्यंतच्या मुलांचा विचार काही जण करू लागले आहेत; पण त्यापुढच्या वयाच्या मुलांना घर मिळणे राहूनच जाते. खरे तर कायद्यात तशी सोय आहे. त्याही मुलांसोबत पालकांचे गहिरे नाते निर्माण होऊ शकते, त्यांनासुद्धा स्वतःचे – आयुष्यभराचे असे कुटुंब हवे असते, हे लक्षात येत नाही आणि ही मुले आधार-संस्थांमध्येच झुरत राहतात.
मोठी मुले दत्तक घेणार्या अनेक कुटुंबांशी माझा संवाद चालू असतो. त्यातून जाणवलेले काही मुद्दे पाहू.
1. मुलाला तुमच्यापेक्षाही अधिक चिंता असते
भारतात राहणार्या एका आंतरदेशीय जोडप्याने बर्याच प्रयत्नांती एका 8 वर्षांच्या मुलाला दत्तक घेतले. घरी गेल्यापासून रोजच तो ‘मला परत जायचे आहे’ म्हणायचा; पण असे काही ऐकायला मिळेल, हे त्या जोडप्याच्या ध्यानीमनी नव्हते. मात्र हळूहळू त्यांच्या लक्षात आले, की ‘आपण ह्यांना खरेच हवे आहोत ना’ याची तो खात्री करून घेत होता! त्यांनी शांतपणे, धीराने घेतले, तेव्हा तो रुळला. सुरुवातीला मुले असे म्हणतातही; त्यात नवीन असे काहीच नव्हते.
नवीन कुटुंबात जाताना मुलाला बेचैन वाटते, आपण ह्यांना आवडू की नाही याचीही चिंता असते; मग ते मूल 2 वर्षांचे असू दे किंवा 12 वर्षांचे. नव्या पालकांची पुरेशी ओळख नसते, त्यांच्यावर किती विश्वास टाकावा याचा अंदाज नसतो. तुम्ही त्यांना आयुष्यभर सांभाळणार का नाही, अशी काळजी मन कुरतडत असते. ही काळजी निरनिराळ्या प्रकारे व्यक्त होते. ती बोलत नाहीत, निराश असतात, त्यांना राग येत राहतो, ती अकांडतांडव करतात… आपण यांना खरेच हवे आहोत ना, हे ती तपासत राहतात.
या सगळ्या काळात पालकांनी शांत, समंजस, सौम्यपणे वागायला हवे. यामध्ये निराश झालात, तर स्वतःसाठी थोडा वेळ घ्या, मग परत या आणि शांतपणेच वागा. मूल वेड्यासारखे करत असले, तरीही! तुम्ही त्याला दूर लोटणार नाही, अशी खात्री त्याला वाटू दे.
2. मुलाला आधीच्या सवयी बदलायला जरा वेळ द्या
एका 12 वर्षांच्या मुलीला दत्तक घेतल्यावर सुरुवातीला काही दिवस ती फक्त टीव्ही पाहत राही. तिला दुसरे काहीही करायचे नसे. एक तर बर्याच मुलांना आधारगृहात फार काही करायला वाव नसतो, त्यामुळे तशी सवयही नसते. टीव्ही बघत राहिले, म्हणजे तिला तिच्या आयुष्यात घडणार्या मोठ्या बदलांसंबंधी विचार करणे टाळता येई. मग आई ह्याविषयी इतर दत्तक-पालकांशी बोलली. मुलीला सांगून सांगून हळूहळू ह्या सवयी बदलायला लावल्या. ठरावीक वेळी अभ्यास करणे, खेळायला जाणे, टीव्ही पाहण्याच्या वेळेवर मर्यादा घालणे वगैरे. या सगळ्याला मुलीने भरपूर विरोध केलाच; पण कालांतराने तिला इतर गोष्टींमध्ये गोडी वाटायला लागली, शाळाही आवडायला लागली.
मुले आधारगृहात राहत असताना त्यांना लागलेल्या काही सवयी, तिथल्या वागण्याच्या तर्हा घरी योग्य वाटणारही नाहीत कदाचित; पण धीर धरा. तुमच्या प्रेमाने, आधाराने मूल हळूहळू कुटुंबात सामावून जाईल. त्याची वागणूक, त्याच्या सवयी सुसंगत होतील. त्याला काही काळ जावा लागेल. इतर दत्तक-पालकांशी बोललात, तर तीही तुम्हाला हेच सांगतील, की शेवटी मुले पालकांसारखी वागायला लागतात.
3. मुलाचे बोलणे ऐका
मूल घरी येते, तेव्हा त्याला आधीचे कायकाय आठवत असते. तिथली मुले, तिथल्या ताया, तिथल्या गोष्टी. माझी मुलगी चौथ्या वर्षी घरी आली. ती कायकाय सांगायची. ते आधारगृहामधले आहे का त्या आधीचे ते आम्हाला कळत नसे; पण आम्ही तिला हवे ते, हवे तेव्हा बोलू द्यायचो.
