अंजनी खेर
फ्रिबात आलेल्या प्रत्येक
परदेशी पाहुण्याला
फ्रिबावासी भिंत दाखवायला नेतात.
तो भिंतीपलीकडे दूऽऽऽरवर बघतो खूप वेळ.
मग फ्रिबाचे नागरिक खोऽऽऽलवर बघतात
पाहुण्यांच्या डोळ्यात.
ते डबडबलेले नसले
तर पाहुण्याचं कौतुक संपतं.
फ्राबीमध्ये प्रत्येक पाहुण्याला ते
त्यांची ‘संरक्षक’ भिंत दाखवतात.
देशाची सारी चिंता, तिटकारा, खंत दाखवण्यासाठी.
पाहुण्याचे डोळे कोरडेच राहिले तर…
देतात पाहुण्याला हाकलून,
शिवीगाळ आणि अपमान करून.
फ्रिबा फ्राबी दोघेही
डोळे छान ओले झाले तर
आदरसत्कार, कौतुक, सन्मानार्थ मेजवानी आणि
डोळ्यात भरतील अशा भेटवस्तूंनी गौरवतात.
प्रवासी परदेशीयांनो,
फ्रिबाफ्राबीच्या प्रवासाला जाताना
कांद्याच्या अर्काची बाटली जवळ ठेवा.
डोळे मस्त डबडबतात.
एरीश फ्रीड

दुसरं महायुद्ध संपल्यावर आधुनिक, हिटलरपश्चात जर्मनीचा इतिहास सुरू होतो. 23 मे 1949 ह्या दिवसापासून. ह्या दिवशी पश्चिम जर्मनीची राज्यघटना म्हणजे ‘मूलभूत’ कायदा (इरीळल ङरु) अस्तित्वात आला.
मात्र हे अर्धसत्य विधान झालं. कारण तिकडे पूर्वेला हिटलरपश्चात जर्मनीचा अजून एक तुकडा होता; वेगळ्याच राजकीय विचारसरणीचा. 8 मे 1945 रोजी हिटलरच्या जर्मनीने महायुद्धात बिनशर्त शरणागती पत्करल्यावर जर्मनीचे हे जे दोन तुकडे पडले त्यामागे कुठलंही नियोजन, विचार, वाटाघाट नव्हती. प्रजेचं मानस जाणून घेण्यासाठी घेतलेलं सार्वमत (झश्रशलळीलळींश) नव्हतं की जनतेच्या इच्छेची कदर नव्हती. हिटलर हा समान शत्रू नाहीसा झाल्यावर युद्धात विजयी झालेल्या चार राष्ट्रांमध्ये मतभेद उफाळून आले. अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स एकीकडे आणि सोविएट रशिया दुसरीकडे अशा दोन फळ्या तयार झाल्या. ओडर आणि नाईसं ह्या नद्यांची एक सीमारेषा तयार झाली. ह्या रेषेच्या पूर्वेकडचे काही जर्मन प्रदेश जर्मनीपासून तुटले, काही हिटलरनं व्यापलेले देश स्वतंत्र झाले. म्हणजे ओडर- नाईसं या नद्या पूर्व जर्मन तुकडा आणि पूर्व युरोप यांच्यातली सीमारेषा झाल्या. ह्या रेषेच्या पश्चिमेकडे राहिले जर्मनीचे दोन्ही तुकडे. दोन्ही तुकड्यांची राजकीय विचारसरणी आणि अर्थव्यवस्था पूर्णपणे भिन्न होत्या. पश्चिमी तुकड्यात तीनही मित्रराष्ट्रे त्यांनी व्यापलेल्या आपापल्या विभागात सत्ता राबवत होती.
बर्लिन ही राजधानीही चार भागात विभागली गेली होती. बर्लिनची स्थिती पूर्व जर्मन प्रदेशानं वेढलेल्या बेटासारखी होती. 1948 च्या जूनमध्ये रशियानं बर्लिन पूर्णपणे बळकावण्याचा प्रयत्न केला. मुख्य पश्चिमी भूमीशी जोडणारे रस्ते वापरता येईनात. कोळशासकट सर्व जीवनावश्यक गोष्टी अखंड विमानवाहतुकीनं पुरवल्या गेल्या. दोन लाखांपेक्षा जास्त विमान उड्डाणं झाली.
मुळात हे तुकडे पडले कसे? बर्लिनच्या पूर्वेकडून येणार्या रशियन फौजांनी जमेल तेवढी पूर्वेकडची भूमी काबीज केली आणि पश्चिमेकडून येणार्या अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्स ह्या मित्रराष्ट्रांच्या फौजांनी जमेल तेवढी पश्चिम भूमी काबीज केली. आणि ह्या पूर्णपणे अनियोजित आणि आकस्मिक दुभंगातून त्या त्या प्रजेवर त्या त्या शास्त्यांची विचारसरणी थोपली गेली. प्रजेला तिचं वाहक व्हावंच लागलं. म्हणजे हा जाणीवपूर्वक केलेला वैचारिक संघर्ष नव्हता, विचारपूर्वक निवडलेली भूमी नव्हती, तर एका दुःसह विचारसरणीतून (नाझीवाद) दुसर्या लादलेल्या विचारसरणीत जाऊन पडण्याचा अस्मानी-सुलतानी घाव होता.
