ऋतुजा जान्हवी
मला माहीतच होतं की मी दत्तक आहे. गुपित नव्हतं ते. अगदी सहज समजलं मला. आई नेहमी सांगायची, की मला संस्थेतून घरी आणलं तो क्षण म्हणजे तिच्या सर्वांत गोड आठवणींपैकी एक. मला एकदम भावलं ते!
मी दत्तक आहे ह्याचं कधीच काहीच वाटलं नाही मला. आहे तर आहे! लोकांना आश्चर्य वाटतं मी असं सांगितलं की. काही प्रश्न मला नेहमी विचारले जातात. ‘तुला कधी समजलं तू दत्तक आहेस?’ ‘तुला जन्मदात्यांना भेटायची इच्छा नाही का?’ ‘नाही, तर निदान ते कोण आहेत हे जाणून घ्यायचं नाही का?’ माझं उत्तर नेहमीच ‘नाही’ असतं.
हवं तर 18 पूर्ण झाल्यावर तू जन्मदात्यांचा शोध घेऊ शकतेस, असं आईनं मला मी 10-12 वर्षांची होते तेव्हा सांगितलं होतं. त्यावर मी म्हणाले होते, ‘‘का?’’ आताही तेच म्हणते. त्या वाटेनं जाण्यात मला कधीही रस नव्हता. आहे तिथे मी खूश होते, माझे आईवडील माझेच होते, त्यांनी मला जन्म दिलेला असो वा नसो.
कुटुंब म्हणजे रक्ताची नाती असं अजूनही वाटतं लोकांना. ते खरं नाही. हे रक्ताच्या नात्यांवर जोर देणं कमी केलं पाहिजे, असं वाटतं मला. मित्रांमध्ये, पाळीव प्राण्यांमध्ये… कुटुंब कुठेही सापडू शकतं.
माझं बालपण चारचौघांसारखंच होतं, असंच वाटतं मला. काहीच वेगळं वाटलं नाही. आईबाबा मोकळ्या विचारांचे असल्यानं दत्तक असण्याच्या विचारानं मला कधीच टोचलं नाही. त्या गोष्टीला काही महत्त्वच दिलं नव्हतं मी. इतर लोक मात्र ह्याविषयी इतकं आभाळ कोसळल्यासारखं बोलतात, की कधीकधी वाटतं, आपण जरा तरी गांभीर्यानं घ्यायला हवं होतं की काय हे! आईबाबांना काही फरक पडत नव्हता; पण इतरांना ह्याबाबतीत अनेक ‘हँग-अप्स’ होते. त्यांच्या मते मूल दत्तक घेणं आणि मूल जन्माला घालणं हे सारखं नव्हतंच.
मी चार वर्षांची असेन. मला लहान बहीण हवी होती. लवकरच आम्ही अजून एक दत्तक-मुलगी घरी आणली. मी खूश! तिचं माझ्यासारखं नव्हतं पण. दत्तक असण्याबद्दल तिला खूप प्रश्न होते. तिला अशा काही गोष्टींचं कुतूहल होतं ज्यांचा मी फारसा विचारही केलेला नव्हता. त्यामुळे प्रत्येक दत्तक-मूल आपल्या दत्तक असण्याकडे वेगवेगळ्या प्रकारे पाहतं हे माझ्या लक्षात आलं.
दत्तक घेणं ही किती सुंदर गोष्ट आहे. समाजात अजूनही त्याकडे एक डाग म्हणून पाहिलं जातं. मला ही भावना चिरडून टाकावीशी वाटते! कोलकाता-बलात्काराच्या आणि इतर अशा बातम्यांवरून मी आणि माझी बहीण बोलत होतो. आम्हाला ह्या जगात मुलं जन्माला घालायची नाहीयेत. अशा परिस्थितीत दत्तक घेणं किती सयुक्तिक आहे! कितीतरी मुलांना कुटुंबाची गरज आहे.
गंमत बघा! तीसहून अधिक वर्षांपूर्वीही माझे आईबाबा अगदी असाच विचार करायचे!
ऋतुजा जान्हवी

rjanhavi@gmail.com
चित्रकार आणि कॉमिक आर्टिस्ट.
