प्रीती पुष्पा-प्रकाश

आपल्याला शांतिप्रिय आणि न्याय्य समाज निर्माण करायचा आहे. तसं असेल तर माणसामाणसात दुही निर्माण करणार्‍या सगळ्याच गोष्टींना फाटा कसा द्यायचा हे आपल्याला या क्लिष्ट जगात शोधायलाच लागेल. आणि त्याची सुरुवात कुटुंबापासून करायला हवी कारण आपलं कुटुंब निदान आपल्या हातात आहे.

अख्खं जग एकीकडे आणि ज्यांच्यासोबत एका छताखाली राहतो ती बोटावर मोजण्याइतकी माणसं एकीकडे! ह्याच लोकांशी जास्त भांडणं होतात. ह्याच माणसांच्या अडीनडीला आपण उभे राहतो. ह्याच माणसांसमोर आपण अगदी आपल्याला हवं तसं, जसं असतो तसं, असू शकतो आणि हीच माणसं कुठल्या प्रसंगात कशी वागतील हे आपल्याला अनुभवानं नेमकं माहीत असतं. यांच्याबरोबर राहत असूनही चोवीस तास आपण यांच्यासोबत नसतो. तरीही आपण आपल्या सर्वाधिक हळव्या आणि नाजूक प्रसंगात यांच्यासोबतच असतो. आनंदातही हेच असतात आणि दुःखातही हेच असतात. हेच आपलं पाठबळ असतात आणि हेच आपली कमतरताही.

या कुटुंबातही अनेक प्रकारे हिंसा घडत असते; पण ‘शांती’ अबाधित असते (आणि उपहासही!) आपल्यापैकी काहीजण खर्‍या अर्थानं शांती नांदावी यासाठी कुटुंबपातळीवर अनेक लहान-मोठ्या कृती करत स्वतःला आणि कुटुंबाला अधिक प्रगल्भ करत जातात. काहींना त्याची गरजही वाटत नाही, तर इतर काहींना त्यावर काम करण्यासाठी वेळच नसतो. काहींना आवश्यकता वाटत असते, वेळही असतो पण काय करावं हे न समजून त्यांना अगदी कोंडीत सापडल्यासारखं होत असतं. हिंसा आणि शांती यावरच्या उपायांच्या दृष्टिकोनामध्ये इतकी विविधता दिसते तर प्रत्यक्ष हिंसेत आणि त्या अनुषंगानं येणार्‍या शांतीमध्ये किती विविधता दिसेल.  

मला असं दिसतं, की इथल्या हिंसेची सुरुवातच मुळी लग्नसंस्थेपासून होते. सध्याच्या आपल्याकडे अजूनही प्रचलित असलेल्या पितृसत्ताक पद्धतीविषयी मी बोलतेय. युद्ध करताना रक्ताची नाती सोबत असावीत आणि निर्माण केलेल्या सत्तेचा आणि मालमत्तेचा वारस नेमका ठाऊक असावा यातून उदयाला आलेली लग्नसंस्था स्त्रियांना मुळापासून उपटून नव्या जागी रुजवण्याचा प्रयत्न करते. अर्थातच शरीरानं जरी हे होत असलं, तरी मनानं मुली मुळापासून कशा उपटल्या जाणार? त्याहून प्रश्न असतो, नव्या जागी रुजण्याचा. तेही व्हायला बरीच वर्षं जायला लागतात. मुलीनं (किंवा मुलानं) स्वतःचं घर सोडून दुसर्‍या घरी राहायला लागणं ही पायरी मुळातच हिंसक आहे असं मला वाटतं. मग यात शांतीचा मार्ग कुठला असू शकतो, तर दोघांनी मिळून नवा संसार, नव्या जागी थाटणं. नोकरी-व्यवसायाच्या निमित्तानं हे घडतंही. किंवा मुद्दामही घडवून आणलं जातं. यात त्यातल्या नवरोबाच्या आईवडिलांचं काय हा प्रश्न समोर असतोच. त्याचाही विचार शक्य असलं तर केला जातो; पण मुलीच्या आईवडिलांचा असा विचार करायचं काही कारणच संबंधितांना वाटत नाही. ती मुलीच्या माहेरघरातल्या मुलग्यांचीच (असला तर) जबाबदारी मानली जाते. मग फक्त मुली असलेल्या पालकांनी काय करायचं? तेच मुलगे असलेल्या पालकांनाही करावं लागणार, हे ओघानंच येणार नाही का? अजून एक शक्यता अशी आहे, की दोन्हीकडच्या कुटुंबीयांनी जवळपास घरं घेऊन राहणं. प्रत्यक्षात हे वेगवेगळ्या कारणांमुळे नेहमीच शक्य होईल असं नाही; पण पर्याय म्हणून हा विचार करायला हवा. एकेकच मुलगा आणि मुलगी असतील तर शक्य होईलसुद्धा; मात्र जास्त भावंडं असणार्‍यांनी काय करायचं, असा प्रश्न राहतोच. अशा प्रकारे पर्यायांची चर्चा करत गेलो तर लक्षात येईल, की प्रत्येकच पर्यायात काही ना काही फायदा-तोटा आहे, किंतु-परंतु आहेत. प्रत्येकाला शक्य होईल आणि म्हणून मान्य होईल असे पर्याय ज्याला त्यालाच आपापले सुचू शकतील. समाजानं आत्तापर्यंत आखून दिलेली ‘मुलीनं सासरी जायची’ घडी मोडून आपण वेगळ्या घड्या घालण्याची मनातून आणि मनापासून तयारी दाखवू तेव्हा हे शक्य व्हायची शक्यता आहे.    

