अमोल कानविंदे
इरावती आता 10 वर्षांची झाली आहे. ती 5-6 वर्षांची झाली, की तिला या दत्तक-प्रक्रियेबद्दल सांगा असा भारतीय समाजसेवा केंद्राचा (BSSK) आग्रह होता. घरी येण्याआधी ती तिथे होती. बर्याच वेळेला सांगायचं ठरवूनदेखील आम्ही तिच्याशी याबद्दल काही बोलू शकलो नाही. नेमकं कारण नाही सांगता येणार; पण आम्ही तिच्याशी बोलायला जरा वेळ घेत होतो एवढं खरं. या गोष्टी समजण्याचं तिचं वय नाही किंवा एवढ्या लहान वयात ही गोष्ट सांगणं बरोबर होणार नाही असं कदाचित तेव्हा आम्हाला वाटलं असावं.
इरा मोठी होत गेली, तिचं ‘फ्रेंड-सर्कल’ वाढत गेलं. मग मात्र आम्हाला वाटू लागलं, की सांगण्याची वेळ आलेली आहे. मी आणि मयुरी, माझी पत्नी, एकमेकांशी या बाबतीत बोलत होतोच; पण इराला सांगायला जीव धजत नव्हता. आता आमच्याच मनात प्रश्नांचं काहूर उठलं होतं. इरा हे सगळं कसं स्वीकारेल, कोणते प्रश्न विचारेल, तिला दुःख होईल का… एखाद्या लहान मुलीला वयाच्या नवव्या-दहाव्या वर्षी अचानक कळलं, की इतकी वर्षं आपण ज्यांच्याबरोबर राहतोय ते आई-बाबा हे आपले जन्मदाते नाहीत, तर त्या बालमनावर काय आघात होईल, या कल्पनेनंच आम्ही वेळ घेत होतो. बाकी तिला काय आणि कसं सांगायचं हा प्रश्न नव्हताच; त्याची ‘रिहर्सल’ झालेलीच होती. मयुरीच्या मावशीनं आम्हाला तिचे अनुभव सांगितले होते. तिनेही 30 वर्षांपूर्वी एक मुलगी दत्तक घेतली होती. आता तिचे लग्न होऊन ती छान संसार करते आहे. मावशीचे अनुभव ऐकून आम्हाला बळ मिळालेले होते. आमच्या मोठ्या मुलाला, वरदला, याची थोडीफार कल्पना होती, कारण इरा घरी आली तेव्हा तो 5 वर्षांचा होता. तेव्हा त्याला दत्तकप्रक्रियेबद्दल काही माहीत नसले, तरी कालांतरानं या गोष्टीची काहीशी समज आलेली होती. त्यामुळे फक्त इरालाच नव्हे, तर वरदलासुद्धा समजेल अशा भाषेत आणि अशा वातावरणात सांगणं आवश्यक होतं.
शेवटी एक दिवस इरा आणि वरदला जवळ बसवलं. आधी दोघांना कृष्णाची गोष्ट सांगितली. कृष्णाचा जन्म वेगळ्या आईच्या पोटी झाला; पण त्याचा सांभाळ मात्र यशोदेनं केला. त्यामुळे आजही यशोदा हीच कृष्णाची आई म्हणून ओळखली जाते, वगैरे. आईला आणि मला घरी एक मुलगा अन् एक मुलगी अशी दोन मुलं हवी होती. पहिला मुलगा होता म्हणून मग आम्ही दुसरी मुलगी म्हणजे तुला घरी आणलं इरा. अशा प्रकारे आम्ही गोष्टी समजावत गेलो. हे सगळं सांगत असताना इरा निर्विकार चेहरा ठेवून ऐकत होती खरी; पण तिच्या डोळ्यांत जरासं पाणी तरळलं होतं. जराशी हादरली होती ती. अगदी आईच्या कुशीत शिरून तिनं हे सगळं ऐकलं. मग मयुरीला म्हणाली, ‘‘म्हणजे मी तुझ्या पोटातून आले नाही? म्हणजे तू माझी खरी आई नाही?’’
मयुरीनी इराला पोटाशी धरलं आणि म्हणाली, ‘‘खरी आई आणि खोटी आई असं काहीच नसतं. आई ही आईच असते. इतकी वर्षं तू आम्हाला आई-बाबा म्हणतेस, यापुढेही आम्हीच तुझे अन् वरदचे आई-बाबा आहोत. काहीही बदललेलं नाही. सगळं आधीसारखंच असणार आहे. तू जशी होतीस, जशी वागायचीस, तसंच ह्यापुढेही राहायचं. हे घर, आम्ही दोघं अन् वरद सगळं तुझंच आहे.’’ तिनं हे सगळं आता छान स्वीकारलंय.
इरा घरी आली, तेव्हा ती 15 महिन्यांची होती. त्यामुळे तिचे अगदी लहानपणीचे फोटो आमच्याकडे नाहीत. वरदचे फोटो बघताना ती तक्रार करायची. मी एवढी असताना माझे फोटो का काढले नाहीत, माझा पहिला वाढदिवस का साजरा केला नाही… वगैरे वगैरे. पण आता ती हे प्रश्न विचारत नाही. फक्त माझे लहानपणी काढलेले फोटो दाखव एवढंच म्हणते. आणि फोटो दाखवले की खूश होते. आपण फार वेगळे नाही आहोत हे तिला समजतं.

