राजश्री देवकर
मोठ्या मुलांच्या दत्तकत्वाचा विचार करताना मला हमखास आठवतात ती साई आणि रमा ही भावंडं.
कोविड 19 चा काळ, त्याची भयावहता आपण सगळ्यांनीच अनुभवली आहे. अनेकांनी त्या काळात आपले प्रियजन गमावले. त्याच काळात एक दिवस पोलीस 7 वर्षांचा साई आणि 5 वर्षांच्या रमाला भारतीय समाज सेवा केंद्रात (बीएसएसके) घेऊन आले. नुकतीच त्यांची आई कोविडने गेली होती. आणि त्यांचं असं आता कोणीच उरलेलं नव्हतं. जे घडलं होतं त्याचा धक्का, भीती, आता आपलं काय होणार ह्याची काळजी, हे सारं त्यांच्या चेहर्यावर दिसत होतं. संस्थेतली एक कार्यकर्ती मुलांशी हळुवारपणे बोलली. ‘काळजी करू नका, आम्ही आहोत न!’ असं म्हणून तिनं त्यांना धीर दिला. आम्ही त्यांना संस्थेत दाखल करून घेतलं. त्यांना सांभाळणार्या ‘आई’ही त्यांच्याशी जिव्हाळ्यानं वागत होत्या.
हळूहळू मुलं मोकळी होऊ लागली. सगळ्यांशी हसू-बोलू लागली. काय घडलं ते सांगू लागली. साईनं आईबद्दल, तिच्या मृत्यूबद्दल सांगितलं. ते कुठे राहायचे तेही कार्यकर्ता-ताईला सांगितलं. त्याच्या बोलण्यातून काही एक माहिती मिळाल्यानं आम्हाला आशा वाटू लागली. त्यानं सांगितलेल्या पत्त्यावर एक कार्यकर्ती साईबरोबर गेली. तिनं तिथे आजूबाजूला चौकशी केली. पण कुणालाही त्यांच्या नातलगांबद्दल काही माहिती नव्हती. घरात शोधाशोध केली, तेव्हा तिला रमाचा जन्मदाखला तेवढा मिळाला.
बाल कल्याण समितीकडे ह्या केसची आम्ही सविस्तर मांडणी केली. वर्तमानपत्र आणि टीव्हीवर मुलांबद्दल माहिती प्रसिद्ध केली; पण काहीही प्रतिसाद मिळाला नाही. पोलिसांनाही काही तपास लागला नाही. मधल्या काळात डॉक्टरांनी साईची ‘बोन एज टेस्ट’ करून त्याची जन्मतारीख काढून दिली होती. तो सहा वर्षांपेक्षा बर्यापैकी मोठा होता. त्यामुळे त्याला बीएसएसकेमध्येच ठेवणं शक्य नव्हतं. त्याची पाठवणी बाल संगोपन केंद्रात झाली. त्यामुळे भावंडांची ताटातूट झाली. मात्र पुढे इतर कायदेशीर सोपस्कार पार पडले, आणि मुलांना दत्तक-कुटुंबात जाण्याचा मार्ग बाल कल्याण समितीनं मोकळा केला. भावंडं एकत्र राहावीत ह्यासाठी ती एकाच कुटुंबात दत्तक जावीत असं कायदा सांगतो. त्यामुळे साई आणि रमाची ताटातूट काही काळापुरतीच ठरली.
प्रत्येक मूल त्याच्या हक्काच्या घरात वाढावं हे आमच्या संस्थेचं ब्रीदवाक्य आहे. त्यामुळे याही मुलांना आपलं प्रेमाचं कुटुंब मिळावं अशी आमची आंतरिक इच्छा होती. त्यासाठी आम्ही पुढची प्रक्रिया सुरू केली. ‘केअरिंग पोर्टल’वर एका कुटुंबानं दत्तक-प्रक्रिया पूर्ण करून ह्या मुलांचं पालकत्व स्वीकारण्याची इच्छा दर्शवली. संस्थेची कार्यकर्ती सातत्यानं त्या कुटुंबाच्या संपर्कात होती. मुलं मोठी असल्यानं पालकांची त्या प्रकारे मानसिक तयारी व्हावी म्हणून तिनं त्यांची समुपदेशन-सत्रं घडवून आणली. अशी इतर काही उदाहरणं सांगितली. कुठली आव्हानं असू शकतात त्याबद्दलही त्यांच्याशी बोलली. एकंदर चार वेळा बोलून त्यांचा इरादा पक्का आहे न, त्यामागची कारणं सच्ची आहेत न, हे तिनं जाणून घेतलं. तिचं पूर्ण समाधान झाल्यानंतर तिनं ह्या दत्तक-प्रक्रियेला हिरवा झेंडा दाखवला.
मुलं तशी मोठी होती; विशेषतः साईला जुन्या आठवणी त्रास देत होत्या आणि मध्ये काही काळासाठी तो दुसर्या संस्थेतही होता. तो हे सगळं कसं स्वीकारेल, ह्याची आम्हाला जरा चिंता होती. त्यामुळे ती कार्यकर्ती त्याला वेळोवेळी जाऊन भेटली, त्याला समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्याच्याशी बोलल्यावर तिच्या लक्षात आलं, की त्याला बीएसएसकेमध्ये परत यायचं आहे आणि कुटुंबातही जायचं आहे. त्याचं बोलणं ऐकून आम्हाला सगळ्यांना दिलासा मिळाला. सगळं तसं सुरळीत चाललेलं होतं. भावा-बहिणींचं नातं, कुटुंबात असणारे भावबंध, ह्या गोष्टी मुलांपर्यंत पोचवण्यासाठी मानसतज्ज्ञांची मदत घेतली. अनेकदा त्यांची सत्रं झाली. मुलांची मनःस्थिती, त्यांच्या मनात नेमकं काय चाललेलं आहे, हे जाणून घेण्यासाठी ह्या सत्रांचा खूप फायदा झाला.