मात्र एकदा हा घाव पडल्यावर दोन्ही तुकड्यातली माणसं – काही खुशीनं, काही नाईलाजानं – त्या त्या विचारसरणीचं प्रतिनिधित्व करू लागली. अर्थात पश्चिमेकडचा तुकडा भाग्यवान. त्यांना भांडवलशाहीची, पण माणसाला बरंचसं स्वातंत्र्य देणारी लोकशाहीची विचारसरणी मिळाली होती. अमेरिका ही महासत्ता पाठीशी होती, कारण अमेरिकेला रशियाच्या विस्तारवादाला आणि साम्यवादाला टक्कर देण्यासाठी जर्मनभूमीचा उपयोग करून घ्यायचा होता. अमेरिकेनं मुख्यत: भांडवल दिलं आणि सर्व मित्रराष्ट्रांनी जर्मनीला वेगानं पुन्हा उभं राहायला मदत केली. पराभूत राष्ट्राला मिळणारी तुच्छतेची वागणूक पश्चिम जर्मनीला मिळाली नाही. उलट जर्मनीत आणि पश्चिम युरोपात मोठी औद्योगिक गुंतवणूक करण्यात आली. पश्चिमेची आर्थिक परिस्थिती दहा वर्षांतच एवढी सुधारली, की त्या प्रकाराला जगाच्या इतिहासात आर्थिक चमत्कार (एलेपेाळल ाळीरलश्रश) म्हणून गौरवलं जाऊ लागलं. पूर्वेला परिस्थिती याउलट होती. रशियानं पूर्व जर्मनीकडून युद्धखर्च वसूल केला. रशियन आदेशानुसार अर्थव्यवस्था चालवावी लागत होती.
पूर्वेकडच्या हुकूमशाहीसदृश राज्यातून माणसं बाहेर पडू लागली. त्यांची संख्या वाढतच होती. एवढ्या प्रमाणात माणसं देश सोडून जाण्यानं अर्थव्यवस्था कोसळू लागली. तेव्हा पूर्व जर्मनीनं ऑगस्ट 1961 मध्ये आपल्या बर्लिनच्या सीमेवर भिंत बांधली. पूर्व जर्मनांचे निसटून जाण्याचे सर्व मार्ग खुंटले. ही भिंत हे जणू खुलं, लोकशाहीचं पश्चिमी जग आणि समाजवादी-साम्यवादी दमनशाहीचं पूर्वेकडलं जग यांच्यातल्या भेदाचं प्रतीक झालं. जगभर हे प्रतीक मान्य झालं. जून 1963 मध्ये अमेरिकेचे जगभर लोकप्रिय असलेले अध्यक्ष जॉन केनेडी जर्मनीच्या भेटीवर आलेले असताना त्यांना भिंत दाखवायला आणण्यात आलं होतं. त्यांचं भाषण ऐकण्यासाठी लाखोंच्या संख्येनं बर्लिनकर आले होते. विली ब्रांट हे तेवढेच लोकप्रिय असे बर्लिनचे महापौर होते. त्यावेळी केनेडींनी ‘मीही बर्लिनकर’ हे त्यांचं सुप्रसिद्ध वाक्य उच्चारून बर्लिनकरांचं हृदय जिंकलं. मग सर्व बड्या पाहुण्यांना भिंत दाखवण्यासाठी आणण्याची प्रथाच पडून गेली. मात्र फ्रान्सचे अध्यक्ष दि गॉल हे जर्मनीत आलेले असताना त्यांनी मात्र भिंत पाहायला स्पष्ट नकार दिला.
एरीश फ्रीड ह्या जर्मन कवीनं याकडे सहानुभूतीची वसुली म्हणून पाहिलं. नाझींच्या छळछावण्यांच्या खालोखाल तिरस्करणीय गोष्ट म्हणून ही भिंत पाहिली जायला हवी, तिचा ‘टूरिस्ट स्पॉट’ होऊ नये असं त्याला वाटलं.
मित्रराष्ट्रांनी व्यापलेल्या पश्चिमी तुकड्याचं अधिकृत नाव होतं फेडरल रिपब्लिक ऑफ जर्मनी; इंग्रजी लघुरूप एफ.आर.जी. पूर्वेकडच्या समाजवादी-साम्यवादी तुकड्याचं अधिकृत नाव होतं जर्मन डेमोक्रॅटिक रिपब्लिक आणि इंग्रजी लघुरूप जी.डी.आर. शिवाय जर्मन भाषेतली लघुरूपं अजून वेगळी. दोन्हीकडे जर्मन / जर्मनी आणि रिपब्लिक हे शब्द समान आहेत. त्यामुळे कुठलं नाव कोणाचं या बाबतीत खूप माणसांचा गोंधळ होतो. आणि दोन्ही देशांमधील वैचारिक फरकाचा निर्देश नावांमधून होत नाही. म्हणून त्यांना ‘फ्रीबा’ आणि ‘फ्राबी’ अशी फारसा फरक नसलेली गंमतशीर नावं दिलेली आहेत.
ही भिंत उभी असेतोवर जगात शीतयुद्ध चालू होतं असं इतिहास सांगतो. 1988 सालच्या नोव्हेंबरमध्ये भिंत पडली आणि शीतसंघर्षही संपला.
अंजनी खेर
anjookher@gmail.com
जर्मन भाषेच्या निवृत्त प्राध्यापक. ‘केल्याने भाषांतर’, ‘मिळून साऱ्याजणी’, ‘पालकनीती’ इ. नियतकालिकांतून त्यांनी केलेली जर्मन कथांची भाषांतरे प्रसिद्ध झाली आहेत.
चित्र : मोहन देस
