प्रीती पुष्पा-प्रकाश

2015 मध्ये पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये रीतसर नोंदणी करून माझी प्रसूती झाली. तोवर वाचलेलं भरपूर होतं. काय करायचं काय नाही, काय श्रेयस, हे मनात बर्‍यापैकी पक्कं होतं. त्यातलं एक म्हणजे नैसर्गिक (‘नॉर्मल’ या अर्थानं) प्रसूती होण्यासाठी शक्य तितका प्रयत्न करायचा आणि दुसरं म्हणजे जागतिक आरोग्य संस्थेनं (डब्ल्यूएचओ) सांगितल्याप्रमाणे बाळाला पहिले सहा महिने आईच्या (म्हणजे माझ्या) दुधाशिवाय काहीही द्यायचं नाही. द ला लेशे लीगचं (The La Lache League https://llli.org/) ‘द आर्ट ऑफ ब्रेस्टफीडिंग’ हे माझं विशेष लाडकं पुस्तक.

या सगळ्या अभ्यासातून आणि दीनानाथमधील लॅक्टेशन कन्सल्टंट डॉ. विशाखा हरिदास यांच्याकडून आईच्या दुधाविषयी, स्तनपानाविषयी आणि दूध जास्त झालं तर त्याचं काय करायचं याबद्दल चांगली माहिती कळली होती. आपल्यावर ‘ती’ वेळ आली तर काय करायचं हे स्पष्ट होतं.

कधीकधी बाळ काही तास सलग दूध मागत नसे. अशावेळी स्तन दुधाने भरून जायचे. कडक व्हायचे. दुखू लागायचे. पाझरू लागायचे. ‘ती’ वेळ येऊन ठेपली म्हणायची! आता वेगळ्या रुटीनची गरज होती. स्तन भरले आणि बाळ मागत नसेल, तर हातानं किंवा ब्रेस्ट पंप वापरून ते दूध काढून ठेवायचं.

एरवी आपल्या बाळाला स्तनपान करत असलेली पण कामासाठी बाहेर पडणारी आई हे काढून ठेवलेलं दूध फ्रीजमध्ये साठवून ठेवू शकते. तिच्या माघारी घरातलं कुणी ते बाळाला देऊ शकतं. पण आमच्या बाबतीत तसं नव्हतं. बाळानं मागितलं, की द्यायला मी घरीच होते. मग ह्या जास्तीच्या दुधाचं काय करायचं?

2011 मध्ये दीनानाथमध्ये ‘ब्रेस्टमिल्क बँक’ सुरू झाली होती. काढलेलं दूध साठवायचं कसं याबद्दल आम्हाला माहिती दिलेली होती. नुकत्याच बाळंत झालेल्या आया दूध द्यायला हॉस्पिटलपर्यंत सहज येणार नाहीत ही अडचण लक्षात घेऊन ‘पिकअप’ ची सोय बँकेकडूनच करण्यात आलेली होती. दूध साठल्यावर त्यांना फोन करायचा. दूध घ्यायला माणूस ‘कोल्ड बॉक्स’ घेऊन घरी यायचा. भरलेल्या बाटल्या देणं आणि रिकाम्या बाटल्या घेणं, एवढाच कार्यक्रम! पुढे ह्या दुधाची गुणवत्ता-चाचणी वगैरे होऊन तिथे असलेल्या शिशू-अतिदक्षता विभागातल्या बाळांसाठी ते वापरलं जाई. कधी काही गंभीर कारणानं या रुग्णबाळांच्या आयांना दूध नसे. अशावेळी हे बँकेतलं दूध उपयोगी पडे.

अतिदक्षता विभागातल्या बाळांची परिस्थिती अतिशय नाजूक असते. आधीच ते बाळ, त्यात शरीरानं स्वस्थ नाही म्हणून अतिदक्षता विभागात आहे आणि म्हणून आई जवळ नाही. कधी काही कारणानं आईही मोठ्यांच्या अतिदक्षता विभागात… अशी सगळीच परिस्थिती अगदी मेडिकल प्रोफेशनलनासुद्धा आव्हानात्मक असते. अशावेळी बाजारात सर्रास उपलब्ध असलेल्या बेबी फूडपेक्षा ब्रेस्टमिल्क मिळालं, तर बाळांसाठी ते खूपच महत्त्वाचं ठरतं.  

त्यावेळी बँक नवीन होती. मागणी आणि पुरवठा यात तफावत तर होतीच; पण मुळात स्वतःचं बाळ असताना असं स्वतःचं दूध दुसर्‍या बाळांसाठी देणं अनेक घरच्या मोठ्या मंडळींनी कधी पाहिलंही नव्हतं आणि त्यांना ते मान्यही नव्हतं. आधीच पहिलटकरणीची अवस्था जरा नाजूक, म्हणजे शारीरिकदृष्ट्या असेल नसेल; पण त्या काळात घरच्या मोठ्यांचं बर्‍याच बाबतीत ऐकावंच लागतं. ‘माझा अभ्यास झालेला आहे आणि आईपणाचा अनुभव पहिलाच असला, तरीही मी काय करतेय हे मला माहीत आहे’, असं आत्मविश्वासानं म्हणणार्‍या आयांना उद्धट नाही म्हटलं, तरी घरच्यांच्या भुवया नक्की उंचावल्या जातात. अशा परिस्थितीत स्वतःवर आणि नव्यानं निर्माण होणार्‍या ‘बाळ-केंद्री’ व्यवस्थेवर विश्वास ठेवून त्यांच्या मागे उभं राहणं महत्त्वाचं होतं आणि आहे. आता पुण्यात अशा 4-5 ब्रेस्टमिल्क बँका आहेत. त्या याच तत्त्वावर काम करतात. ‘पिकअप’ ची सोयही सर्व बँका देतात. 

दूध जितकं जास्त काढलं जाईल, तितकं जास्त तयार होतं. कमी काढलं, तर कमीच तयार होईल, हे तत्त्व स्तनपानाबद्दल थोडीदेखील माहिती असणारी व्यक्ती जाणते. त्यामुळे स्वतःचं बाळ असताना असं दुसर्‍यांना दूध दिलं, तर आपल्या बाळाला दूध कसं पुरेल, ही भीती पूर्णपणे खोटी ठरते.

बाळासाठी पहिले सहा महिने फक्त आणि फक्त स्वतःच्या आईचं दूध यासारखं सुख नाही. ते काही कारणानं उपलब्ध नसेलच, तर अतिदक्षता विभागातील बाळांसाठी तरी ब्रेस्टमिल्क बँक हा पर्याय हळूहळू उपलब्ध होतोय. स्वस्थ बाळांना आजही हा पर्याय नाहीच. बेबी फूड हा पर्याय कितीही सोयीचा वाटला, तरीही तो न घेतलेलाच बरा! आता तर दत्तक-पालकत्व करतानाही स्तनपान करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ह्या सगळ्या प्रवासात सोबत करणारे, आजवर विशेष प्रकाशात न आलेले लॅक्टेशन कन्सल्टंट, स्तनपान करू बघणार्‍या आणि अडथळ्यांना सामोर्‍या जाणार्‍या मातांसाठी मोठा आधारच म्हणावे लागतील.  

प्रीती पुष्पा-प्रकाश

jonathan.preet@gmail.com

ब्रेस्टमिल्क बँकेविषयी अधिक जाणून घ्यायचे असल्यास दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या डॉ. विशाखा हरिदास (9270367773) यांना संपर्क साधता येईल.