अलका धुपकर
वीस ऑगस्ट 2013 ला नरेंद्र दाभोलकरांची हत्या झाली, त्याला आता 9 वर्षं पूर्ण झाली आहेत. अजूनही हत्या नक्की कुणी केली, त्यामागे कोणती विचारसरणी होती, याचा पत्ता लागलेला नाही; पण ज्या संस्थेशी संबंधित व्यक्तींना या प्रकरणात अटक झाली आहे, त्यावरून समजतंय, की विचारांना विरोध म्हणूनच ही हत्या झाली. दाभोलकरांच्या हत्येचा खटला पुण्याच्या सीबीआय कोर्टात सुरू आहे. महाराष्ट्रासारख्या प्रागतिक, पुरोगामी म्हणवणार्या राज्यात – लोकांना विचार करायला लावणार्या, एका अर्थी साध्यासुध्या म्हणजे कुणाशीही वैर नसलेल्या, विवेकवादी विचारांची आस्था बाळगणार्या, समाजाला अंधश्रद्धेच्या आणि जातीपातीच्या बेड्यांतून विज्ञानाकडे नेऊ पाहणार्या माणसाला सकाळी फिरायला गेलेले असताना गोळी घालून ठार केलं जातं, तसं करणार्याचा शोधही लागत नाही – असं का आणि कसं होतं? मग खुनाची मालिकाच सुरू होते. एक दाभोलकरच नाही तर गोविंद पानसरे, एम. एम. कलबुर्गी, गौरी लंकेश यांनाही याच पद्धतीनं ठार केलं जातं. तरीही दुनियेच्या बातम्या समाजाला देणार्या पत्रकारजगतातही याबद्दल मर्यादितच खळबळ उठते. काही वृत्तपत्रांच्या गटात तर ‘हू इज धिस दभोलकार? अॅन्ड हू इज धिस पनसारे? व्हाय सम पिपल आर बिहाइंड दीज ओल्डीज?’ अशी निर्गुण निराकार चर्चा होते. ‘आम्ही सारे दाभोलकर’चे मूक मोर्चे निघतात. ‘दक्षिणायन’सारखी चळवळ उभी राहते. पण जाणिवा-नेणिवा जागृत न झालेली अशीही एक तरुण पिढी आहे; ज्यांना याबद्दल फारसं काहीच माहीत नसतं. त्यांना दाभोलकर गेल्याच्या बातम्यांनी धक्का बसलेला नसतो – कारण दाभोलकर कोण, हे त्यांना माहीतच नसतं. खुनी सापडत नाही, यात त्यांच्या मते वेगळं काहीच नसतं; अशा अनेक मर्डर केसेस असतातच. ही राजकीय खुनाची केस आहे याची जाणीव अनेकांना आजही नाही.