त्या भावंडांमध्ये खूप प्रेम असल्याचं आम्हाला दिसत होतं. ही आणि अशा इतर गोष्टी आम्ही पालकांपर्यंत पोचवत होतोच. मग आम्ही मुलांची पालकांशी ऑनलाईन भेट घडवून आणली. तो अत्यंत आनंदाचा क्षण होता. मुलं पालकांना स्क्रीनवर पाहून खूप खूश झाली. मुलं आणि पालक, दोघंही एकमेकांना आवडले होते. दोघांनीही आपापला होकार कळवला.
मग प्रत्यक्ष भेट ठरली. मुलं मोठी असल्यानं तीन दिवस भेटायचं ठरलं. पहिल्या दिवशी खेळाच्या माध्यमातून मुलांची पालकांशी ओळख करून देण्यात आली. मुलांच्या मनात स्थान मिळवण्याचं हे चांगलं माध्यम होतं. खरंच त्याची चांगली मदत झाली. पुढचे दोन दिवस मुलं आणि पालक एकमेकांच्या संगतीत होती. ‘दत्तकपूर्व संगोपन’! त्यांचे आनंदी चेहरे पाहून आम्हालाही फार बरं वाटत होतं. तिसर्या दिवशी पालकांचा आम्हाला फोन आला – ‘मुलं मस्त रुळली आहेत, खूप खूश आहेत.’
मग पुढची प्रक्रिया पार पडली.
आम्ही पालकांकडून वेळोवेळी मुलांची ख्यालीखुशाली जाणून घेत होतो. मुलांची भाषा, त्यांचा अभ्यास, त्यांच्या आवडीनिवडी सगळ्याच गोष्टींमध्ये पालकांची भूमिका संयत होती. साई मोठा असल्यानं त्याला जुळवून घ्यायला जरा वेळ लागला. रमा त्यामानानं पटकन रुळली. सुरुवातीला अडचणी आल्या, नाही असं नाही; पण पालकांच्या आणि इतर कुटुंबीयांच्या मदतीनं मुलांनी त्यावर मात केली. साईला खेळात रस असल्याचं दिसल्यावर पालकांनी त्याला ‘स्पोर्ट्स’मध्ये घातलं. तिथे त्यानं चमक दाखवताच त्याला सायकलही घेऊन दिली. त्याला जबाबदारी घेऊन बाहेरची कामं करायला आवडतात, हे लक्षात आलं, तसं छोटी छोटी कामं त्याच्यावर टाकायला सुरुवात केली. त्यामुळे आपण कुटुंबातली जबाबदार व्यक्ती आहोत, असं त्यालाही वाटू लागलं. बाबा घरी नसले म्हणजे त्याच्या वागण्यातून ते जाणवायला लागलं. रमाला नृत्यात रस होता. तिला त्या क्लासला घातलं. करताकरता चौघांमध्ये घट्ट नातं निर्माण झालं.
कधीकधी मुलं जुन्या आठवणींनी सैरभैर झालेली दिसली, तर पालक त्यांना सांभाळून घेत. त्यांच्या मनातलं ऐकून घेत. बोलता बोलता त्यांचं लक्ष दुसर्या विषयाकडे वळवत. कुठे लांबवर चक्कर मारायला जा, गोष्टी सांग, नातलगांना आपल्याकडे बोलाव किंवा आपण त्यांच्याकडे जा अशा वेगवेगळ्या गोष्टींतून त्यांच्या पालकांनी त्यांच्यापुढे नवीन विश्व उलगडलं. मुलांना आपल्या हृदयात आणि आपल्या घरात अलगद सामावून घेतलं.
राजश्री देवकर
rajeshrid5@gmail.com
भारतीय समाजसेवा केंद्र (बीएसएसके), पुणे येथे वरिष्ठ कार्यकारी अधिकारी.
अनुवाद : अनघा जलतारे
भारतीय समाज सेवा केंद्र (बीएसएसके) ही संस्था 1979 सालापासून बालकल्याणाच्या क्षेत्रात काम करते आहे. तेव्हापासून आजवर संस्थेने 0 ते 6 ह्या वयोगटातल्या 6426 मुलांचे संगोपन केले असून त्यापैकी 4861 मुलांना देशात तसेच परदेशात दत्तक-प्रक्रियेतून त्यांचे कुटुंब मिळवून दिले आहे. दत्तक-पालकांना त्यांच्या पालकत्वाच्या प्रवासासाठी तयार करण्याच्या दृष्टीने संस्थेतर्फे प्री आणि पोस्ट अॅडॉप्शन कार्यशाळा ऑनलाईन आणि ऑफलाईन घेतल्या जातात. तसेच मोफत वैयक्तिक मार्गदर्शन व सल्लाही दिला जातो.
संस्थेचे मुख्य कार्यालय पुणे येथे आहे.
संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक : 020 – 26158002 / 26155332 / 26159314
bssk@bsskindia.org www.bsskindia.org
 
 
             
             
            