लग्न झाल्यावर अपरिहार्य मानली गेलेली बाब म्हणजे मुलीनं नव्या कुटुंबात सर्व अनोळखी लोकांसोबत आणि त्यांच्या खाण्यापिण्याच्या, कपड्यांच्या, वागण्याच्या सवयींसोबत जुळवून घेणं. मुळात लग्न नवीन, घर नवीन अशा वेळी ‘आपल्या घरात अशीच पद्धत आहे,’ या नावाखाली अनंत नव्या पद्धती तिच्या गळी उतरवल्या जातात. आजवरच्या आयुष्यातल्या तिला आवडत असलेल्या गोष्टींचं काय असा प्रश्न ना तिला विचारला जातो, ना ती सांगू शकते. बदल दोघांच्याही जीवनात होत असतात; पण ‘होमपिच’वर असलेला नवरा या बदलाला लवकर सरावतो. आत्तापर्यंत घरातल्यांनी त्याचेच हट्ट ऐकले असतील, तर नवीन आलेल्या व्यक्तीनंही कुटुंबातल्या इतरांप्रमाणेच आता माझं ऐकायची सवय करून घ्यायला हवी, अशी तो अपेक्षा करतो.

हे लिहितानाही वाईट वाटतंय, पण अजूनही बर्‍याच घरांमधून बाबानं ओरडून बोलायचं आणि आईनं निमूट ऐकून सहन करायचं हे चित्र दिसतं. ‘जरा पडती बाजू घेतली म्हणून काय बिघडलं?’ करत भांड्याला भांडं लागून आवाज होऊ नये म्हणून स्त्रियांनीच उलटून न बोलणं, शांतपणे ऐकून घेणं, घुसमट झाली तरी आपलं आपण निस्तरणं अशी कुटुंबाची किमान अपेक्षा तरी असतेच असते. हे बघत मोठे झालेले मुलगे कदाचित लहानपणी आपल्या आईसाठी सहृदयतेनं रडले असले, तरी ‘आपली बारी’ आल्यावर बाबाप्रमाणेच नकळत वागू लागतात. काही ओरडून बोलणारे पुरुष त्यांच्या आरडाओरड्याचं समर्थन करताना दिसतात. तर काही त्याची तुलना स्त्रियांच्या रडण्याशी करतात. ‘तुम्ही रडलेलं चालतं, मग आम्ही का नाही ओरडायचं?’ असा सवालही करतात.