काही पत्रकार मात्र अस्वस्थ झालेले असतात. ते पोलिसांकडे पुन्हा पुन्हा चौकशी करतात. अशी एक अलका धुपकर. खुनाच्या आधी दोन आठवडे तिनं दाभोलकरांची मुलाखत घेतलेली होती. ती या खुनाच्या बातमीनं हादरून गेली. त्या दिवशी पत्रकार म्हणून आणि पहिल्यांदा स्वत: एक व्यक्ती म्हणूनही ती त्या विरोधातल्या आंदोलनात सामील झाली. त्या दिवशी मुंबईत निघालेल्या मूक मोर्चातही सहभागी झाली. खुन्याच्या तपासाचा मुद्दा तिनं तिच्या पत्रकारितेच्या माध्यमातून लावून धरला. त्याबद्दलच्या बातम्या मिळवायला हिंडली, सोर्सेसना भेटली, माहिती जमा केली; आणि ते सत्य लोकांसमोर मांडलं, त्याबद्दल अनेक ठिकाणी व्याख्यानं दिली. एवढ्यावर तिचं मन भरलं नाही. तिच्या लक्षात आलं,
की दाभोलकरांबद्दल, त्यांच्या विचारधनाबद्दल, पुस्तकांबद्दल, कामाबद्दल इथल्या-अगदी महाराष्ट्रातल्या – तरुणाईला फारसं माहीतच नाहीय. नऊ वर्षांपूर्वी कदाचित शाळेत असणार ही मुलं आणि आता ती ऐकताहेत त्यांच्या खुन्याचा न लागलेला शोध. त्यात त्यांना रस नाही. त्या तरुणाईला दाभोलकरांची ओळख करून द्यायला हवी… म्हणून ती कामाला लागली. आपल्या आणखी पाच-सहा मैत्रिणींसह दाभोलकरांवर एक कलात्मक प्रदर्शन उभं करायला लागली. ह्यासाठी तिच्याजवळ असते ती तिनं गोळा केलेली माहिती आणि दाभोलकरांच्या लेखांमधून, पुस्तकांमधून मिळणारं वैचारिक धन. पण तेवढंच प्रदर्शन उभं करायला आणि गावोगावी न्यायला पुरेसं नाही; याचीही तिला जाणीव आहे. मुंबईच्या ‘जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स’च्या फाईन आर्ट्सच्या कलाकार विद्यार्थांच्या मदतीनं ती एक आगळं वेगळं ‘आर्ट इन्स्टॉलेशन प्रदर्शन’ उभं करते आहे. तिच्या काही मैत्रिणी तिला या कामात साथ देत आहेत. या प्रदर्शनात पोस्टर्स आहेत, इन्स्टॉलेशन्स आहेत. दाभोलकरांच्या पुस्तकांचंच एक इन्स्टॉलेशन करणार आहेत. असं प्रदर्शन तयार करावं आणि ते फिरवावं असं त्यांना का वाटलं आणि तरुणाईसाठी करत असलेल्या या उपक्रमात पालकनीतीच्या वाचकांकडून त्यांची काय अपेक्षा आहे असं आम्ही विचारलं; त्यावरचं अलका धुपकरांचं उत्तर तुमच्यापर्यंत पोचवत आहोत.
– संपादक

नाशिकला दाभोलकर व्याख्यानमालेच्या शंभराव्या व्याख्यानात मी बोलले. तेव्हा व्याख्यान संपल्यावर आयोजकांनी मला म्हटलं, की दाभोलकरांच्या कामाबद्दल सुरुवातीला थोडं बोलशील असं अपेक्षित होतं. मी म्हटलं ‘दाभोलकर व्याख्यानमाला असं ह्या व्याख्यानमालेचं नाव आहे, आणि शंभराव्या व्याख्यानात मी बोलत होते. त्यामुळे दाभोलकरांच्या कामाबद्दल पुन्हा सांगावं असं मला वाटलंच नाही. मी तपासात झालेल्या कमतरतांबद्दलच बोलले’. त्यानंतर एम.पी.एस.सी.