प्रांजली लर्च

मी प्रांजली लर्च. मी स्वित्झर्लंडची नागरिक आहे. मात्र माझा जन्म पुण्याचा. दोन वर्षांची असताना माझ्या स्विस माता-पित्यांनी मला इथून दत्तक घेतले. खूप प्रेमळ आहेत आईबाबा. त्यांचे, इतर नातलगांचे मला खूप प्रेम मिळाले; मात्र घराच्या बाहेर मी फारशी रुळू शकले नाही. माझे बालपण, म्हणजे माझी शाळेची वर्षे, खडतर म्हणावी अशी गेली. मी पडले भारतीय वर्णाची, काळीसावळी. माझा रंग आणि माझे स्विस नसणे, ह्या दोन गोष्टींमुळे मला शाळेत खूप चिडवाचिडवी सहन करावी लागली. मी ह्या सगळ्यांपेक्षा वेगळी आहे, ही भावना माझ्या मनात नेहमी घर करून राहिली; आणि वेगळी म्हणजे माझ्यात काहीतरी कमतरता आहे असे वाटत राहायचे. हळूहळू ह्या विचाराने मनात एवढे मूळ धरले, की कुणाला माझ्यात शोधूनही चूक सापडू नये म्हणून मी धडपडत राहिले. झटून अभ्यास केला आणि शिक्षणात उत्तम कामगिरी करून दाखवली. सर्वांशी आस्थेने वागत राहिले. वंशविद्वेष मनाआड करत दादागिरी सहन करत राहिले. ह्या सगळ्यातून माझे व्यक्तिमत्त्व संवेदनशील होत गेले.

वाईट वाटायला लावणारे अनेक प्रसंग आयुष्यात घडले. त्यातले काही कायमचे मनावर कोरले गेले. कॉलेजात असताना माझ्या इकॉनॉमिक्सच्या सरांना माझे प्रांजली हे नावच मान्य नव्हते. लेक्चर सुरू असताना संपूर्ण वर्गासमोर एकदा ते म्हणाले, स्विस नावांच्या शेवटी इ किंवा ए (“e” or, “a”) हे अक्षर असते. आणि म्हणून तुझे प्रांजली हे नाव मी बदलतो आहे. आजपासून मी तुला प्रँशिला म्हणणार आहे. मी प्रिन्सिपल सरांकडे तक्रार करूनही पुढची चार वर्षे ते मला प्रँशिलाच म्हणत राहिले. त्यावरून वर्गातली मुलेही मला शिला ह्या टोपणनावाने हाक मारू लागली. आजही आम्ही मुले एकत्र भेटलो, की मला सगळे शिलाच म्हणतात. हे आठवले, की माझी त्यावेळची हतबलता आठवून मनात निराशा दाटून येते. मी बाळ असताना ज्या संस्थेत होते, तिथे कुणीतरी माझे नाव प्रांजली ठेवले होते. पुढे माझ्या आईबाबांनी माझे तेच नाव राहू दिले. कारण भारतातून त्यांच्यासोबत जाताना इथली म्हणून माझ्याजवळ तेवढीच गोष्ट होती. ती त्यांना माझ्यापासून हिरावून घ्यायची नव्हती. त्यांनी मला प्रेम दिले, माया दिली… त्यातून मी आज आहे तशी घडले!

माझ्या दत्तक असण्याबद्दल आणि त्यामुळे आयुष्यात घडलेल्या घटनांबद्दल मी एवढी शांतपणे कशी बोलू शकते, ते मला माहीत नाही. कदाचित ह्याचे श्रेय माझ्या पालकांनी आम्हा भावंडांना प्रेमाने वाढवले, वेळोवेळी ते आमच्या पाठीशी उभे राहिले, त्याला द्यावे लागेल. असे असले तरी, भारतात येऊन आपली मुळे शोधावीत, इथली संस्कृती जाणून घ्यावी, इथली माणसे अनुभवावीत, अशी फार इच्छा होती. मी करत असलेल्या कामाच्या निमित्ताने ती संधी मला मिळालीही. भारत अनुभवता आला. आपल्यासारखी दिसणारी, असणारी माणसे पाहून खूप आनंद झाला.

प्रांजली लर्च

शिक्षिका. 2020 साली पुण्यातील विद्या व्हॅली शाळेत टीचर एक्सचेंज प्रोग्राम अंतर्गत भारतात आल्या होत्या.

अनुवाद : अनघा जलतारे