नव्यानं घरात आलेली बायको सोईस्कररित्या कधी घरची असते तर कधी परकी. सासू, सासरे, दीर, नणंद यांचं करताना तिनं मायेनं करायचं; पण तिच्या मानसिक, आर्थिक गरजा पूर्ण करताना मात्र शेवटी ती परकीच! आजही लग्न झाल्यानंतर मुलीनं नाव बदलणं हे स्वाभाविक असतं. अगदी आडनावांची यादी नावामागे लागली तरी. म्हणजे रश्मी सोमाणी जाधव किंवा प्राजक्ता कुलकर्णी पाटील अशी; पण लग्न झालं म्हणून नाव बदलणारे नवरे कुठे दिसत नाहीत. त्यांनी नाव बदलावं अशी अपेक्षा नाहीए; पण स्त्रियांनी नाव बदलायला हवं ही अपेक्षा थांबवण्याची गरज वाटते. नाव न बदलणार्‍या स्त्रिया चक्क क्रांतिकारक ठरतात.

लग्न झालं की ‘मूल कधी होणार?’ हा प्रश्न अतिशय कल्पकपणे विचारण्याचं सगळ्यांनाच स्वातंत्र्य मिळतं. जणू काही मूल जन्माला घालण्यासाठीच त्यांनी लग्न केलेलं असतं. एके काळी हे खरं असलं, तरी आत्ताच्या घडीला ते तसं नाहीए. त्यातही हा प्रश्न स्त्रियांनी स्त्रियांना विचारणं हे स्त्रियांनी पुरुषांना किंवा पुरुषांनी पुरुषांना विचारण्याच्या तुलनेत खूप जास्त घडतं. मूल होणं ही त्या नवराबायकोची खाजगी बाब आहे. त्यांनी ते ठरवायचं आहे. त्यांना गरज असली, आईवडिलांची मदत लागणार असली तर कराल का, असं ते स्पष्ट विचारतील. आईवडिलांनीही जबाबदारी घेऊ किंवा घेणार नाही अशी जी काय असेल ती स्पष्ट भूमिका घ्यावी. काहींना नातवंडांचं करणं आवडणारं असू शकतं तर काहींसाठी नकोसं. आणि त्यात काहीच वावगं नाहीए. फक्त विचारांची स्पष्टता आणि स्पष्ट संवाद दोन्हीही महत्त्वाचं. 

नवरा-बायकोचा सहवास हा प्रत्येक वेळी प्रेमातून जन्माला आलेला असतो, की फक्त पुरुषाच्या हव्यासातून ही तपासून पाहायची गोष्ट आहे. आताच्या आधुनिक जगात, स्त्री-पुरुष संबंधांमध्ये ज्या ‘कन्सेंट’बद्दल (संमती) बोलले जाते, तो लग्नाअंतर्गत संबंधांत गृहीत धरून टाकलाय का? लग्नाला ‘हो’ म्हटलंय म्हणजे प्रत्येक संभोगाला, शरीरसुखाच्या प्रत्येक कृतीला एकदाच काय ते ‘हो’ म्हणून टाकलंय का? यात प्रत्येक वेळी स्त्रीच होरपळते असं नाही; पण तिच्याविरुद्ध गोष्टी घडण्याचं प्रमाण खूप जास्त आहे. ही लैंगिक हिंसा थांबवायला तर कोणी उपलब्धही नसतं. नवरा-बायकोच्या या भांडणात शहाणी माणसं कशी पडणार? लग्नानंतरही लैंगिक कृती करताना एकमेकांना संमती विचारली जायला हवी, ती गृहीत धरता कामा नये.                 

‘पोटात मुलगी आहे’ म्हणून बायकोचा / सुनेचा गर्भपात करवून घेणारे लोक, या विषयावर इतक्या चर्चा, चर्चासत्रं, लेख आणि काय काय होऊनही अजूनही अस्तित्वात आहेत आणि तो करण्यासाठीच्या वैद्यकीय सुविधाही; आणि ह्या दोन्हीसाठी कारणीभूत असलेली समाजव्यवस्थाही. वेगवेगळ्या कारणांसाठी ‘आत्ता मूल नको’ असं त्या गर्भाच्या निर्माणकर्त्यांना वाटू शकतं. खास करून त्यामुळे आयुष्यभरासाठी बंधनात अडकणार्‍या स्त्रीला असं वाटणं शक्यच आहे आणि तिच्या या भावनेचा तिच्या साथीदारानं (तो नवरा असला तरी) आदर करणं आवश्यकही. त्यासाठी गर्भ टाळण्याच्या अनेक पद्धतींशिवाय इमर्जन्सी गोळी आहेच आणि तरीही गर्भ राहिलाच, तर गर्भसमापन गोळीही आहे; पण मूल लिंगानुसार असावं की नसावं हे ठरवण्याचा आग्रह मात्र हिंसकच आहे. तो आग्रह बदलायचा तर कायदा असला, तरी ‘मुलगी म्हणजे पराया धन आणि मुलगा म्हणजे म्हातारपणची काठी’ हा दृष्टिकोण बदलल्याशिवाय त्या कायद्याचा खरा उपयोग होणार नाही. ही हजार वर्षांची आपली मानसिकता काहीशे वर्षांत बदलणं आपल्याला अवघड जातंय. आणि जे अवघड जातंय त्यावर अधिक जोर लावून प्रयत्न करायलाच लागणार आहेत.                  