ची मुलं मला भेटायला आली. ती म्हणाली, की दाभोलकर मर्डर केसमध्ये आम्ही दाभोलकरांचं नाव पहिल्यांदा ऐकलं. दाभोलकरांनी काय काम केलं आहे ते आम्हाला माहीत नाही. मला हे ऐकून खूप आश्चर्य वाटलं. खरं म्हणजे दाभोलकरांच्या मृत्यूनंतर आंदोलन झालं होतं. ‘आम्ही सारे दाभोलकर’ अशा टोप्या घालून लोक त्यात होते. ह्या सुरुवातीच्या काळात या विषयाला प्रसिद्धी मिळत होती; पण हत्येनंतर जो मोमेंटम होता, जो जोरा होता तो हळूहळू विरत गेला आहे. आणि आता त्या विषयाबद्दल प्रतीकात्मक आंदोलनं केली जातात. दक्षिणायनची मोहीम झाली, तीही पुरोगामी विचारांचं वारं ज्यांच्यापर्यंत पोचलं आहे अशा तरुणांनाच माहीत आहे. पुरोगामी चळवळीचं वारं न पोचलेल्या बहुतांशी पिढीला ते माहीत नाही (याला अपवादही आहेत). 2024 च्या निवडणुकीत ही पिढी पहिल्यांदा मतदान करणार आहे. या पिढीला विचार करता यायला हवा, ‘चार विचारवंतांच्या हत्या घडतात म्हणजे काय होतं’ हे त्यांना मतदान करताना समजायला हवं – असं आपण म्हणतो. ही मुलं तेव्हा आठवी ते बारावीत होती. आता तर मर्डर केसच्या बातम्याही साहजिकपणे कमी येतात. मग या मुलांना ‘दाभोलकरांनी काय सांगितलंय’ हे समजायला आपण काय करू शकतो… असा विचार माझ्या मनात आला. दाभोलकरांचे विचार मला महत्त्वाचे वाटतात; ते सर्वांना, विशेषत: तरुणाईला समजायला हवेत असं मला वाटतं. त्यांची आणि माझी वैयक्तिक ओळख कामानिमित्ताने आणि तेवढीच झाली होती. सातार्यामध्ये त्यांची गाठ पडली होती. सातार्यामध्ये आशा शिंदे हिचा तिच्या वडिलांनीच खून केला होता, 2012 साली. खोट्या प्रतिष्ठेसाठी घेतलेला हा बळी होता. या बातमीच्या निमित्ताने मी दाभोलकरांना सातार्यात भेटले. ‘जात हीच अंधश्रद्धा आहे’ या वाक्यानेच त्यांच्या प्रतिक्रियेची सुरुवात झाली होती, हे मला चांगलंच स्मरतंय.
मी 2018 साली कोची आर्ट बिनालेला गेले होते. तिथे अनेक विषयांची प्रदर्शनं होती. आपल्याला जे प्रश्न पडतात, त्यावरची प्रतिक्रिया असलेल्या कलाकृती केलेल्या मी पाहिल्या. हिंदू मुस्लिमांमधल्या वैराचे प्रश्न, एलजीबीटीक्यू यांच्या बाबतीत होणार्या भेदभावाचे प्रश्न आपल्याला पडत राहतात. तिथे या विषयांची वेगवेगळ्या प्रदर्शनांमधून मांडणी केलेली होती. लोकांचा स्वातंत्र्याचा मुद्दा, समान हक्काचा मुद्दा, मजुरांवरच्या अत्याचाराविरुद्ध केलेलं काम, एका ट्रान्सजेंडरची हत्या झाली होती त्यावरचं एक प्रदर्शन होतं. न्यूजपेपरचा, चित्रांचा, ऑडिओचा वापर त्यात होता. सिस्टर लायब्ररी म्हणून एक इन्स्टॉलेशन होतं. पुस्तकांचंच इन्स्टॉलेशन होतं… तिथला विषय वेगळा होता. स्त्री-स्वातंत्र्य, समता अशा विषयावरची पुस्तकं घेऊन तो केलेला होता.
कलामाध्यमातून केलेला तो देखणा जागर माझ्यासाठी डोळे उघडणारा आणि एक ‘लिबरेटिंग एक्स्पिरियन्स’ होता. तिथे माहिती नव्हती, शब्द न वापरता हे साधलं होतं. नाशिकपासून माझ्या मनात तरुणांना दाभोलकरांबद्दल सांगणं होतं. आणि ते मांडायची भाषा आर्ट बिनालेत आधी मी जे पाहिलं होतं त्यातून मला सुचली. त्याच दिवशी ‘मला काय वाटतं आहे’ ह्याचा मी एक खर्डा तयार केला आणि तो मैत्रिणींशी शेअर केला. त्यांचाही उल्लेख महत्त्वाचा आहे – दीप्ती राऊत, विद्या कुलकर्णी, संयोगिता ढमढेरे, प्राजक्ता धुळप आणि अश्विनी कुलकर्णी. त्यांनी माझा विचार समजून घेतला. त्या विचाराला आकार देण्यासाठी मग आम्ही एकत्रच प्रयत्नशील राहिलो.