जरा मोठ्या मुलांना त्यांच्या आधीच्या घराबद्दलही आठवत असते. त्यांना हवे तेवढे बोलू द्या. त्यांचे बोलणे बंद करू नका. तुमच्या प्रश्न विचारण्यातही सहजता, हळुवारपणा असू दे. त्यांना उत्तरे द्यायची असतील, तर ठीक. त्यांना त्यांच्या गतकाळाच्या आठवणी येणारच. त्याचा अर्थ पालक म्हणून स्वतःशी जोडत राहू नका.
4. शिक्षणाचा वेग मुलाला सहज झेपेल एवढा राहू द्या
एका कुटुंबाने एक मुलगा असताना दुसरी मुलगी दत्तक घेतली होती. दोघांना एकाच शाळेत घातले होते. शाळा चांगली नावाजलेली होती. त्यांचा शालेय अभ्यासावर विशेष भर होता. मुलाला ती शाळा आवडायची. त्याचे तिथे छान चाललेले होते; पण मुलीचे सूर काही जुळेनात. मुलीच्या शिक्षणात राहून गेलेला काही भाग भरून काढायला जरा वेळ द्यावा लागेल, काही गोष्टी परत शिकाव्या लागतील, तिला तिच्या वेगाने शिकवावे लागेल हे त्या शाळेत होईना. मग आईने तिच्यासाठी असा समग्र विचार करणारी दुसरी शाळा शोधली. शैक्षणिक दर्जाइतकेच महत्त्व मुलाच्या विकासाला द्यायला हवे. पुढे करिअर ठरवतानादेखील त्यांनी मुलीच्या आवडीनिवडीशी सुसंगत मार्ग शोधला.
मुलांना पाहिजे तशा शैक्षणिक संधी त्यांना आधारगृहात मिळालेल्या नसू शकतात. त्यामुळे लहानपणापासून कुटुंबात वाढलेल्या मुलांइतकी शैक्षणिक पातळी कदाचित ती गाठू शकणार नाहीत. इतरांशी तुलना करण्यापेक्षा, मूल आत्ता जिथे आहे तिथून त्याला सुरुवात करू दे. त्याची क्षमता कळायला त्याला थोडा वेळ द्या, थोडा अवकाश द्या आणि थोडी मदतही करा.
शिक्षण ही स्पर्धा नव्हे. आपण आज ते तसे करून ठेवले आहे. गरज पडली, तर काही वर्षे मुलाला घरीच शिकवा. मुलाची गरज आणि वेग जाणून घेऊनच त्याला शिकवा. स्पर्धेला महत्त्व देणार्या शाळेपेक्षा शिकायला महत्त्व देणारी शाळा निवडा.
5. तुम्हाला गरज वाटेल तिथे इतरांची मदत घ्या
एका कुटुंबाने मुलगी दत्तक घेतली. तिला वाढवण्यात त्यांना आजीआजोबांची मदत घ्यायला नको वाटत होते. आजीआजोबा काही म्हणतील आणि ती दुखावली जाईल अशी त्यांना भीती वाटे. बरेचदा इतरही काही कारणांनी अशी मदत उपलब्ध नसते. अशा वेळी मदतनीस ठेवण्याचा जरूर विचार करावा. मुलाशी भावनिक बंध निर्माण होण्याचा दृष्टीने त्यांना शक्य तितका वेळ तुमच्या सोबत असू दे; पण त्यांना सांभाळायला, शिकवायला माणसे ठेवलीत, तर तुम्हाला मदतच होईल.
मोठ्या मुलांना दत्तक घेताना समुपदेशक सहजासहजी मिळत नाहीत. त्यामुळे दत्तक-पालक एकमेकांची मदत घेतात. त्यांच्याशी बोलत असताना, ‘असे माझाही मुलगा करत असे’, ‘हो, हे नॉर्मल आहे’ अशा वाक्यांचा आधार मिळू शकतो. मुलाच्या वाढीच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर तो आवश्यक असू शकतो.
शेवटी आपल्यासाठी सारी दुनिया समोर असते; पण मुलासाठी फक्त आपणच असतो. आपल्या आजूबाजूला, माहितीत, ओळखीत अशी मुले किंवा दत्तक घेऊ इच्छिणारी जोडपी असल्यास त्यांच्यापर्यंत तुम्ही ही माहिती पोचवा. निदान या प्रश्नाबद्दल, त्यातील गुंतागुंतीबद्दल आपापल्या गटामध्ये, मित्रपरिवारात बोलता येईल. कदाचित आपली छोटीशी कृती एखाद्या मुलाचे आयुष्य बदलू शकेल!
स्मृती गुप्ता

smriti@waic.in
‘व्हेअर आर इंडियाज् चिल्ड्रन’ (WAIC https://waic.in/) संस्थेच्या सहसंस्थापक. विशेष गरजा असणारी, वयाने मोठी मुले दत्तक-प्रक्रियेत यावीत म्हणून प्रयत्नशील असतात.
अनुवाद : सायली तामणे
नीलिमा सहस्रबुद्धे