इरा आता छान चित्रे काढते. अभ्यासातही तिला बर्यापैकी गती आहे; पण जास्त आवडता विषय ड्रॉईंग. अगदी सातव्या वर्षीच तिला तिची स्वतःची बेडरूम मिळाली. मयुरी इंटिरियर डिझाइनर असल्यामुळे तिनं खोली एकदम छान सजवून दिली. आता बया एकटी झोपायला शिकली आहे. किंबहुना एकटी झोपणार असशील तरच तुझी रूम करून देणार हे सांगितल्यावर एक महिना आपल्या खोलीमध्ये एकटी झोपायची. मग खोली तयार झाल्यावर तर आभाळ दोन बोटं उरलं होतं. सगळ्या मैत्रिणींना बोलवून आपली रूम, लावलेला वॉलपेपर, आपलं कपाट, स्टडी-टेबल, सगळं सगळं कौतुकानं दाखवलं. आता तिचे काहीही प्रश्न उरले नसावेत असं आत्ता तरी वाटतं. कारण त्याबद्दल ती आता काही विचारत नाही. तिला कळलं त्यानंतर अगदी थोडे, एक-दोन दिवसच जरा वेगळी वागल्यासारखी वाटत होती. आता पुन्हा आधीसारखीच रुळली आहे. तसाच हट्ट, आरडाओरडा, दंगामस्ती… सगळं कसं अगदी यथासांग, यथाशक्ती चालू आहे. तिच्या बोलण्या-वागण्यात कधीही हा विषय येत नाही. आणि आम्हीदेखील तो काढत नाही. वरदच्या वागण्यातही कधी वेगळेपण आलं नाही. मत्सर जाणवला नाही. पूर्वीही नव्हताच. खरं सांगायचं झालं, तर इराच कधीकधी इर्षेनं वागायची. म्हणजे वरदचं कधी कौतुक केलं, की मुद्दाम आपली चित्रं घेऊन यायचं, आमच्या नजरेत येण्यासारखं वागायचं, कधी घट्ट मिठी मारायची, माझ्या अंगावर चढून बसायचं हे सगळं ती अगदी लहान असल्यापासून करायची, अजूनही हे चालूच आहे. आम्हीदेखील तिला थांबवायचा प्रयत्न केला नाही. करणार नाही. आत्ता मुलं लहान आहेत, आमच्याजवळ आहेत; पण काही काळानं आणखी मोठी होतील. मग हे क्षण असे पुन्हा येणार नाहीत.
अमोल कानविंदे

kanvindeamol@gmail.com
मार्केटिंग क्षेत्रात कार्यरत. वाचन व प्रवास हे त्यांचे आवडीचे विषय आहेत.
 
 
             
             
            