मुक्ता-हमीदशी म्हणजे दाभोलकरांच्या कुटुंबीयांसोबतही हा विचार शेअर केला. कारण त्यांच्या काही व्यक्तिगत चीजांचा उपयोग प्रदर्शनात करायचा विचार होता. हमीदने सुचवल्यानुसार कोल्हापूरला सुनील लवटे सरांना जाऊन भेटले, त्यांचा या विषयातला अनुभव मोठा आहे. त्यांनी या विषयाला अजून खोली दिली. नवीन मुद्दे सांगितले. मग त्यांनी सुचवल्याप्रमाणे जे. जे. आर्ट्सच्या डीन सरांना भेटले. त्यांनी खूपच सहकार्य दिलं; दाभोलकरांचं व्यक्तिमत्त्व, कार्य आणि विचार या विषयावर मुलांना काम करायची परवानगी दिली. हे काही सोपं नाही हे तुम्ही जाणता. मग आम्ही जवळपास 30 मुलांच्या सोबत या प्रदर्शनाचं काम करायचं ठरवलं. ह्यात फाईन आर्ट्सच्या सर्व विभागांची
म्हणजे टेक्स्टाईल्स, स्कल्प्चर, पेटिंग, म्युरल इत्यादी सगळ्या विभागातली
मुलं आहेत. त्यापैकी बहुसंख्य महाराष्ट्राबाहेरची आहेत; त्यांना दाभोलकरांबद्दल फारसं काहीही माहीत नव्हतं. मी त्यांच्याशी बोलले, इंटरनेटवरून मटेरियल दिलं, त्यांना पुस्तकं वाचायला सुचवली. मला आश्चर्य वाटतं आणि कौतुकही, की त्या मुलांनी हा विषय समजून घेतला आणि त्यावर काम सुरू केलं.
ह्या प्रदर्शनात पंधरा पेटिंग्ज आहेत, अनेक इन्स्टॉलेशन्स आहेत. आजच्या तरुणांची भाषा व्हिज्युअल आहे. त्यानुरूप मुलांनी काम केलं. त्यांना शब्द कमी वापरायचे आहेत. त्यांच्या कल्पना आहेत, प्रतिभा आहे ती या प्रदर्शनातल्या प्रत्येक गोष्टीत दिसते. शिवाय, दाभोलकरांच्या हत्येच्या वेळी चळवळीसोबत ते ज्या प्रकल्पावर काम करत होते तो होता ‘जोडीदाराची विवेकी निवड’, त्यावरही ह्यात मांडणी आहे. हा विषय विशेषत: तरुणांसाठी आहे, तो इथे असायला हवा. दाभोलकरांची पुस्तकं, कामाची माहितीही दिलेली असेल, पण कमीतकमी शब्दात. मुलांच्या मते शब्दांचा वापर नको; ही कलेची भाषा आहे. तिची ताकदच अशी असते की ती मनापर्यंत पोचते. विचार करायला भाग पाडते. जेव्हा बोलू दिलं जात नाही, तेव्हा विचार पोचवण्याचं काम कलेतून होतं. दाभोलकरांनाही बोलू दिलं गेलं नाही, त्यांना मारून टाकून त्यांचा आवाज दडपला गेला. या प्रदर्शनाला नाव माझ्या मैत्रिणींनी सुचवलं, इंग्रजीत ‘वी आर ऑन ट्रायल’, आणि मराठीत ‘कसोटी विवेकाची’.