एक बदल मात्र आपल्या समाजात घडला आहे, त्याचाही उल्लेख करायला हवा. नव्या बाळाचं नाव ठेवण्यात हल्ली खूप वैविध्य दाखवलं जातं. पूर्वी त्या नावात धर्मच नाही तर जातही दिसायची. म्हणजे पुढे त्याला हिंसा भोगावी लागेल की करावी लागेल हे त्याच्या जन्मानं ठरूनच जायचं. तसं आता होत नाही. नव्यानं आलेल्या जागतिक नावं देण्यामागे मुख्यतः नावीन्याचा विचार असला, तरी त्यानं झाला तर फायदाच होईल. रशियन नावाची मिशा, वनस्पतिशास्त्रातील कारवी, बॉलीवूडमधून आलेली सिमरन वरकरणी तरी कोणत्या जाती-धर्मात जन्माला आल्या आहेत हे पटकन लक्षात येत नाही. आणि नावासारखी गोष्ट आर्थिक स्तरांमधून सहज पसरते त्यामुळे काही काळातच ही नावं सगळीकडे दिसू लागतात.

आजच्या समाजात माणसाची ओळख कळण्यासाठी निदान त्रिनाम पद्धत लागते. उदाहरणार्थ प्रीती नावाच्या माझ्या ओळखीतच पंधरा जणी आहेत. पुण्यात पाचशे आणि भारतभरात पन्नास हजार प्रीती असतील. त्यातल्या प्रीती पुष्पा किती असतील? आणि प्रीती पुष्पा प्रकाश? तेव्हा आपल्या अस्तित्वातल्या न बदलणार्‍या आणि आपल्या असण्याशी निगडित असलेल्या गोष्टी या त्रिनामात असल्या तर ते रास्त ठरेल. यासाठी आईवडिलांची पहिली नावं आपल्या पहिल्या नावासोबत घेऊन रचना करता येते. ह्या रचनेचा फायदा असा होतो, की या गोष्टी लग्न केलं म्हणून बदलत नाहीत. सुरुवातीपासून ही पद्धत वापरणार्‍यांनी या विषयावर लेखही लिहिलेले आहेत. त्यातून जात, धर्म, आर्थिक स्तर नष्ट होण्याची सुरुवात तरी होईल अशी आशा वाटते. आत्ता प्रीती पुष्पा प्रकाश या व्यक्तीचा धर्म सामान्यपणे कळत असेल; पण एकदोन पिढ्यांनंतर यात बदल होऊ शकेल. समजा हे नाव सिमरन अर्वा शमिन असं असेल, तर ते कुठल्या जातीधर्माचं आहे हे त्यातून दिसणार नाही.              

आपल्याकडे खरं तर जन्म दाखल्यावर जात विचारलेली नसते. इतरत्र समजा विचारलीच, तर आम्ही कुठलाच जात-धर्म मानत नाही, असं विचारणार्‍याला सांगता येतं. वर उल्लेखलेल्या पद्धतीत एक तोटा असा जाणवतो, की विशिष्ट कुटुंबाशी नातं सांगणारं आडनाव नसल्यानं काही पिढ्यांनंतर आपल्याला कोण कोणाचे वंशज आणि पूर्वज असं ओळखणं अवघड जाईल. अर्थात, पूर्ण नावं लक्षात ठेवून ते करता येईलच. स्त्रियांबाबत तर आजही ते होतंच की. समाजातून जात-धर्म पुसून टाकून माणसांनी माणसांशी माणसांसारखं वागणं हे शक्य होणार असेल, तर एवढा तोटा सहन करायला काय हरकत आहे!

