प्रदीप फाटक

मी एक मध्यमवर्गीय तरुण. 1975 साली लग्न झालं. नव्या नवलाईचा संसार सुरू झाला. बघता बघता तीन-चार वर्षं भुर्रकन उडाली. आम्ही दोघं पुढच्या चाहुलीची वाट पाहू लागलो. काही प्रश्न आहे की काय असं वाटून एक-दोन गायनॅकॉलॉजिस्टना दाखवलं. त्यांनी दोघांच्या सगळ्या तपासण्या केल्या. पत्नीला ओवॅरियन सिस्ट असल्याचं कळलं, मग त्याचं ऑपरेशन केलं. तेही अगदी निर्घोर पार पडलं. आता डॉक्टरांनी औषधं बदलून दिली. त्या सायकल्स सुरू झाल्या. व्रतं झाली, नवस केले. निरनिराळ्या देवदर्शनाच्या आवृत्त्या झाल्या. मग कुणीतरी ‘नारायण नागबळी’ करायला सांगितला. त्र्यंबकेश्वरी राहून, तीन दिवस व्रतस्थ राहून श्राद्ध करायचं म्हणे. केलं. तेही केलं.

एकमेकांना धीर देत दिवस काढत होतो. उपचार घेत होतो. कुटुंबातलं वातावरण अतिशय प्रेमळ होतं. कधीही कुणी टोमणे मारले नाहीत, की हीन वागणूक दिली नाही. पण हे करून बघा, ते करून बघा, असे सल्ले साहजिकच आमच्या वाट्याला येत. माझा मामा गायनॅकॉलॉजिस्ट आहे. तो म्हणाला, ‘‘अरे, माझ्याकडे या, आपण सगळं बघू, काय प्रश्न आहे, सोडवून टाकू.’’ मग त्याच्याकडे गदगला गेलो. तिथे पुन्हा तपासण्या. एका फॅलोपिअन ट्यूबमध्ये मामाला प्रश्न सापडला. मग तिथेच राहून ती ट्यूब मोकळी करून घेतली. सगळ्यांनी खूप सहकार्य केलं. मामा-मामींनी लाडानं कौतुकानं सगळं केलं.

पुन्हा औषधं, पुन्हा नवीन उपचार, ह्यातच आम्ही बुडून गेलो. मग कृत्रिम गर्भधारणेचे दोन-तीन प्रयोग झाले. आमच्या भावनांचा आता कडेलोट झाला होता. एकमेकांच्या नात्यातही हरवलेपण – तुटकेपण सतावत होतं. कुणी नातेवाईकबाईंनी दत्तकाचा विषय काढला. मग त्या दिशेनं विचार सुरू झाले. त्यातले अनुभवी किंवा अननुभवी लोक सल्ले देत. एव्हाना आमच्या लग्नाला चौदा वर्षं पुरी झाली होती.

इतक्यात अगदी जवळच्या नात्यातल्या एका बहिणीनं स्वत:ची पहिली मुलगी असताना मुलगा दत्तक घेतल्याचं कळलं. त्यांना भेटून दत्तक-विषयातली आणखी माहिती मिळवली. ‘आधीची मुलगी असताना तू का दत्तक घेतलंस’ असं तिला विचारलं. ती म्हणाली, ‘‘मला मूल होऊ शकतं हा काही माझा विशेष गुण नाही. आम्हाला आणखी एक मूल हवं आहे, त्या बाळालाही आईवडील आणि ताई हवी असणार. म्हणून दत्तक घेतलं.’’ 

तिचं वाक्य मला आवडलं. मूल ‘होऊ शकतं’ हा गुण नाही – म्हणजे ‘होत नाही’ हा दोषही नाही; हा विचार करण्याजोगा आहे. मग माझ्या पत्नीच्या डॉक्टरमामांनी खूप प्रयत्न केले. आम्ही मुंबईतल्या श्रद्धानंद आश्रमातून मूल घ्यायला सज्ज झालो. संस्थेनं आम्हाला एक मुलगा दाखवला. पण आमचा निर्णय होईपर्यंत दुसर्‍या जोडप्यानं त्याला पसंत करून घेऊन टाकलं.

मी विचारात पडलो. मुलगा हवा असा विचार होता आमचा; पण मुलग्यांना डिमांड जास्त असते, मुलींना नसते. संस्कृतीतल्या या मुद्द्याचा आम्ही फायदा करून घ्यायचा ठरवला. आम्हाला दोघांना मुलगा-मुलगी यात काहीच फरक वाटला नसता. आम्ही ‘मुलगी हवी’ असं संस्थेत सांगितलं. संस्थेनं आनंदानं एक साडेतीन महिन्यांची मुलगी दाखवली. तीच आमची मानसी. आम्ही तिला बघितल्यावर एका आठवड्यानं ‘ही मुलगी देता येणार नाही’ असा संस्थेचा फोन आला. पण नंतर काय प्रश्न होता तो त्यांचा त्यांनी मिटवला आणि ती आम्हाला मिळाली.

मानसीला बघायला माझ्या वडिलांसोबत एकदा गेलो होतो. संस्थेतली इतर मुलंही तिथे दिसली. माझे वडील म्हणाले, ‘‘अरे, आपल्याला चार मुलं नाही का मिळणार?’’