काही लोकांनी मला म्हटलं, की ‘कॉलेजच्या मुलांना कशाला घेता, त्यापेक्षा मोठ्या कलाकारांना घ्या, दाभोलकरांना ओळखणारे खूप लोक आहेत.’ पण मला वाटतं, हे प्रदर्शन तरुणाईसाठी आहे. ती कला त्यांच्याच विचारातून घडली तर जास्त परिणामकारक ठरेल, शिवाय आर्थिक गणितातही बसू शकेल. हे प्रदर्शन एकदा करून पुरणार नाही, ते अनेक ठिकाणी न्यायला हवं. असं नेण्याजोगं असेल. टिकेल असं, वजन फार होणार नाही, हाताळून खराब होणार नाही – असं असायला हवं. यशवंतराव चव्हाण सभागृहात पहिला कार्यक्रम 28 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर असा ठरवला आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकरांची जयंती 1 नोव्हेंबरला असते.
याआधी आम्ही अनेक इतर जागांचाही यासाठी विचार करून पाहिला; पण केवळ ‘एलिट’ म्हणवले गेलेले लोकच नाही, तर सर्वसामान्य लोक येऊ शकतील, प्रदर्शन मांडण्याची सोय करता येईल आणि परवडेल अशा हेतूंनी हा निर्णय घेतला. यामध्ये खर्चाची व्यवस्था लोकसहभागानं करायची आहे. आजही सुरुवातीच्या कामांना लागणारे पैसे आमच्याकडे नाहीत. कलात्मक प्रदर्शन करायचं म्हणजे रंग, मानधन, मटेरियलचा खर्च, जागेचं भाडं, वाहतूक खर्च ह्या सगळ्याचा विचार करावा लागणार. पहिल्या प्रदर्शनाकरता या सगळ्याचा किमान खर्च सहा लाखांचा आहे. माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे, की दाभोलकरांनी आपल्यासाठी इतकं काही करून ठेवलंय, ते तरुण मुलांमुलींपर्यंत पोचवायला तुम्ही आम्हाला मदत करा.
हे पैसे ‘परिवर्तन ट्रस्ट’ या रजिस्टर्ड संस्थेच्या अकाउंटमध्येच जातील. तुम्हाला तुम्ही दिलेल्या डोनेशनबद्दल 80ॠ ची सूट मिळेल. तुमच्या पैशाचा दुरुपयोग होणार नाही. त्या पैशाचा हिशोब तुम्हाला मिळेल. आमचा हेतू एवढाच आहे, की दाभोलकरांचा विचार ज्या पिढीपर्यंत पोचला नाही, तिथे नेण्याचा प्रयत्न कलेच्या माध्यमातून करणं. महाराष्ट्रातल्या प्रत्येक शहरापर्यंत तर जायलाच हवं; पण भविष्यात दिल्ली, पंजाब, केरळ आणि तामिळनाडू इथेही जायला हवं.
अलका धुपकर
alaka.dhupkar@gmail.com
प्रगतीशील व संवेदनशील पत्रकार. TOI Plus ह्या डिजिटल आवृत्तीच्या साहाय्यक संपादक.
परिवर्तन ट्रस्ट ह्या संस्थेला देणगी देण्यासाठीचा तपशील :
बँकेचे नाव – IDBI BANK, सातारा A/C,
संस्थेचे नाव – परिवर्तन (व्यसनमुक्ती संस्था)
A/C NO – 45110010956448
IFSC CODE – IBKL0000451
कृपया देणगी दिल्यावर अलका धुपकर ह्यांना व्हॉट्सपवर (9930360543) खालील माहिती कळवावी.
1. देणगीदाराचे पूर्ण नाव
2. आधार क्रमांक
3. पॅन कार्ड नंबर
4. संपर्कासाठी पत्ता
5. चेक क्रमांक / ऑनलाईन पैसे पाठवल्यास UTR
6. पैसे पाठवल्याची तारीख
7. देणगीची रक्कम