आमच्या मुलाचं नाव आम्ही सुहृद प्रीती-अश्विन असं ठेवलं आहे. त्यात प्रीती-अश्विन हे त्याचं आडनाव म्हणून लावतो; त्याला मधलं नाव नाहीए. त्रिनाम पद्धतीमध्ये अनेक वेगवेगळे प्रकार करता येऊ शकतील आणि लोक करत आहेत. आडनाव मागे पडून त्याला चिकटलेली जात आणि धर्म गळून पडणं आणि माणूसपण आपल्यात आणि आपल्या मुलांमध्ये रुजणं ह्या उद्देशानं केलेले सर्व प्रयत्न कौतुकास्पदच आहेत. आडातूनच काढून टाकल्यावर पोहर्‍यात येण्याचा संभव कमीच असेल. जातिविषयक, धर्मनिहाय शब्द, उल्लेख वापरणं आपल्या बोलण्यातून संपुष्टात येतंय ना याकडे आपलंच लक्ष असायला लागणार आहे. आणि तरीही आपली मुलं हे कुठे ना कुठे तरी ऐकतील आणि आपल्याला येऊन प्रश्न विचारतीलच. मग धर्म म्हणजे काय, हे सांगताना काय आणि कसं सांगायचं याचा विचार आधीच करून ठेवणं गरजेचं आहे. आपलं-परकं न करता, एका भौगोलिक भागात राहणार्‍या लोकांचे असलेले वागण्याचे समान नियम असं सोपं सुटसुटीत चित्र आपण मुलांना शांतपणे दाखवू शकलो, तर धर्मांध जनतेच्या दंगलींतील फोलपणा मोठं झाल्यावर त्यांना सहजच लक्षात येईल.

विभक्त कुटुंब, आपल्या आप्त-स्वकीयांपासून दूर राहायला गेलेलं कुटुंब यातून एकटी स्त्रीच नाही तर कुटुंबातले सगळेच मुळापासून उपटले गेले आहेत असं चित्र दिसतंय का? कदाचित हो. पण त्यातूनच एका नव्या ‘सपोर्ट सिस्टीम’चा उदय होईल आणि आपली सामाजिक शांततेकडे वाटचाल होईल अशी शक्यता वाटते. कुटुंबातील लहान मुलं, म्हातारी माणसं, आजारी व्यक्ती अशा, दुसर्‍याची सातत्यानं मदत लागणार्‍या माणसांसाठी अशी विभक्त कुटुंबं आजही दुसर्‍यावर अवलंबून राहणारच आहेत. ज्यांच्याकडे पैसा आहे, ते सगळ्या सेवा खरेदी करू शकतीलही; पण त्यात कुठे तरी प्रेम, विश्वास कमी पडतोय हे जाणवतंच. अशा वेळी प्रत्येक निर्णयात पायात पाय न घालणार्‍या पण अडीनडीला उभं राहणार्‍या, जवळपास राहणार्‍या शेजारी, नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींचा असा एक मिश्र गोतावळा तयार होतो. हा गोतावळा पुरेसं स्वातंत्र्यही देतो आणि मूल वाढवायला लागणारं गावही. आणि समाजाला आवश्यक असलेली सहिष्णुताही.

आपल्याला शांतिप्रिय आणि न्याय्य समाज निर्माण करायचा आहे. तसं असेल तर माणसामाणसात दुही निर्माण करणार्‍या सगळ्याच गोष्टींना फाटा कसा द्यायचा हे आपल्याला या क्लिष्ट जगात शोधायलाच लागेल. आणि त्याची सुरुवात कुटुंबापासून करायला हवी कारण आपलं कुटुंब निदान आपल्या हातात आहे. इतर अनेक ठिकाणी निर्णयाधिकार आपल्यापासून खूप दूर असला तरीही!

प्रीती पुष्पा-प्रकाश

jonathan.preet@gmail.com

पूर्णवेळ आई. मिश्र संस्कृतीतील मूल आनंदाने वाढवत आहेत. पर्यावरण, जैवविविधता, उत्क्रांतिशास्त्र, भाषा हे त्यांच्या आवडीचे आणि अभ्यासाचे विषय आहेत.

चित्रे : अनंत डेरे