आपल्याला मूल झालं नाही आणि म्हणून आपण दत्तक घेतोय याची उरलीसुरली ‘गिल्ट’ ह्या वाक्यानं नाहीशी झाली. बरंच झालं. आम्हाला मूल झालं नाही, म्हणून आम्ही दत्तक घ्यायला गेलो. 

रंगपंचमीच्या दिवशी आमच्या जीवनात नवे गोडुले रंग भरण्यासाठी माझ्या पत्नीनं मानसीला ओटीत घेतलं. कायदेशीर कार्यवाही वगैरे होऊन मानसी आमची झाली. तिला घेऊन आम्ही पुण्याला आलो. घर तिच्या स्वागतासाठी सज्ज होतं. रंगपंचमीचं केशरी शिंपण तिच्यावर समारंभपूर्वक केलं. ती तान्हुली-गोडुली मात्र पाळण्यात झोपून गेली होती. अगदी आश्वस्तपणे. इतके दिवस आम्ही जगत होतो; पण मानसीच्या येण्यानं आमच्या घराला, जगण्याला इतका साजरेपणा दिला, की आपण ह्याचीच वाट पाहत होतो, हे आम्हाला दोघांनाच नव्हे तर आईवडिलांसह सगळ्या घरालाच उमजून गेलं.

आमचा सगळा जीवनक्रमच मानसीनं बघता बघता व्यापून टाकला. आमच्या आयुष्यात हा केवढा मोठा बदल होता. सगळं घर मानसीभोवती फिरत होतं. आमच्या लेकीच्या स्पर्शानं आमचं ऊर भरून गेलं. त्यानंतरचे सगळे दिवस मानसीचेच होते. तिच्या बाळलीला, ती हसते कशी, भूक लागली की रडते कशी, तिच्यासाठी लाडानं शिवलेले कपडे, गोजिरवाणे बूट, मोजे, टोपडी, खेळणी… लहान मूल म्हणजे एक वेगळंच विश्व असतं नाही?

इतके दिवस आम्ही काय हरवून बसलो होतो त्याची जाणीव क्षणाक्षणाला होत होती; पण आता मानसी आमची होती, आणि आम्ही तिचे आईबाबा!  

दिवसांना पंख फुटले. पक्षी उडाले. महिन्यांचे वाढदिवस करता करता मानसीचा पहिला वाढदिवस आला. आली तेव्हा उपडीही पडत नव्हती ती. तिथपासून सरकणं, घोडाघोडा करणं, रांगणं, बसणं, धरून उभं राहणं, इवली इवली पावलं टाकणं, आणि एकीकडे गोडुलं बोलणं, आई-बाबा म्हणणं. आता आम्ही तृप्त होतो. चहूदिशांनी तिच्या लीला आमचं आयुष्य समृद्ध करत गेल्या. प्रेमाचा आजवर न मिळालेला वर्षाव आम्हाला दोघांना फारफार हवासा वाटत असे.

जीवन इतकं सुंदर असतं, इतकं हवंसं असतं हे जणू नव्यानं कळत होतं. आयुष्यातले ताणतणाव विरून एक विलक्षण सुखकारकता मानसीनं आमच्या आयुष्यात आणली. ती बालवाडीत जायला लागली आणि एक दिवस म्हणाली, ‘‘आई, माझ्या मैत्रिणीच्या आईच्या पोटात ना अग एक छोटूसं बाळ आहे. मलापण हवं, तू आण ना.’’

पत्नीनं मला हे सांगितलं; ही मानसीची मागणी आपल्याला पुरी करता येणार नाही या निराशेनं थोडं आणि जास्त तिच्या कौतुकानं. यानंतर काहीच दिवसांनी माझ्या पत्नीला दुसर्‍या बाळाची चाहूल लागली. चौदा वर्षं आम्ही वनवास काढला. इतक्या डॉक्टरांनी उपाय करूनही जे साधलं नाही, ते आमच्या चिमुकलीनं सहज केलं. मानसी ‘ताई’ झाली. पुढची गोष्ट कुठ्ल्याही सुखी घराची असते तशीच.

ह्यातून आम्हाला दिसलेली जाणवलेली एक गोष्ट सांगतो. जगात काही लोकांना हवं असूनही मूल होत नाही. ते खूप काळ उपचार घेत, प्रयत्न करत राहतात. जगात काही बाळं आईवडील हवे आहेत अशी असतात. ह्या दोन्ही गरजांची सांगड घालावी. ती बाळंही खूश होतील आणि आईवडील तर सुपरखूश!

तुम्हाला हे सांगतो आहे, कारण त्या गोष्टीला आता चौतीस वर्षं झाली आहेत. मानसी पुण्यातल्या नावाजलेल्या महाविद्यालयात शिकली, पदव्युत्तर शिक्षण घेऊन आपल्या पायावर उभी राहिली. तिचं लग्न झालं. तिची लेक आता पाच वर्षांची आहे. धाकट्या लेकानं डॉक्टर व्हायचा निर्णय घेतला, आणि तो पूर्णही केला आहे. आता त्यानं त्यातल्या उच्चशिक्षणाला सुरुवात केली आहे.

हीच आमची साठा उत्तराची कहाणी – एव्हाना पंचाहत्तरीत आलेली! 

प्रदीप फाटक

paphatak49@gmail.com

निवृत्त व्यावसायिक. हौशी चित्रकार, ट्रेकर आणि संगीतप्रेमी पुणेकर.